Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..

4/9/23

प्रश्न बनून राहिलेल्या मुली

(पूर्वप्रसिद्धी साप्ताहिक साधना) तीन प्रश्न भेटले आहेत आत्तापर्यंत निरागस हास्य चेहऱ्यावर लेवून. एक – सप्टेंबर २०१६ उत्तराखंडमध्ये मी ‘आरोही’ या समाजसेवी संस्थेमध्ये काही दिवसांकरिता स्त्रीरोगतज्ञ म्हणून काम करण्याकरिता गेले होते. उत्तराखंडच्या, नैनिताल जिल्ह्यातील कुमाऊ भागात पहाडी गावांत, फिरत्या दवाखान्यातर्फे गर्भवती महिलांची तपासणी व उपचार करणे, नंतरच्या काळात तेथील दाईना बाळंतपणाचे प्रशिक्षण देणे, अशी जबाबदारी माझ्यावर होती. शेवटचे दहा दिवस मेडिकल ट्रेक होता. आम्ही चार डॉक्टर्स, चार स्वयंसेवक, एक फोटोग्राफर व आमचे लीडर पंकज सर, जे वर्षातून दोन वेळा स्व-खर्चाने हा ट्रेक आयोजित करतात, अशी आमची टीम जमली होती. बालेश्वर या गावापासून आणखी पुढे जाऊन एका पहाडावरील रिसोर्टमधे आम्ही पहिल्या रात्री मुक्काम केला. रोज सकाळी सातलाच ट्रेक सुरु करायचा, अकरापर्यंत गावात पोहचायचे, तिथे कॅम्प लावून रुग्ण तपासणी करायची. छोटे गाव असेल तर जेवून आणखी पुढच्या गावी जाऊन तिथे पुन्हा कॅम्प लावायचा व मग मुक्कामाच्या ठिकाणी जायचे असा दिनक्रम होता. कधी गाव खूप दूरवर असले तर मग एकाच गावी जाणे होयचे. कधी गावातील शाळेत सर्व वयोगटातील मुला-मुलींच्या आरोग्यतपासणीसाठी जायचो. आम्ही डॉक्टर्स आरोग्य तपासणी करत असताना, बाकी स्वयंसेवक मुलांसाठी चित्रकला, वेगवेगळे खेळ असे प्रकार घ्यायचे. खूप मजा यायची आणि ट्रेकिंगने थकायलाही होऊन जायचे. रात्री थकून भागून मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायचो. पहाड चढताना प्रत्येकाची चालण्याची गती वेगवेगळी असायची. कोणी वेगाने जायचे, तर कोणी संथ. माझा हा पहिलाच हिमालयीन ट्रेक असल्याने आणि इतक्या उंचीवरच्या ट्रेकिंगची सवय नसल्याने मी सर्वात मागे असायचे. अशीच एकेदिवशी शाळेतील तपासणीनंतर मी एकटीच पहाड उतरणीच्या रस्त्याला लागले होते. शाळा सुटली होती. सर्व पोरे पोरीही त्याच रस्त्याने निघाले होते. पहाड उतरून गेले की त्यांचे गाव होते. आमचाही मुक्काम तिथेच होता. त्यातील एक चुणचुणीत, आठ वर्षांची पोट्टी माझ्यासोबत चालू लागली. आमची मग दोस्ती झाली. मी दमले आहे, हे लक्षात येऊन ती व तिच्या आणखी इटुकल्या मैत्रिणी माझी पाठीवरची bag मागू लागल्या. “दीदी, bag हमे देदो, आप थक जाओगे.” मला हसू आले आणि कौतुक पण वाटले त्यांच्या काळजीचे. खाली उतरून गेल्यावर अक्रोडाची दोन-तीन मोठी झाडे लागली. सर्व पोरे-पोरी अक्रोड वेचू लागले. शोधून, दगडाने फोडून खाऊ लागले. माझी छोटी मैत्रीणही त्यात सामील झाली. मी उभी राहून कौतुकाने ते पाहत होते. तर ती पोरगी सारे अक्रोड गोळा करून मलाच आणून देऊ लागली. मी नको म्हणतेय तरी जबरदस्तीने माझ्या bag मध्ये टाकू लागली. बाकीच्या पोरांनाही मग मला अक्रोड द्यायला म्हणून रागावू लागली. अशारितीने भरपूर सारे अक्रोड गोळा झाले माझ्याकडे. मग आम्ही दोघी परत रस्त्याला लागलो. तिचे घर लागले, तसे मी तिला म्हटले, “तू दप्तर ठेऊन ये. आपण फिरायला जाऊ.” मीही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचले. थंड पाण्याने आंघोळ करून ताजीतवानी झाले. तेवढ्यात ती आलीच मला शोधत. मग आम्ही दोघीही गावात फेरफटका मारायला गेलो. एक लहानसे दुकान दिसले. तिच्या प्रेमाखातर मला तिला काहीतरी देऊ वाटत होते. त्या दुकानातून टूथपेस्ट, ब्रश, तेल, कंगवा, साबण अशा तिला रोज लागणाऱ्या वस्तू, काही बिस्किटे, थोडे चॉकलेट असे सामान तिला घेऊन दिले. ती खुश दिसली. मलाही तिचा आनंद पाहून समाधान वाटले. मग तिला मी घरी सोडवायला गेले. तिच्या घरात काही अक्रोड होते, तिला तेही मला द्यायची इच्छा होती, म्हणून ती पळत घरात शिरली. मी बाहेरच अंगणात थांबले. ती अक्रोड घेऊन बाहेर आली. तिच्यामागे आणखी लहान लहान मुले आली. तिचे अक्रोड माझ्या bag मधे ठेवत मी तिला विचारले, “कोण कोण आहे तुझ्या घरी ?” तेव्हा कळले, ती सर्वात मोठी मुलगी घरातील. तिला २ छोट्या बहिणी आणि २ छोटे भाऊ. असे ते पाच लोक. तिच्या मागे दूरवर उभे राहून, फाटक्या कपड्यातले ते बहिण भाऊ माझ्याकडे कौतुकाने पाहत होते. मी दिलेल्या सामानाची पिशवी घेऊन ती हसतच तिच्या भावंडाकडे गेली. त्या पिशवीत मात्र एकच ब्रश, एकच साबण होता. ते तिला स्वतःला तरी किती दिवस पुरणार होते ? तेथून परत येताना, त्या फाटक्या कपड्यातल्या भावंडांचे दृश्य माझ्या डोळ्यासमोरून हटत नव्हते. तेव्हा मला माझ्या त्या मुलीला त्या वस्तू घेऊन देण्यातील क्षणभंगुरता लक्षात आली. त्या रात्री, त्या पहाडी गावामध्ये, मी डायरीत लिहित राहिले, “पहाडातील या सर्वात दुर्लक्षित राहिलेल्या मुलीसाठी काय करू शकते मी ? दर वर्षी इथे असेच ट्रेकिंग करत यावे की सर्व सोडून कायमचे येऊन रहावे इथे ? की वर्षातील एक महिना नित्य नेमाने इथे येत जाऊन काहीतरी काम करावे या मुलींसाठी ? काय करू शकते मी या मुलीसाठी ?” हसऱ्या चेहऱ्याने मला निरोप देणारी ती अक्रोडवाली मुलगी कायमची प्रश्न बनून रुतून बसली आहे माझ्या मनात आणि आठवत राहते दररोज. दोन - फेब्रुवारी २०१८ पुणे रेल्वे स्टेशनवर मी वैतागून उभी होते. उद्यान एक्स्प्रेसची पावणे अकराची वेळ होती आणि ट्रेन दोन तास उशिराने येणार होती. त्या दोन तासात दमायला झाले वाट बघून. शेवटी एकदाची एक वाजता ट्रेन येण्याची सूचना आली व bag घेऊन मी फलाटावर उभी राहिले रूळाकडे डोळे लावून. एक भिकारीण, तिच्या दोन-तीन पोरा-टोरांसोबत भीक मागत माझ्यासमोर आली. भिकाऱ्यांना भीक द्यावी की नको या प्रश्नावर मनात खूप काथ्याकुट करूनही अजून त्याचे निश्चित उत्तर मला सापडलेले नाही. त्यामुळे ते काम मी मूडवर सोपवते. पोरे असलेली बाई, म्हणून त्या बाईच्या हातावर काही पैसे टेकवले. ती पुढे निघून गेली. पण तिच्या सोबतची फाटक्या मळक्या कपड्यातील पोर माझ्यासमोरच थांबली. “मुझे भी दो.” ट्रेन येण्याकडे लक्ष असणाऱ्या माझी चिडचिड झाली, “आगे जाव.” मी रागाने तिच्याकडे पाहत बोलले. तिने हट्टाने मान मुरडून, “उंहू” केले. ती सहा-सात वर्षे वयाची शेंबडी पोर पाहून मी विरघळले. मनात विचार आला, माझा भाचा जेव्हा काही मागतो, तेव्हा मी लाडाने त्याला देते. ही सुधा तर छोटी पोरच आहे. इतक्या कोवळ्या जीवाला मी भिकारी या चष्म्यातून पाहून हिडीस फिडीस करणे योग्य आहे का ? मग सावकाशपणे मी पर्स उघडली. चिक्कीचे पुडे ठेवलेले होते, ते तिला देऊन टाकले. खुशीने ते घेऊन ती पुढे गेली. पाच मिनिटांनी मी पुन्हा तिच्याकडे पहिले. दूरवर गेलेली ती अजूनही तो पुडा दाताने उघडायचा प्रयत्न करत होती आणि दुरूनही माझ्याकडे पाहत होती. मी विचारात पडले. समाजात अशा स्टेशनवर फिरणाऱ्या, बालपण उपभोगण्याऐवजी भिक मागत फिरणाऱ्या या मुलींप्रती माझी काय जबाबदारी आहे ? मीही हिच्या या परिस्थितीला, हिच्या ‘भिकारी असण्याला’ समाजाचा एक भाग म्हणून काही अंशी तरी नक्कीच जबाबदार आहे. हिच्यासाठी मी काय करू शकते ? असा हा रेल्वे फलाटावर भेटलेला शेंबडा आणि हट्टी प्रश्न. त्याला हुसकावले तरी ‘उंहू’ करत बसून राहतो मानगुटीवर. तीन. कुटरु अनाथालय. मार्च, २०१८. छत्तीसगड. बिजापूर जिल्हा. भैरमगड प्रभाग. कुटरु खेडे. त्यातील पंचशील नावाचा अनाथाश्रम. दहा एक वर्षांपूर्वी झालेल्या नक्षलवाद्यानविरुद्ध आदिवासींनी केलेल्या सशस्त्र लढ्यामध्ये मारल्या गेलेल्या आदिवासींच्या अनाथ मुला-मुलींसाठी ‘मधुकर राव’ या आदिवासी नेत्याने बनवलेला हा आश्रम. रविवारी या गावात मी तेथील रूग्णालयामधे गर्भवती महिलांच्या तपासणीसाठी गेले की मुलींच्या आश्रमात चक्कर होतेच. अधीक्षकांची विनवणी असते की तेथूनच काही अंतरावर असलेल्या मुलांच्या आश्रमालाही भेट द्या. पण मुलींकडून पायच निघत नाही आणि अजून मी मुलांच्या आश्रमाकडे फिरकलेही नाही. माझा मुंबईवरून मित्र आला होता मकरंद दीक्षित, त्याने माझ्या या मुलींना ओरिगामी शिकवले. दोनवेळा कुटरुला गेला, दोन्ही वेळी मुलींच्याच आश्रमात. मुलांकडे नाहीच. मुली जीवच लावतात तितका. मधे महिनाभर रजा घेऊन काही कामानिमित्त मी महाराष्ट्रात, गुजारतमधे गेलेले. परत आल्यावर बिजापुरच्या जिल्हा रुग्णालयातच व्यस्त. त्यामुळे सलग दीड महिना जाणेच झाले नाही आश्रमात मुलींकडे. परवा होळी झाली, सारेजण रंग खेळले. मी मात्र चिंताग्रस्त. डोक्यात नुसती चिंता, तणाव. खेळूच वाटले नाहीत रंग. आपल्याला कोणीच नाही अशा एकटेपणाच्या विचित्र जाणीवेने पुरे घेरून टाकले होते. यावर्षीची होळी बिनारंगांची गेली म्हणून अजून नाराजी. मुलींची आठवण आली म्हणून मधुकर रावांना फोन केला की मी या रविवारी येते तिकडे म्हणून. आज गेले तर मुली खुशीने धावतच आल्या. येऊन, प्रणाम म्हणत वाकून पायाला नमस्कार. मी नको नको म्हणेपर्यत वाकल्यासुधा. बाकीच्यांना म्हटले, “झुको मत. गले लगो.” मग गळाभेट झाली. पाहिले तर मी येणार म्हणून मुलींनी आज पुन्हा एकदा रंग खेळायची पूर्ण तयारी करून ठेवलेली. कपाळावर ‘टीका’ लावायला ताटात रंग काढलेले, पाण्याने बादल्या भरून ठेवलेल्या. “आज दीदी के साथ रंग खेलना है” म्हणत कोणी अंघोळी पण नव्हत्या केलेल्या. मी आश्चर्याने सर्दच ! मनात रिकाम्या हाताने आल्याची खंत, गडबडीत मिठाई आणायची विसरूनच गेलेले. मग मुलींना, त्याच्या तरुण उत्साही शिक्षिकांना हळूहळू शांत केले. म्हटले, अजून दोन दिवसांनी रंगपंचमी येते आहे, तेव्हा मी रुग्णालयाचे काम संपवून दुपारी येईन, आपण मिठाई खाऊ, कोल्ड्रिंक पिऊ, मग रंग खेळू, मस्त गाणे लावून साऱ्याजणी नाचूया रात्र होईपर्यंत. रात्री मी इथेच राहीन. पकोडे करू रात्री. असा सर्व कार्यक्रम ठरवला, तेव्हा कुठे मग सारे शांत झाले. माझे मन आनंदाने भरून आले. हे वर्ष अंगाला रंग लागला नाही, म्हणून खंतावले होते मी. पण या वेड्या मुलींनी माझी तीही हौस भागवली, या अनाथ मुली मुक्त हस्ताने प्रेम देताहेत मला. त्यांचा रंग खेळून झालाय परवाच, पण माझ्यासाठी मधुकर राव पुन्हा एकदा परवानगी देत आहेत मुलींना रंग खेळायला. खूप कृतज्ञ वाटले मधुकर राव आणि या मुलींप्रती. बाहेर ऊन असल्याने आम्ही हॉलमधेच मोठ्ठे रिंगण करून बसलो होतो. परीक्षा चालू असल्याने १०-१२ वीच्या मोठ्या मुली अभ्यास करत होत्या. आम्ही बाकी सारे मग बैठे खेळ खेळलो. खेळताना नियम मोडले जात होते, चीटिंग चालू होती आणि मला गम्मत वाटत होती, त्यांच्यासोबत पुन्हा लहान होण्याची. एक सात वर्षाची मुलगी पळायला उठली आणि तिचा एका बाजूचा पूर्ण फाटलेला फ्रॉक मला दिसला. मनात कुठेतरी हलले. त्यांना खेळण्यात सोडून मी उठून त्यांच्या शिक्षिकेकडे गेले, किती कपडे मिळतात, कोण देते वगैरे. “बच्चे है, तो खेलते खेलते, फट जाते है कपडे.” बरोबरच होते ते. त्या चिमुकल्या अनाथ मुलींना कसे कळावे की मिळणारे अपुरे कपडे नीट जपून वापरावेत म्हणून. मनात आले, होळीनिमित्त त्या सर्वाना कपडे घेऊन द्यावेत. पुन्हा मनात तोच विचार, तू घेऊन दिलेला एक एक कपडा किती दिवस पुरणार आहे त्यांना ? येताना त्यांना विचारले, “कौनसी मिठाई लावू ?” एकीने हक्काने सांगितले, “दीदी, गुलाब जामून लावो, मुझे बहोत पसंद है.” म्हटले, “ठीक है.” सर्वांचा निरोप घेऊन बिजापुरला जायला परत निघते मी, मनात रंगपंचमीचा कार्यक्रम आखत. त्यातील एक नऊ वर्षाची मुलगी मला फार आवडते, सरिता. नेहमी मी गेले की पाणी आणून देणे, मला सर्व फिरवून दाखवणे, फोटो काढणे, अशी कामे करणारी चुणचुणीत मुलगी, शांत समंजस. मनात येते, मी हिला दत्तक घेऊ शकते का ? पण हिला इथून, तिच्या जन्म स्थळापासून दूर महाराष्ट्रात नेणे योग्य होईल का ? मी तिला खरीखुरी माया देऊ शकेन का ? की नाहीतर मीच कायमसाठी राहून जावे इथे कुटरुमधे या मुलींसोबत. पण मी इतकी समर्थ आहे का, इतका मोठा निर्णय निभवायला? डोक्यात नुसते प्रश्न. मुलींचे मिळणारे भरभरून प्रेम, माझ्या एकटेपणाला पळवून लावणारे. साऱ्या जगावर नाराज होऊन अंगाला रंग न लावून घेणारी मी त्यांच्या प्रेमाच्या रंगात अंतर्बाह्य रंगून जाते नकळतपणे. अजूनही मी फक्त घेतच आहे त्यांच्याकडून. ते त्यांना परत कशी देऊ ? या सर्वाची परतफेड कशी करायची ? त्यांच्यासाठी मी काय करू शकते ? हा तिसरा प्रश्न.

1 comment: