Pages
Welcome...
Labels
- Love (1)
- कविता (23)
- मीराची डायरी (17)
- ललित (32)
- संवाद (6)
- सुचेल ते.. (10)
- हिंदी कविता (3)
2/27/24
मराठी भाषा बोलते म्हणून
1/30/18
छत्तीसगड
मला आयुष्यात ध्येयाने वेडावलेली, अफाट काम करून दाखवणारी, स्वतःची बुद्धी व उर्जा समाज हितासाठी वापरणारी माणसे भेटली की मी भारावून जाते अशा व्यक्तींच्या दर्शनाने. मग ते डॉ. अभय बंग, डॉ. रानी बंग असोत, डॉ. प्रकाश आमटे असोत, विकास आमटे असोत किंवा आमचे छत्तीसगडस्थित बिजापुरचे जिल्हाधिकारी डॉ. अय्याज तांबोळी असोत. अशी माणसे स्वतः तर मोठे कार्य घडवातातच पण दुसऱ्यासाठीही एक मोठा आदर्श निर्माण करतात.
इथे छत्तीसगड मधे काम करताना, डॉ. अय्याज तांबोळीची कार्यशैली आणि मैत्री जवळून पाहायला मिळाली. त्यांच्यासाठी लिहिलेली ही कविता.
हिरवं हिरवं जंगल
दाट दाट झाडी
कमळांनी भरलेले तालाब
आभाळाला टेकणारे महाकाय वृक्ष
या साऱ्या उत्कट निसर्गात
गर्द हरवलेली माणसांची
छोटी छोटी खेडी..घरे.
आणि या सगळ्यावर उमटलेली
तुमच्या शुभ्र कर्तृत्वाची मोहोर
हे सारं सारं तर आवडतं मला..
उघड्या नागड्या पोरांना
छातीशी धरणार्या
अतिसुंदर आणि अतिकठीण आया.
पोटातील भूक गच्च दाबून
गोड हसणार्या आदिवासी बाया..
जंगलात लाकूड, करवंदे, महूआ
ढुंढाळणारे हे जंगल वासी.
या सर्वांवर मायेची पाखर धरणारे
त्यांच्या जगण्याचा टेकू बनणारे ,
आधार देणारे तुमचे काम..
त्या कामामागचा तुमचा कळवळा
तुमची दूरदृष्टी
तुमचा सारासार विचार
हे सारं सारं तर आवडतं मला..
तुमच्याकडे कोणतीही अडचण
घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला
तुमच्याकडून
मिळणारा दिलासा
एखाद्या अवघड समस्येवर
तुमच्याकडे असलेले असंख्य उपाय
समोरच्या व्यक्तीला समजून घेऊन
तुमच्या विशाल अंतरंगात
सामावून घेणारे
तुमचे प्रेमळ, सहज भान
तुमचे हसून बोलणे,
सांभाळून घेणे
हे सारं सारं आवडतं मला..
हेच तर बळकट करते आयुष्यावरची श्रद्धा
आणि तुमच्यावरचा विश्वासही.
12/28/16
स्वप्नांची किंमत काय ?
Being a Doctor as private consultant in your new clinic, waiting for patients, with professional & personal stress, night fired for admitted patient, ill health, bored mood, broken heart and 4G internet connection makes you a poet !!
स्वप्नांची किंमत काय ?
माझ्या...तुझ्या...आपल्या दोघांच्या...
पूर्ण झालेल्या....
अर्ध्यातून सुटलेल्या..
आणि अशीही काही स्वप्ने...
जी सत्याचा प्रकाश पडताच हवेत विरून गेली..
आणि काही..डोळे उघडताच संपून गेली..
ही सर्व स्वप्ने जातात का कुठे ?
यांची किंमत काय.?
आणि कशामध्ये होते यांचे मोल ?
थोडे हसरे क्षण, काही आनंदाचे हेलकावे.
काही भावनांचे कल्लोळ..
बरेच सारे अश्रू..आनंदाचे..
आणि दुःखाचे....
आणि वेदनेचेही...
अशीच असते किंमत या स्वप्नांची...
पूर्ण झालेल्या..आणि भंगलेल्या..
आपण गोळा करत राहतो
हाताला येईल ते तुकडे..
आणि शिवत राहतो पुन्हा पुन्हा
आपणच स्वतः उसवलेली
हृदयाची काळीज शिवण.
हेच असते भागधेय
स्वप्ने पाहणाऱ्या
तुझे आणि माझे..
6/15/16
पुरूष नेहमी पुरूषच असतो..!
पुरूष नेहमी पुरूषच असतो
दारू पिणारा,
शिवीगाळ मारपिट करणारा
बिड्या फुंकणारा ,
नपुंसक असला तरीही..
पत्ते कुटत,
बायकोच्या पैशावर मजा मारणारा
गावभर उकिरडे फुंकणारा
पुरूषच असतो !!
पुरूष नेहमी पुरूषच असतो
फार फार तर मर्द म्हणवतो
स्त्री ?
ती कधी बाईमाणूसही म्हणवते
नाहीच असे नाही
बर्याचदा
जेवणात मीठ कमी पडले
तर ती हराम होते
पुरूषाने ठेवली की
रखेल होते
मूल न देऊ शकणारी
वांझोटी असते
कधी वेश्या असते
आणि नवर्याने टाकून दिली तर
गावजेवण होते
दुर्गा म्हणतात कधीकधी तिला
पण ती पुराणातच परवडते सार्यांना
जिवंत जाळली जाते सहजच
हलक्या चारित्र्याची म्हणून
किंवा भोगली जाते
तिच्या मर्जीविरूद्ध
बंद दाराआड
किंवा उघड्यावरच
ती छिनाल असते
पुरूषाला जाळ्यात फसवणारी
ती रांड असते
अशी तशी ती कोणकोण असते
फक्त माणूस तेवढी नसते
11/23/14
जंगल
जंगल खुळावतं
वेडी भूल घालतं
तारतं की मारतं
माहित नाही
पण जागवतं
आतमध्ये
विलक्षण सळसळ
जंगल खुणावतं
गोड शीळ घालतं
त्याच्या पोटात
शिरता
अलिप्ततेने का होईना
पण घेतं
कवेत
जंगल
जसं पसरलंय
आजूबाजूला
तसंच एक
आतमध्ये
वृक्षांच्या फांद्या
तसे पसरलेले
जाळे मेंदूमध्ये
तंतूंचे..!
मग कधी
होतो भ्रम
जणू हे आतलंच
उगवलंय बाहेर
आणि जणू जंगलच
प्रकटलंय
माझ्या
अणूरेणूंतून..!
10/27/14
तू जा..
आत्ताच तर श्वास होतोय
मोकळा हळूहळू
आत्ताच जीवाला दिलाय
नव्या आयुष्याचा दिलासा
त्यात तू येऊन
जुन्या जखमांना नकोस डिवचू
आणि नकोस करू हट्ट
माझे व्रण छेडायचा
आत्ता कुठे मीच मला
आवरून ठेवते आहे
एकावर एक साठवण
रचून लावते आहे
तू असा अचानक
येऊ नकोस माझ्या गाभाऱ्यात
(कितीही हाक दिली मी
जीवाच्या आकांताने तरीही)
काळजाच्या डोहात उतरायचा
विचारही नकोस करू
(पाणी नितळ दिसलं
तरी असू शकतं रक्तपिपासू)
कुठले कसले
हिंस्त्र पशू
बसले आहेत दबा धरून
झोपवलंय मी त्यांना
अनंतकाळच्या भूलथापा देऊन
तुझ्या नुसत्या चाहुलीने
जाग येऊ पाहतेय काळरात्रीला
म्हणून
दुरूनच तू जा
तू लवकरच जा
कारण
मीच पेटवलेल्या हवनकुंडामध्ये
तुझाही बळी देण्याचा
आदिम मोह
कधीही जागू शकतो माझ्या अंतरात...
10/21/14
उगाच
उगाच वाटतं दोन दिवस
सोबत झाली सोबत झाली
पुन्हा असतोच आपण
एकट्या वाटेचे प्रवासी
उगाच वाटतं दोन क़्शण
तो भेटला तो थांबला
येणारच असतो परतून
निरोपानंतरचा दुरावा
उगाच बांधत राहतो
आपण हवेमधले इमले
मन दूर भटकत जाई
पाय घट्ट जखडलेले
उगाच द्यायची नावे गोंडस
नव नवीन नात्यांना
बारमाही उन्हाळा वसे मनी
ओलावा कसा तगावा
सगळेच हे
उगाउगीचे खेळ
ऊन्हामधलं घर
आणि बर्फाचं बेट
1/7/13
"Days will..."
memories will fade
life keeps on going
bondage will melt
i wake up to each day
waiting for new sun
it will show up someday
making for dawn
silently i hope
memories should fade
bondage should go
tired body sleeps
for new one to be born..