Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..

7/22/11

साचे

" गणपती बनवण्यासाठी जसे साचे असतात ना, तसेच माणसे बनवण्यासाठी पण हवे.."
" का गं, तुला कसला साचा हवा आहे तुझ्यासाठी..? "
" नाही, मला नकोय साचा.. उलट साचेबंद आयुष्य आणि साचेबंद माणसं जीव घुसमटवतात माझा.. "
" का गं बाई..? "
" अरे हे डोक्यावरचं आभाळ असंच मोकळं ढाकळं हवं. विशाल  निवांत निराकार. त्याला उगाच एखाद्या खुराड्यामध्ये बंदिस्त करायला नाही आवडत मला.. "
" अन ते साच्यांचं काय म्हणत होतीस..? "
" ते साचे होय... ते तुझ्यासारख्या लोकांसाठी.."
"तुझ्यासारख्या लोकांना कसं सारं जसं पाहिजे तसंच हवं  असतं..जागच्या जागी प्रत्येक खिळा.. म्हणजे तुमच्या जवळचा माणूसही तुम्हाला जसाच्या तसा हवा, एका विशिष्ट चौकटीत बंदिस्त. त्याच्या विचारांची, वागण्या बोलण्याची चौकट. थोडा तो वेगळा वागला, इकडे तिकडे सरकला, की तुम्ही बिथरता. तो असं वागूच कसं शकतो म्हणून कांगावा करता.. तो एक जिवंत माणूस आहे, जिवंतपणा म्हटलं की बदल आलाच, अकलेची वाढ आली, विचारांची विविधता आली हे विसरूनच जाता.. माणसाचं विशाल मन एका छोट्या खुराड्यात कोंडून घेण्याची त्यावर सक्ती करता... स्वत:च्या संकुचित वृत्तीपायी दुसऱ्यांच्या मनांचा बळी घेता.."
    " म्हणून म्हणते, तुम्ही ना तुम्हाला पटणाऱ्या आचार विचारांचे, स्वभावाचे साचे बनवून घ्या आणि घालत सुटा रतीब तुम्हाला हव्या तश्या माणसांचा.... "
तो प्रचंड चिडला.. त्याचे तिरकस उत्तर.. " thanks for suggestion .."
तिचे सरळ बोलणे.. " तू नकोस म्हणू thanks .. कारण त्याचा फायदा तर आमच्या सारख्या लोकांना होईल.. आम्हा  जिवंत माणसांना साच्यात घालून mould करण्याचे तुमचे अघोरी प्रयत्न तरी थांबतील.. "

No comments:

Post a Comment