Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..

5/12/15

"मी पूर्णपणे अशी कोणालाच नको असते"


मी पूर्णपणे अशी कोणालाच नको असते.
म्हणजे तुम्हालाही येतं का असं feeling कधीकधी किंवा अनेकदा....?
आपल्यातील थोडासा. काहीसा selected भागच फक्त इतरांना हवा असतो.
तेवढ्याच भागापुरते त्यांना आपल्याशी देणेघेणे असते.
ते येतात, तेवढाच भाग पाहतात, तेवढ्याशीच नाते जपतात. तेवढ्याकडून त्यांना हवे ते काम काढून घेतात. त्यांचे येणे वसूल करून घेतात आणि जातात निघून उरलेल्या भागाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून.
अशी मी मग वेगवेगळ्या भागात विभागली जाते.
किंवा मग लोकांना सोप्पं जावं म्हणून मीच आधी तुकडे करून ठेवते स्वतःचे.
“घ्या, तुम्हाला हवा तो तुकडा घ्या. ”
असे मग नुसते तुकडे तुकडेच होऊन जातात.
मग कुणालातरी माझा अगदीच आतला तुकडा हवा असतो, काळजाचा. अलगद येऊन, माझे सारे बंदीपहारे सहजच चुकवून, ती व्यक्ती तो माझ्या जीवाचा तुकडाही अलगद जाते वापरून. मनात येईल तेव्हा येऊन गोंजारते. मन भरलं की पाठ फिरवून निघून जाते. पण तिच्या हाताळण्याने पोहोचते त्याला भरून न येणारी इजा. काळजाची इजा कोणाला दाखवणार ? आणि जी व्यक्ती ती देऊन गेली, तिला तर आठवण पण नाही राहत त्या भागाची अथवा मुद्दामच ती व्यक्ती सोंग करते, की अरे, मी तर तिकडे आलेच नाही. माझ्याकडे तर नसतात कसले साक्षी पुरावे.
इतकी पण शरम नसावी का अशा लोकांना ? इतका पण मर्दपणा नसावा का पुरुषांमध्ये की कबूल करण्याचा की मी वापरला तुझा काळजाचा भाग माझ्या आनंदासाठी ? एवढा basic प्रामाणिकपणा नसावा का एक माणूस म्हणून ?
आणखी दुसऱ्या कोणाला थोडा व्यावहारिक भाग हवा असतो. त्यांनी ते स्पष्ट ठेवलेलं असतं ते चांगलं. पण मी पडते मूर्ख. माझं तर नियंत्रण नसतंच त्यावर. त्या व्यक्तीला माझा व्यावसायिक भाग देत असतानाच अचानक दुसराच भावनिक भाग विरघळू लागतो, प्रेम पाझरू लागतो. ती व्यक्ती मग अगदीच विचित्र नजरेने पाहू लागते त्या माझ्या गरीब लाचार भागाकडे. त्या तिरस्काराच्या नजरेने माझं पूर्ण अस्तित्वच शहारून जातं. असं वाटतं, लपवून टाकावा अथवा मारून टाकावा तो भावनाविवश भाग. मी अशी विद्ध असताना ती व्यक्ती तिचं व्यावसायिक काम काढून घेऊन निघून जाते आणि मागे मी शरमेच्या, निराशेच्या गर्तेत अडकलेली.
काही असतात तापदायक, मला स्वतःलाही नकोसे वाटणारे. रागाचे, इर्षेचे, Insecurity चे, निराशेचे. दु:खाचे.. मलाच ते पेलवत नाहीत. वाटतं स्वतः पासून तोडून ते फेकून द्यावेत. पण तसं होत नाहीत. ते असतात माझ्या अस्तित्वाचे अविभाज्य अंग. अशा टोकदार, काटेदार, कुरूप भागांचे दर्शन ज्याला होते, ती व्यक्ती तर नाकारुनच टाकते माझ्या चांगल्या भागांचे अस्तित्व. तो माझा एक भागच बनून जातो मला Define करणारा केंद्रबिंदू त्या व्यक्तीसाठी. पाहत राहते मी हताशपणे फक्त. “अरे, मला स्वतःलाच या भागाचं कोडं सुटत नाही, ते मी तुला कसं समजावून सांगू. पण म्हणून मला त्या भागाने अधोरेखित करण्याचा तुला काहीच हक्क नाही...” हे सारं असतं आतल्याआत.
असे अखंड तुकडे पडलेले असतात मनाचे, माझ्या भाव विश्वाचे.
त्यात शरीराचाही एक तुकडा. त्याच्या मागण्यांचा प्रदेश तर वेगळाच. त्या मागण्या मलाही घाबरवून टाकणाऱ्या. नैतिकतेच्या कोड्यात अडकून त्यांचा सगळा घोळच होऊन जातो, जो ना त्यांना उमगतो, ना मला. कधी कधी त्या सुख पुरवणाऱ्या, तर कधी मनावर तप्त सळईने ओरखडे ओढणाऱ्या.
असे असंख्य घायाळ तुकडे. त्यांचे त्यांचे घायाळ प्रदेश. त्या प्रदेशाची मी नियंत्रण नसलेली मालकीण.
आणि मजा अशी की मी अख्खीच्या अख्खी कुणालाच नको असते. असं का होतं ? मी माझ्या काळ्या-पांढऱ्या सकट, वरचं आवरण आणि आतल्या गाभाऱ्यासकट, माझ्या सर्वच्या सर्व भागांसकट कोणालाच का हवीशी नसते ?
असं स्वतःचे लचके तोडून आणि त्या तुकड्यांचा बाजार मांडून जगणं खरंच आवश्यक आहे का ?


23 comments:

  1. रागाचे, इर्षेचे, Insecurity चे, निराशेचे. दु:खाचे.. मलाच ते पेलवत नाहीत. वाटतं स्वतः पासून तोडून ते फेकून द्यावेत. पण तसं होत नाहीत. ते असतात माझ्या अस्तित्वाचे अविभाज्य अंग. अशा टोकदार, काटेदार, कुरूप भागांचे दर्शन ज्याला होते, ती व्यक्ती तर नाकारुनच टाकते माझ्या चांगल्या भागांचे अस्तित्व. तो माझा एक भागच बनून जातो मला Define करणारा केंद्रबिंदू त्या व्यक्तीसाठी. पाहत राहते मी हताशपणे फक्त. “अरे, मला स्वतःलाच या भागाचं कोडं सुटत नाही, ते मी तुला कसं समजावून सांगू. पण म्हणून मला त्या भागाने अधोरेखित करण्याचा तुला काहीच हक्क नाही...” >>>> फार मार्मिक लिहिलं आहे. पोस्ट आवडली, तुमचा सगळा ब्लॉग आवडतो खरं तर.

    ReplyDelete
    Replies
    1. तू वाचलं आणि तुला ते भावलं हे वाचून छान वाटलं. thank you :)

      Delete
  2. मी पूर्णपणे अशी कोणालाच नको असते.
    म्हणजे तुम्हालाही येतं का असं feeling कधीकधी किंवा अनेकदा....?
    >> अगदी येतं, अनेकदा येतं…

    Speechles...

    ReplyDelete
    Replies
    1. तुझ्या पर्यंत भावना पोहोचल्या, छान वाटलं.

      Delete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. Superb. Brilliant. Baryach mahinyanni itka uttam blog vaachanaat aala. All the best!

    ReplyDelete
    Replies
    1. Hey thnks a lot.. your compliment will inspire me to express more :-)

      Delete
  5. छान लिहिलं आहे

    ReplyDelete
  6. आणखी दुसऱ्या कोणाला थोडा व्यावहारिक भाग हवा असतो. त्यांनी ते स्पष्ट ठेवलेलं असतं ते चांगलं. पण मी पडते मूर्ख. माझं तर नियंत्रण नसतंच त्यावर. त्या व्यक्तीला माझा व्यावसायिक भाग देत असतानाच अचानक दुसराच भावनिक भाग विरघळू लागतो, प्रेम पाझरू लागतो. ती व्यक्ती मग अगदीच विचित्र नजरेने पाहू लागते त्या माझ्या गरीब लाचार भागाकडे. त्या तिरस्काराच्या नजरेने माझं पूर्ण अस्तित्वच शहारून जातं. असं वाटतं, लपवून टाकावा अथवा मारून टाकावा तो भावनाविवश भाग.

    मार्मिक !! एवढा छान ब्लॉग माझ्या वाचनात आतापर्यंत कसा आला नाही बरं ? छान लिहितेस !!!

    ReplyDelete
  7. Eka stree chya life mdhe ase bhrpur vela ghdte ticha koni vicharch krt nahi...tumchya ya blog mdhun kmit kmi lok tichya bhavnancha thoda tri vichar krtil.....
    Khup hrudyala bhidnari gosht sangitli tumhi ya blog mdhun

    ReplyDelete
    Replies
    1. तुला हे भावलं हे वाचून छान वाटलं . सर्व स्त्रियांना जोडणारा "भावना" हा सेतूच होय.

      Delete
  8. farach sundar...hech te baryach divasanpasun konalatari sangavas vatat hote..pan shabd suchat nhavte...thanks

    ReplyDelete
    Replies
    1. Tula awadala ani swatha cha watala he wachun khp chan watala...he lihilela koni tari samjun ghyawa hich ek ichcha asate.
      Thank you vel kadhun wachalya baddal...

      Delete
    2. Tula awadala ani swatha cha watala he wachun khp chan watala...he lihilela koni tari samjun ghyawa hich ek ichcha asate.
      Thank you vel kadhun wachalya baddal...

      Delete
  9. मानवी व्यवहारांचे अतिशय सुंदर शब्द चित्रण. ....खूप खोल आणि विचार करायला लावणारे लिखाण.

    ReplyDelete
  10. तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे काही कळत नाही पण तुमचा लेख मात्र वाचत रहावा अस वाटल
    कदाचित पुन्हा पुन्हा वाचण्याची गरज पडणार मला

    ReplyDelete