Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..

10/27/14

तू जा..

आत्ताच तर श्वास होतोय
मोकळा हळूहळू
आत्ताच जीवाला दिलाय
नव्या आयुष्याचा दिलासा
त्यात तू येऊन
जुन्या जखमांना नकोस डिवचू
आणि नकोस करू हट्ट
माझे व्रण छेडायचा

आत्ता कुठे मीच मला
आवरून ठेवते आहे
एकावर एक साठवण
रचून लावते आहे
तू असा अचानक
येऊ नकोस माझ्या गाभाऱ्यात 
(कितीही हाक दिली मी
जीवाच्या आकांताने तरीही)
काळजाच्या डोहात उतरायचा
विचारही नकोस करू
(पाणी नितळ दिसलं
तरी असू शकतं रक्तपिपासू)

कुठले कसले
हिंस्त्र पशू
बसले आहेत दबा धरून
झोपवलंय मी त्यांना
अनंतकाळच्या भूलथापा देऊन
तुझ्या नुसत्या चाहुलीने
जाग येऊ पाहतेय काळरात्रीला
म्हणून
दुरूनच तू जा

तू लवकरच जा
कारण
मीच पेटवलेल्या हवनकुंडामध्ये
तुझाही बळी देण्याचा
आदिम मोह
कधीही जागू शकतो माझ्या अंतरात...





10/21/14

उगाच

उगाच वाटतं दोन दिवस
सोबत झाली सोबत झाली
पुन्हा असतोच आपण
एकट्या वाटेचे प्रवासी

उगाच वाटतं दोन क़्शण
तो भेटला तो थांबला
येणारच असतो परतून
निरोपानंतरचा दुरावा

उगाच बांधत राहतो
आपण हवेमधले इमले
मन दूर भटकत जाई
पाय घट्ट जखडलेले

उगाच द्यायची नावे गोंडस
नव नवीन नात्यांना
बारमाही उन्हाळा वसे मनी
ओलावा कसा तगावा

सगळेच हे
उगाउगीचे खेळ
ऊन्हामधलं घर
आणि बर्फाचं बेट