Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..
Showing posts with label संवाद. Show all posts
Showing posts with label संवाद. Show all posts

4/24/12

भेसळ

"तुझा खरंखुरं प्रेम आहे ना रे माझ्यावर? "
" माणसानं साऱ्याच तत्वांमध्ये, मूलभूत प्रेरणामध्ये मोठी भेसळ करून ठेवलीये; सगळं कसं अगदी नासवून टाकलंय."
" का रे बाबा, आणि हे मधेच काय..? "
" बघ  ना, प्रेम ही माणसाची मूलभूत प्रेरणा..अगदी आतली. प्रेम म्हणजे प्रेमच ना ? ते खरंच असतं ना, खोटं कसं असतं गं..? पण आजकाल ते आपल्याला कसं व्यक्त करावं लागतं, माझं तुझ्यावर खरंखुरं प्रेम आहे..!! प्रेमालाही आजकाल खरंखुरं हे विशेषण लावावं लागतं यातच सारं आलं. "
" म्हणजे ? "
" म्हणजे स्वत:च्याच पायांनी स्वत:च्या अधोगतीकडे जायचे आणि वर सुंदर  शब्दांचा मुलामा फासून प्रगतीचे ढोंग करायचे. ते ढोंग पकडले जाऊ नये म्हणून बुद्धीचा वापर करायचा.."
" ते जाऊ दे, प्रेम आहे ना..? "
" हो, अगदी खरंखुरं.."

1/22/12

ती..

कुठल्याही आईला वाटतेच मुलीचं व्यवस्थितपणे लग्न जमावं.. त्यासाठी कधीकधी  मुलीचा भूतकाळ स्वछ्च नसेल तर लपवावा, असं लग्नाळू मुलीच्या आईचं म्हणणं..
पण पोरीचा निश्चय ठाम. मुलाला भूतकाळाविषयी सर्व कल्पना आधीच देणार..
" जुनं पुरून टाक गं आता.. झालं गेलं विसर. पुन्हा ते मुलाला सांगायची की गरज..? अशानं कोणता चांगला मुलगा होकार देणार तुला..? "
" अगं आई, केवळ चांगला नवरा मिळावा यासाठी मी माझी तत्वे पाण्यात सोडून देऊ का..? एकवेळ एकटं जगणं पचवेन मी, पण माझ्या आत्म्यावरचे घाव लपवून आणि आयुष्याच्या प्राथमिक तत्वांशीच तडजोड करून काही मिळवणं नकोय  मला. "
" म्हणजे बिन लग्नाची राहशील पण तडजोड नाही करणार..? "
" अगं आई, माझं लग्न होणं जितकं महत्त्वाचं वाटतं तुला, तितकंच माझं एक चांगला माणूस असणं का नाही महत्वाचं वाटतं..? "
" पण भूतकाळाशिवाय काही अडतंय का.."
" भूतकाळ लपवून ठेवणे म्हणजे एकप्रकारे मी स्वत:लाच नाकारणे नाही काय..? आणि जर मीच स्वत:ला नाकारलं तर दुसरा  कोणी मला पूर्णपणे कसा काय स्वीकारू शकेल..?
   चांगल्या मुलाचंच म्हणशील तर, माझ्या भूतकाळाकडे स्वछ्च नजरेने पाहण्याचा पुरुषार्थ ज्या मुलामध्ये नसेल, अशा पुरुषासोबत माझं आयुष्य बांधून घेण्याची मला काहीही गरज किंवा इच्छा नाहीये.. एकवेळ असा संकुचित वृत्तीचा मुलगा माझ्या जीवनाचा राखणदार होऊ शकेल पण साथीदार कधीच नाही...!! "

7/22/11

तिची विमानं..!!

" बघ ना, आता मोबाईल, इंटरनेट सारं आहे.  पत्राची गरजच उरली नाही.  तो तुझ्यापासून कितीही दूर असला ना तरी नव्या तंत्रज्ञानाने प्रत्यक्षात असतो एका 'call च्या ' कक्षेमध्ये, नाहीतर एका 'mail च्या' अंतरावर..."
"पण खरं सांगू का, ते एक click करणं नाहीच जमत मला..मग त्याच्या आठवणींचे माझ्या कवितांमधील किस्से माझ्या जवळच राहतात.."
" का गं..? "
" असं वाटतं की त्या साऱ्या आठवांचे ठसे पांढऱ्या शुभ्र कागदांवर उमटवावेत; खाली माझं नावही टाकू नये. मग त्यांची मस्त मस्त विमानं बनवावीत आणि अलगद सोडून द्यावीत वाऱ्याच्या तरंगावर.. मग त्यांनीही उडत उडत जाऊन, निमूटपणे  त्याच्याच तळव्यावर विसावावं.. काळजीपूर्वक  त्यानं एकेक ओळ वाचावी... बास्स.. एव्हढंच..! पुढे रस्ता बंद.. काहीच नको..!! "

साचे

" गणपती बनवण्यासाठी जसे साचे असतात ना, तसेच माणसे बनवण्यासाठी पण हवे.."
" का गं, तुला कसला साचा हवा आहे तुझ्यासाठी..? "
" नाही, मला नकोय साचा.. उलट साचेबंद आयुष्य आणि साचेबंद माणसं जीव घुसमटवतात माझा.. "
" का गं बाई..? "
" अरे हे डोक्यावरचं आभाळ असंच मोकळं ढाकळं हवं. विशाल  निवांत निराकार. त्याला उगाच एखाद्या खुराड्यामध्ये बंदिस्त करायला नाही आवडत मला.. "
" अन ते साच्यांचं काय म्हणत होतीस..? "
" ते साचे होय... ते तुझ्यासारख्या लोकांसाठी.."
"तुझ्यासारख्या लोकांना कसं सारं जसं पाहिजे तसंच हवं  असतं..जागच्या जागी प्रत्येक खिळा.. म्हणजे तुमच्या जवळचा माणूसही तुम्हाला जसाच्या तसा हवा, एका विशिष्ट चौकटीत बंदिस्त. त्याच्या विचारांची, वागण्या बोलण्याची चौकट. थोडा तो वेगळा वागला, इकडे तिकडे सरकला, की तुम्ही बिथरता. तो असं वागूच कसं शकतो म्हणून कांगावा करता.. तो एक जिवंत माणूस आहे, जिवंतपणा म्हटलं की बदल आलाच, अकलेची वाढ आली, विचारांची विविधता आली हे विसरूनच जाता.. माणसाचं विशाल मन एका छोट्या खुराड्यात कोंडून घेण्याची त्यावर सक्ती करता... स्वत:च्या संकुचित वृत्तीपायी दुसऱ्यांच्या मनांचा बळी घेता.."
    " म्हणून म्हणते, तुम्ही ना तुम्हाला पटणाऱ्या आचार विचारांचे, स्वभावाचे साचे बनवून घ्या आणि घालत सुटा रतीब तुम्हाला हव्या तश्या माणसांचा.... "
तो प्रचंड चिडला.. त्याचे तिरकस उत्तर.. " thanks for suggestion .."
तिचे सरळ बोलणे.. " तू नकोस म्हणू thanks .. कारण त्याचा फायदा तर आमच्या सारख्या लोकांना होईल.. आम्हा  जिवंत माणसांना साच्यात घालून mould करण्याचे तुमचे अघोरी प्रयत्न तरी थांबतील.. "

7/21/11

"तिचं आणि त्याचं नातं"

एका पावसाळी संध्याकाळी तिचा आणि त्याचा वाद.. नेहमी सारखाच..
तो.. " सगळंच संपतं गं कधी ना कधी.. प्रत्येक नातं हे जेव्हा जोडलं जातं, तेव्हाच नियतीनं त्याचा शेवट 
कुठेतरी लिहून ठेवलेला असतो..."
  ती.. " म्हणजे आपलं नातंही संपणार कधीतरी..? "
तो.. " माझा तसा अर्थ नव्हता.. मी generalised statement दिलं... every relationship has to end some day .." 
ती.. " किती नकारात्मक बोलतोस.."
तो.. " खरं तेच बोलतो.."
ती.. "नाही.. मला नाही पटत असलं चुकीचं बोलणं..
      खरं तर दोन व्यक्तींमध्ये नातं जोडलं गेलं की ते ना गोंदलं जातं काळाच्या पडद्यावर आभाळीच्या नक्षत्रासारखं... ते असतंच  कायम अस्तित्वात..फक्त  होतं काय तर त्याचे रंग बदलत जातात, पोत बदलतो, सूर बदलतात, इतकंच.. पाण्याचा झरा असतो ना, तो कशी वाट काढत राहतो, वळणं वळणं घेत जातो, कधी जमिनीच्या पोटात गुडूप होऊन जातो पण पुन्हा दूर कुठेतरी बाहेर पडतोच.. त्या पाण्याच्या प्रवाहासारखंच नातंही घेत राहते जीवनातील अनोळखी प्रदेशांचा शोध.. "
तो.. " अगं पण बाष्पीभवन होतंच ना पाण्याचं.. उन्हाचे  चटके बसले की वाफ होते पाण्याची.. नातंही होरपळून जातं वास्तवाच्या धगीत आणि मागे राहते नुसती वाफ.. "
ती.. " हो वाफ होते पण म्हणून संपून थोडीच जातं..?  त्याचं अस्तित्व रहातच ना... आणि मग ग्रीष्म दाहाने वाफ झालेलं पाणी वर्षा ऋतूमध्ये पाऊस होऊन बरसतं त्याचं काय..? "
   बाहेरचा पाऊस हातावर घेत ती बोलली..
  बोटावरचा थेंब तिनं काळजीपूर्वक त्याच्या हातावर टेकवला  आणि मूठ बंद केली..
   तोही चिडलेला... तिला खिडकीजवळून बाजूला सरकवून त्याने खटकन खिडकी बंद केली.
 तो आडमुठेपणाने बोलला.. " मी खिडकी बंद केल्यावर, पाऊस बाहेर, मी आत कोरडा.. मग काय करशील..? "
 ती मुग्ध हसली.. समजून उमजून हसत उत्तरली...
 " पावसाचं पाणी म्हणजे जिवंत अन सळसळतं चैतन्य असतं.. ते मातीत रुजतं, मातीशी सलगी करतं.. एखादं बीज शोधतं, त्याला माया देऊन फुलवतं.. मग ते बीज अंकुरतं एखाद्या रोपट्याच्या रूपानं. त्याला फळ आलं तर तुझ्या पोटात जाऊन तुला जीवनरस पुरवेल, आणि फूल आलं तर त्याचा सुगंध भिंत किंवा  तुझी बंद खिडकीही ओलांडून पोहोचेल तुझ्या नाकपुड्यांत.. "
बोलतच तिने हळूच त्याच्या नाकावर टिचकी मारली.
  तो गोंधळला, बावरला.
तिला हसू फुटलं, पण त्याला हार मानायची नव्हतीच तिच्या समोर..
त्याचा सवाल.. " पण अगदीच बिनकामाचं गवत उगवलं तर, जनावरांच्या पण खाण्यालायक नाही असं, किंवा त्याहीपेक्षा वाईट म्हणजे विषारी वेल उगवली तर..? "
 तिच्या चेहऱ्यावरचे हसू पुसून जाऊन तिथे आता वेदनेची कळ.
 त्याच्या चेहऱ्यावर     मात्र       जिंकल्याचा आनंद.
तरीही तिचे हळवे उत्तर.. " बिनकामाचं माजलेलं गवतसुध्धा शेकोटीच्या कामी येतं, एखाद्या रक्त गोठवणाऱ्या थंडीमध्ये ऊब मिळावयाला; आणि विषाचं म्हणशील तर काही नाती जपण्यासाठी आयुष्याचीही किंमत आनंदाने  मोजावी लागते कधी कधी.. "
 तो स्तब्ध. अस्वस्थ आणि बेचैन. भले तो दगडासारखा कठोर असला म्हणून काय झालं, इतका हळवा हल्ला झाल्यावर कोसळणार नाही तर काय..
तिची शून्यात नजर.. " कुठला पाऊस घेऊन येणार रे आपलं नातं ? माहीत नाही म्हणून आजकाल प्रत्येक पाऊस घेते अंगावर.. कुठल्या थेंबातून कुठला अंकुर फुटेल कोणी सांगावे..? " 

7/19/11

समजून घेताना..

" प्रत्येक माणूस म्हणजे भावनांचा पेटारा असतो... पण बंदिस्त.. अगदी कडी कुलुपात बंद.. बाहेरून  नुसतेच कडक कवच दिसते, परंतु आत मात्र खदखदणारे अद्भुत, अजब रसायन..."
" गम्मत म्हणजे बहुतेकांना या कुलुपाची चावी कुठे शोधायची हेच ठाऊक नसते... मग नुसतेच कवच पकडून बसतात, आपापल्या कुवतीनुसार अर्थ लावतात आणि मग अनर्थ होतात..."
"मग दुसऱ्यांची किल्ली शोधायची तरी कुठे..?"
" पहिल्यांदा स्वत:ला स्वत:ची किल्ली शोधावी लागते. स्वत:ची किल्ली सापडली म्हणजे मग आधी स्वत:चे कवच भेदून आत शिरता येते आणि स्वत:ला समजून घेता येते. स्वत:ला समजून घेता आले, तरच इतरांना समजून घेणे सहजपणे जमते.. एकदा का ही समजून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली ना, की सगळे गुंते अलगद सुटतात, गैरसमज गळून पडतात.. इंद्रिये स्वछ्च आणि जास्त संवेदनशील होतात.. मग फुलाच्या गळून पडण्याचा नादही टिपता येतो आणि कोड्यात टाकणारी मौनेही बोलकी होतात.. असा माणूस पाण्यासारखा नितळ होऊन जातो.. दृष्टी आतून बाहेर निर्मळ होते.. मग जागा होतो खरा विश्वबंधुभाव.. तेव्हा स्वत:वर आणि इतरांवरही प्रेम करण्यासाठी काही खास प्रयत्न करावे लागत नाहीत.. ते सहज साध्य होते...
 मनाची क्षितिजे रुंदावतात.. "