Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..

6/15/16

पुरूष नेहमी पुरूषच असतो..!

पुरूष  नेहमी पुरूषच असतो 

दारू पिणारा,

शिवीगाळ मारपिट करणारा

बिड्या फुंकणारा ,

नपुंसक असला तरीही..

पत्ते कुटत,

बायकोच्या पैशावर मजा मारणारा

गावभर उकिरडे फुंकणारा

पुरूषच असतो !! 

पुरूष  नेहमी पुरूषच असतो 

फार फार तर मर्द म्हणवतो 

स्त्री ?

ती कधी बाईमाणूसही म्हणवते 

नाहीच असे नाही

बर्याचदा 

जेवणात मीठ कमी पडले

तर ती हराम होते

पुरूषाने ठेवली की

रखेल होते

मूल न देऊ शकणारी

वांझोटी असते

कधी वेश्या असते

आणि नवर्याने टाकून दिली तर

गावजेवण होते

दुर्गा म्हणतात कधीकधी तिला

पण ती पुराणातच परवडते सार्यांना

जिवंत जाळली जाते सहजच

हलक्या चारित्र्याची म्हणून

किंवा भोगली जाते

तिच्या मर्जीविरूद्ध

बंद दाराआड

किंवा उघड्यावरच

ती छिनाल असते

पुरूषाला जाळ्यात फसवणारी

ती रांड असते

अशी तशी ती कोणकोण असते

फक्त माणूस तेवढी नसते

2/25/16

जातीचे रंग

खरेच जात आडनावात असते का ?

आपण भारतीय एवढे शिष्टाचार पाळणारे आहोत का ? कि नाव विचारून hello how are you, करून गप्प बसू ?

कामाच्या ठिकाणी एकटी मुलगी दिसली की लग्न झालं कि नाही असे थेट विचारणारे आपण. 

गाव कुठलं , या पाठोपाठ कोणत्या समाजाचे हा प्रश्न हमखास येतो.

मी डॉक्टर. निम्मे पेशंटतरी हमखास लग्न झालंय का आणि जात कोणती हे विचारतात.

गळ्यात मंगळसूत्र शोधणे व आडनावावरून जात ओळखण्याचे खेळ कोणीही करत नाही.

बोलायचा मुद्दा हा की जात काही आडनावात नसते. कपाळावरच्या टिळ्यात नसते. कि कपड्याच्या रंगात नसते.

जात दबा धरून बसलेली आहे आपल्याच मना-मनात.  सोयीनुसार आणि गरजेनुसार प्रकट होते वेळोवेळी.

जात आहेच आपल्या रोजच्या व्यवहारात.  

इतरांशी वागण्या बोलण्यात. छोट्या आणि मोठ्या गोष्टींत येतेच जात.

पण ती येते दोन्ही बाजूंनी.

जो अन्याय करतोय असं दिसतं त्याच्याही बाजूने आणि ज्यावर अन्याय होतोय असं वाटतं त्याच्याही बाजूने सुप्तपणे येतेच जात.

आजकाल आपल्या विचारांना, आवडी निवडींना, आवडत्या लेखकांना, संमेलनांना, विरोधकांना.......सगळ्याना चिकटून बसते आहे चिवट जात..

उठल्या उठल्या पहिले डोळ्यावर   आणि मेंदूवर जातीचा चष्मा घातला कि झालं . मग सोप्पं जातं चूक काय बरोबर काय, आपलं कोण परकं कोण ठरवायला.

 अशातच कोणी समर्थनाचा झेंडा घेऊन आणि कोणी विरोधाचा झेंडा घेऊन उभं राहतं लढायला. त्यांची नजर नेहमी विरूद्ध दिशेकडेच असल्याने स्वतःच्या झेंड्याचा जातीत रंगलेला गडद रंग दिसतच नाही. फक्त so called शत्रूवर मारा करणं इतकंच limited focus.

त्रयस्थाला दिसतात दोन्ही रंग. पण त्याच्यावरही विचार जबरदस्ती केली जाते एक बाजू निवडण्याची, मोठ्या आवाजातल्या घोषणा, इतिहासाचे दाखले, अन्यायाचे पुरावे, supporters ची  झुंड.. सगळं सगळं !

तटस्थतेने पाहणार्याला दिसतो एक देश..शतकांपासून जाती नुसार विभागून भांडणारा.

तर दुसरीकडे देशासमोरचे असांख्य प्रश्न ज्यांना जातीचा किंचितही वास नाही. , कदाचित त्यामुळेच त्यात कुणाला रस नसावा.

 दुष्काळ, बेकारी, पर्यावरणाचा ह्रास, प्रदूषण, चंगळवाद,  भू क, गरीबी, शहरातील वाढती लोकसंख्या,  लैंगिक शोषण,  इत्यादीना नाहीये कौणतीच जात.

ठरवलाच द्यायचा रंग त्यांनाही तर देता येऊ शकेल  आणि  मग छान रंगातील भांडणे.

समस्यांवरचे  उपाय ? तो शोधू नंतर निवांत. वेळ मिळाला तर.

इथे पहिले जातींचा खेळ आणि  राजकारण तर रंगू दे. 

11/23/15

शरीर व मन

     आपले शरीर आणि मन या एकदम जादुई गोष्टी आहेत या जमीनीवरच्या.
     हे शरीर आणि मन या चैतन्याने सळसळणार्या जिवंत गोष्टी आहेत. परंतु यांत्रिकतेने आयुष्य जगताना आपण हे वेळोवेळी विसरू पाहतो.
     वयाच्या २८ व्या वर्षी मी मनाने भयंकर निराश आणि शरीराने भरपूर जाडी झाले होते. अशा अवस्थेत मला जशी काही मी ५0 वर्षाची म्हातारी झाली आहे असे वाटू लागले होते. सर्व आशा संपलेली. आयुष्यावरची श्रद्धा संपून गेलेली. सौंदर्य शिल्लक नाही. काही करायची इच्छा उरली नाही. शेवटी ८३ किलो असे भयंकर वजन आणि निराशेच्या खोल गर्तेत अडकलेले मन यांत गुदमरून गेलेले मन यांना अचानक एका क्षणी जाग आली, कि अरे काहीतरी चुकतेय. असे जगून चालणार नाही. हे बदलायला हवे. It's now or never..!
            जर मी यावर काही उपाय शोधला नाही तर कदाचित आत्ता झालेली ही जाणीव अशीच पुसली जाईल. या असल्या सडलेल्या आयुष्याची सवयच होऊन जाईल आणि मग परत बदलावेच वाटणार नाही कदाचित कधी .
      मग खूप विचार केला कि ही अवस्था का आली ? काही वर्षांपूर्वी तर मी अशी मुळीच नव्हते.
       शरीराच्या या अवस्थेचे कारण तर obvious होते. मनाच्या नैराश्येमुळे शरीराची मंदावलेली हालचाल, काहीही व्यायाम नाही, मनात येईल तेव्हा हवे तितके काहीही विचार न करता अनियंत्रितपणे खाणे, याने वजन वाढून शरीर बेढब नाही होणार तर काय होणार ? उत्तर सापडले, मग उपाय पण ठरवला कि रोज व्यायाम, प्राणायाम व आहारनियंत्रण, योग्य खाणे.
  खरेतर शरीर व मन एकमेकांशी connected असतात. एक बिघडले कि त्याचा परिणाम दुसर्यावर होतो. तसेच उलट पण होते कि आपण एकाची काळजी घेतली कि दुसर्यावर पण परिणाम होतो. उदाहरण द्यायचे झाले तर, मन दुःखी असले कि शरीर मंदावते. काहींना भूक लागत नाही तर काहीजण दुःख झाले कि खूप जास्त खाऊ लागतात, junk food, sweets, chocolates अति खाऊन वजन वाढते. तसेच उलट पण होते. रोज न चुकता व्यायाम केल्याने, सकाळी उठून walk किंवा jogging केल्याने मनाचे नैराश्य दूर होऊन मन आतून आनंदी होते.
         शरीराचे उत्तर सापडले होते.
          मन इतके रसातळाला का गेले होते ? घटस्फोट झाला होता हे महत्वाचे कारण होतेच. पण तेवढे पुरेसे नव्हते. आणखी पण बरेच काही होते. त्यात पुन्हा divorce मुळे आलेलं नैराश्य.
        यातून बाहेर कसे पडायचे ?
  अशाच एका रविवारी 'सप्तरंग' वाचत होते. त्यातील नेहमीच मी सर्वप्रथम संदीप वासेलकरांचा लेख वाचते. त्या दिवशीच्या लेखाचा आशय होता कि आजच्या तरूणांनी फक्त भौतिक सुखसोईंमध्ये अडकून न पडता सामाजिक सुधारणांसाठीही झटले पाहिजे. त्यांचा प्रश्न होता आजची तरूणाई हरवली आहे भौतिक सुखाच्या मागे धावत. सामाजिक जबाबदारीचे भान कमी होते आहे आजच्या तरूंणामध्ये.
     मला ते कुठेतरी click झालं. अंधारात उजेडाची तिरिप पडावी तसं झालं. आयुष्यात पुढे काय करायचे ते अचानक उमजून आले. लक्षात आले की मी भौतिक यशाच्या मागे आंधळेपणाने इतकी धावत सुटले होते कि त्यात माझी जीवनमूल्येच मी हरवून गेले होते. दिशेविना रस्ता जसा भरकटतो तसेच Principles आणि श्रद्धा यांच्या शिवाय माझं आयुष्यच भरकटलं होतं. यावर उपाय काय ?
      तेव्हा आठवले, अकरावीत असताना वाचलेले डॉ. अभय बंग यांचे पुस्तक "माझा साक्षात्कारी ह्दय रोग". तेव्हापासून डोक्यात होते कि कधीतरी या Great व्यक्तीकडे जायचे. आता तो क्षण आला होता. निर्णय घेतला आणि गडचिरोलीजवळ असणार्या डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांच्या शोधग्राम येथील SEARCH च्या दवाखान्यात मी Medical Officer म्हणून रूजू झाले.
      तिथे रोज संध्याकाळी प्रार्थना असते. त्यानंतर नायना (डॉ. अभय बंग) हे सर्वांना मार्गदर्शन करतात. ते ऐकणे, दिवसभर campus मध्ये त्यांचे होणारे दर्शन, morning walk ला त्यांच्यासोबत गेल्यावर होणार्या गप्पा या सर्वातून मी घडत गेले. Principles आणि faith पुन्हा सापडले. तिथे माझ्यावर निरपेक्ष प्रेम करणारी, माझ्यातील विश्वास पुन्हा जागवणारी, जीव लावणारी, हक्काने रागवणारी, काळजी करणारी, अशी माणसे भेटली. भरभरून प्रेम केले सार्यांनी माझ्यावर. तेथे जसा पुन्हा नव्याने जन्म झाला माझा.
     तसेच तिथे मी नियमित व्यायाम सुरू केला. तिथे campus च्या आजूबाजूला जंगल पसरलेले आहे. खूप सुंदर वृक्ष , झाडे वेली व त्यावर असंख्य सुंदर पक्षी, मधेच तलाव असा सुंदर निसर्ग. Duty तून वेळ मिळेल तसे सकाळी चालायला जायचे व एखाद्या प्रचंड व सुंदर मोहाच्या वृक्षाखाली ध्यान करायचे असा नित्यक्रम बनून गेला. मग मी सायकल विकत घेतली गडचिरोलीवरुन. संध्याकाळी आजूबाजूच्या खेड्यात माझी सायकल रपेट होऊ लागली. त्याने शरीरावरची चरबी जशी वितळत गेली. आहार तर सुधारला होताच. तिथे junk food तर नव्हतेच. या सर्वामुळे वजन कमी झाले. पुन्हा मी पंचवीशीची दिसू लागले. त्यामुळे आत्मविश्वास वाढला व मन प्रसन्न राहू लागले.
       तेथे गेल्यावर नायनांना मी पहिला प्रश्न विचारला होता, नायना, माझी आयुष्यावरची श्रद्धा संपली आहे. काय करू ?
     "स्वतःच्या दुःखापेक्षा मोठं ध्येय समोर ठेव. स्वच्या पलीकडे जाणारं ध्येय ठेव."

7/13/15

कोकण solo trip

     At some point of time, some roads need to be taken alone. Few things need to be done alone.
     तसे कोकणात दापोलीला job साठी एक हॉस्पीटल पहायला जायचेच होते. एक सर्जन मित्र त्याच्या कुटुंबासोबत चिपळूण जवळच्या गावात राहतो. त्यालापण भेटायचे ठरवलेले होतेच. त्यात आला माझा वाढदिवस. म्हटलं , कशी करावी स्वतःची वाढ स्वतःलाच सिद्ध ? मगा एक कल्पना सुचली. इतके वर्षै प्रत्येक वाढदिवसाला इतरांकडून Gifts स्वीकारले. यावेळेस मात्र, Being an adult, स्वतःच स्वतःला Gift द्यायचे. ठरवूनच टाकले मग, This kokan solo trip is gift to me by myself for my 29th birthday.
      घरच्यांना whats app वर message टाकला आणि निघाले. बसने स्वारगेटला पोहोचले तरी नक्की नव्हते होत जायचे की नाही. गेल्यावर थोडावेळ थांबताच चिपळूणची एस्.टी. आली. पूर्ण पँक. पण कंडक्टरने एकटी मुलगी म्हणून घेतले आणि ड्रायव्हर शेजारी बॉनेटवर बसवले. मस्त धमाल आली. बॉनेटवर बसून समोरचा धावता रस्ता पाहिला, मोठी चढण, घाट पाहिले, मध्येच डुलक्या  काढल्या. ड्रायव्हरसोबत Selfie पण काढली. शेवटचा चिपळूणच्या just अलिकडचा घाट तर जबराच होता. घट्ट धरून बसले होते. पण भारीच घाट होता तो. त्या घाटातच माझ्या trip चे सार्थक झाले. असं वाटलं, इथेच कष्ट फिटले सारे या यातायातीचे.
     चिपळूणशेजारीच एका छोट्या गावात मित्राचे घर होते . त्याची बायको पणा माझी मैत्रीणच. त्याच्या घरी गेले. मधली काही वर्षे आमचा बिलकुल संपर्क राहिला नव्हता. पण त्यांना भेटून तसे काही जाणवलेच नाही. अगदी आधीच्या जिव्हाळ्यानेच गप्पा झाल्या.
      दुसर्या दिवशी सकाळी उठून मग परत फिरस्ती. पहिले चिपळूण, मग खेड, तेथून दापोली.( इथे पुन्हा ड्रायव्हर शेजारी बोनेटवर.. मज्जा नुसती ! ) दापोलीचे हॉस्पीटल पाहून निघाले तेव्हा खरी trip ची रंगत सुरू झाली. माझा plan ठरला होता. हर्णे beach, हर्णे बंदर, मग आंजर्ले गावात रात्री मुक्काम, दुसर्या दिवशी सकाळी कड्यावरच्या गणपतीचे दर्शन व पुन्हा beach. मग return to Dapoli आणि back to Pune. रिक्षा वाल्याने अव्वाच्या सव्वा पैसे सांगितले तेव्हा मी एस्.टी. चा वसा घेतला, "वाट पाहीन पण एस्.टी.नेच जाईन." स्टँडवर गेले तर समोर पुणे गाडी. मोह झाला कि गाडीत बसू नि घरी जाऊ. कुणी सांगितलंय ऊन्हात भटकायला. पण भटकभवानीचे माझे पाय असे थोडीच मागे फिरणार ?  आळशीपणाला दटावत उभी राहिले तशी एक तासाने हर्णेची गाडी आली आणि आवघे  २६ रूपये देऊन मी मस्त खिडकीतून घाट पाहत हर्णे ला पोहोचले.
     दुपारचे रणरणते ऊन. त्यात चालत पूर्ण हर्णेचा किनारा मी पार करून हर्णे बंदर व तेथील Lighthouse ला पोहोचले. ऊन्हात beach, समुद्राचे पाणी चमचमत होते. बंदर मला फार फार आवडते. मच्छीमार्यांच्या होड्या , जहाजे याच्या मी प्रेमातच आहे. किनार्यावर मच्छीमार्यांची एकच लगबग चालली होती. कारण रोज ४ वाजता तिथे माश्यांचा लिलाव चालतो.  खार्या पाण्यात पाय भिजवत, selfie काढत ऊन्हाने मी दमून गेले. मग दीपस्तंभ चढून वरती गेले. तिथून तर खालचा जबरदस्त view दिसत होता. तिथे मी थोडी सावली शोधली नि मग मस्त ताणून दिली. तासाभराने कावळ्यांच्या कलकलाटाने जाग आली. तिकडे खाली बंदरात माश्यांचा लिलाव सुरू झाला होता आणि इकडे मासळी पळवू पाहणार्या कावळ्यांना चेव चढला होता.
     मी दिपस्तंभावरून उतरून खाली आले. वाटेत मुंगुस भेटलं. त्याचं नकटं नाक उडवत ते वळून वळून पाहत होतं.
     तेथून पुढे आंजर्ले ला जायचे होते. चौकशी केल्यावर कळले तेथून आंजर्ले फक्त ४-५ किमी आहे. मग म्हटले की चालतच जाऊ इतक्या जवळ आहे तर. निघाले पाठीवर सँक अडकवून. माझ्या डाव्या हाताला समुद्र आणि उजवीकडे डांबरी रोड. संध्याकाळ होत आलेली. सूर्य केशरी झालेला. उजवीकडे, रोडच्या पलीकडे, मोठ्या होड्यांची रांगच रांग. मच्छीमार आता ३-४ महिने समुद्रावर जाणार नसल्याने तेथील मोकळ्या मैदानात होड्या आणि जहाजे जणू Park करून ठेवलेली. त्याला कुंपण व छत बनवून संरक्षित केलेली. डाव्या हाताचे मावळते केशरीबिंब आणि उजवीकडील माझी आवडती जहाजं पाहत मी तो on foot प्रवास full enjoy केला. मधेच मच्छीमारांची वस्ती लागली. तिथे सर्वाप्रकारचे मासे पहायला मिळाले. लांबडे मासे तर सुकायला टाकले होते.
     ती वस्ती जाउन थोडे पुढे जाताच रस्ता संपला. समोर मुक्त निळाशार समुद्र. पलीकडे टुमदार, छोटेखानी, स्वप्नवत सुंदर आंजर्ले गाव. समोर खाडी होती. त्यात पलिकडच्या तीरावर पोहोचवायला होड्या होत्या. मावळतीच्या केशरी पार्श्वभूमीवर नावा वल्हवणारे नावाडी, असे ता इतके अप्रतिम दृश्य होते की मी प्रेमातच पडले त्याच्या. मीही सामील झाले मग त्या दृश्यात. पैलतीरावर जायला एका होडीत बसले. खाडीतील ती संध्याकाळ, होडीतील तो एकटा क्षण, ती वल्हवणारा नावाडी, हे सारं इतकं परिपूर्ण होतं कि त्या क्षणात जणू मी माझं आख्खं आयुष्य जगले. सगळं तिथेच थांबावं, तो क्षण तसाच रहावा असा मोह पडला. That was perfect frame of life. " here it is, here I am ! "
       होडीतून उतरून, अंधार पडल्याने पहिले मुकूकामाची जागा शोधली. एका घरमालकाकडेच पर्यटकांना रहायची सोय होती. कोकणात असे लोक खूप चांगले आदरातिथ्य करतात. आल्याचा गरम चहा पिला आणि तरतरी आली. बेडवर पडून मग सर्चमधल्या मित्र गोतावळ्याला कॉल करून गमती सांगितल्या. उकडीचा मोदक आणि बाकिचं मस्त जेवण जेवल्यावर  थकून लगेच झोपपण लागली.
             सकाळी ६ लाच उठून मी गणपती दर्शनाला निघाले. पायर्यांचा रस्त्याने डोंगरावर जायचे. शेजारी कडा. म्हणून कड्यावरचा गणपती. काही लोक डांबरी रस्त्याने कार घेऊन येतात. पण देवासाठी चालण्यातील कष्टाचे सुख आणि तेव्हा आपोआप दिसणारे निसर्ग सौंदर्य याची सर एसी कारला कशी यावी ? कड्यावरून खाली पाहिल्यावर तर अप्रतिम देखावा दिसत होता. आंजर्लेचं संपूर्ण सौंदर्य उठून दिसत होते. मधोमध हा डोंगर, त्याच्या बाजूला घरांची  टुमदार वस्ती, ती संपल्यावर नारळाची दाट झाडे, त्यापलीकडे स्वच्छ नितळ समुद्रकिनारा, लाटा, त्याच्याही पलिकडे अथांग निळाशार समुद्र ! समुद्रात तळपणारा सुवर्णदुर्ग. तिथेच बसून Meditation केलं. तो अनुभव विलक्षण होता. मला जड देहातून मुक्त करून चैतन्याचे दर्शन घडवणारा होता. एक अनोखे स्वातंत्र्य बहाल करणारा होता .
    " Yesterday I cried out of my loneliness, Today I celebrate my Aloneness.. ! "
    " Free of past, I am reborn in present. Unaware of future, I rejoice in present. "
          सरसर डोंगर उतरून किनार्यावर धाव घेतली आणि बिलगले माझ्या प्राणप्रिय सखा समुद्राला. त्याला भेटण्यासाठी तर केला सारा अट्टाहास. मनसोक्तपणे समुद्राच्या लाटांमध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून देत, लाटा डोक्यावरून अंगावर घेत खेळले, लोळले, न्हाले. लाटांमध्ये चिंब होत समुद्राशी एकरूप झाले. तन आणि मन समुद्रमय होऊन गेले.
" I am daughter of Sea,
  I am made of Earth,
   I have wings of sky "

" My mind is full of peace, Heart is full of Love and Soul is dancing with joy . "

परतून आल्यावर बरेच दिवस माझे whats app status होते , I wish to buy a ship and go for long long, deep deep sea waters...

   

7/12/15

लिहिण्यातली बेशिस्त

    बरेच दिवस लिहीले नाही काही.
कितीतरी गोष्टी सांगायच्या राहिल्या आहेत.
म्हणजे प्रत्येक वेळेस मनात सारे तयार होयचे काय सांगायचे ते, पण net access नसायचा, कधी laptop नाही. तर कधी सगळं असलं तरी मनच ताळ्यावर नाही लिहायला. असे बेशिस्तीचे प्रकार घडले. आता थोडा मनाला शिस्त लावायचा प्रयत्न करायला हवा.
     दोन छान गंमती तुमच्याशी share करायच्या आहेत. एक म्हणजे माझी birthday special solo कोकण trip. धम्माल केली एकटीने. दुसरे म्हणजे सध्या माझी भटकभवानीची पावले सांगलीला घेऊन आली आहेत. इथले अनुभव सांगायचेत.
    hope लवकर शिस्तीत लिहीणं होईल !!

5/28/15

Being A GypSycho

Whats app वर status काय टाकायचं ?
रोजच्या जगण्यातील महत्त्वाचा प्रश्न !
Status  कसं , जुळून आलं पाहिजे तुमच्या व्यक्तिमत्त्वाला आणि त्यावेळेच्या mood ला . कधी एखादं गाणं, कधी thought , तर कधी नुसतीच गंमत. कधी एखाद्या गोष्टीची आलेली मनस्वी चीड.
        असंच विचार करताना आज नवीनच शब्द सापडला. "GypSycho "
Status टाकलं. "Being A GypSycho "
लगेच सर्वांची उत्सुकता.
"म्हणजे काय गं"
म्हटलं, " Gypsy plus psycho "
त्यात त्याचा टोमणा.  "self -actualisation झालंय का ? "
"हो, झालंयच." त्याला ठणकावलं.
हे पाय काही थांबायचं नावच घेत नाहीत. अंगात वारा शिरल्यासारखं होतं. सारखी नव्याची ओढ, नव्याचा ध्यास. नव्या ठिकाणी जाण्यासाठी जिवाची तगमग.
वाटतं जणू पायाला चाकंच आहेत.
दर सहा महिन्यांनी नव्या ठिकाणी जायची हौस. पण practiacally आणि नोकरीच्या दृष्टीने  ते शक्य नसते. मग दर एक वर्षाने बदलायची जागा. एक वर्ष टिकून रहायचे.
मग अशी दर एक वर्षाने नव्या ठिकाणी पोहोचलेली मी पाहिली की सगळ्यांचे judgement आलेच.
"Unstable आहेस तू."
झालं.
नुकतेच केस कापले. बॉयकट. काही महिन्यांनी असं स्वतःला पूर्ण बदलून टाकायला आवडते मला. स्वतःला renew करत रहायचे periodically.
नवा Dp पाहून पुन्हा messages.
"पुन्हा केस कापले ?"
कंटाळा येतो मला केस विंचरायचा. आयुष्यात बाकीची इतकी महत्त्वाची कामे असताना या dead cells उर्फ केस maintain करण्यात वेळ का वाया घालवायचा ?
पिकूमधल्या दिपीकाचे मस्त केस पाहून वाईट वाटत असतानाच त्याचा message.
" मस्त दिसतेय." हुं, याला तर सगळंच आवडतं.
असं वार्यावर भिरभिरतं आयुष्य मला जाम आवडतं.
आवडतं मला explore करायला.
नवीन ठिकाणांना , वेगवेगळ्या लोकांना , तरूणाईला , सामाजिक प्रश्नांना आणि त्याच्या उत्तरांना explore करणं . हे करता करताच स्वतःच्या आत दडलेल्या उर्मींना चाळून, छानून समजून घेणं.
Risk ?
Risk तर असतेच. अंधारात चाचपडायची, ठेच लागून धडपडायची, रस्ता चुकायची.  हट्टाने घेतलेले निर्णय अपयशी ठरल्यावर  स्वतःवरचा विश्वास हरवण्याची. आनंदाचे क्षण वेचताना निराशेच्या खोल गर्तेत अडकायची.
Risk तर असतेच.
पण ती तर घ्यावीच लागेल. त्याशिवाय स्वतःला शोधता कसे येणार ? स्वतःचा थांगपत्ता कसा धुंडाळणार ?
सगळ्यातून तावूनसुलाखून गेल्याशिवाय काळजाचं पातं धारदार कसं होणार ?
रोज मी cycling, walking , जमेल तो exercise करते. कारण शरीरावर वयाचा गंज नाही चढू द्यायचा मला.
पोटात अन्न टाकताना शक्यतो healthy food च निवडते. कारण चरबीचे थप्पे नको आहेत चढायला माझ्या रक्तवाहिन्यांमध्ये.
मनाचे काय ?
आत्म्याचे काय ?
त्याची पण काळजी घ्यायला हवी ना ?
मनावर नाही चढू द्यायचा गंज भूतकाळाचा, निराशेचा, आळशीपणाचा, समाजाच्या आंधळ्या समजूतींचा, एवढेच काय, तर Security आणि comfort zone चा पण गंज नको.
त्यासाठी Exploration..!
नायना (डॉ. अभय बंग) सांगतात , "खरी लढाई तर आत असते. "
बरोबर आहे नायना. सगळी लढाई आतच. बाहेर उमटतात ते त्याचे पडसाद.
ही आतली तगमग बसूच नाही देत शांत. ही जागवत राहते कित्येक रात्री. ही पेटवत राहते नवनवीन उर्मींचे होमकुंड.
ही चेतवत राहते मेंदूच्या तंतूंना.
या सगळ्यात मी काय गमावते आणि काय मिळवते ?
याचा हिशोब कसा करणार ? समाजाच्या ठरलेल्या चौकटीमध्ये नाही मांडणार मी याचा जमाखर्च.
स्वतःवर असणारा घट्ट विश्वास आणि समोरच्यावर  माणसावर प्रेम एवढं पुरेसं असतं मला जगण्यासाठी.
तू म्हणतोस, "समाज नाकारून चालत नाही."
समाज नाहीच नाकारत मी. पण समाजाची आंधळी धारणा व आंधळी बुद्धी नक्कीच नाकारते.
माझी वेगळी वाट मीच निवडलेली आहे. वेगळी वाट निवडल्यावर शक्यता असतेच इतरांपासून वेगळं व एकटं पडायची. पण ती शक्यता कितीही नकोशी असली तरी मला स्वीकारावी लागेलच. ती स्वीकारूनच ही वाट चालायची आहे मला.
Trust your strength dear..!!

5/12/15

"मी पूर्णपणे अशी कोणालाच नको असते"


मी पूर्णपणे अशी कोणालाच नको असते.
म्हणजे तुम्हालाही येतं का असं feeling कधीकधी किंवा अनेकदा....?
आपल्यातील थोडासा. काहीसा selected भागच फक्त इतरांना हवा असतो.
तेवढ्याच भागापुरते त्यांना आपल्याशी देणेघेणे असते.
ते येतात, तेवढाच भाग पाहतात, तेवढ्याशीच नाते जपतात. तेवढ्याकडून त्यांना हवे ते काम काढून घेतात. त्यांचे येणे वसूल करून घेतात आणि जातात निघून उरलेल्या भागाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून.
अशी मी मग वेगवेगळ्या भागात विभागली जाते.
किंवा मग लोकांना सोप्पं जावं म्हणून मीच आधी तुकडे करून ठेवते स्वतःचे.
“घ्या, तुम्हाला हवा तो तुकडा घ्या. ”
असे मग नुसते तुकडे तुकडेच होऊन जातात.
मग कुणालातरी माझा अगदीच आतला तुकडा हवा असतो, काळजाचा. अलगद येऊन, माझे सारे बंदीपहारे सहजच चुकवून, ती व्यक्ती तो माझ्या जीवाचा तुकडाही अलगद जाते वापरून. मनात येईल तेव्हा येऊन गोंजारते. मन भरलं की पाठ फिरवून निघून जाते. पण तिच्या हाताळण्याने पोहोचते त्याला भरून न येणारी इजा. काळजाची इजा कोणाला दाखवणार ? आणि जी व्यक्ती ती देऊन गेली, तिला तर आठवण पण नाही राहत त्या भागाची अथवा मुद्दामच ती व्यक्ती सोंग करते, की अरे, मी तर तिकडे आलेच नाही. माझ्याकडे तर नसतात कसले साक्षी पुरावे.
इतकी पण शरम नसावी का अशा लोकांना ? इतका पण मर्दपणा नसावा का पुरुषांमध्ये की कबूल करण्याचा की मी वापरला तुझा काळजाचा भाग माझ्या आनंदासाठी ? एवढा basic प्रामाणिकपणा नसावा का एक माणूस म्हणून ?
आणखी दुसऱ्या कोणाला थोडा व्यावहारिक भाग हवा असतो. त्यांनी ते स्पष्ट ठेवलेलं असतं ते चांगलं. पण मी पडते मूर्ख. माझं तर नियंत्रण नसतंच त्यावर. त्या व्यक्तीला माझा व्यावसायिक भाग देत असतानाच अचानक दुसराच भावनिक भाग विरघळू लागतो, प्रेम पाझरू लागतो. ती व्यक्ती मग अगदीच विचित्र नजरेने पाहू लागते त्या माझ्या गरीब लाचार भागाकडे. त्या तिरस्काराच्या नजरेने माझं पूर्ण अस्तित्वच शहारून जातं. असं वाटतं, लपवून टाकावा अथवा मारून टाकावा तो भावनाविवश भाग. मी अशी विद्ध असताना ती व्यक्ती तिचं व्यावसायिक काम काढून घेऊन निघून जाते आणि मागे मी शरमेच्या, निराशेच्या गर्तेत अडकलेली.
काही असतात तापदायक, मला स्वतःलाही नकोसे वाटणारे. रागाचे, इर्षेचे, Insecurity चे, निराशेचे. दु:खाचे.. मलाच ते पेलवत नाहीत. वाटतं स्वतः पासून तोडून ते फेकून द्यावेत. पण तसं होत नाहीत. ते असतात माझ्या अस्तित्वाचे अविभाज्य अंग. अशा टोकदार, काटेदार, कुरूप भागांचे दर्शन ज्याला होते, ती व्यक्ती तर नाकारुनच टाकते माझ्या चांगल्या भागांचे अस्तित्व. तो माझा एक भागच बनून जातो मला Define करणारा केंद्रबिंदू त्या व्यक्तीसाठी. पाहत राहते मी हताशपणे फक्त. “अरे, मला स्वतःलाच या भागाचं कोडं सुटत नाही, ते मी तुला कसं समजावून सांगू. पण म्हणून मला त्या भागाने अधोरेखित करण्याचा तुला काहीच हक्क नाही...” हे सारं असतं आतल्याआत.
असे अखंड तुकडे पडलेले असतात मनाचे, माझ्या भाव विश्वाचे.
त्यात शरीराचाही एक तुकडा. त्याच्या मागण्यांचा प्रदेश तर वेगळाच. त्या मागण्या मलाही घाबरवून टाकणाऱ्या. नैतिकतेच्या कोड्यात अडकून त्यांचा सगळा घोळच होऊन जातो, जो ना त्यांना उमगतो, ना मला. कधी कधी त्या सुख पुरवणाऱ्या, तर कधी मनावर तप्त सळईने ओरखडे ओढणाऱ्या.
असे असंख्य घायाळ तुकडे. त्यांचे त्यांचे घायाळ प्रदेश. त्या प्रदेशाची मी नियंत्रण नसलेली मालकीण.
आणि मजा अशी की मी अख्खीच्या अख्खी कुणालाच नको असते. असं का होतं ? मी माझ्या काळ्या-पांढऱ्या सकट, वरचं आवरण आणि आतल्या गाभाऱ्यासकट, माझ्या सर्वच्या सर्व भागांसकट कोणालाच का हवीशी नसते ?
असं स्वतःचे लचके तोडून आणि त्या तुकड्यांचा बाजार मांडून जगणं खरंच आवश्यक आहे का ?