Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..

4/3/17

नवीन नाती


एक नवीनच शोध लागलाय गेल्या काही दिवसात. एखाद्या व्यक्तीचा आपल्याला उगीचच राग येत असतो. आपण मनातून तिचा द्वेष करत असतो. कदाचित ती व्यक्ती आपली शत्रू पण असू शकते.
माझ्या बाबतीत असं झालं. दुसऱ्या लोकांच्या बोलण्यावरून, सोशल साईटस वरून माझी एका व्यक्तीबद्दल फारच वाईट मत बनले होते. खरेतर मी कधी त्या व्यक्तीशी बोलले पण नव्हते. ती व्यक्ती माझ्यापेक्षा जास्त यशस्वी असल्याने माझ्या मनात सुप्त असुरक्षिततेची भावना असेल. माहित नाही. कधी आमचे प्रत्यक्ष भेटायचे प्रसंग आले पण आम्ही ते टाळले. दोघाकडून ते टाळले गेले. समोरासमोर कधी भेटलो नाही. मधल्या मित्र-मैत्रिणींकडून गप्पांमध्ये विषय निघायचा.
असाच व्होट्स अप च्या कॉमन ग्रुपमधे आम्ही होतो. त्यातून कुठल्यातरी निमित्ताने आमची फायनली गाठभेट पडली. प्रत्यक्ष भेटल्यावर आमच्या चांगल्या गप्पा झाल्या. माझ्या मनात त्यांच्याविषयी आदर निर्माण झाला आणि त्यांनीही मला आदरपूर्वक वागणूक दिली. wavelenght जुळल्यासारखा फील आला. मला स्वतःलाच आश्चर्य वाटले की इतके दिवस मी विनाकारण मनात किती नकारात्मक विचार केले होते त्या व्यक्तीबद्दल. उलट त्या व्यक्तीने मला आणखी नवीन लोकांशी ओळख करून दिली. त्या व्यक्तीसोबतची माझी मैत्री अशाप्रकारे सकारात्मक व माझ्या आवडीनिवडीना पूरक ठरली.
खरेतर मला नवीन माणसांना भेटणे, समजून घेणे, विविध क्षेत्रातले मित्र मैत्रिणी जोडणे नेहमीच आवडते. पण तरीही मनातील पूर्वग्रहदुषित विचारांनी मी एका व्यक्तीबद्दल नकारात्मक भावना ठेवली होती.
कितीतरी वेळा आपण असेच करतो ना ? आपल्या गैरसमजा मुळे , मनातील अनाकलनीय भीतीमुळे , मनात अढी पकडून ठेवल्याने एखाद्या व्यक्तीबद्दल राग पकडून ठेवतो, द्वेष करत राहतो. त्याचे दोन वाईट परिणाम होतात. एकतर अशा काल्पनिक विचारांचा आपल्यालाच त्रास होतो, मानसिक त्रास होतो आणि दुसरे म्हणजे आपण एका चांगल्या मित्रत्वाच्या नात्याला पारखे होतो.
मी तरी आता ठरवलेय, जेव्हा कोण व्यक्तीबद्दल असं वाटेल, तेव्हा स्वतःहून जाऊन बोलूया, संवाद वाढवूया. नवी नाती निर्माण करूया.