Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..

3/2/12

विश्वास

निरोप  तिचा घेताना
त्यानं दिलं एक रोपटं
आणि सांगितलं तिला
या रोपट्याला पहिलं फूल
येण्याआधीच मी येईन 
तो नजरेआड होईपर्यंत
ती बसून राहिली
दारातील पायरीवर..   
चुकून जर तुम्ही
गेलात तिच्या घराकडे
तर दिसेल ती तशीच
पायरीवर बसलेली
आणि पायाशी तिच्या
पडला असेल
सुकलेल्या फुलांचा सडा..!

जाणीव

 माझ्यासोबत रहा.. माझ्यासोबत थांब...
तुझा हात हातात घ्यायचा आहे कायमसाठी...
पूर्वी एकदा पकडला होता तुझा हात, पण तो गरज म्हणून, मदतीसाठी...
खूप दुर्बल होते, अगतिक होते; तेव्हा हक्काने तुला हाक मारली आधारासाठी
आणि तूही मोकळेपणाने आलास मला सावरायला..
 नंतर त्याच हक्काने तू दूर झालास आणि मीही जाऊ दिले तुला
आत्मनिर्भर होण्यासाठी; स्वत:ला ओळखण्यासाठी..
एकटीच लढत राहिले, ढासळलेले दुवे सांधत राहिले.
आता समर्थ झाले आहे स्वत:बद्दलच्या नव्या जाणीवेने..
नव्यानंच सुरु करते आहे पुन्हा जगायला आत्मसन्मानासहित..
या सशक्त जाणीवेनं तुझा हात हातात घ्यायचा आहे
निखळ सोबतीसाठी, कुठल्याही अपेक्षेविना..प्रगाढ विश्वासानं..!!