Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..

5/28/15

Being A GypSycho

Whats app वर status काय टाकायचं ?
रोजच्या जगण्यातील महत्त्वाचा प्रश्न !
Status  कसं , जुळून आलं पाहिजे तुमच्या व्यक्तिमत्त्वाला आणि त्यावेळेच्या mood ला . कधी एखादं गाणं, कधी thought , तर कधी नुसतीच गंमत. कधी एखाद्या गोष्टीची आलेली मनस्वी चीड.
        असंच विचार करताना आज नवीनच शब्द सापडला. "GypSycho "
Status टाकलं. "Being A GypSycho "
लगेच सर्वांची उत्सुकता.
"म्हणजे काय गं"
म्हटलं, " Gypsy plus psycho "
त्यात त्याचा टोमणा.  "self -actualisation झालंय का ? "
"हो, झालंयच." त्याला ठणकावलं.
हे पाय काही थांबायचं नावच घेत नाहीत. अंगात वारा शिरल्यासारखं होतं. सारखी नव्याची ओढ, नव्याचा ध्यास. नव्या ठिकाणी जाण्यासाठी जिवाची तगमग.
वाटतं जणू पायाला चाकंच आहेत.
दर सहा महिन्यांनी नव्या ठिकाणी जायची हौस. पण practiacally आणि नोकरीच्या दृष्टीने  ते शक्य नसते. मग दर एक वर्षाने बदलायची जागा. एक वर्ष टिकून रहायचे.
मग अशी दर एक वर्षाने नव्या ठिकाणी पोहोचलेली मी पाहिली की सगळ्यांचे judgement आलेच.
"Unstable आहेस तू."
झालं.
नुकतेच केस कापले. बॉयकट. काही महिन्यांनी असं स्वतःला पूर्ण बदलून टाकायला आवडते मला. स्वतःला renew करत रहायचे periodically.
नवा Dp पाहून पुन्हा messages.
"पुन्हा केस कापले ?"
कंटाळा येतो मला केस विंचरायचा. आयुष्यात बाकीची इतकी महत्त्वाची कामे असताना या dead cells उर्फ केस maintain करण्यात वेळ का वाया घालवायचा ?
पिकूमधल्या दिपीकाचे मस्त केस पाहून वाईट वाटत असतानाच त्याचा message.
" मस्त दिसतेय." हुं, याला तर सगळंच आवडतं.
असं वार्यावर भिरभिरतं आयुष्य मला जाम आवडतं.
आवडतं मला explore करायला.
नवीन ठिकाणांना , वेगवेगळ्या लोकांना , तरूणाईला , सामाजिक प्रश्नांना आणि त्याच्या उत्तरांना explore करणं . हे करता करताच स्वतःच्या आत दडलेल्या उर्मींना चाळून, छानून समजून घेणं.
Risk ?
Risk तर असतेच. अंधारात चाचपडायची, ठेच लागून धडपडायची, रस्ता चुकायची.  हट्टाने घेतलेले निर्णय अपयशी ठरल्यावर  स्वतःवरचा विश्वास हरवण्याची. आनंदाचे क्षण वेचताना निराशेच्या खोल गर्तेत अडकायची.
Risk तर असतेच.
पण ती तर घ्यावीच लागेल. त्याशिवाय स्वतःला शोधता कसे येणार ? स्वतःचा थांगपत्ता कसा धुंडाळणार ?
सगळ्यातून तावूनसुलाखून गेल्याशिवाय काळजाचं पातं धारदार कसं होणार ?
रोज मी cycling, walking , जमेल तो exercise करते. कारण शरीरावर वयाचा गंज नाही चढू द्यायचा मला.
पोटात अन्न टाकताना शक्यतो healthy food च निवडते. कारण चरबीचे थप्पे नको आहेत चढायला माझ्या रक्तवाहिन्यांमध्ये.
मनाचे काय ?
आत्म्याचे काय ?
त्याची पण काळजी घ्यायला हवी ना ?
मनावर नाही चढू द्यायचा गंज भूतकाळाचा, निराशेचा, आळशीपणाचा, समाजाच्या आंधळ्या समजूतींचा, एवढेच काय, तर Security आणि comfort zone चा पण गंज नको.
त्यासाठी Exploration..!
नायना (डॉ. अभय बंग) सांगतात , "खरी लढाई तर आत असते. "
बरोबर आहे नायना. सगळी लढाई आतच. बाहेर उमटतात ते त्याचे पडसाद.
ही आतली तगमग बसूच नाही देत शांत. ही जागवत राहते कित्येक रात्री. ही पेटवत राहते नवनवीन उर्मींचे होमकुंड.
ही चेतवत राहते मेंदूच्या तंतूंना.
या सगळ्यात मी काय गमावते आणि काय मिळवते ?
याचा हिशोब कसा करणार ? समाजाच्या ठरलेल्या चौकटीमध्ये नाही मांडणार मी याचा जमाखर्च.
स्वतःवर असणारा घट्ट विश्वास आणि समोरच्यावर  माणसावर प्रेम एवढं पुरेसं असतं मला जगण्यासाठी.
तू म्हणतोस, "समाज नाकारून चालत नाही."
समाज नाहीच नाकारत मी. पण समाजाची आंधळी धारणा व आंधळी बुद्धी नक्कीच नाकारते.
माझी वेगळी वाट मीच निवडलेली आहे. वेगळी वाट निवडल्यावर शक्यता असतेच इतरांपासून वेगळं व एकटं पडायची. पण ती शक्यता कितीही नकोशी असली तरी मला स्वीकारावी लागेलच. ती स्वीकारूनच ही वाट चालायची आहे मला.
Trust your strength dear..!!

5/12/15

"मी पूर्णपणे अशी कोणालाच नको असते"


मी पूर्णपणे अशी कोणालाच नको असते.
म्हणजे तुम्हालाही येतं का असं feeling कधीकधी किंवा अनेकदा....?
आपल्यातील थोडासा. काहीसा selected भागच फक्त इतरांना हवा असतो.
तेवढ्याच भागापुरते त्यांना आपल्याशी देणेघेणे असते.
ते येतात, तेवढाच भाग पाहतात, तेवढ्याशीच नाते जपतात. तेवढ्याकडून त्यांना हवे ते काम काढून घेतात. त्यांचे येणे वसूल करून घेतात आणि जातात निघून उरलेल्या भागाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून.
अशी मी मग वेगवेगळ्या भागात विभागली जाते.
किंवा मग लोकांना सोप्पं जावं म्हणून मीच आधी तुकडे करून ठेवते स्वतःचे.
“घ्या, तुम्हाला हवा तो तुकडा घ्या. ”
असे मग नुसते तुकडे तुकडेच होऊन जातात.
मग कुणालातरी माझा अगदीच आतला तुकडा हवा असतो, काळजाचा. अलगद येऊन, माझे सारे बंदीपहारे सहजच चुकवून, ती व्यक्ती तो माझ्या जीवाचा तुकडाही अलगद जाते वापरून. मनात येईल तेव्हा येऊन गोंजारते. मन भरलं की पाठ फिरवून निघून जाते. पण तिच्या हाताळण्याने पोहोचते त्याला भरून न येणारी इजा. काळजाची इजा कोणाला दाखवणार ? आणि जी व्यक्ती ती देऊन गेली, तिला तर आठवण पण नाही राहत त्या भागाची अथवा मुद्दामच ती व्यक्ती सोंग करते, की अरे, मी तर तिकडे आलेच नाही. माझ्याकडे तर नसतात कसले साक्षी पुरावे.
इतकी पण शरम नसावी का अशा लोकांना ? इतका पण मर्दपणा नसावा का पुरुषांमध्ये की कबूल करण्याचा की मी वापरला तुझा काळजाचा भाग माझ्या आनंदासाठी ? एवढा basic प्रामाणिकपणा नसावा का एक माणूस म्हणून ?
आणखी दुसऱ्या कोणाला थोडा व्यावहारिक भाग हवा असतो. त्यांनी ते स्पष्ट ठेवलेलं असतं ते चांगलं. पण मी पडते मूर्ख. माझं तर नियंत्रण नसतंच त्यावर. त्या व्यक्तीला माझा व्यावसायिक भाग देत असतानाच अचानक दुसराच भावनिक भाग विरघळू लागतो, प्रेम पाझरू लागतो. ती व्यक्ती मग अगदीच विचित्र नजरेने पाहू लागते त्या माझ्या गरीब लाचार भागाकडे. त्या तिरस्काराच्या नजरेने माझं पूर्ण अस्तित्वच शहारून जातं. असं वाटतं, लपवून टाकावा अथवा मारून टाकावा तो भावनाविवश भाग. मी अशी विद्ध असताना ती व्यक्ती तिचं व्यावसायिक काम काढून घेऊन निघून जाते आणि मागे मी शरमेच्या, निराशेच्या गर्तेत अडकलेली.
काही असतात तापदायक, मला स्वतःलाही नकोसे वाटणारे. रागाचे, इर्षेचे, Insecurity चे, निराशेचे. दु:खाचे.. मलाच ते पेलवत नाहीत. वाटतं स्वतः पासून तोडून ते फेकून द्यावेत. पण तसं होत नाहीत. ते असतात माझ्या अस्तित्वाचे अविभाज्य अंग. अशा टोकदार, काटेदार, कुरूप भागांचे दर्शन ज्याला होते, ती व्यक्ती तर नाकारुनच टाकते माझ्या चांगल्या भागांचे अस्तित्व. तो माझा एक भागच बनून जातो मला Define करणारा केंद्रबिंदू त्या व्यक्तीसाठी. पाहत राहते मी हताशपणे फक्त. “अरे, मला स्वतःलाच या भागाचं कोडं सुटत नाही, ते मी तुला कसं समजावून सांगू. पण म्हणून मला त्या भागाने अधोरेखित करण्याचा तुला काहीच हक्क नाही...” हे सारं असतं आतल्याआत.
असे अखंड तुकडे पडलेले असतात मनाचे, माझ्या भाव विश्वाचे.
त्यात शरीराचाही एक तुकडा. त्याच्या मागण्यांचा प्रदेश तर वेगळाच. त्या मागण्या मलाही घाबरवून टाकणाऱ्या. नैतिकतेच्या कोड्यात अडकून त्यांचा सगळा घोळच होऊन जातो, जो ना त्यांना उमगतो, ना मला. कधी कधी त्या सुख पुरवणाऱ्या, तर कधी मनावर तप्त सळईने ओरखडे ओढणाऱ्या.
असे असंख्य घायाळ तुकडे. त्यांचे त्यांचे घायाळ प्रदेश. त्या प्रदेशाची मी नियंत्रण नसलेली मालकीण.
आणि मजा अशी की मी अख्खीच्या अख्खी कुणालाच नको असते. असं का होतं ? मी माझ्या काळ्या-पांढऱ्या सकट, वरचं आवरण आणि आतल्या गाभाऱ्यासकट, माझ्या सर्वच्या सर्व भागांसकट कोणालाच का हवीशी नसते ?
असं स्वतःचे लचके तोडून आणि त्या तुकड्यांचा बाजार मांडून जगणं खरंच आवश्यक आहे का ?