Pages
Welcome...
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..
Labels
- Love (1)
- कविता (23)
- मीराची डायरी (17)
- ललित (32)
- संवाद (6)
- सुचेल ते.. (10)
- हिंदी कविता (3)
8/27/14
“ त्या तिघांची गोष्ट “
गणेश चहा पीत आणि बँकेची कागदपत्रे चाळत झोपाळ्यावर बसला होता तेव्हा त्याचा पोरगा शाळेतून येऊन घरात घुसला आणि मातीचे पाय तसेच नाचवत स्वयंपाकघरात गेला .
“ मम्मे, नवे मास्तर आलेत गं शाळेत.“
“ सुम्या आधी ते घाणेरडे पाय धुजा मोरीत मग बोल.”
पण पोराला आईच्या रागावण्याचा काही फरक पडेल तर शप्पथ .
“आगं ते सांगत्यात आपल्याच गावचे हायेत म्हणून , वडगावचे... विकास जाधव पूर्ण नाव. “
पोरांनी एका दमात माहिती सांगितली आणि इकडे गणेश आनंदाने हरखून गेला.
“ आरे तो तर माझा लहानपनचा यार विकू . आत्ताच जाऊन भेटतो त्याला .”
विकासची निघायची तयारी सुरु झाली तशी त्याच्या बायकोची बडबडसुद्धा.
“ काय हो , इतके साल कुठं खपला होता तुमचा यार ? तो ना आपल्या लग्नाला आला कि नाही त्याच्या लग्नाचं निमंत्रण धाडलं नि निघाले तुम्ही कामं सोडून भेटीगाठी करायला .”
पण जसं काही बायकोचं बोलणं त्याच्या कानी पडलंच नाही.
गणेश बुलेटवरून निघाला खरा पण त्याचे मन भूतकाळाच्या आठवणींमध्ये अडकले होते. तो आणि त्याचा जिगरी दोस्त विकास. दोघे दोन टोकांचे पण मैत्रीचा अतूट बंध. पण त्याच्या बायकोचं म्हणणं अगदीच काही खोटं नव्हतं. बरेच वर्षे काहीच संपर्क राहिला नाही एकमेकांशी. गणेशच्या लग्नाच्या वेळेस विकासची कसलीशी परीक्षा निघाली. गणेशने पण मग आग्रह नाही केला. त्याला माहिती होता विकासचं अभ्यासाचं ध्येय. वाटलं नंतर निवांतपणे भेटून बोलू पण राहूनच गेलं. आणि विकासचं लग्न तर वेगळंच प्रकरण होतं. त्याची मैत्रीण संगीता आणि तो पूर्ण भिन्न समाजातले, वेगळ्या जातीचे. त्यात विकास थोडाफार सुखवस्तू घरातला तर संगीता खूप गरिबी आणि अज्ञान असलेल्या मोठ्ठ्या कुटुंबातली. त्यामुळे कदाचित दोघांनी छोटंसंच केलं असेल लग्न. नसेल बोलावलं कोणालाच. पण हे सर्व त्रांगड बायकोला कसं समजावं ?
शाळेत पोहोचताच समोर जन्या शिपाई दिसला. नव्या मास्तरचा पत्ता त्याने नीट सांगितला. गणेशने बुलेट वळवली. पुन्हा त्याच आठवणी. विकास आधीपासूनच हुशार आणि अभ्यासू. तर गणेश मात्र पास नापासाचा झोक्यावर हिंदोळे खायचा. मग विकास जबरदस्तीने गणूला सोबत घेऊन अभ्यासाला बसायचा. त्याच्यापरीने गणूला शिकवायचा जेणेकरून तो पास तरी होईल. मग एकदाचा अभ्यास संपला की दोघे गावभर फिरायला मोकळे. कधी नदीमध्ये जाऊन दोघे यथेच्छ पोहायचे आणि भूक लागली की गणूच्या घरी जावून चटणी भाकर खायचे. तर कधी विकुची आई गरम गरम कांदे पोहे आणि शिरा बनवायची. मग तर दोघे मस्त ताव मारायचे. रविवारी रानभर फिरून करवंदे, चिंचा गोळा कर आणि दगडाखालचे विंचू शोधून चेचून मार हे नेहमीचे ठरलेले उद्योग. बरयाच वेळा गणू त्याच्या आईला शेतकामात मदत करायचा तेव्हा विकू भल्याथोरल्या आंब्याखाली अभ्यास करत पहुडायचा. या दोघांच्या जोडगोळीला तिसरी संगीता कधी येऊन मिळाली ते त्यांनापण लक्षात आले नाही. संगीताचे आई बाप सालगडी म्हणून शेतावर रहायला त्यांच्या गावात आले. विकूच्याच घरामागे त्यांची झोपडी. मग बर्याचवेळा कामामुळे शाळा बुडाली की अभ्यास विचारायला म्हणून तिचं विकूकडे येणंजाणं सुरु झालं आणि तीही त्यांची जवळची मैत्रीण झाली. तशी संगीता एकपाठी. शाळेत कविता शिकवली की ही घरी जाईपर्यंत घडाघडा म्हणून दाखवणार. तिच्या स्पष्ट आवाजातले श्लोक ऐकून विकूची आईपण तिच्यावर खुश झाली आणि तिला घरी यायला आपसूक परवानगी मिळाली.
वय वाढलं तसं सगळंच बदलू लागलं. गणू दहावीत नापास झाला आणि शिक्षणाला त्यानं रामराम ठोकला. वडलाबरोबर तोही शेतात जावू लागला. विकू आणि संगीता मात्र तालुक्याच्या गावी कॉलेजला जावू लागले. बसने मिळून येऊजावू लागले. कधीमधी गणूही फिरायला म्हणून दोघांसोबत जायचा. मग ते कधी हॉटेलात काहीबाही खायचे, कधी सिनेमाला जायचे. पण मग गणूच्या कानावर विकू आणि संगीबद्दल वेगळंच काही कानावर येऊ लागलं. गावातली पोरं दोघांबद्दल उघड उघड चर्चा करू लागली आणि डोळा मारून कुत्सित हसू लागली. गणूसाठी विकू हा थोरामोठाच्या पंक्तीत बसणारा मुलगा होता. त्यामुळे वेडवाकडं काही करेल असं त्याला चुकुनही वाटलं नाही. आणि जर खरंच त्या दोघांना एकमेकांबद्दल काही वाटतच असेल तर त्यात वाईट काय असं गणूचं म्हणणं. तशी संगीतापण वयात आल्यानं वेगळीच भासू लागली होती. तिच्या बोलक्या चेहऱ्यावर आता तरुणाईचा साज चढल्यानं ती आकर्षक दिसू लागली होती. त्यात ती त्वेषानं वादविवाद करायची, वक्तृत्वस्पर्धेत हिरीरीनं भाग घ्यायची तेव्हा तर तिचं तेज आगळचं भासायचं. विकू खूप कौतुक करायचा तिचं आणि ती लाजून लाल होऊन जायची. गणू दोघांसोबत असायचा तेव्हा त्यालाही हे जाणवू लागलं. कधी तिघे नदीकाठी फिरायला जायचे तेव्हा विकू आणि संगी त्यांच्या गप्पांच्या नादात गणूला विसरून पुढे निघून जायचे तेव्हा गणूपण मग गालात हसून एकटाच घरी परतायचा. कधीतरी मधेच मग विकूच्या घरी उडत उडत दोघांच्या प्रकरणाची बातमी पोहोचली आणि खूप मोठं भांडण झालं. विकू आणि संगीला एकमेकांना भेटायला बंदी घातली गेली. गणूला घेऊन विकू मग संध्याकाळी नदीकाठी गेला आणि कधी संतापाने तर कधी हतबलतेने बरेच काही बोलत राहिला. रात्र चढत चालली तरी विकूचं मन शांत होत नव्हतं. परत परत तो त्यांची मैत्री किती शुद्ध आहे, तसलं काही नाही हे गणूला पटवून देवू लागला तसं गणूनं त्याचा हात पकडून त्याला शांत केलं आणि समजावलं. पण विकू मात्र खूप अस्वस्थ होता. मग तो आणि संगी चोरून भेटू लागले. कधी कॉलेजच्या बागेमध्ये तर कधी सिनेमाला , कधी हॉटेलमध्ये.
मग एकदा असंच गणू विकूबरोबर असताना त्यानं पेन शोधायला पिशवी उचकटली तर त्यात त्याला निरोधची पाकिटे सापडली. दोघे मग पिशवी घेऊन नदीकाठी गेले. एक निरोध काढून त्याचं निरीक्षण केलं, ते कसं वापरावं यावर चर्चा केली. गणूनं मग त्यात हवा फुंकून फुगा फुगवला आणि हवेत सोडला. तो एका पोराच्या हाती लागला. ते बघून मग दोघे हसत गडाबडा लोळू लागले. हसणं आवरत मग विकूने गणूला त्याच्या आणि संगीच्या प्रेमाबद्दल सांगितलं. त्यांनी रंगवलेली स्वप्ने, लग्न करण्याच्या आणाभाका, विकूचा खूप अभ्यास करून प्राध्यापक होण्याचा निर्धार असे बरेच काही विकू बोलत राहिला आणि गणू भक्तिभावाने ऐकत राहिला. त्याचा त्याच्या या हुशार आणि स्वप्नाळू मित्रावर पूर्ण विश्वास होता.
काहीच दिवसात वाईट घटना घडली. गनूचा बाप कसल्याशा तापाचं निमित्त होऊन वारला. त्याची आई मग सारा संसार आवरून, त्याला आणि भावंडाना घेऊन, तिच्या भावाकडे शिरूरला गेली आणि गणूचा विकूशी संपर्कच तुटला तो कायमचाच. इकडे येऊन गणूवर कुटुंबाची जबाबदारी पडली. अगदीच हलाखीचे दिवस होते ते. उपासमारी होऊ नये म्हणून जमेल तेवढे रात्रंदिवस कष्ट करायचे आणि कसातरी आला दिवस ढकलायचा एवढंच गणूच्या हातात राहिला. त्यात मग वडगाव आणि वडगावचा दोस्त सगळं खूपच मागं राहून गेलं.
ब्रेक दाबत गणेश विकासच्या घरासमोर थांबला. दारात पोहोचला तर समोरच विकास निवांत खुर्चीवर बसून वृत्तपत्र चाळन्यात मश्गुल.
“ रामराम मास्तर.”
“ कोण आहे..? अरे गण्या लेका तू. “
दोघांनी अक्षरश: गळामिठी मारली. दोघांना आनंदातिरेकाने किती बोलावं आणि काय बोलावं असं होऊन गेलं. गणेशने मग त्याचा वृत्त्तांत दिला. त्याचे कष्ट, थोरला असल्यामुळे धाकट्या भावाबहिणीची जबाबदारी, गरीबीवर मात करून आज स्थिरावलेला गणेश, त्याची बायको आणि शाळेची आवड असणारा मुलगा. सारं काही.
“ लेका बुलेट घेतलीस तू. तू कसलारे गरीब?”
दोघे खळखळून हसले.
“तुझं सांग रे विक्या. तू खरा मोठा माणूस. अभ्यास खरा देव. पैसा गाडी सगळं सालं झूठ.”
यावर विकास कसानुसा हसला. क्षणभर गणेशला वाटलं कि त्याच्या चेहर्यावर कसलंतरी दु:ख तरळलं. पण लगेच ती छटा गायब झाली. मग हसून विकासने त्याची माहिती सांगायला सुरु केली. त्यानं त्याच तालुक्याच्या गावी शिक्षण चालू ठेवलं. बारावीनंतर बी.ए. मग एम.ए. केलं. नंतर बी.एड. एम.एड झालं. नेट परीक्षा पास झाला. ओपनमध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळेना म्हणून हि नावाजलेल्या शिक्षणसंस्थेच्या शाळेत नोकरी घेतली. वृत्तपत्रात जाहिरात आली कि मुलाखतीसाठी जायचा असे प्रयत्न चालूच ठेवले. सगळं ऐकून घेताना गणेशला जुनी आठवण आली. पूर्वीपण असेच चालू असायचे. विकू बोलत राहणार आणि गणू लक्ष देऊन ऐकत राहणार. अगदी तस्सेच वाटले गणेशला. त्याने विचार केला मनाशीच कि इतकी वर्षे मध्ये गेली तरी सगळं अजूनही तसंच आहे. जणू कालच ते दूर झाले होते आणि आज पुन्हा भेटले. काहीच बदललं नाही इतक्या वर्षांमध्ये. हि खरी मैत्री. गणेश सुखावला. आपल्या मित्राबद्दलच्या अभिमानाने त्याचा ऊर भरून आला. आता त्याला संगीताला भेटायची ओढ लागली. तिचे टपोरे डोळे आणि बोलका चेहरा आठवला. आतून स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज येतच होता. मग चहाचा वास दरवळला. आता कुठल्याही क्षणी आतल्या खोलीतून संगीता चहाचे कप घेऊन बाहेर येईल म्हणून गणेश वाट पाहू लागला.
“विकू, लई भारी वाटतंय तुला भेटून. पण वहिनी कुठाय?”
“अगं बाहेर तरी ये. बघ कोण आलंय ?” विकूने हसतच हाक मारली.
“आलेच चहा घेऊन” म्हणत त्याची बायको आली खरी पण ती वेगळीच बाई पाहून गणेशला धक्काच बसला.
“या आमच्या सौभाग्यवती शालिनी. अरे तुला लग्नाला बोलवायचं राहूनच गेलं बघ. घाईघाईत झालं लग्न फारच. ही एम.ए. करतीये इंग्रजीमध्ये. हुशार आहे.” विकास कौतुकाने बोलला. शालिनी आनंदली.
“हे असेच करतात हो कौतुक. भावजी तुम्ही नका ऐकू यांचं.”
“चौथा महिना चालू आहे.”
विकास हळूच डोळा मारत बोलला. शालिनी आत पळाली. विकास आनंदानं बोलत राहिला. पण गणेश मात्र आतून पुरता ढवळून निघाला होता. त्याला संगीताची शेवटची झालेली भेट आठवली. गणेशचे घर शोधत ती बाजारामध्ये त्याची चौकशी करत असलेली त्याला शिरूरला भेटली. तो तिला घरी घेऊन गेला. इकडचं तिकडचं बोलणं झाल्यावर ती शेवटी मुद्द्यावर आली. त्याच्यासमोर हात जोडून बोलली, “ एकच उपकार कर माझ्यावर. आज तुला भाऊ मानून खूप विश्वास ठेवून आलीये तुझ्या दारात. तिसरा महिना लागलाय. खाली करायचं आहे. गावात कुणाला कळलं तर लोक तोंडात शेण घालतील. धाकट्या बहिणींची लग्न जमायला त्रास होईल. म्हणून आलेय तुझा पत्ता शोधत.”
गणेश अवाक झाला. विकासची कसलीतरी परीक्षा होती म्हणून त्याने लग्नाला सध्या नाही म्हणून सांगितले आणि तिला गर्भपाताचा सल्ला दिला. पण गणेशला मात्र विकासच्या बेजबाबदारपणाचा खूप राग आला होता. अश्या परिस्थितीत त्याने संगीताला एकटे टाकल्याचा आणि तिच्यावर अशी उपकार मागण्याची वेळ आणल्याचा विकासला जाऊन जाब विच्रावा असं त्याला मनापासून वाटलं. पण संगीताने त्याला शपथ घातली असं काही न करण्याची. दोन दिवस मग गणेशने तिला त्याच्या घरी राहायला लावलं. सरकारी दवाखान्यात गर्भपात सुरक्षितपणे झाल्यावर आणि तिची तब्येत बरी वाटल्यावर तिला तिच्या घरी जाऊ दिलं. तेव्हा त्या दोघांनाही खात्री आणि विकासबद्दल विश्वास होता की तो स्थिरस्थावर झाला की तिच्याशीच लग्न करेल.
पण आज गणेश वेगळंच काही पाहत होता. त्याचं मन सुन्न झालं. विकासचं बोलणं थांबवत तो मधेच म्हणाला, “विकू, बाहेर चल. थोडं बोलायचंय.”
“ बोल की निवांत इथंच.”
पण गणेश उठून निघाला तसं विकासही गुमान त्याच्या मागे बाहेर आला.
“संगीताचं काय झालं, विकू ? तुम्हा दोघांचं लगीन का नाही झालं?”
संगीताचं नाव निघताच विकास दचकला. त्याचा चेहरा कसानुसा झाला.
“तो विषय नकोस काढू गण्या. परत कधीतरी बोलू त्याबद्दल.”
पण गणेश पुरताच चिडला होता. त्याला कसंही करून त्याच वेळी विकासकडून उत्तर हवंच होतं. मग विकासनं बरीच कारणे दिली. लहानपणीची कमी समज, तरुण वयातला वेडेपणा, दोघांच्या वेगळ्या जाती, वेगळे समाज, तिची गरीबी, तिचं शिक्षणात मागे पडणं, त्याच्या घरच्यांचा तिला असणारा सक्त विरोध, त्यांचं विकासला शपथ घालणं असं बरंच काही. पण गणेशला मात्र काहीच पटत नव्हतं. त्याचा संताप वाढतच चालला होता.
“ हे सगळं तुला आधी तिला नादाला लावताना आणि तिची जिंदगी नासवताना नाही का आठवलं ?’
गणेशला विकासच्या कानफडात ठेवून द्यावीशी वाटली. पण विकासही आता चिडला.
“ तुला बोलायला काय सगळं सोप्पंय रे. तू आणि काय जगावेगळे केलेय रे. तुझ्या आईनं नेलं तुला दुसर्या गावी आणि तुही कायमचा निघून गेला. मला तू एकच जिवलग दोस्त होता. पण तुला एकदाही मागे वळून नाही पाहावे वाटले? तुझ्या आयुष्यात तू बुडून गेला होतास पण माझी एकदा पण कशी नाही आठवण आली रे तुला? तुझ्या जबाबदार्या तू पार पाडल्या, पैसे कमावले, घर, गाडी घेतली, जातीतल्या पोरीशी लग्न करून स्थिरावला. तुही समाजाने आखून दिलेल्या रेषेवर चालला नं? मग मीही तेच केलं तर मला का दोष? मी काय समाजसुधारणेचा ठेका घेतलाय का?”
“पण मी काय माझ्या स्वार्थासाठी कुठल्या गरीब पोरीचं आयुष्य नाही नासवलं.”
रागातच गणेश घरी निघून आला. पण संगीताची काळजी त्याला स्वस्थ बसू देईना. दुसर्या दिवशी वडगावला तिला भेटायला जायचं त्यानं मनाशी पक्कं केलं.
“गण्या तू? “ संगीता अविश्वासाने पहातच राहिली. “एवढ्या दिवसांनी कसा काय उगवलास?”
गणेश ठरवून आला होता कि संगीताला जाब विचारायचा, की एवढा मोठा अन्याय तिने होऊच कसा दिला? कंबर कसून उभी का नाही राहिली विकासची मुंडी पकडायला ? पण प्रत्यक्ष तिला समोर पाहताच त्याचा सारा आवेशच गळून पडला. तिचे टपोरे डोळे जणू विझून गेले होते. चेहर्यावरचं तेज हरवून गेलं होतं. हीच ती त्याची जुनी मैत्रीण का अशी शंका यावी इतकी ती बदलून गेलेली.
“ एकदा फक्त मदत मागितली असती तू तर नसतो आलो का धावून तुझ्या खातर? भाऊ म्हणाली होतीस ना मला? मग एवढा परका वाटलो का तेव्हा?”
“जेव्हा खरी गरज होती तेव्हा तर आलेच होते कि रे हक्कानं. पण जेव्हा कुठला इलाजच नव्हता तेव्हा तू तरी बापडा काय करणार होतास.”
एकीकडे चहाचं आधण ठेवत संगीता दु:खात हरवल्यासारखी बोलत राहिली.
“पैशाची गरज होती त्याला. मस डोंगराएवढं शिकून पण नोकरी मिळेना. कुठल्याशा कॉलेजात फुकट राबत होता. एका मोठ्या माणसाच्या ओळखीने चांगली नोकरी मिळाली, मास्तरचीच साधी नोकरी पण चांगल्या पगाराची. त्यानं त्याबदल्यात त्याच्या पोरीशी लग्न करायची शर्त ठेवली. हुंडापण पुष्कळ मिळाला. लोक म्हणतात चार पाच लाख. मीच म्हटला त्याला करून टाक लग्न. नाहीतरी मी काय देऊ शकणार होते त्याला? माझ्या सुखासाठी त्याचं वाटोळं कशाला रे.”
गणेशला काहीच ऐकू वाटत नव्हतं. सगळं खोटं. हिचा जीव होता त्याच्यावर. पण त्यानंच भरवसा तोडला म्हटल्यावर काय राहिलं. जरी हिनं विकासच्या लग्नाला विरोध केला असता तरी त्यानं थोडीच ऐकलं असतं हिचं?
मग चहा पीत ती तिची कथा ऐकवत राहिली. तिचे कष्ट, गावात झालेली बेअब्रू, त्यापायी तिचं लग्न न जमायला त्रास, मग बहिणींची उरकून घेतलेली लग्ने, असं बरंच काही.
“ मागल्याच साली बापुच्या मोतीबिंदूचं ऑपरेशन करून घेतलं. माय आन बापू नाही चिडत माझ्यावर कधी. यासाली पाऊस चांगला झालाय. बघ की पिकं कशी तरारलीयेत.”
ती बरेच बोलत राहिली. गणेश सुन्न होऊन बसून राहिला.
हा त्याचा बालपणाचा गाव, त्याची शाळा, त्याचा दोस्त विकू, मैत्रीण संगी, नदीकाठच्या गप्पा, दगडाखालचे विंचू सगळचं त्याला परकं वाटू लागलं. कुणाचं चुकलं आणि का चुकलं कसलाच विचार त्याला नकोसा झाला. ही समोरची पोक्त वाटणारी संगीता कुठल्या दिशेने जाणार त्याला समजत नव्हतं. त्याचं आयुष्य त्याला कुठे नेईल ते तरी त्याला कुठे माहिती होतं? नशीबाच्या खांद्यावर मान टाकून निवांत झोपावं की हातात धारदार पात्याची कुर्हाड घेऊन खडा पहारा द्यावा असं काहीसा विचार करत तो तसाच बसून राहिला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
आपला ब्लॉग "मराठी ब्लॉग लिस्ट" या मराठी ब्लॉग्सच्या डीरेक्टरीव जोडायचा असल्यास खालील लिंक ला भेट द्या-
ReplyDeleteलिंक- http://marathibloglist.blogspot.in/
Khup vednadayk hota ha blog.....
ReplyDeleteहो. वेदना हे माझं लिहिण्याचं inspiration आहे.
DeleteBlog वाचल्याबद्दल धन्यवाद Sashu !!
DeleteThis is called life.manasala have te sagle kadhich bhetat nahi. ....
ReplyDeleteThis is called life.manasala have te sagle kadhich bhetat nahi. ....
ReplyDeleteyes...thats tragedy but also blessing of human life..हवे ते सगळे मिळाले तरी ते व्यवस्थित हाताळणे कुठे जमते माणसाला !!
DeleteAwesomee Writing
ReplyDelete