Pages
Welcome...
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..
Labels
- Love (1)
- कविता (23)
- मीराची डायरी (17)
- ललित (32)
- संवाद (6)
- सुचेल ते.. (10)
- हिंदी कविता (3)
3/29/23
“वादळात चालताना तू माझा रे सांगाती..”
(पूर्व प्रसिद्धी चतुरंग, पुरवणी लोकसत्ता)
घरातून बाहेर पाय ठेवल्यापासून विविध ठिकाणी, विविध क्षेत्रांत पुरुषांचे इतके वाईट अनुभव येत राहतात, की कधीकधी मग सर्वांचीच भीती वाटू लागते, चांगुलपणावरचा विश्वास संपू लागतो. काम करण्याची उमेद मावळते. मन निराश होऊ लागते. अशावेळी प्रत्येकीच्याच आयुष्यात असे काही खास, जवळचे पुरुष वेगवेगळ्या रुपात असतात, की ज्यांच्यामुळे पुन्हा आत्मविश्वास येतो, स्वतःला रिचार्ज करण्याचे जणू ही उर्जाकेंद्रे असतात. थकून यांच्याकडे जावे, यांनी पाठीवर हात ठेवून बळ द्यावे आणि आपण पुन्हा झेप घ्यायला तयार व्हावे.
मुलीच्या आयुष्यातील सर्वात पहिला आणि सर्वात जवळचा पुरुष म्हणजे वडील.
माझ्या आयुष्याची सुरुवातीची वर्षे त्याच्याशी वाद घालण्यात, बंड करण्यात गेली. वाढत्या शाळकरी वयात मग त्यांचे वैज्ञानिक प्रयोग शिकवणे, नवीन गोष्टी शिकायला, प्रयोग करायला प्रोत्साहन देणे, यातून आपले वडील कुठेतरी इतर वडील लोकांपेक्षा वेगळे आहेत, हे जाणवले आणि थोडासा राग निवळला. वेगवेगळ्या गावी, विज्ञानप्रयोग प्रदर्शनांसाठी हौसेने ते घेऊन जायचे, कधी पुण्याला, कधी महाडला, कधी मुंबईला, लहानपणी त्या सर्वाचे फार अप्रूप वाटायचे. असेच दहावीमध्ये एकदा राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी पपा मला सोलापूरला घेऊन गेलेले आणि परीक्षा हॉलमध्ये जायच्या आधीच अचानक मला मासिक पाळी सुरु झाली. तेथील गलिच्छ स्वच्छतागृहातून मी तशीच रडत बाहेर आले, शरमेने हळू आवाजात पपांना सांगितले. असे काही त्यांना सांगण्याचा आयुष्यातील पहिलाच प्रसंग, मला वाटले, परीक्षा सोडून घरी जावे लागणार. तर पपा म्हणाले, “त्यात काय एवढे, हा घे कपडा,” आणि सहजपणे त्यांनी स्वच्छ पांढरा शुभ्र रुमाल खिशातून काढून दिला. धीर देऊन मला पुन्हा परीक्षाहॉलमध्ये पाठवले. इतकी छोटीशी गोष्ट, पण माझ्या हळव्या मनावर तो प्रसंग कायमचा उमटून गेला. “हा माणूस नेहमी खंबीरपणे पाठीशी उभा असेल आणि मला मुलगी म्हणून कधी कमीपणाने वागवणार नाही”, हे त्या वयातही अबोध मनात जाणवले.
घरामध्ये आई नोकरी करणारी असेल, तेव्हा बापाला कामाचा भार उचलावाच लागतो. अजूनही आपल्या so called modern जगातही, उच्चशिक्षित लोकांना पुरुषाने स्वयंपाक करणे कमीपणाचे वाटते. परंतु अगदी १९९०च्या काळापासून, माझे वडील घरातील सर्व जबादारी मोकळेपणाने उचलायचे. नेहमी आनंदी चेहऱ्याने कधी नाश्ता तर कधी भाजी बनवणारे पपा ‘पुरुषाने स्वयंपाक बनवण्यात’ कधीच कमीपणा मानत नाहीत. सुरुवातीला नातेवाईकांचे, कौटुंबिक मित्र-मैत्रिणींचे कितीतरी टोमणे झेलावे लागले की नवरा कसा काय स्वयंपाक बनवतो. पण लोकांसमोर पपांनी नेहमीच ठामपणे उत्तरे दिली की ‘माझी बायको जशी नोकरी करून माझ्याएवढीच कमावते, तर माझी पण जबाबदारी बनते, की मीही मोकळ्या वेळात घरची जबाबदारी उचलावी.’ अजूनही लोक बोलतात आणि अजूनही पपा त्याच सहजपणे उत्तर देतात. बारावीच्या परीक्षेच्या वेळी, मला अतिताणाने रडू यायचे, तेव्हाही त्यांनी प्रेमाने समजावले की परीक्षेतील यश हेच काही सर्वकाही नसते, जेवढे झेपेल तेवढेच कर. MBBS नंतर बंडखोरीतून केलेल्या, माझ्या आंतरजातीय प्रेमविवाहाला मोठ्या मनाने समजून घेऊन स्वीकारणारे पपा, काही वर्षांनी घटस्फोटानंतरही तितक्याच समजूतदारपणे माझ्या पाठीशी उभे राहिले. जगाचे टक्केटोणपे खात असताना, “तू काही काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत.” असे म्हणून त्यांनी नेहमीच मला मायेने सावरले. अनेकदा नातेवाईक, ओळखीचे लोक तगादा लावतात, की हिचे लग्न कधी करणार. मीही कधी लोकांच्या चौकशीने भांबावून जायचे, तेव्हा माझे पपा मात्र खंबीरपणे म्हणाले, “तू माझ्यासाठी मुलाप्रमाणेच आहेस. कधीच स्वतःला कमी समजू नकोस. तू समाजपयोगी काम करते आहेस, तेच आयुष्यात सर्वात महत्वाचे आहे. लग्न म्हणजे काही सर्वस्व नाही. तुला अनुरूप मुलगा मिळेल, तेव्हाच लग्न कर.” अशा या जगावेगळ्या वडिलांच्या पाठिंब्यामुळे आपोआपच मीही आत्मनिर्भर झाले, माझी निर्णयक्षमता सक्षम बनली, स्वतःवरचा गमावलेला विश्वास या माणसाने मला परत मिळवून दिला.
काही दिवसांपूर्वीच माझे ऑपरेशन झाले तर माझ्या खाण्यापिण्याची सारी जबाबदारी, न सांगता, पपांनी स्वतःवर घेतली. फळांचे जूस, भाज्यांचे सूप, सारेकाही खुशीने, नवीन नवीन प्रयोग करत माझ्याशी गप्पा मारून, माझे टेन्शन हलके करत, मला बरे करणे, हे त्यांचे कामच होऊन गेले. कोणी तब्येतीचे विचारले, तर मी अभिमानाने सांगते, “माझे पपा आहेत ना, ते माझी खाण्याची सर्व पथ्ये पाळतात, त्यामुळे लवकर बरी झाले मी.” लहानपणी पपांचा मार खाल्लेल्या मला त्यांचे हे बदलेले रूप पाहून आश्चर्य वाटत राहते. लहानपणी रागात बनलेल्या मनाच्या निरगाठी सैलावत जातात.
घरातील जबाबदारी घेण्यासोबतच, त्यांचे सामाजिक कामही चालूच असते. पूर्वी NSS सोबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत गावा-गावात काम करणारे माझे प्राध्यापक वडील मी जवळून पाहिले आहेत. त्याकाळात गावात स्वच्छता मोहीम राबवणारे, लोकांना उघड्यावर शौचास करण्याचे तोटे सांगून जनजागृती करणारे, प्रसंगी कॉलेजच्या मुलांना घेऊन, उघड्यावरची घाण स्वतः उचलून, विल्हेवाट लावणारे पपा, त्यांच्यासोबत मलाही अशा शिबिरांना घेऊन जायचे. कदाचित त्याचा परिणाम असेल, त्यामुळे मलाही आधीपासूनच गावात जाऊन लोकांसोबत काम करण्याची आवड निर्माण झाली. स्वयंपाक कधी शिकवला नाही, परंतु हातचलाखीच्या जादू शिकवून, स्टेजवर जाऊन माझ्याकडून त्या करवून घ्यायचे. आज मला जाणवते, माझ्या व्यक्तिमत्वातील कितीतरी गोष्टी या माणसाने माझ्याही नकळत घडवल्या आहेत. काही वर्षांपूर्वी माझ्या ‘मुलां’शी मैत्रीला विरोध असणारे पपा आता मात्र याबाबतीतही बदलले आहेत. उलट आजकाल माझ्या मित्रांसोबत त्यांच्याही छान गप्पा होतात. कधी चिकन बिर्याणी बनवून ते आम्हाला सर्वाना खाऊही घालतात. माझ्या कामाच्या ठिकाणी, छत्तीसगडमध्ये येऊन काम पाहणे, लोकांना भेटणे, हे सर्व त्यांना मनापासून आवडते.
मी प्रचंड स्त्रीवादी आहे, त्या दृष्टीने, माझ्या निर्णयक्षमतेवर विश्वास ठेवणारे, मला निवडीचे स्वातंत्र्य देणारे, मला वेगळ्या कामासाठी प्रोत्साहन देणारे आणि बाहेरच्या कामासोबत, घरातील जबाबदारीही उचलणारे माझे वडील मला स्त्रीवादीच वाटतात. अजूनही कधी “पपांनी स्वयंपाक बनवला” हे ऐकून माझ्या एखाद्या मित्राचा घास आश्चर्याने घशात अडकतो, तेव्हा मी अभिमानाने सांगते, “माझे पपा feminist आहेत.”
अनेकवेळा नोकरीमध्ये वाईट अनुभव आल्यामुळे, कामाच्या ठिकाणी लोकांच्या बाबतीत माझा दृष्टीकोन नकारात्मक झाला होता. सुरुवातीला कोणी कितीही चांगले वागले तरी काही दिवसांनी त्या माणसाचे खरे रूप बाहेर येते, असा गेल्या काही वर्षातील अनुभव. पुरुष तर आणखी जास्त भयंकर अनुभव देणारे. त्यामुळे सध्याच्या नवीन हॉस्पिटलमध्येही सुरुवातीला भुलून न जाता, डोळे उघडे ठेवून काम करण्याची माझी धडपड. नवीन जागी रुळण्याची काळजी, कामाचे टेन्शन, विविध तणाव. येथे भेटलेला बॉस. पहिल्यादिवशी त्यांना भेटले, तेव्हा वाटले नव्हते की या माणसाची फारशी काही मदत होईल. परंतु मग पुढच्याच काही महिन्यात लक्षात आले, की या माणसाची साथ-सोबत आहे प्रत्येक गोष्टीत. मग ती हॉस्पिटलमधील काही समस्या असो किंवा कधी वैतागाने, निराशेने माझे रडणे असो. कधी पळून जायचा प्रयत्न करावा, तर तो आहेच खंबीरपणे उभा, समस्येचे उत्तर घेऊन आणि “पळून जायचे नाही” हे ठामपणे सांगायला. यापूर्वीच्या कामामध्ये मी अनेकदा समस्यांना वैतागून पळालेली आहे. यावेळेस मात्र हा पाठीराखा आहे, समस्या सोडवायला. उलट जबाबदारी देऊन, मला समर्थ, परिपक्व होण्यास मदत करायला. माझ्या घटस्फोटाबद्दल त्याला माहित होते, परंतु त्या गोष्टीचा उच्चारही कधी त्याने माझ्यासमोर केला नाही किंवा मला अस्वस्थ वाटेल, असे खाजगी आयुष्याचे प्रश्न विचारले नाहीत. उलट मीच एकदा निराश झालेले पाहून त्याने समजावले, घटस्फोट वगैरेचा काही फरक पडत नसतो. इतके चांगले काम करते आहेस. मस्तपैकी खुशीने जग.” त्याच्या शब्दांनी, कामाच्या केलेल्या कौतुकाने आपोआपच मला बळ आले. त्या एकाच प्रसंगानंतर माझा घटस्फोट ही गोष्ट कधीच आमच्या बोलण्यात चुकनही आली नाही.
कामात एखादी नवीन कल्पना सुचली की त्याला सांगायचा अवकाश, त्याने ती कल्पना प्रत्यक्षात राबवायला प्रोत्साहन द्यावे. वस्तुस्थितीची जाणीव करून देऊन, नियोजन करायला शिकवावे. कधी ताण-तणावाने मी रडकुंडीला आले, तर त्याने नवीन काहीतरी लिखाण-वाचन सुचवावे. आपोआपच त्याच्यामुळे मी लिखाणाकडे वळले. माझे लिखाण नवीन जोमाने सुरु झाले, छंदाचे रुपांतर जबाबदार, शिस्तशीर लिखाणात झाले. एका साप्ताहिकात मी नियमित स्तंभ लिहू लागले. त्याचे हे पाठबळ फक्त माझ्यसाठीच नाही, तर सर्वच डॉक्टरांसाठी होते. तो सर्वांसाठीच होता, तरीही गर्दीत तो प्रत्येकाला आपला जवळचा मित्र वाटावा, असा त्याचा सर्वाना सामावून घेणारा स्वभाव. त्याच्या मनाचा मोठेपणा पाहून, स्वतःच्या कोतेपणाची लाज वाटावी. कधी कोणाशी भांडण झाल्यावर त्याने समजवावे, की मन मोठे करावे म्हणून. स्त्रीला आदर कसा द्यावा, हे तर त्याच्याकडूनच शिकावे. त्याच्या बायकोला, बाळाला नेहमीच प्रेमाच्या पंखाखाली सांभाळणारा तो. माझ्यासारख्या एकट्या मुलींना अशा भागात राहताना किती समस्या येतात, हे समजून घेऊन नेहमी मदतीसाठी तो तत्पर. आमच्या मैत्रीत किंवा कधीही कुठल्या मुलीशी बोलताना त्याची नजर ढळली नाही, उलट तो इतका उमदा, हसतमुख की मुलीची नजर त्याला लागावी. कधीही बोलायला त्याच्या घरी जावे आणि कितीही व्यस्त दिनक्रमातूनही, थकलेले असतानाही त्याने निवांत गप्पा माराव्यात. त्याच्याशी बोलले की मनावरचा भार हलका होऊन जावा. घर सोडून, छत्तीसगडमध्ये येताना, नेहमीच ‘तो’ आहे म्हणून इतक्या दूरवरही अतीव विश्वासाने येता यावे. असा ‘तो’ माझा मित्र, माझे प्रेरणास्थान, माझा मार्गदर्शक, माझा पाठीराखा. इतके विश्वासाचे नाते. दोन्ही बाजुनी खूप नाजूकपणे, आदराने जपलेले.
असा हा जगावेगळा बॉस. मोठ्या हुद्द्यावर असणारा, परंतु पाय मात्र जमिनीवरच असलेला. आजूबाजूला इतकी खुजी माणसे पाहते, जी थोडीफार सत्ता मिळताच, गुर्मीत वागतात, अधिकारपदाचा माज दाखवतात, जवळचे असले तरी वागणे बोलणे बदलते. छोट्या कामासाठीही मग आडकाठी लावून धरतात, नमस्कार चमत्कार करवून घेतात. परंतु हा मात्र वेगळ्याच मातीचा बनलेला माणूस, माणुसकी जपणारा, प्रामाणिक, व्यवहारात शिस्त, मात्र कुठेही विनाकारण कठोरपणा नाही, चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य, सोबतच्या अधिकाऱ्यापासून गावातील आदिवासी मनुष्यासोबही तितक्याच संवेदनशीलतेने, आपुलकीने बोलेल. स्वतःच्या वागण्यातूनच लोकांसमोर वेगळे उदाहरण ठेवणारा अधिकारी. त्याच्याशी कितीही मतभिन्नता झाली, राग आला तरी तो लगेच निवळायचा, कारण अनुभवाने कळून चुकले होते, की तो जे करतो, ते सर्वांच्या हिताचा विचार करूनच करतो. माझ्या चुका झाल्या, तेव्हा त्यांच्या शिस्तीने मला शिक्षाही मिळाली. पण मग नंतर मोठ्या मनाने त्यांनी ते माफही केले. त्यांच्याकडून कितीही गोष्टी शिकले, तरी कमीच आहे. कधी प्रवासात समस्या यावी, अनोळखी प्रदेशात भीती वाटावी आणि त्यांना फोन करताच त्यांनी काळजीने, तातडीने मदत करावी. मला गावातील स्त्रियांसाठी काम करायला आवडते, हे पाहून त्यांनी मला ‘कुटरु’ या खेड्यात कामासाठी पाठवले आणि येथील स्त्रियांशी, लोकांशी माझे विश्वासाचे नाते जुळले. कुटरुमधील पंचशील आश्रमात त्यांनी जायचा सल्ला दिला आणि या अनाथालयात मला नेहमीच मुलींचे प्रेम मिळाले. अजूनही कामाचा ताण येतो, तेव्हा श्रमपरिहारासाठी मी कुटरुला धाव घेते.
असा हा दयाळू मनाचा, दुर्मिळ अधिकारी. ३१ डिसेंबरला, स्वतःच्या हाताने मटणाची स्पेशल डिश बनवून सर्व आम्हा सर्व डॉक्टरांना प्रेमाने खाऊ घालणारा. रात्री १२ वाजता, स्वतः प्रत्येकाच्या हातात फटाके, फुलबाजे, बाण नेऊन उडवायला सांगणारा. जिथे जिथे तो जाईल, तिथे तिथे आनंद वाटणारा. मी पाहत राहते आश्चर्याने आणि त्याच्या छत्राखाली सुरक्षित, आनंदी आयुष्य अनुभवत राहते विश्वासाने. तो दूर जाताना डोळ्यातून पाण्याच्या धारा लागलेल्या. असे वाटले, माझी आयुष्याची दिशा हरवेल आता. पण कधीतरी मला तो आधार सोडावाच लागणार होता. स्वतःचा रस्ता स्वतःलाच शोधावा लागतो शेवटी. असे वाटते, त्याच्यासारखे बनता यावे. शेवटी त्याला हक्काने सांगता यावे,
“वादळात चालताना तू माझा रे सांगाती..”
Subscribe to:
Post Comments (Atom)
nice
ReplyDeletethank you !
DeleteNice words
ReplyDelete