बऱ्याच दिवसांनी मिळालेला थोडा निवांत रविवार..त्यात छान सुस्त सकाळ...उशिरा उठले त्याचं थोडं वाईट वाटलं कारण त्यामुळे सकाळी लांब फिरायला जायचं राहून गेलं.
मग चहा पीत पीत म्हटलं जाऊन येऊ छोटी चक्कर मारायला. चालत चालत गेले शेतीच्या बाजूला. दोन्ही बाजूला भाताची शेती आणि मध्ये गवताने भरलेली पाऊलवाट .. आणि वरून मस्त कोवळं ऊन.. मज्जा येत होती.
पायवाटेच्या दोन्ही बाजूला पूर्ण पसरलेलं गवत आणि त्यात वेगवेगळी गवतफुले फुललेली. ईवली ईवली फुले पण किती देखणे रंग त्यांचे. एकाचा प्लेन पिवळा रंग परंतु त्यावर सुईच्या बारीक टोकाने नक्षी बनवावी तशी काढलेली रेषांची ओळ. त्या चिमुरड्या फुलाचा हा थाट..! दुसरे अगदीच साधे बिना नक्षीचे , कागदाचे वाटावे असे साधे चिटूकले, बिना आकाराचे फूल पण त्याचा रंग शाईसारखा सुरेख निळा. त्या हिरव्या गवतावर ते श्याम निळे फूल इतके उठून दिसत होते की मला माझा निळा कृष्ण आठवला.
पुढे तर आणखी गम्मत. माझी आवडती गुलाबी रंगाच्या लुकड्या पाकळ्यांची फुले. पाकळ्या गोंडस गुलाबी आणि त्यांना एकत्र बांधणारा मध्यभागी पिवळा जर्द गोंडा. त्यावर तसेच पिवलळेधम्म परागकण. ही फुले मला फार भावतात. जिवलग सख्या वाटतात. त्यांचे सौंदर्य असे अद्भुत भासते जणू आकाशातील नक्षत्रे टिंब टिंब गळून धरणीवर पडली आणि त्यातून ही फुले उगवली. एखाद्या चित्रकाराने नजाकतीने बॉर्डर करावी तसे त्या पाकळ्यांना गडद गुलाबी तरल काठ.
त्यांच्या कौतुकात दंग होऊन मी चालते न चालते तोवर पुढे माझा रस्ता अडवून एक गिर्रेबाज फुल उभे. त्याला जन्माला घालणारे गवत मात्र अगदी राकट तणकट, कडू वासाचे. पण त्याचे फुल इतके नितळ सुंदर. हळद पिवळ्या देखण्या पाकळ्या, लांब आणि एकत्र येऊन मध्ये खोली निर्माण करणाऱ्या..त्यांची आतली चतकोर पाव काजळ बाजू मात्र लालसर गर्द तपकिरी. जणू त्या पिवळ्या पाकळ्यांवर बोटांच्या परांनी अलगदपणे तो गर्द लाल ठेवून दिलेला. आणि मध्यभागी पिवळे जाड परागतंतू. त्यावर गर्द लाल परागकण. प्रेमातच पडले मी त्या ऐटबाज फुलाच्या. ते सौंदर्य न्याहाळत थांबले काही काळ.
राहवले नाही तेव्हा बोललेच त्याला; "तू खूप सुंदर आहेस. आणि तुझे हे जे रंग आहेत न ते म्हणजे जणू देवाचा स्पर्श झालाय तुला. तुझं अस्तित्व त्याचं असणं जणू सांगतंय मला." मी सांगितले आणि त्याने ऐकले. I am damn sure..!!
इतकी साधीसुधी गवतफुले. ना त्यांना गंध, ना तोरेबाज आकार वा ना टिकण्याची ताकद. ना त्यांना दीर्घकाळाचे वरदान, अथवा कुठे मिरवण्याचा हक्क. कोणी पाहतो न पाहतो त्यांना. माणसाने आपल्या धावपळीमधे खास थांबून दखल घेण्याजोगं काही नाही. परंतु ही फुले स्वतःतच असतात दंग. त्यांच्या निसर्गराजाचे भरभरून प्रेम त्यांना मिळतेय आणि त्यातच ती डोलत राहतात सुंदरपणे..!
मला वाटते जगावे तर असे..! गवतफुल बनून. तशी मी आहेच रानटी वेल. गंधाची वा रुपाची हौस नाही. माणसाच्या दुनियेतील कुठलीही बंधने मी पाळत नाही. कोणी दखल घ्यावी याची इच्छाही नाही. फक्त एवढेच वाटत राहते अल्पकाळ जगावे पण उत्कट जगावे. अस्सल जगावे निसर्गासारखे. फुलायचे तेव्हा सर्व कणाकणातून फुलून यावे आणि सुकले तरी समाधानाने सुकावे स्वतःला पूर्ण स्वीकारून आणि समजून उमजून...!!
आणि मग आणखी गम्मत घडली. माझा सर्पांवर फार जीव आहे. आज सकाळपासून शोधत होते गवतात पण दिसलाच नाही. रूमवर परतले तर बाहेरच्या फरशीवर पहुडलेला वाश्या.. टुकूटुकू बघत तोंड वळवळणे चाललेले त्याचे. मी धांदरटपणे जवळ गेले तर पालथा खाली मातीत पडून गायब. Thank you. तू तरी भेटलास आज..!!
Pages
Welcome...
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..
Labels
- Love (1)
- कविता (23)
- मीराची डायरी (17)
- ललित (32)
- संवाद (6)
- सुचेल ते.. (10)
- हिंदी कविता (3)
11/16/14
एक निवांत सकाळ...आणि गवतफुले.!
Subscribe to:
Post Comments (Atom)
Mi tithech aahe tya tuzyasobat ase watale blog wachatana. Thank you.
ReplyDeleteChan watla mala comment wachun !!
ReplyDelete