जंगल खुळावतं
वेडी भूल घालतं
तारतं की मारतं
माहित नाही
पण जागवतं
आतमध्ये
विलक्षण सळसळ
जंगल खुणावतं
गोड शीळ घालतं
त्याच्या पोटात
शिरता
अलिप्ततेने का होईना
पण घेतं
कवेत
जंगल
जसं पसरलंय
आजूबाजूला
तसंच एक
आतमध्ये
वृक्षांच्या फांद्या
तसे पसरलेले
जाळे मेंदूमध्ये
तंतूंचे..!
मग कधी
होतो भ्रम
जणू हे आतलंच
उगवलंय बाहेर
आणि जणू जंगलच
प्रकटलंय
माझ्या
अणूरेणूंतून..!