Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..

5/27/14

प्राक्तन

<

तुला कळेल हे तेव्हा आनंद होईल तुला जिंकल्याचा, की शेवटी तू बोलला होतास ते खरं ठरलं म्हणून.
तू तेव्हाच तर वर्तवलं होतंस ना की तुझ्याशिवाय अगदी वाईट हाल होतील माझे .
बघ इथे आहे मी पराभूत आणि अगम्य भीतीनं ग्रासलेली. हो, अगदी वाईट हाल होत आहेत मनाचे.
. . म्हणजे ना, तुझ्या आठवणी अशी सुंदर नाजूक फुलपाखरं बनून अलगद उतरतात माझ्या मनाच्या वैराण भूमीवर. मी मोहरते, त्यांच्या नाजूक स्पर्शाने सुखावते. नकळतपणे माझे सारे बंदीपहारे सैल होतात. सगळं सुरक्षित आहे हे जाणून आळसावतात. आणि मग या बेसावध वेळेचा फायदा उठवायला येते टोळधाड. तुझा तिरस्कार, माझ्या मूर्ख चुका, तुझा निसटत गेलेला हात आणि अगम्य खाईत लोटली गेलेली मी. लचके तोडले जातात माझ्या गात्रागात्रांचे तुझ्या आठवणींच्या गिधाडांकडून. सर्वात वाईट गोष्ट ही की मला विरोध करायलाही नाही जमत या सर्व गावगिधाडांना. हेच प्राक्तन आहे हे निमूटपणे स्वीकारतं माझं मन आणि स्वतःहून स्वाधीन होतं टोळधाडीच्या तावडीत.
मला संपूर्णपणे छिन्न विछिन्न करून झालं की त्यांचे वखवखलेले आत्मे होतात शांत. माझ्यासमोरच बसतात ते मांस लागलेल्या चोची साफ करत. मलाही नकळतपणे शांत वाटतं. छान सुस्तावते मी वेदनांच्या कुशीत. तुलाआणि मला जोडणारा हा दुःखाचा धागा पकडून मी झुलत राहते या आणि त्या दुसर्या जगाच्या सीमारेषेवर.
बघ हे असं होणार हे तर तू वदवलं होतं ना माझा हात सोडताना.?