खरेतर पहाडी लोक असा शब्दप्रयोग खूपवेळा वाचनात आला होता. परंतु त्या शब्दावर कधी विचार करायची गरज पडली नाही किंवा तसा विचारच केला नाही. हलद्वानी या गावापासून जेव्हा मी सतोलीला टेक्सीने निघाले आणि लवकरच सपाट प्रदेश संपून आम्ही पहाडातून प्रवास सुरु केला , तेव्हा कुठे मला पहाडी प्रदेश या शब्दाचा खरा अर्थ लक्षात येऊ लागला. कारण आम्ही नुसते एका पहाडावरून दुसऱ्या , तेथून तिसऱ्या असे फक्त पहाडातच प्रवास करत होतो. जी काही गावे लागत होती, ती त्या पहाडांवरच होती. जेवायला आम्ही थांबलो, ते गाव सुद्धा असेच एका पहाडावर वसलेले होते. मी टेक्सीतून उतरले, एका रोडसाईड धाब्याकडे गेले. आजूबाजूला नुसते पहाडच पहाड, आणि हा धाबापण असाच एका पहाडी वळणावर विसावलेला. तिथे पराठे आणि पहाडी आलू स्पेशल डिश खाताना माझे विचार चालू होते, “अरे, खरेच हे लोक शब्दशः पहाडावरच राहतात, यांची गावे, शेती, बाजार, जगणे मरणे सगळे पहाडावरच तर आहे.”
पुढे एका वळणावर तर मला आणखी एक दृश्य दिसले. एका पहाडाच्या रस्त्याला लागून असलेल्या उतरणीवर एक भलामोठा वृक्ष होता आणि त्याच्या एका बऱ्याच उंचीवरच्या फांदीवर एक स्त्री चढलेली. मला तर आश्चर्याचा धक्काच बसला. हे मला झालेले धाडसी पहाडी स्त्रीचे पहिले दर्शन!! त्यानंतर मग रस्त्यांवर गवताचे प्रचंड मोठे मोठे भारे आपल्या डोक्यावर वाहणाऱ्या पहाडी स्त्रिया दिसतच राहिल्या. ते भारे जवळ जवळ त्या स्त्रियांच्या उंची एवढेच मोठे मोठे असायचे, डोक्यावरच्या भाऱ्यामुळे त्यांचा चेहरा दिसायचाच नाही, त्यांना पुढचा रस्ता कसा काय दिसत असेल याचेच मला नवल वाटत राहिले. एकही पुरुष मला असा भारा वाहताना दिसला नाही. स्त्रियांच्या या कष्टांची किंमत त्यांचे शरीर कशाप्रकारे मोजते आहे, याची झलक एक डॉक्टर म्हणून मला पुढल्या काही दिवसात पहायला मिळणार आहे, याची मला किंचितही कल्पना त्यावेळेला नव्हती.
सतोलीच्या हॉस्पिटलमध्ये असताना , माझा दुसराच दिवस होता तेव्हा, एक स्त्री व तिचा नवरा तपासणीसाठी आले. तिचे वय फक्त २४ वर्षेच होते. मी तिला तपासले आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण तिची गर्भपिशवी पूर्णपणे बाहेर आलेली होती. बरेच दिवस ती तशीच बाहेर लटकत राहिल्याने त्यावर जखमा झालेल्या होत्या. वास येत होता. खरेतर अशा प्रकारचा आजार हा पाळी निघून गेलेल्या, ५०-६० वयाच्या वयस्कर स्त्रियांमध्ये दिसून येतो. याला आम्ही प्रोलाप्स असे म्हणतो. महिला याला “अंग बाहेर येणे” असा शब्दप्रयोग वापरतात. गर्भपिशवी ही लीगामेंटस व स्नायूच्या सपोर्टने तिच्या नॉर्मल जागेवर धरून ठेवलेली असते. विविध कारणांनी हा सपोर्ट कमजोर पडून गर्भपिशवी व तिच्यासोबत लघवीची पिशवी, संडासची जागा हे नॉर्मल जागेवरून हळूहळू खाली सरकू लागतात. त्यानुसार आम्ही त्याचे 1st , 2nd , 3rd डिग्री व complete prolapse वर्गीकरण करतो. जास्त म्हणजे 2nd, 3rd डिग्री व complete prolapse ला स्त्रियांच्या वयानुसार विविध शस्त्रक्रिया लागतात. अशा आजाराच्या खेड्यातल्या वयस्कर स्त्रिया लाजेने वेळीच दवाखान्यात येत नाहीत आणि मग आजार वाढतो, जखमा होतात तेव्हा येतात. तोपर्यंत मग शस्त्रक्रियेची गुंतागुंत वाढलेली असते. गडचिरोली जिल्ह्यात मी होते, तिथे तर एक अंधश्रद्धा होती की ज्या स्त्रियांचे लग्नाबाहेर परपुरुषासोबत संबंध असतात, त्यांना हा आजार होतो. त्यामुळे तर मग तिथे अशा आजाराच्या स्त्रिया कोणालाच काही सांगत नाहीत. सहन होण्याच्या पलीकडे त्रास गेल्यावर मगच दवाखान्यात येतात.
प्रोलाप्स होण्याच्या कारणांमध्ये सतत होणारी बाळंतपणे, दोन बाळंतपणामध्ये अगदी कमी कालावधी असणे, लहान वयातच बाळंतपणे होणे, चुकीच्या पद्धतीने कळ देणे, घरीच बाळंत होणे, रजोनिवृत्तीनंतर आधीच कमजोर झालेले लिगामेंट आणि स्नायू नैसर्गिकरित्या आणखी कमजोर होऊन गर्भपिशवी खाली सरकणे. या कारणांशिवाय कुपोषण, गर्भवतीने पौष्टिक आहार न घेणे, गर्भवतीला रक्तक्षय असणे ही कारणे पण आहेत. तसेच स्त्री बाळंत झाल्यानंतर तिने दीड महिना आराम केला पाहिजे, कष्टाची कामे बिलकुल करू नयेत. कारण बाळंतपणाच्या वेळेस स्त्रीच्या शरीरावर ओटीपोटाच्या स्नायूंवर ताण आलेला असतो, त्याला आराम मिळून त्यांची ताकद पुनः भरून यायला तेवढा वेळ द्यावा लागतो.
आपल्या भागातील तरुण स्त्रियांमध्ये 1st 2nd डिग्री प्रोलाप्स दिसून येतात. परंतु त्यापेक्षा जास्त मात्र चुकून एखादीला दिसतो.
इथे सतोलीमध्ये मात्र २४ वर्षाच्या स्त्रीला इतक्या टोकाचा आजार पाहून मी विचारात पडले. तिथल्या नर्सचे मात्र म्हणणे पडले की हे खूप कॉमन आहे या पहाडी भागात. खूप स्त्रियांना असा आजार दिसून येतो. मी मात्र खूप अस्वस्थ झाले होते त्या स्त्रीला पाहून. तिच्या गर्भपिशवीला १५ दिवस औषधाने ड्रेसिंग करून, जखमा बऱ्या करून, सूज कमी होऊ देऊन मग तिचे ऑपरेशन करता येणार होते.
इतक्या कमी वयात हिला कसा काय पूर्ण प्रोलाप्स झाला ? हिने कमी त्रास असतानाच का नाही तपासणी करून घेतली ? हिला एक वर्षापासून इतका जास्त त्रास आहे, तर ही त्रास सहन करत कशी काय काम करत असेल ? डॉ. सुशील सरांशी बोलून माझ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली. तेथील गरिबी, भौगोलिक परिस्थिती, स्त्रियांवरचा कष्टांचा बोजा आणि आरोग्य सुविधांचा अभाव या सर्व गोष्टींमध्ये तिच्या आजाराचे मूळ सामावले होते. गरिबीमुळे लहानपणिपासूनचे कुपोषण, गर्भवतीला न मिळणारा पौष्टिक आहार, कष्टांची कामे, त्यात महत्वाचे म्हणजे जड गवताचे भारे डोक्यावरून वाहून नेणे. भौगोलिक परिस्थिती यासाठी की तिथल्या महाकाय डोंगरांवरून सततची चढ उतरण चालूच, त्यात डोक्यावर मोठाले गवताचे भारे किंवा इतर जड सामान. यामुळे स्त्रीच्या ओटीपोटात जास्त ताण येतो व तिथल्या स्नायूंवर, लिगामेंटस वरचा ताण वाढतो, पर्यायाने गर्भपिशवीचा सपोर्ट हळूहळू कमजोर होत जातो. तसेच भौगोलिक परिस्थितीचा आणखी एक तोटा की स्त्रीला बाळंतपणाच्या कळा सुरु झाल्यावर तिला तिच्या डोंगरातील प्रदेशातून आरोग्यसुविधा असलेल्या शहराच्या ठिकाणी जायला वाहन मिळत नाही. बऱ्याच वेळा तिला कॉटची पालखी करून काही किलोमीटर चढ उतार पार करून, तेथून डांबरी रस्ता असलेल्या ठिकाणी नेले जाते. तेथून मग बरेच पैसे मोजून शहरापर्यंत पोहोचवले जाते. ही पूर्ण प्रक्रिया होईपर्यंत बऱ्याच स्त्रिया घरीच बाळंत होऊन जातात. तर काही लोकांकडे वाहनासाठी पैसा नसल्याने, शहराची भीती वाटत असल्या कारणाने ते घरीच बाळंतपणाचा पर्याय स्वीकारतात. तिथे काही ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे व त्यापेक्षा लहान डीस्पेन्सरीज आहेत. परंतु तिथे एकही डॉक्टर व नर्स नसते. तिथे दाईच बाळंतपण करतात. एकदा मी तिथे दाई मिटिंग मधे सर्वांना प्रश्न विचारला की तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात का जात नाहीत ? तर एका दाईने सांगितले, “आम्ही नेतो तिथे स्त्रियांना, आम्हाला पण वाटते की औषधे मिळावीत, बाळंतपणे सुखरूप व्हावीत परंतु एकदा गेलो तर तिथे डॉक्टर, नर्स कोणीच नाहीत. वर पाणी पण नाही. शेवटी मीच इकडून तिकडून पाणी गोळा करून आणले आणि केले त्या बाईचे बाळंतपण.” यावर मी निरुत्तर झाले.
घरी होणाऱ्या बाळंतपणामध्ये स्त्रियांना रक्तस्त्राव होऊन त्यांचे मृत्यू होण्याचे प्रमाण बरेच आहे. तसेच कुपोषण आणखी वाढणे, रक्तक्षय होणे, जंतुसंसर्ग होणे, बाळ पोटातच किंवा जन्मल्यानंतर मरणे, बीपी वाढून फिट येणे, सतत गर्भपात होणे, अशी बरीच गुंतागुंत निर्माण होते.
बाळंत झाल्यावर या स्त्रिया बिलकुल आराम करत नाहीत. लगेच १-२ दिवसात त्यांची कष्टांची कामे सुरु होतात. हेसुद्धा तरुण वयामध्ये प्रोलाप्स होण्याचे महत्वाचे कारण आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व नर्स नसल्याने त्यांना कुंटुंब नियोजनाबद्दल माहिती द्यायला कोणीही उपलब्ध नाही. त्यामुळे प्रत्येक स्त्रीला दरवर्षी मुल होते व प्रत्येकीला कमीत कमी ४ मुले तरी होतात. एक गर्भवती स्त्री तर १० व्या वेळेस गरोदर होती, कारण पहिल्या ९ ही मुली होत्या.
संध्याकाळी आम्ही हॉस्पिटलमधून सुकूनकडे, म्हणजेच आमच्या राहण्याच्या ठिकाणी परत जाताना माझे मन खूप उदास होते. काही केल्या त्या स्त्रीला मी विसरू शकत नव्हते. सुशील सरांशी चर्चा करत रस्ता संपत होता. आता मला समजत होते की यांना स्त्रीरोग तज्ञाची इतकी तातडीची गरज का आहे ते. पुढचा माझा महिना पूर्ण प्लान केला होता. पहिले ८ दिवस मोबाईल मेडिकल युनिट म्हणजेच फिरत्या दवाखान्यासोबत स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम करणे, नंतर १५ दिवस दाई प्रशिक्षण कार्यक्रम आखणे व राबवणे आणि शेवटचे ७ दिवस पिंडारी ट्रेक मध्ये डॉक्टर म्हणून जॉईन होणे.
डॉ. हिमांशु सोबत आरोहीच्या हॉस्पिटलमध्ये डॉ. तेजस्वी म्हणून डेंटिस्त काम करते. ती शेजारच्या एका शहरातून जॉबसाठी तिथे आलेली. तिच्याकडे पाहिले की पहाडी सौंदर्य काय याचा प्रत्यय मला आला. सफरचंदासारखे गुलाबी गाल आणि लाघवी बोलणे हे तिचे स्पेशल फीचर्स. तिच्या गोड स्वभावाने आमची पक्की मैत्री जमली. मला सर्व माहिती सांगणे, तिथे अडजस्ट होयला मदत करणे, तेथील स्टाफशी ओळख करून देणे असे सगळे ती प्रेमाने करायची.
माझ्यासोबत आणखी २ मुली रिंकी व भावना तिथे नर्स म्हणून जॉईन झाल्या होत्या. दोघी पण पहाडी मुली. परंतु माझ्यावर त्यांचे फार प्रेम. तसेच कामात भरपूर उत्साह. सतत मला हे शिकवा , ते शिकवा म्हणून मागे लागणार. यातील भावना माझ्यासोबत फिरत्या दवाखान्यासाठी येणार होती. तर मुन्नी दीदी म्हणून, बऱ्याच वर्षांपासून आरोही सोबत काम करणारी, पेशंटच्या रजिस्ट्रेशनची जबाबदारी सांभाळणारी व स्टाफची व्यवस्थापक म्हणून काम पाहणारी बोल्ड स्त्री होती. एक त्रास देणारी नर्स पण होती. फार्मसी सांभाळणारा तरुण प्रदीप, रक्त तपासणी करणारे जगदीशदा , एक्स रे करणारे प्रकाशदा असे सारे माझ्या चांगल्या ओळखीचे झाले होते. आमची छान टीम जुळली होती. पुढचे ८ दिवस फिरत्या दवाखान्यामध्ये आम्ही सारे एकत्र काम आणि फुल दंगामस्ती करणार होतो.
No comments:
Post a Comment