संध्याकाळी वेळी-अवेळी उगाचच हळवं व्हायला होतं..
उगाचच एखादी चिमणी मनात उसासते आणि बांधून ठेवलेलं सारंच बंध तोडून बाहेर पडू पाहतं. मनाची ही चुकार खोड माहीत असते म्हणून मुद्दाम हुरहूर लावणारी ती सांजवेळ चुकवण्यासाठी कठोरपणे मनाला एखाद्या अवघड कामात अडकवावं तर सगळं काही सुरळीत चाललयं असं वाटत असतानाच उगाचच एखादी चिमणी मनात उसासते आणि गळ्यात कोंडून ठेवलेला हुंदकाही बिनबोभाटपणे बाहेर पडतो. आवरून सावरून शहाणं केलेलं मनही मग बंद करून उठतं, ते त्याचा हक्क मागू लागतं हळवं होण्याचा.. आणि हळवं होऊन त्यानं नित्यनेमानं काय करावं तर एकच ठरलेलं काम.. तुझ्या आठवणींत गुंग होणं. आधी तुझी आठवण काढून मोहरतं, आनंदतं; मग अचानक तुझं दूर असणं त्याला जाणवतं आणि मग बसतं झुरत तुझ्यासाठी पूर्ण सांजभर.. जणू ही संध्याकाळची वेळ म्हणजे त्याची हक्कानं वेडं होण्याची, तुझ्यासाठी झुरण्याची. ऐकतच नाही ते माझी कुठलीच शहाणपणाची गोष्ट. अगदी हटूनच बसतं.. मग मीही त्याला समजावण्याचे सारे प्रयत्न सोडून देऊन, हताशपणे पाहत बसते त्याच्याकडे.
खरंतर हे सारं आवडतं मलाही, पण तूच सांग इतका हळवेपणा बरा आहे का.. अशानं मग आयुष्यच अडकून राहील ना रे जुन्या आठवणींच्या गुंत्यामध्ये.. नवे धागे जोडणं अशक्यच होईल रे मग मला.. ते तुला तरी आवडेल का..?
म्हणूनच अलीकडे हुसकावून देते साऱ्या हळव्या चिमण्या, नाहीतर खाऊन टाकतील त्या माझ्या नव्या आयुष्याची इवलीशी रोपं..
No comments:
Post a Comment