लहान असताना कुठल्याशा भाषेतला, मल्याळम की तमीळ भाषेतला एक सिनेमा पाहिला होता. थोडासा सुंदर, पुष्कळसा वेदनादायी. तो पाहिला आणि मनात रुतून बसला. अधेमधे उगाच आठवत राहतो आणि अस्वस्थ करत राहतो. एका मित्राशी फुलांच्या गप्पा रंगल्या आणि पुन्हा तो सिनेमा आठवला. त्याच्याशी ती आठवण share करू वाटली म्हणून हे लिहीणं ..
दोन बहिणी आई वडिलांसोबत गावात राहत असतात. त्यातली थोरली असते तिला एक सिध्दी प्राप्त असते. एक मंत्र म्हणाला की तिचं रूपांतर मोठ्या वृक्षात होतं, त्याला सुवासिक आणि शुभ्रधवल फुले असतात. त्या वृक्षाला कळशीतल्या पाण्याने तीन वेळा पाणी घातले की पुन्हा ती माणूस होते. ही गोष्ट फक्त दोघींनाच ठाऊक असते.
तर अशा त्या दोघी बहिणी भल्या पहाटे उठून दररोज जंगलात जात असतात, मग तिथे थोरली सुंदर फुलांचा वृक्ष बनत असते व धाकटी फुले वेचते. ती फुलं त्या मग बाजारात विकत असतात. एकदा एक मुलगा त्या फुलांच्या प्रेमात पडतो. त्यांना म्हणतो कि मी खूप पैसे देईल , मला या फुलांचं झाड दाखवा. त्या त्याला हाकलून लावतात. पण त्याला कसंही करून ते झाड हवं असतं. मग तो दोघींवर पाळत ठेवतो आणि चोरून सारं पाहून घेतो.
मग तिच्या घरच्यांना पटवून तिच्याशी लग्न करतो. लग्नाच्या पहिल्याच रात्री तिला सांगतो मला सारं माहिती आहे आणि आत्ताच तू मला तो वृक्ष बनून दाखव. ती खूप घाबरते, रडते, त्याला विनवते. पण तो जबरदस्तीने तिला वृक्ष व्हायला भाग पाडतो. नंतर तिने सांगून ठेवले तसे पाणीही टाकतो. रोजच रात्री हा प्रकार चालू राहतो.
तिची धाकटी नणंद रोज सकाळी त्यांच्या खोलीत फुले पाहत असते. तो घमघमणारा वास तिला वेडं करत असतो. मग ती चोरून एका रात्री पाहून घेते व तिलाही ते गुपित माहिती होतं.
एके दिवशी नणंद तिच्या वहिनीला घेऊन गप्पा मारत दाट जंगलात जाते. तिथे मग तिला गळ घालते कि मलि झाड बनून दाखव. रडून खूप हट्ट करते तेव्हा ती भोळी वहिनी तयार होते , म्हणते पण कळशी कुठेय ? तर या नणंदेने सगळी तयारी आधीच करुन ठेवली असते. मग मंत्र म्हणून ती वृक्ष होते आणि लगेच ती नणंद तिच्या सर्व मित्रमैत्रिणींना आवाज देते. सगळे जमतात. फुले गोळा करतात. मग त्यांचे खेळ सुरू होतात. मध्येच पोरं पोरी त्या वृक्षाच्या फांद्यांवर चढतात. पोरं बेभान असतात. फांद्या तुटल्याचे आवाज येतात. नणंद घाबरते अरे ही माझी वहिनी आहे, असं करु नका. कोणालाच फिकिर नसते. जमेल तशा फांद्या तोडत , उड्या मारत पोरे पळून जातात. नणंद घाबरत, रडत कळशीने पाणी टाकते व किंकाळी फोडून पळून जाते.
इकडे तिचा नवरा तिची वाट पाहतोय. अंधार पडला तरी येईना म्हणून काळजी करतोय. बहिण भीतीने काही सांगत नाही. हा तिला बरेच दिवस सगळीकडे शोधत राहतो पण ती सापडत नाही. तो तिच्या विरहाने रडतो , तडफडतो. बहीण गुपचुप राहते.
शेवटी त्याला शंका येते आणि शोधत तो त्या जंगलात येतो. प्रत्येक वृक्ष पाहू लागतो. मग अचानक एका लाकडाच्या ओंडक्याला अडखळतो, पडतो. पाहतो तर "ती" असते. तिच्या शरीराच्या जागी फांद्या तुटलेलं वृक्षाचं खोड असतं आणि वरती वेदनेने पिळवटलेला चेहरा.
शेवटचा scene असा आहे कि तो बैलगाडी चालवतो आहे आणि camera मागे तिचा तुटलेला वृक्षदेह पहुडलेला दाखवतो.
पाहणाऱ्याच्या काळजावर वेदनेचे चरचरणारे निखारे ठेवून सिनेमा संपतो.
Pages
Welcome...
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..
Labels
- Love (1)
- कविता (23)
- मीराची डायरी (17)
- ललित (32)
- संवाद (6)
- सुचेल ते.. (10)
- हिंदी कविता (3)
3/15/15
एका फुलांच्या वृक्षाची गोष्ट
Subscribe to:
Posts (Atom)