Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..

4/29/12

तुझं मौन

शब्दांचे मनोरेच्या मनोरे
बंधू पाहतेय मी
आणि तिकडे  तू तर 
बसलाय दडी मारून
मौनाच्या खोल डोहात
कसे जुळावेत रे
आपले सूर..?
एकदा केला प्रयत्न
शब्दांचा पूल बांधून
तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा
पायऱ्या होत्या फक्त
तुझ्या आवरणापर्यंत
तेथून आत
तुझ्या काळजात
कशी रे उतरू..?

4/24/12

तू येशील तेव्हा...

तू येशीलही कदाचित..
काळाच्या कुठल्यातरी बिंदूवर असेल ठरवलेली तुझी माझ्याकडे परतण्याची वेळ.
वाट पाहीन मी.. पण तू येशील तेव्हा मी असेन का रे जिवंत..?
तू येशील तोपर्यंत तग धरू शकेल का माझं कमकुवत मन..
की मोडून पडेल मी एखादं झाडं वादळात भुईसपाट व्हावं तशी..
थरथरतोय जीव आत्ताच. 
निराशेची काजळी चढू लागते मनाच्या नितळ आरश्यावर माझ्याही नकळतपणे.
तशी प्रयत्न करतेच आहे रे मी मनावर ताबा ठेवण्याचे. अगदी जागता कडक पहारच ठेवला आहे मी मनावर.
उगाच अडकू नये त्यानं कुठल्याही भुलभुल्लैयात नि गुंतू नये कुठल्याच वांझ भावनांमध्ये विनाकारण.
पण तरीही एखाद्या अनामिक क्षणी अंधाराची भुतावळ हळूहळू गर्दी करू लागते रे मनामध्ये..
मग मनही खचतं, निराशेनं ग्रस्त होऊन कोसळू लागतं गर्तेमध्ये
आणि मी पाहत राहते असहाय्यपणे..
अशी एखादी काळीकुट्ट रात्र मी कशी जागून काढते ते माझं मलाच माहित.
नाहीच कधी समजणार तुला, अश्या कित्येक रात्रींचे हल्ले मी कसे परतवून लावते.
पण मी आता थकते आहे हळूहळू.. कधीतरी हार मानावी लागेल की काय याची काळजी वाटतेय.
आणि तसं झालं ना तर त्या जखमा नाही पेलू शकणार माझं काळीज..
म्हणूनच विचार करते, तू येशील तेव्हा मी असेन का रे..?
तू येशील तोपर्यंत राहील का रे मी जिवंत मनाने..?
का भान सुटलं असेल माझं वास्तवाचं आणि गेली असेल मी जाणीवांच्या पलीकडे..!
स्वीकारू शकशील कारे तू मला तशाही अवस्थेत..? की पुन्हा एकदा नाकारून निघून जाशील कायमसाठी..?
पण..पण तू येशील तेव्हा मी असेन का रे ?

भेसळ

"तुझा खरंखुरं प्रेम आहे ना रे माझ्यावर? "
" माणसानं साऱ्याच तत्वांमध्ये, मूलभूत प्रेरणामध्ये मोठी भेसळ करून ठेवलीये; सगळं कसं अगदी नासवून टाकलंय."
" का रे बाबा, आणि हे मधेच काय..? "
" बघ  ना, प्रेम ही माणसाची मूलभूत प्रेरणा..अगदी आतली. प्रेम म्हणजे प्रेमच ना ? ते खरंच असतं ना, खोटं कसं असतं गं..? पण आजकाल ते आपल्याला कसं व्यक्त करावं लागतं, माझं तुझ्यावर खरंखुरं प्रेम आहे..!! प्रेमालाही आजकाल खरंखुरं हे विशेषण लावावं लागतं यातच सारं आलं. "
" म्हणजे ? "
" म्हणजे स्वत:च्याच पायांनी स्वत:च्या अधोगतीकडे जायचे आणि वर सुंदर  शब्दांचा मुलामा फासून प्रगतीचे ढोंग करायचे. ते ढोंग पकडले जाऊ नये म्हणून बुद्धीचा वापर करायचा.."
" ते जाऊ दे, प्रेम आहे ना..? "
" हो, अगदी खरंखुरं.."

मीरा

 मीरा होणं कठीण की राधा..
हे कोणीच नाही ठरवू शकणार...
दोघींची तुलना करण्याचा प्रयत्नही करू नये कोणी..
पण तरीही कधी वाटतं, राधेला थोडंतरी झुकतं माप मिळालं दैवाकडून..
आयुष्याच्या एका टप्प्यावर, काही काळ का होईना,
कृष्णानं राधेची प्रीत स्वीकारली.
त्याच्या मुग्धमधुर लीला राधेच्याच नशिबी....!
पण मीरा.. तिच्या प्रेमाची रीतच न्यारी..!
कधीही न भेटलेल्या त्या सावळ्यासाठी
तिनं आयुष्यभराचं व्रत घेतलं..
प्रेमाचं महाकठीण व्रत.. जे फक्त तिलाच पेललं..
त्या मीरेला समर्पित..