काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकार्यांनी डॉक्टर्स ट्रांझिट होस्टेलसाठी ६ सायकल विशेष निधीतून दिल्या. सर्व डॉक्टर्स जसा वेळ मिळेल, तसे सायकलिंग करायला दूरदूरपर्यंत जातात. आमच्या जिल्हा रुग्णालयापासून उजवीकडे २ किमी आणि डावीकडे २ किमी, असे बिजापूर शहर पसरले आहे. डावीकडे २ किमी वर जिल्हाधिकारी ऑफिस लागते, तेथून आणखी पुढे बडमिंटन कोर्ट, पोहण्याचा तलाव, शासकीय विश्रामगृह, मधुबन नावाचा जुना ढाबा असे पोइंटस लागतात. तेथून आणखी एक किमी पुढे जिल्हाधिकारी निवासस्थान लागते. मग नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय, डी.ए.वी. स्कूल व कॉलेज लागते. तेथून डावीकडे आत गेले की मांझीगुडा नावाचे सुंदर गाव लागते. तेथून आणखी पुढे जाऊन, ३-४ गावे ओलांडून एक गोल राउंड मारला, की पुन्हा बिजापुरमध्ये येता येते. जिल्हा रुग्णालयाच्या उजवीकडे बाजार, पेट्रोल पंप, बस स्थानक, आणि सर्वांचा मनपसंत दंतेश्वरी ढाबा लागतो. डाव्या दिशेला ४५ किमी भैरमगड, आणि ८० किमीवर दंतेवाडा जिल्हा लागतो, तर उजवीकडे ६० किमीवर भोपालपट्टणम, मग इंद्रावती आणि इंद्रावतीच्या पलीकडे महाराष्ट्रातील पाथागुडम गाव व सिरोंचा जिल्हा लागतो. भोपाल पट्टणम पासून दक्षिणेकडे तेलंगणा लागते. बिजापूर शहराच्या चारी दिशांवर CRPF च्या चार बटालियनचे काम्प्स आहेत.(नंबर्स)
सायकलिंगला सर्व निघतात, तेव्हा काही मेन रोडने डावीकडे नवोदय विद्यालय, नेमेडकडे जातात, काही आजूबाजूच्या छोट्या गावाकडे जातात. उजवीकडे बस स्थानक संपले की चढ उतार आहे, पुढे घाट सुरु होतो. याला सारे “घाटी” म्हणतात, कधी सर्व इकडे फिरायला जातात. घाटी संपले की मोदकपाल नावाचे गाव लागते, तिथे CRPF साठी साटेलाईट फोन आहे. बऱ्याचवेळा, बिजापूरमधे दोन-दोन दिवस नेटवर्क निघून जाते, तेव्हा महत्वाचा फोन अथवा इमेल करण्यासाठी आम्ही सारे मोदकपाल इथे जातो.
मला सायकलिंग आवडते, दिवसभराचा कामाचा ताण, चिंता, प्रश्न याने डोके भणभणते तेव्हा एकटीने मी दूरवर सायकलिंगला जाते तेव्हा ते मेडीटेशन होते. निसर्गाच्या सहवासात मनातील सर्व तणाव अलगद निवळत जातात आणि परतून येईपर्यंत मन शांत प्रसन्न होऊन जाते. त्यात मला माझीगुडा हे गाव खूप आवडते. गावात पोहोचताच एक भला थोरला डेरेदार, असंख्य पारंब्यांचा वडाचा वृक्ष लागतो. फोटोत मावतही नाही त्याचा पसारा. तेथील घरेही निळ्या, हिरव्या रंगात रंगवलेली. घरांच्या दारात त्या त्या मोसमाची झाडे, वेली, फळे, फुले, भाज्या लावलेली. छोटेसे गाव संपले की पुढे दूर दूर पसरलेली शेते. खडबडीत रस्ता, एखादा ट्राक्तर, सायकलीवरून जाणारी पोरे, लगबगीने चालणारी एखादी स्त्री. सध्या उन्हाळ्यात लालभडक फुललेले पळस. तेथून दिसणारा पहाड, सोबत मावळतीचा लाल गोळा आणि केशरी आकाश. ते सारे पाहताना भान हरपून जाते. घरची आठवण, चिंता, कोणाशी भांडण सारे विसरायला होते. मग प्रसन्न मनाने परतायचे. इथपर्यंत येऊन जाऊन ८-१० किमी सायकलिंग आरामात होते. गेले काही दिवस मी वेड्यासारखी सायकलिंग करत होते. सायकलचे सीट खूप कडक होते, ते घासून जखम झाली. त्यात रविवारी मी दंतेवाडयाला ‘बचपन बनाओ’ या संस्थेतील माझे मित्र मैत्रीण ज्योती आणि प्रणित यांना भेटायला गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तेथून २० किमीवर असणाऱ्या ‘ढोलकल’ या ठिकाणी ट्रेकिंगसाठी गेलो. ढोलकल येथील पहाडावरचा गणपती प्रसिद्ध आहे. नवव्या-दहाव्या दशकातील सुंदर गणेश मूर्ती इथे जंगलाने वेढलेल्या डोंगराच्या माथ्यावर विराजमान आहे. याची गोष्टही गमतीशीर आहे. (स्टोरी ऑफ ढोलकल ) फेब्रुवारी महिना. पानगळ झालेली. सकाळी ९-१० लाच कडक उन्हे पडलेली. त्यात दगड चढून, त्यावर घासून माझे दुखणे वाढले. ११ वाजता आम्ही परत उतरायला सुरुवात केली. आम्ही चारच लोक होतो, त्यात वाटाड्या नाव. आमचा मित्र लिंबाजी, ज्याला गुडघ्याचा आजार आहे, जिद्दीने पूर्ण पहाड चढला होता. उतरताना मात्र त्याला त्रास होऊ लागल्याने, तो आणि वाटाड्या “नाव ” दोघे मागे राहिले, ते सावकाश येत होते. मी आणि ज्योती गप्पा करत पुढे गेलो आणि बराच वेळाने लक्षात आले की आम्ही रस्ता चुकलोय. १ तासाच्या उतरणीसाठी आम्हाला रस्ता भटकल्याने चार तास लागले. उन्हाने चांगलाच त्रास झाला. तेथून परत येताना रस्त्याच्या कडेला सल्फी विकणारे लोक दिसले. इथे वेगवेगळ्या प्रकारचे, झाडांच्या रसापासून बनवलेले स्थानिक मद्य भेटते. महुआ, सल्फी, ... मला बऱ्याच दिवसापासून सल्फी चाखायची होती. आंबट चिंबट ताकासारखे लागणारी सल्फी दोन घोट प्यायली. संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास, ज्योती आणि प्रणितचा निरोप घेऊन, माझ्या कारने मी दंतेवाडा सोडले. बिजापुरला पोहोचेपर्यंत अंधार पडला होता. अंधारात एकटीने परतताना जाम भीती वाटत होती.
दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमधे कळले, की काल बिजापूरच्या रोडचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे अपहरण झाले आणि आज पहाटे बिजापूरपासून काही अंतरावर मेन रोडवरच त्याला गोळी घालून मारण्यात आले. त्याची डेड बॉडी पोस्टमोर्टेमसाठी आमच्या जिल्हारुग्णालयात आल्याने सर्वत्र तीच चर्चा चालली होती. माझी मैत्रीण भारती आणि डॉ. नागुलन त्यासाठी गेले होते. ते ऐकून मी घाबरले, कारण काल रात्री मी त्याच रस्त्याने आले होते.
सोमवारपासून मला थंडी ताप सुरु झाला, जखमेच्या वेदनेने खुर्चीत बसणे अशक्य झाले होते. मी स्वतः डॉक्टर असून, जखमेकडे दुर्लक्ष केले आणि भरपूर पस भरून दुखणे चांगलेच वाढले. भुल देऊन, छोटी शस्त्रक्रिया करून पस काढावा लागणार होता. पण मी तयार नव्हते. मला घरी जाऊ वाटत होते. परंतु इतका लांबचा प्रवास अशा स्थितीत मला शक्य नव्हता. इथे बिजापूरमधे, जिथे मी स्वतः रुग्णांवर शस्त्रक्रिया करते तिथे स्वतः रुग्ण बनणे, याची लाज वाटत होती. मेसचे जेवण खाऊ वाटत नव्हते. या काळात भारती सतत सोबत राहिली. तापाच्या गुंगीत मी झोपून रहायचे तेव्हा आमची होस्टेलची मावशी (नाव) येऊन सर्व खोली स्वच्छ करत होती, कपडे धुवून, सुकवून घडी घालून ठेवत होती. मेस मधली बबली मी मागेल ते बनवून आणून द्यायची. शेवटी बुधवारी दुखणे असह्य झाले तेव्हा मी डॉ. नागुलनला शस्त्रक्रिया करायची विंनती केली. माझ्या नर्सेस, शिल्पा, प्रेमलता, प्रियांका, वेदिका, साऱ्याजणी माझ्यासाठी उमंगच्या ऑपरेशन थिएटरमधे आल्या. मी स्वतः एक सर्जन असूनही, मला मात्र इंजेक्शन्सची प्रचंड भीती वाटते. मी रडत होते आणि माझ्या नर्सेस नाजूक हातानी मला सुई लावत होत्या. भुल तज्ञ डॉ. गुप्ता मदतीसाठी बाहेर थांबले. मी आत येऊन, ज्या टेबलवर माझे रुग्ण झोपतात, तिथे झोपले. डॉ. भारतीने मला भुलीचे इंजेक्शन दिले आणि माझ्या जाणीवा तात्पुरता बंद झाल्या. शस्त्रक्रियेनंतर दोन दिवसातच मी पूर्ण बरी झाले. त्यादिवशी मला पहिल्यांदाच एक नवीन गोष्ट जाणवली. सतत राबणाऱ्या, स्वतःच्या शरीराला आराम न देता, अथकपणे कष्ट करत राहणाऱ्या माझ्या स्त्री रुग्णांना, जेव्हा आम्ही डॉक्टर्स, नर्सेस भरती करतो, काही शस्त्रक्रिया करतो, त्यांची निरपेक्ष काळजी घेतो, त्यांना सक्तीची विश्रांती घ्यायला लावतो, तेव्हा त्यांनाही खरेच मनापासून चांगले वाटत असेल. आदिवासी रुग्ण जास्त दिवस रुग्णालयात भरती होयला तयार नसतात. बऱ्याचवेळा आमची स्त्री रुग्ण गंभीर आजारी असते आणि तिचे मात्र “घर मे बच्चे है, बहोत काम है, छुट्टी दो,” असे रोज टुमणे चालू असते. त्यांना खूप समजावून सांगितल्यावर बऱ्याचवेळा राहतात, तर कधीकधी न सांगता निघून जातात. असे निघून जाणारे रुग्ण कधी परत येतच नाही, तर काही खूप गंभीर स्थितीत परत येतात. एकदा एका स्त्रीचे बाळ उलटे म्हणजेच पायाळू असल्याने मी तिला सिझर करावे लागेल असे समजावले, रात्रीतून ती निघून गेली. काही दिवसांनी बाळ अडकलेल्या स्थितीत परत आली, मग तातडीने तिची शस्त्रक्रिया करावी लागली. अशा रुग्णांचा पत्ता आम्ही फिल्डवरील मितानी, ANM नर्सेसना देतो, रुग्णांची फिल्डवर काळजी घेणे, गरज पडली की तातडीने रुग्णालयात परत आणणे, याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवतो.
आमचे रुग्णालय सरकारी असूनही आधुनिक, सर्व सुविधापूर्ण आणि महत्वाचे म्हणजे खूप स्वच्छ आहे. मी काही खाजगी रुग्णालयेही पाहिली आहेत, जिथे बाहेरून चमक धमक असते परंतु आत मात्र गबाळा कारभार असतो. त्यामुळे आमच्या आदिवासी रुग्णांसाठी असलेल्या शस्त्रक्रिया टेबलवर झोपताना मला थोडेही घाण वाटले नाही. माझी मैत्रीण डॉ. भारती एक चांगली डॉक्टर आहे हे मला स्वतःला माहित असल्याने, तिच्याकडे भुलतज्ञ डिग्री नसली तरीही, मी तिलाच भुल द्यायला लावली. डॉ. नागुलन माझा जवळचा मित्र आणि त्याहीपेक्षा जास्त, मी पाहिलेल्या सर्जन्सपैकी सर्वोत्तम सर्जन असल्याने मी विश्वासाने त्याच्यावर सर्व भार टाकला. माझ्या नर्सेसने माझ्या कुटुंबीयासारखी माझी काळजी घेतली.
तो पूर्ण आठवडा एक वेगळा अनुभव ठरला. घरापासून, कुटुंबापासून इतके दूर असतानाही, मी ते दुखणे निभावून नेले, ते माझ्या मित्र मैत्रिणीच्या, नर्सेसच्या प्रेमामुळे. मागील वर्षी, घर सोडून, बिजापुरला येताना भीती होती, मी एकटी राहू शकेन का. घरच्यांना सतत चिंता असते, ही एकटी कशी राहतेय. कधी ओळखीचे लोक म्हणतात, घर सोडून इतक्या लांब जाऊन राहणे हा मूर्खपणा आहे. कोणी फुकटचा सल्लाही देते, सामाजिक कार्याचे खूळ डोक्यातून काढून टाका, ज्यांच्यासाठी तू काम करशील, त्यांना तुझी काही किंमत नसते. मला स्वतःलाही बऱ्याचवेळा एकटेपणाची भीती घेरून टाकते.
परंतु जेव्हा गरजेच्या वेळी इतके सारे लोक धावून येतात, कुठल्याही अपेक्षेविना प्रेमाने मदत करतात, तेव्हा माझा माणुसकीवरचा विश्वास बळकट होतो. माझा असा अनुभव आहे, जिथे जिथे मी गेले आहे, तिथे तिथे माझी काळजी घेणारे, मला जपणारे, खाऊ पिऊ घालणारे लोक मला भेटले आहेत. कधी बिजापुच्या आजूबाजूच्या गावात भटकायला जाते, तेव्हा लोक बोलवून चहा पाजतात, खाऊ घालतात. पुणे सोडून गडचिरोलीला ‘सर्च’ संस्थेत गेले, तेव्हा डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी मुलीप्रमाणे मायेची वागणूक दिली, त्यांच्यामुळे माझ्या आयुष्याच्या बद्दलच्या जाणीवा स्पष्ट झाल्या. डॉ. योगेश दादा यांचे नेहमी प्रोत्साहन आणि पाठबळ राहिले. सर्चच्या परिसरातील कार्यकर्त्या लोकांच्या कुटुंबांनी भरभरून कौतुक आणि प्रेम केले. बार्शीचे घर सोडून, बिजापुरला यायचा निर्णय घेताना, डॉ. अय्याज सरांवर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि इथे येऊन माझी ही अंधारातील उडी योग्य असल्याचा अनुभव आला.
जग चांगले आहे की वाईट आहे, हा प्रश्न सर्वांनाच पडत असतो, मलाही पडतो. पण जेव्हा आपण चांगल्या मनाने काम करत असतो, तेव्हा नेहमी चांगलेच लोक भेटत राहतात. माझा मागील ‘बेच्चो’ हा लेख वाचून खूप लोकांनी कौतुक केले, “तू ग्रेट आहेस,’ अशा अनेक प्रतिक्रिया मिळाल्या. खरेतर माझ्यापेक्षा कितीतरी हुशार आणि चांगली शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर्स आहेत, माझी डिग्रीही साधी आहे. पण मला वाटते, कोणी ग्रेट वगैरे नसते. तर तुम्ही इतरांसाठी जेव्हा कुठलेही काम करता, चांगल्या हेतूने मदत करता, ते तुम्हाला ग्रेट बनवते. तुमचे निर्णय, तुमची इतरांप्रती संवेदनशीलता आणि तळमळ, हे तुम्हाला ग्रेट बनवते.
दुखण्यातून बरी होऊन पुन्हा कामाला सुरुवात झाली. एका पार्टीत चिकन खाताना, दात तुटला. दाताच्या दुखण्याची मला प्रचंड भीती वाटते. डॉ. कुंवर सरांना म्हटले, मी जगदलपुरला जाईन. सर म्हटले, “घरकी मुर्गी दाल बराबर मत समझो. अपना डेंटिस्त डॉ. मनोज अच्छा है. उससे करवालो.” भोपालपट्टणम च्या डॉ. मनोजने मला व्यवस्थित दातात फिलिंग करून दिले.
कधी कोणी म्हणते, सरकारी रुग्णालयात इतका खर्च करायची काय गरज ? साधे पुरेसे आहे की. मग आम्हाला राग येतो, गरिबांना अधिकार नाही का प्रशस्त, सुविधापूर्ण आणि स्वच्छ रुग्णालय उपलब्ध असण्याचा ? एकदा बिजापुरमधील कोणी एक सरकारी अधिकारी व त्यांची बायको रुग्णालय पहायला आले. त्या बाई म्हणाल्या, “इतके मोठे आणि चांगले रुग्णालय बांधले आहे जिल्हाधिकारी तांबोळी सरांनी. पण हे आदिवासी लोक घाण करतात.” मनात म्हटले, “बाई ग, हे आदिवासी लोकांच्या हक्काचे रुग्णालय आहे.” कधी अशा शिक्षित लोकांपेक्षा माझे आदिवासी लोक मला जास्त सामाजिक आणि जवळचे वाटतात.
दुपारी ओपीडी संपल्यानंतर सामसूम झाली होती. मी मुख्य इमारतीत फोनवर बोलत उभी होते, तेव्हा एक आदिवासी माणूस, त्याच्या बायको-पोरासोबत आला. इथे सरकारी रुग्णालय कुठे आहे, म्हणून मला विचारले. मी त्याला सांगितले, की बाबा, तू उभा आहे, ते हेच आहे. तो म्हणाला, नाही, हे तर खूप मोठे रुग्णालय दिसतेय. माझ्याकडे पैसा नाही. गरीब लोकांचा इलाज कुठे होतो, ते रुग्णालय मला दाखवा. मग मी त्याला समजावले, की इथे मोफत इलाज होतो आणि त्याला आवश्यक त्या ठिकाणी नेऊन सोडले.