Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..

7/16/13

"i hate u.."


"i hate u.."
      अतिशय तीव्रतेने आतून आलेला टोकाचा तिरस्कार...तुला मेसेज केला आणि मी विचारात हरवून गेले.
  आपले ठरलेच तर होते ना आधी की "no love, no involvement .." त्यामुळे तुझ्या माझ्या नात्यामधे या असल्या भयंकर तापदायक गोष्टी कधी आल्याच नाहीत.
          अपेक्षा, अहंकार, हक्काची भावना, आरोप किंवा विश्वास अशा वेळखाऊ गोष्टीना जागाच ठेवली नाही आपण. कदाचित म्हणूनच ते नाते निखळ आनंददायी होते.. तुझ्यासोबत उत्कटपणे जगलेले क्षण अजूनही सुखावतात जीवाला. माझे मौनही तुला सहज समजायचे. तुझ्या सुखद सहवासात माझी तडफड तगमग शांत झाली आणि माझी मीच मला नव्याने सापडले. तुझ्यासोबत मोकळेपणाने श्वास घ्यायला शिकले पुन्हा एकदा...
           मग अचानक तू जाण्याची वेळ येऊन ठेपली हे जाणवलं आणि सुखासुखी चाललेल्या जीवाला ठेच लागली नकळत..! तशी तुला प्राप्त करण्याची इच्छा नव्हतीच रे कधी.. दोघांच्या  दिशा भिन्न. दोन टोकाला दोघे आपण. कसालाच बांधणारा धागा नाही. असेच होते नारे कधीकधी न मिळू शकणारी गोष्टच हविहवीशी वाटू लागते. त्यातलाच हा प्रकार...की हे वेगळेच काही..? नकोसे पण नियंत्रण नसलेले..प्रेम..?
          एवढे दिवस घट्टपणे बांधून ठेवलेल्या, शहाणपणाचे धडे गिरवलेल्या जीवाने असा ऐनवेळी घात का केला माहीत नाही.
          एवढं टोकाचं प्रेम माझ्या आत साठलयं तुझ्यासाठी आणि त्याकडे वळूनही न पाहता तू निघून चाललाय माझ्यापासून दूर..
   म्हणून हे " i hate u.. "
   तुझ्यासाठी नाहीच. माझ्यासाठी. माझ्या मला तुझ्यापासून वाचवण्यासाठी.