Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..

10/15/11

नव्यानं..

    पुन्हा सारं काही समजू घेऊ पाहते आहे नव्यानं.. " आयुष्य सुंदर असतं " यावर विश्वास ठेऊ पाहते आहे पुन्हा एकदा.. एखादी छोटीशी जरी तिरीप आली उजेडाची तरी घट्ट धरून ठेवते आहे तिला, उद्याच्या प्रकाशाची आण घालत..  पुन्हा एकदा स्वत:कडे नव्याने पाहते आहे, स्वत:ला समजून घेते आहे आणि हळूहळू स्वीकारू पाहते आहे स्वत:ला सर्व खाणाखुणांसकट, चुकांसकट, दोषांसकट आणि हो, नव्यानेच जाणवलेल्या चांगुलपणासकट.. आणि प्रयत्नही चालूच आहेत स्वत:वर प्रेम करण्याचे..
    सगळंच शिकावं लागतेय रे पुन्हा एकदा.. एखाद्या खोल गर्तेतून सुदैवानं जिवंत बाहेर यावं, पण सर्वच हरवून जावं, विसरून जावं तसं काहीसं झालं आहे.
   आता पुन्हा अस्तित्वाचे सारे उरलेसुरले अवशेष गोळा करून स्वत:ला घडवायचंय.. काही तुकडे घासूनपुसून घ्यायचे तर काही तसेच...त्यातूनच नवीन घडेल काहीतरी..
   सगळंच शिकतेय नव्यानं.. म्हणजे अगदी  सकाळी जाग आल्यावर  बेडवरून  खाली  उतरताना  स्वत:च्या  पायांवर भार द्यायचा,  मग हळूहळू खोल श्वास घेत ,  थंड फरशीचा स्पर्श अनुभवत पावलं  टाकायची.. इथपासून ते भरकटणाऱ्या मनाला रट्टे देऊन ताळ्यावर आणायचं इथपर्यंत..!
    आणि मग शेवटची आणि अवघड गोष्ट म्हणजे ' तुझ्या विचारांत न हरवणं '.. तसे तुझे विचार हक्कानं ठाण मांडूनच बसलेले असतात.. त्यांना हाकलून द्यायचं म्हणजे जिवावर येतं पण करायलाच हवं ना..?? तुझ्या आठवणींचा कापूस पिंजून पिंजून ढीग पडतो. मग त्यांच्या वाती वळून मी पेटवून ठेवते त्यांना माझ्या हृदयाच्या खोबणीत.. जळत राहतात बिच्चाऱ्या रात्रनदिवस आणि मीही त्यांच्यासोबत..
     मग कधी मोकळ्या रस्त्यावर गाडी सुसाट पळवावी वाटते, खूप जोराचा वारा तोंडावर घ्यावा, कधी पाउस असला कि त्या सरींमध्ये चिंब भिजावं आणि अशा बेभान क्षणी तरी तुला विसरून जाऊन तुझ्याशिवाय जगावं असं फार फार वाटतं रे... पण शेवटी माझे सारेच प्रयत्न असफल होतात तुझ्या चिवट आठवणींपुढे...
     मग कधी आशा पल्लवित होते. तुला पण येत असेल का चुकून माझी आठवण..? तुझ्या कट्टर निर्धाराची नजर चुकवून एखादा हळवा क्षण घेऊन येतो का रे तुझ्या मनात  कधी माझी आठवण..? किंवा चुकूनच कधीतरी, एखाद्या भाववेड्या सायंकाळी तू तुझे सारेच क्षण उधळून टाकतोस कारे माझ्यासाठी..?
         बघ पुन्हा चुकले, पुन्हा तुझ्यामध्ये वाहवत गेले... तुझ्याशिवाय विचार करायलाही शिकावंच लागेल नव्यानं..!!

    
  

सारांश..

   या एकाकी निर्जन प्रदेशात नव्यानेच आलेय.. अजूनही सरावलेले नाहीत माझे डोळे अन मनही या अनोळखी अंधाराला..! अजूनही चाचपडणं चालूच आहे..  हो, पण जिद्द मात्र आहे शाबूत पुन्हा नवी सुरुवात करण्याची.. त्यावरच तर टाकलाय सारा भरवसा उद्याचा..!
       चालत राहते, ठेचकाळते, खुरडत राहते, पुन्हा उभी राहते, चालत राहते, अडखळते, थांबते, पुन्हा सुरुवात करते... हा माझ्या अस्तित्वाचा सारांश..
       पूर्वी भ्रम होते बरेचसे सोबत, पण जसा सूर्य येऊ लागला माथ्यावर, तसे वितळत गेले सारेच.. बाष्प बनून विरून गेले हवेत.. आता एकटी पडले आहे, परंतु तरीही भ्रम नाहीसे झाल्याचं मोठं समाधान गाठीशी बांधून चालत आहे..
     खूपदा वाटलं, आपणही वितळून जावं एखादा विस्तव हातावर ठेवून.. पण मग मीच मला खडसावलं.. असं जर मी केलं, तर हे माणसांचं जग मलाही एक भ्रमच ठरवेल, माझं अस्तित्वही मग एक खोटा आभासच ठरेल.. नाही, असं मुळीच चालणार नाही मला.. भले या अथांग प्रदेशात असेन मी केवळ एका बिंदू एवढी, पण तरीही मी आहे खरीखुरी, भ्रमाच्या पलीकडे जाऊन उरणारी..
      या सूर्याच्या तेजाचा एक अंश तेवतोय माझ्या ऊरातही...त्याला मी असं सहजासहजी नाही बळी पडू देणार जगाच्या भलावणीला भेदरून.. पूर्वी बऱ्याचदा बळी पडले होते मोहक आश्वासनांना, पण आता भ्रम संपले म्हटल्यावर मोहही संपले, तात्पुरते का होईना..!
           अशीच चालत राहीन मी गुंडाळून माझं सारं असणं नसणं या मातीच्या देहामध्ये.. !
           खुपदा कोसळले आहे, अगदी अजूनही खोल खोल गर्तेमध्ये स्वत:ला हरवून कोसळते.. कधी माझी लक्तरं वावटळीसोबत होतात पसार वाऱ्यावर दूर दूर.. कधी विजेचा लोळ येऊन करतो राखरांगोळी माझ्या तनाची आणि मनाचीही..
          आणि यातलं अगदीच काही झालं नाही तर माझ्याच मनातील असंख्य गिधाडं फाडू लागतात माझीच आतडी, मनसोक्तपणे ओरबाडू लागतात माझंच स्वत्व..!
          पण या साऱ्यालाही पुरून उरते माझी चिवट इच्छा...! याला जीवनेच्छा नाही म्हणू शकत कारण ही काही श्वासांची भिकार इच्छा मुळीच नाहीये.. ही इच्छा आहे माझ्यातील तेजाचा, माझ्यातील सत्याचा अंश जपण्याची दुर्दम्य इच्छा.. ही आहे माझ्या आतील धगीला प्रामाणिक राहण्याची इच्छा.. माथ्यावरील सूर्याशी नातं सांगणारी जी एक तेज शलाका लपवली आहे मी या कातडीखाली, तिला प्राणपणाने जपण्याची अनिवार इच्छा..!
        त्यासाठीच तर केवळ पुन्हा पुन्हा गोळा करत राहते मी माझे अस्ताव्यस्त पसरलेले तनाचे अन मनाचे अवशेष, पुन्हा एकदा भरते ते या मातीच्या गोणीत अन पुन्हा करते सुरुवात सूर्य माथ्यावर घेऊन चालायला...