Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..

1/5/15

स्त्री आरोग्यदूत आणि गावाला भेट

सध्या गडचिरोलीच्या डॉ. अभय बंग यांच्या "सर्च" या संस्थेमध्ये काम करते आहे. इथे येणारे अनुभव मला भरभरून एक नवा विश्वास, नवी प्रेरणा, नवी स्वप्ने , नवे समाधान आणि अगदी आतून उमटून येणारा असं आनंद देत आहेत.
रोजचा दिवस काहीतरी शिकवतो आहे. इथे भेटणारे लोक आणि त्यांची कामावरची श्रद्धा मलाही स्वतःच्या आयुष्यात कसे आणखी चांगले माणूस म्हणून जगता येईल हे जाणते अजाणते पणाने शिकवत आहेत. इथल्या अनुभवांबद्दल खूप लिहू वाटतेय म्हणून आज हे लिखाण सुरु करतेय.
सर्चने गावांचे आरोग्य त्यांच्या हाती सोपवण्यासाठी त्यांच्यातीलच काही व्यक्तींना निवडून त्यांना आरोग्य प्रशिक्षण दिले आणि ते सर्चचे आरोग्यदूत म्हणून गावां-गावांमध्ये आरोग्यसेवा देतात. मी आणि अमेरिकेहून इथे आलेली Heather Gardner, त्यांचे काम पाहण्यासाठी शनिवारी आणि रविवारी गावात एका जाऊन राहणार असे ठरले. त्यानुसार आम्ही शनिवारी संध्याकाळी 'पोर्ला' या गावी तिथली आरोग्यदूत 'अरुणाताई' यांच्या घरी राहायला गेलो. तिथे जो अनुभव मिळाला आणि जे माझे जीवन शिक्षण झाले ते मला बरेच विचारप्रवृत्त करणारे ठरले.
त्यादिवशी आम्ही अंधार पडल्याने प्रत्यक्ष काम करायला जाणार नव्हतो. म्हणून त्यांच्या घरातच आम्ही त्यांच्या कामाविषयी चर्चा करत होतो. मी स्वतः स्त्रीरोग तज्ञ असल्याने मी त्यांना प्रश्न विचारून त्यांचे ज्ञान पाहत होते आणि अरुणाताई त्यांची इतकी व्यवस्थित आणि सखोल उत्तरे देत होत्या की मी चाटच पडले. कारण अरुणाताई त्या गावातील विधवा बाई. शिक्षण किती तर सातवी पास. लग्नानंतर एक मुलगी झाली आणि ती एका वर्षाची असतानाच नवर्याचे १९९२मध्ये निधन झाले. १९९३मध्ये सर्चने आरोग्यदूत म्हणून काही निकषांच्या आधारे स्त्रिया निवडल्या त्यात शिक्षणामुळे त्यांचीही निवड झाली. तेव्हापासून त्या या कामात सक्रीय आहेत. त्यांची त्यांच्या कामाविषयीची सखोल माहिती, जे काम करू ते १००% जीव लावूनच करू हा दृष्टीकोन आणि समाजाच्या आरोग्याविषयीची तळमळ या सार्यांचा सुंदर संगम त्यांच्यामध्ये पाहून मी थक्क झाले.
आपण Women empowerment च्या नुसत्या गप्पा मारतो आणि सावित्रीबाई फुले जयंतीला भाषणे देतो. यापेक्षा एकटी स्त्री कंबर कसून स्वतःच्या पायावर उभी राहते आणि आरोग्यसेवा देते हे मला जास्त सुंदर आणि आशादायी चित्र वाटले.
खेड्यातील त्या घरात राहण्याचा अनुभव तर खूप सुंदर होता. त्यांचे आम्हाला प्रेमाने खाऊ घालणे. त्या सतत कामात मग्न असायच्या ते पाहून मला स्वतःच्या आळशीपणाची जाणीव झाली. मग मी मस्त स्वयंपाक पण बनवला त्या छोट्याश्या पण जिव्हाळ्याच्या सुबक खोलीमध्ये. थंडीमध्ये पहाटे उठून चुलीवरच्या गरम पाण्याने अंघोळ करणे ही तर माझ्यासाठी Luxury होती. बाहेर पडल्यावर आजूबाजूला पाहणे, लोकांशी गप्पा मारणे, अरुणाताई सोबत त्यांच्या कामाचा अनुभव घेणे यातून भरपूर शिकणे झाले.
मी बर्याच वेळा ऐकले होते की चार भिंतींच्या शाळेपेक्षा निसर्गाची मोकळी उघडी शाळा सहजपणे आणि जास्त शिकवून जाते ते मी आयुष्यात प्रथम अनुभवले. मला हे उघडे आणि मोकळे जग आवडले. असे वाटले आपण आयुष्यामध्ये स्वतःभोवती चार भिंती बांधतो, त्यात चैनीच्या वस्तू गोळा करतो, आपली म्हणून समजणारी माणसे साठवतो आणि मग बंदिस्त करून घेतो स्वतःला त्यात. त्यात मग आपल्याला खूप सुरक्षित वाटते, इतर जगापासून तोडून स्वतःला त्या भिंतीमध्ये कैद करण्यात स्वतःला आपण सुरक्षित म्हणवतो आणि त्याला म्हणतो "Settlement.."!!!!! Isn't it so much weird..? खरेच किती मुकतो आपण निसर्गाच्या आनंदाला ? समाजाच्या सहवासाला ? समाज म्हणजे काय ते जाणवूच देत नाही आपण स्वतःला आणि हरवून जातो स्वतःच्या Ego च्या छोट्याश्या डबक्यामध्ये.
आत्तापर्यंतचे सारे आयुष्य मला आठवले. tv पाहण्यात आणि अभ्यासाच्या चार पुस्तकांत डोके घालून मी मनाचे दरवाजे बंद करून टाकले आणि आयुष्यातील कितीतरी आनंदाला आणि खऱ्या शिकण्याला गमावून बसले असे वाटले उगाच. All those years, when i enclosed myself in four walls of my so called home, i missed life.
तिथे काळी चहा पीत होतो , बिनदुधाचा. म्हटले सवय करू. पण रात्री झोपताना असा त्रास झाला, वाटले मला दुधाचा चहा हवा आहे by hook or crook. मग जाणवले की किती घट्ट विळखा आहे मला चहाच्या व्यसनाचा. आणि आम्ही त्यांना तंबाखूचे व्यसन सोडा सांगत होतो. या स्वतःच्या निरीक्षणाने मलाच विचारात पाडले.
रात्री आजूबाजूच्या बायांना जमवून बसलो गप्पा मारायला. मग त्यांनी बोलून आणि प्रश्न विचारून मस्त भंडावून सोडले. जेवढी माहिती मला त्यांना देता आली तेवढी दिली आणि त्यांना बोलते करायचा प्रयत्न करून त्यांची माहिती, त्यांचे समज, त्यांचा दृष्टीकोन समजून घ्यायचा प्रयत्न केला.
दुसऱ्या दिवशी सकाळी परत निघालो तेव्हा अरुणाताईना सोडून येताना मन भरून आले होते.
काही वर्षांपूर्वी मी मेळघाटात आरोग्याच्या कामासाठी गेले होते तेव्हा अगदी वेगळा अनुभव आला होता. मी तिथल्या अंगणवाडी सेविकेच्या घरी राहिले होते. तिचा भोंगळ कारभार आणि कामाबद्दलची अनावस्था आणि तिचे शून्य काम, आम्ही घेतलेल्या सभेमध्ये लोकांची तडफड, तिच्याबद्दलच्या तक्रारी हे सर्व पाहून मला रडू कोसळले होते. सरकारच्या योजनांवरचा विश्वास संपून गेला होता. ते गाव सोडताना मनात उदासी आणि दु:ख पसरले होते. आज इथे मात्र उलट अनुभव आला. गावातून बाहेर पडताना मन एका नव्या आशेने आणि उमेदीने भरून पावले होते. या खेड्यात इतकी समर्थपणे काम करणार बाई आहे याचा आनंद आणि तिला घडवणाऱ्या 'सर्च' चा अभिमान यांनी मन भरून पावले होते. अशी स्त्री प्रत्येक खेड्यामध्ये घडली तर माझ्या भारताची आरोग्य व्यवस्था नक्कीच सुधारू शकेल अशी आशा तेवली मनामध्ये. I felt so much empowered for my community and proud of SEARCH..!! प्रकाशाने वाट उजळावी तसे काहीसे जाणवले. आत कुठेतरी प्रकाशाची तिरीप उमटते आहे आणि मनाला उभारी देते आहे. नवे काम करायचा विश्वास आणि उत्साह आणि उर्जा मिळते आहे.

7 comments:

  1. सुंदर लेख. अरुणाताईंना काम करताना येणारे अनुभवही वाचायला आवडले असतं. तसंच मेळघाटातील अंगणसेविकेबद्दलही.

    ReplyDelete
    Replies
    1. नक्की लिहील मेळघाटातील अनुभवाबद्दल. पण अरुणाताई च्या अनुभवासाठी मात्र एकदा नक्की या सर्चला :) ते प्रत्यक्ष पाहणे सुंदर आहे.

      Delete
    2. हं, यायला हवं. बघू कसं जमतं ते. तोपर्यंत तुमच्या लेखनातून भेट होऊ द्या:-)

      Delete
    3. waw, great blog
      -rupali

      Delete
  2. Nice blog with positive attitude towards women.

    ReplyDelete
  3. Hey,.thanks a lot for reading diffrent posts on my blog and taking time out for comments . It feels good to know that some one reads and relates with my writing.

    ReplyDelete