Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..
Showing posts with label सुचेल ते... Show all posts
Showing posts with label सुचेल ते... Show all posts

3/16/24

सांगली

 विहिरीची मुलगी या कादंबरीतील मीरेच्या प्रवासाची सुरुवात सांगलीपासून होते. याचं कारण सांगलीनं माझ्या मनात कायमसाठी हक्काचं स्थान मिळवलं आहे. MBBS नंतर माझे DGO हे PG झाल्यानंतर, मी 3 महिने सांगलीत होते. 2014 साली बहुतेक. सांगलीतील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. हेमंत लिमये सर यांना गडचिरोलीतील शस्त्रक्रिया शिबिरात कमी वेळात, कौशल्यपूर्ण सर्जरी करताना मी पाहिलं होतं. तेव्हाच ठरवलेलं की सरांकडे जाऊन गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया म्हणजेच Hysterectomy, सरांच्या टेक्निकने शिकून घ्यायची. त्यासाठी मग तीन महिने मी सांगलीत मुक्काम ठोकलेला. सांगलीला शिकलेल्या शस्त्रक्रिया, पुढे जाऊन सास्तूर या ठिकाणी नियमित केल्याने मीही त्यात expert झाले. कारण त्या भूकंपग्रस्त भागात गरीब रुग्णांना अगदी माफक दरात NGO ने चालवलेल्या स्पर्श या जिल्हा रुग्णालयात चांगल्या सुविधा मिळायच्या. त्यामुळे गरजू रुग्णांची गर्दी असायची. पुढे छत्तीसगडला माझ्या रुग्णांचे जीव वाचायला ते कौशल्य खूप जास्त उपयोगी आले, तेव्हा मला लिमये सरांच्या प्रती कृतज्ञता वाटलेली. छत्तीसगड सोडताना, तिथल्या इतर स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांना ते कौशल्य शिकवून मला समाधान वाटले. सांगलीत आणि जयसिंगपूर, शिराळा अशा आजूबाजूच्या गावांत जाऊन शस्त्रक्रिया चालायच्या, त्यामुळे फिरणं व्हायचं. कुठं काय चांगलं खायला मिळतं हे सर आणि सोबतच्या सहकाऱ्यांमुळे डेमोसकट माहिती व्हायचं. काम संपल्यावर संध्याकाळी मी पूर्ण रिकामी असायचे. मग सायकल काढून भटकायला जायचे. कधी सांगलीतील नदीचा घाट तर अनेकवेळा हरिपूरला एकटीने जाऊन बसायचे. सुंदर प्रसन्न जागा पाहून वाटायचं की कोणी बॉयफ्रेंड असता तर त्याला इकडे तिकडे फिरवलं असतं. 2017 मध्ये कादंबरी लेखन सुरु झालं तेव्हा मीराचा पहिला मुक्काम कुठे पडावा या प्रश्नासरशी सांगली आठवलं आणि ते लिहिलं गेलं. सोबतच आला नायक मल्हार. मला आयुष्यात कधीही न भेटलेला. पण हे पात्र लिहिताना मीच त्याच्या प्रेमात पडत गेले. असा मल्हार खऱ्या वास्तवात नाहीये हे स्विकारायला जडच गेलं. काही पात्रं लेखकाचे बोलणे आज्ञाधारकपणे पाळतात, काही लेखकाला पारच धुडकावून लावतात. तर काही लेखकालाच मोहात पाडतात. Anywes तर मागच्या आठवड्यात कोल्हापूरला असताना, वाट वाकडी करून, मीरा मल्हारचे आवडते ठिकाण हरीपूर इथे जायचा मोह टाळता आला नाहीये. ती जागा आता खूप बदलली आहे, पण तिथल्या माझ्या आठवणी अजून तशाच जपलेल्या आहेत. इथे दोन नद्यांचा संगम, त्यांच्या वेगळ्या उठून दिसणाऱ्या प्रवाहांसोबत पहायला मिळतो. Between कादंबरी वाचून एका मित्राचा आज फोन आला. त्याच्या वाईट काळात साथ दिलेल्या प्रेयसीबद्दल बोलताना तो म्हणाला की "ती माझ्या आयुष्यात मल्हारसारखी आली." प्रेमाची भाषा अशी स्थळ काळ लिंग ओलांडून पोहोचते. कादंबरी घेण्यासाठी संपर्क New Era PublishingHouse 9373553349

3/4/17

निर्णयाची किंमत

     गडचिरोलीला "सर्च" मध्ये असताना नेहमीच काहीतरी चांगले विचार कानावर पडत रहायचे.
असेच एकदा योगेशदादांनी खूप छान सांगितले.
" आपण दररोजच्या आयुष्यात Tourist सारखे जगतो. छान घर असते. कामाचे ठिकाण ठरलेले असते. घरुन कामाच्या ठिकाणी जायचे आणि काम संपले की पुन्हा परत आपल्या घरी.
  एवढ्याच वर्तुळात जगतो आपण. आजूबाजूचे लोक , समाज यांच्याशी देणेघेणेच नसते. Tourist सारखेच झाले ना हे ? "
       दादांचे बोलणे कायम आठवत राहते आणि आपण स्वतःला Tourist होऊ द्यायचे नाही हे मनाशी ठरवत राहते.
    माझ्या घरी एक कासव पाळले आहे. प्लॕस्टिकच्या मोठ्या डब्यात त्याला ठेवले आहे. त्यात त्याला दोन वेळा खायला मिळते , दुपारी मी त्याला ऊन्हात ठेवते. सगळं त्याला आरामात जागेवर मिळतं. किती सुखी आयुष्य ? वर जिवाचा कोणताही धोका नाही. भारीच ना ? फक्त एवढंच की त्याचे जग त्याच्या प्लॕस्टिकच्या डब्यात बंद झाले आहे. मी तो डबा जिथे उचलून ठेवेल , तेच त्याने प्लॕस्टिकच्या भिंती आडून पहायचं.
            त्याच्याकडे पाहताना मी गोंधळते. Yes, that eternal confusion again starts eating up my mind.
           योगेशदादा स्पष्ट शब्दांत बोलतात. समोरच्याला गोड वाटेल असं बोलणं दादांचा खाक्या नाही. उलट  समोरच्याने घेतलेलं झोपेचं सोंग खाडकन उतरेल असा असतो योगेश दादांचा सल्ला..
      माझं confusion ऐकून दादा म्हणाले ,
"confusion is mind's laziness. एखादा निर्णय घेताना गोंधळ होतो आहे म्हणजे आपण त्या निर्णयाची किंमत मोजायला तयार नाही आहोत. मन धोका पत्करायला तयार नाही होत आहे.
      निर्णय घेतल्यावर त्यासाठी किंमत मोजायची तयारी ठेवावीच लागते."
   

3/3/17

तुमच्या आयुष्याची किंमत किती ?


तुमच्या आयुष्याची किंमत किती ? समजा मी म्हटलं तुम्हाला की मला विकत घ्यायचेय तुमचे आयुष्य, तर किती किमतीला विकाल ?
काय म्हणता ? कशासाठी विकत हवेय ? नाही, ते मी नाही सांगणार. त्याचे पुढे परिणाम काय होतील हेही नाही सांगणार.
बरं, चला तर मग, लवकर सांगा, कितीला विकणार आयुष्य ?
काय ? नाही विकू शकत असं ?
मग एक काम करा. पूर्ण आयुष्य नका विकू. रोजच्या दिवसातील काही तास विका. हे तर जमेल की अगदी.
काय ? हे पण नाही.
आता मात्र कमाल करता हं राव. रोज तर तुम्ही तुमचे कितीतरी तास असेच फुकट देऊन टाकता, काहीजण तर आख्खं आयुष्य फुकट देता दुसऱ्याला, काही शरीर देता फुकट तर काही अख्खा मेंदू, मन,भावना फुकटात देऊन टाकता, आणि मी मात्र तुम्हाला हवी ती किंमत देऊन मागतेय, तर देत नाहीत ?
आवडत नसलेली नोकरी केवळ पैसा हवा म्हणून करता, पैसा का हवा तर समाजात प्रतिष्ठा मिळावी म्हणून, तेव्हा स्वतःला विकताच की हो तुम्ही.
महागाचे कपडे,आवडत नसले तरी, भर उन्हाळ्यात गरम होत असले तरी त्रास सहन करत घालता, का तर समजात स्टेटस दाखवण्यासाठी, तेव्हा त्या काही तासांसाठी तुमचे शरीर फुकट देताच की तुम्ही लोकांसाठी.
एखादी स्त्री लग्न झाले म्हणून, सासरच्या लोकांमुळे, तिच्या आवडीच्या गोष्टींना कायमचा रामराम ठोकते, तेव्हा ती तरी वेगळे काय करते ?
आणि तीच एखादी स्वयंपूर्ण उच्चपदवीधर स्त्री ऑफिसमध्ये स्टेटस दाखवण्यासाठी उंची मेकअप करते, आवडत नसले तरी हानिकारक केमिकल्स वापरते, तेव्हा ती तरी वेगळे काय करते ?
चार चौघात प्रतिष्ठा म्हणून दारू पिली जाते, पार्टी संस्कृती आवडत नसताना हॉटेलिंग केले जाते, परवडत नसताना कर्ज काढून कार विकत घेतली जाते, मुलाला कोणत्या शाळेत घालायचे हे सुधा शेजारचे लोक ठरवतात, किराणा घेण्यासाठी मॉलमध्ये जातो हे अभिमानाने सांगितले जाते. आपण वेळ नाही या सबबीखाली आपले सर्व छंद सोडतो, मन मारून दिवस काढतो.

हे सर्व काय आहे ? आयुष्य दुसऱ्याला देणेच नाही का ? आणि त्या बदल्यात काय मिळते आपल्याला ? सततचा तणाव, चिडचिड, मानसिक अस्वस्थता, काळजी, झोप न येणे, पाठदुखी, कंबरदुखी, बीपी, शुगर, लठ्ठपणा .......मानसिक व शारीरिक व्याधी.
मेंदू तर आपण सोशल साईट, फेसबुक, व्होट्स अप, जाहिराती, राजकारणी, टीवी या सर्वाना देऊन टाकला आहे, त्यामुळे फिलोसोफी, अध्यात्म या गोष्टीसाठी आपल्याला वेळ व इच्छा पण नाही.

मग बघा.. कसला घाट्याचा सौदा करताय तुम्ही ? परवडतेय ??

2/3/17

Body positivity

शाळेतील मुलींना आरोग्य मार्गदर्शन करताना, मी त्यांना body positivity शिकवते , स्वतःच्या शरीराला स्विकारायला आणि सुंदर मानायला शिकवते.
आणि तीच मी कपड्यांच्या दुकानात जाते , तेव्हा माझ्या मोठ्या size चे कपडे हवे तसे मिळत नाहीत, limited stock पाहून स्वतःच्या शरीराचा तिरस्कार करते ,
तेव्हा मी किती confident आणि किती insecure या विचाराने गोंधळून जाते.
माझा नाराज चेहरा पाहून , counter मागची बारीक मुलगी जेव्हा म्हणते की ताई, तब्येत तुझ्यासारखीच हवी. आमच्यासारखी बारीक काय कामाची , तेव्हा धड ती पण सुखी नाही आणि मी पण नाही , याचा मला साक्षात्कार होतो.

7/12/15

लिहिण्यातली बेशिस्त

    बरेच दिवस लिहीले नाही काही.
कितीतरी गोष्टी सांगायच्या राहिल्या आहेत.
म्हणजे प्रत्येक वेळेस मनात सारे तयार होयचे काय सांगायचे ते, पण net access नसायचा, कधी laptop नाही. तर कधी सगळं असलं तरी मनच ताळ्यावर नाही लिहायला. असे बेशिस्तीचे प्रकार घडले. आता थोडा मनाला शिस्त लावायचा प्रयत्न करायला हवा.
     दोन छान गंमती तुमच्याशी share करायच्या आहेत. एक म्हणजे माझी birthday special solo कोकण trip. धम्माल केली एकटीने. दुसरे म्हणजे सध्या माझी भटकभवानीची पावले सांगलीला घेऊन आली आहेत. इथले अनुभव सांगायचेत.
    hope लवकर शिस्तीत लिहीणं होईल !!

4/24/12

मीरा

 मीरा होणं कठीण की राधा..
हे कोणीच नाही ठरवू शकणार...
दोघींची तुलना करण्याचा प्रयत्नही करू नये कोणी..
पण तरीही कधी वाटतं, राधेला थोडंतरी झुकतं माप मिळालं दैवाकडून..
आयुष्याच्या एका टप्प्यावर, काही काळ का होईना,
कृष्णानं राधेची प्रीत स्वीकारली.
त्याच्या मुग्धमधुर लीला राधेच्याच नशिबी....!
पण मीरा.. तिच्या प्रेमाची रीतच न्यारी..!
कधीही न भेटलेल्या त्या सावळ्यासाठी
तिनं आयुष्यभराचं व्रत घेतलं..
प्रेमाचं महाकठीण व्रत.. जे फक्त तिलाच पेललं..
त्या मीरेला समर्पित..

8/8/11

Normality चे scale

कधी कधी असे वाटते की आपल्या जवळच्या माणसांच्या हातात normality चे scale आहे.. ते सतत एक स्केल हातात घेऊन उभे असतात आपल्याला तोलत.. त्याची २ टोके म्हणजे minimum आणि maximum .. त्यावर सतत तोलत, जोखत राहतात इतरांना.. सतत नियंत्रण ठेवू पाहतात. इतरांनी कसे बोलावे, वागावे, विचार करावा हे तेच ठरवणार.. इतर लोकांनी त्यांच्या स्केल वर कायम maximum च्या टोकाला पाहिजे असा त्यांचा अट्टाहास.. इतर लोक कसे आहेत हे त्यांना कधी समजून घ्यायचेच नसते, जणूकाही इतरांच्या मनाशी त्यांना काही देणेघेणेच नसते.. असे लोक इतरांमधील केवळ कमीपणा, दोष, चुका  शोधत राहतात आणि त्यानुसार इतर लोकांना बदलू पाहतात.. एखादे model design करावे तसा त्यांचा माणूस त्यांना हवा तसा design करण्याचा प्रयत्न..!! मग त्यात इतरांच्या स्वतंत्र वृत्तीचा, वेगळ्या विचारांचा, स्वप्नांचा बळी गेला तरी चालते, rather तेच त्यांना हवे असते...
   नाही आवडत मला हे..असं कोणी इतरांच्या आयुष्यावर आक्रमण केलेले..खरेतर कोणालाच नाही आवडतं.. अशा लोकांच्या सहवासात जीव गुदमरतो.. त्यांच्या सतत judge करण्याचा त्रास होतो इतरांना..
    प्रत्येक माणूस वेगळा आणि स्वतंत्र असतो.. त्याला तसंच जगू  दयावं सर्वांनी त्याच्या वृत्तीप्रमाणे.. कुठलंही scale न लावता..

7/31/11

ती वाट आणि खुणेचा दगड..

कधी कधी एखादी वाट मोहात पडते, अनोळखी असूनही आपण घेतो ती इतर सरळ मार्ग सोडून.. कधी पुढे जाऊन त्या वाटेवर अडखळतो, हरवतो. वेळीच समजतं की पुढे चालणं जमणार नाही; मग वळून परत येतो. पण ती मोहाची वाट पुन्हा पुन्हा खुणावेल, म्हणून मग एखादा दगड लावून देतो खुणेसाठी, ती वाट कायमची बंद करण्यासाठी. पण तीच तर चूक होऊन बसते.. इतर असंख्य वाटांवरून आयुष्य धुंडाळता धुंडाळता क्रॉस ओव्हर होऊन त्या जुन्या वाटेशेजारून निघताना आपण ठेच खात राहतो पुन्हा पुन्हा त्या खुणेच्या दगडाशी.. आणि ती ठणकणारी ठेच पुन्हा पुन्हा आठवण करून देत राहते त्या निश्चयाने दूर ठेवलेल्या पण मोहवणाऱ्या वाटेची..! मग कळून चुकतं, पूर्वी जर तो दगड तिथे लावलाच नसता, तर अशी ठेच बसली नसती आणि इतर असंख्य वाटांमध्ये ही वाटही विरघळून गेली असती अलगदपणे, मागे कसलीही खूण न ठेवता..!! 

"U" turn

" आयुष्यातील वेगवेगळे रस्ते..
काही फक्त पुढे पुढेच नेत राहतात..one way सारखे.. त्यावरून वळून मागे नाही परतता येत..
पण म्हणून नाराज नाही व्हायचं स्वत:वरच..
कारण काही रस्त्यांवर मात्र असते सोय... " U " turn ची... " 

7/23/11

जास्त टिकाऊ

इतके दिवस स्वत:च्याच हातांनी स्वत:चेच आयुष्य टराटरा फडत गेले.. आता वयासोबत शहाणपण आलंय. मग काय, प्रयत्न करत राहते जमेल तसं ते पुन्हा शिवायचा आणि परत पाहिल्यासारखं ते अखंड करायचा.. पण होतं काय, शिवणीचे धागे दिसतातच ना.. बुडाला लावलेली ठिगळं बूड उचललं की दिसतातच ना..!
 असू दे.. पण यातही एक गम्मत कळलीये.. शिवून जरी पहिल्यासारखं नाही झालं ना, तरी या चीन्ध्यातून नवंच काही आकार घेऊ पाहतेय.. कदाचित पहिल्यापेक्षाही जास्त ऊबदार,  जास्त मनोहर आणि जास्त टिकाऊ..!!