Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..

11/14/13

अजूनही एक मुलगी .

हे एकविसावं शतक आहे की बाविसाव, माहित नाही. परंतु अजूनही 'मुलगी' वापरली जाते घराघरातून. खूप खूप शिकलेल्या, मोठ्या पदव्या लावलेल्या लोकाकडून सुद्धा. गरीब नि श्रीमंत दोन्ही लोकाकडून. तिचा मन, तिचा देह, तिची अक्कल, तिची बुद्धी, तिचा कण न कण . सगळा घेतलं जातं पद्धतशीरपणे वापरून.
त्यासाठी चिटकवली जातात वेगवेगळी सुंदर विशेषणे. गळ्यात दोरखंड सारखी असतातच वेगवेगळी नाती. हो या नात्यामार्फतच वापरून घेतलं जातं तिला स्वतःचे अथवा कुटुंबाचे स्वार्थ साधून घेण्यासाठी. भावासाठी बहिणीला मार. भाऊ मजा मारत फिरतो तेव्हा बहिण खाली मान घालून संस्कार गिरवते. मुलाची चूक झाली कि माफ. मुलीला शिक्षा. मुलाला शिंगे फुटली तर त्याचही कौतुक. मुलीला शिंगे फुटली तर मात्र आई बाप च थुंकतात तिच्यावर आणि हिरावून घेतात तिचं टीचभर उसनं स्वातंत्र्य . मुलगा खुद के मन का मालिक. मुलीवर मात्र इथून तिथून सारयांची सत्ता .
भाऊ बाप आई नवरा मामा आजी मावशी शेजारी पाजारी भावकी जवकी .. सगळेच असतात बसलेले मुलीवर टपून. हे म्हणे तिचं भल करतात , तिचं नशीब घडवतात, तिला अक्कल देतात. हे सारे तिचे भाग्य विधाते आणि ती यांच्या पायातील पोतेरं .
अजूनही या समाजात शिशुपालाचे १०० अपराध माफ. एका मुलाचे २००-३०० अपराध माफ. आणि एका मुलीला मात्र कधीच माफी नाही . तिच्या एका अपराधाने ती पात्र ठरते शिव्या शापाना आई बापाच्या भावाच्या नवऱ्याच्या सासऱ्याच्या सासूच्या दिराच्या मुलाच्या आणि समाजाच्या. अजूनही या समाजात भाऊ मुक्त बेबंद निर्बंध आणि बहिण मात्र बांधील आई बापाच्या इज्जतीला आणि तिच्या वरच्या ढोंगी संस्कारांना .
अजूनही इथे बहीण मारून टाकली जाते तिच्या भावनासकट. मारली जातात तिची इवलीशी दोन आण्याची तत्वे. उपटून टाकली जाते तिची छोटी अक्कल मुळापासून. संपवलं जातं तिचं उमलू पाहणारे स्वत्व.
अजूनही या समाजात चिरडले जाते एका मुलीचे संपूर्ण भाव वश्व संस्कृतीच्या पंजाखाली. अजूनही या समाजात प्रत्येक मुलगी अनाथ असते तिच्याच घरात. परकी राहते ती माहेर आणि सासर दोन्ही कडे आणि तरीही वापरली जाते दोन्हीकडे समान हक्काने. अजूनही या समाजाला लागते शिंपण मुलीच्या अश्रुंचे तेव्हा कुठे रुजते इथे संस्कृती दिमाखात..