काय हे.किती पण चहा पावडर टाकली तरी चहाला रंगच यायला तयार नाही.नाही आवडत मला असा पांढरा चहा.पहायलाही नाही आणि प्यायलाही नाही.किती वेळा सांगितलं पपांना की अशी सुटी पावडर आणू नका म्हणून.पूर्वीसारखी नाही राहिली आता.पण पैसे वाचवायला म्हणून की जुन्या गोष्टींवर निष्ठा म्हणून पण ते तीच आणतात आणि मग चहाला रंग यावा म्हणून मी ती भसाभसा घालत राहते उकळत्या दुधामध्ये.साखर मात्र कमीच घालायची वजन कमी करायच्या वेगवेगळ्या प्लान्स मध्ये हा एक.आलं घालायला तर मजा येते.सोनू चा तर secret ingredient आहे लवंग आणि थोडी विलायची.मस्त बनवते चहा.
इतक्या वर्षांच्या आयुष्यात किती ठिकाणी फिरले.वेगवेगळ्या घरामधला, कधी आईने,पपाने,नवरयाने आणि कोणीकोणी प्रेमाने बनवलेला,तर कधी नाईलाजाने आणखी कोणी नातेवाईकाने दिलेला.वेगवेगळ्या होस्टेल वर कितीतरी मैत्रिणीनी बनवलेला.कधी कुठल्या गाड्यावरचा मस्त अद्रकवाला चाय तर कधी हॉटेलातला सपक मसाला चहा.कॅन्टीनच्या चहाची तर मजाच काही ऒर.आणि ट्रेक करून वरती गडावर पिलेला चहा तो तर लाजवाब.कधी थकल्यावर फ्रेश होण्यासाठी कधी आळस घालवायला तर कधी नुसताच timepass.कधी एकट्याने कधी ग्रुपमध्ये तर कधी त्याच्या हातात हात आणि डोळ्यात डोळे घालून पिलेला चहा.पावसामध्ये भिजून खाल्लेली भजी आणि सोबत चहा.एकच नंबर.
किती ठिकाणी किती वेगवेगळ्या चवीने पिलेला हा चहा.आजकाल का कोणास ठावूक परका होवून पाहतोय.मीच विसरून जाते की मला नेमका कसा चहा आवडतो.मलाच कळत नाही की मला कशी चव हवी आहे. कदाचित माझा ठावठिकाणा नक्की कुठे हे माहित नसल्याने असे होतेय. कालची सोबत आज नसते आणि आज सोबत असणारं माणूस उद्या असेल का हे माहितच नसतं आजकाल म्हणूनही असा होत असेल.
कारण काहीही असो पण चहा बनवताना मन उदास होतं ते का माहित नाही.मग मीच बनवलेला चहा मला आवडत नाही…असं वाटता पुन्हा वेगळ्या पद्धतीने बनवावा पण वजन वाढेल जास्त चहा पिवून ही पण चिंता.त्यापेक्षा मग चहाचा नादच सोडून देवून तशीच बसते मी जुना चहा आठवत ...!