पुन्हा सारं काही समजू घेऊ पाहते आहे नव्यानं.. " आयुष्य सुंदर असतं " यावर विश्वास ठेऊ पाहते आहे पुन्हा एकदा.. एखादी छोटीशी जरी तिरीप आली उजेडाची तरी घट्ट धरून ठेवते आहे तिला, उद्याच्या प्रकाशाची आण घालत.. पुन्हा एकदा स्वत:कडे नव्याने पाहते आहे, स्वत:ला समजून घेते आहे आणि हळूहळू स्वीकारू पाहते आहे स्वत:ला सर्व खाणाखुणांसकट, चुकांसकट, दोषांसकट आणि हो, नव्यानेच जाणवलेल्या चांगुलपणासकट.. आणि प्रयत्नही चालूच आहेत स्वत:वर प्रेम करण्याचे..
सगळंच शिकावं लागतेय रे पुन्हा एकदा.. एखाद्या खोल गर्तेतून सुदैवानं जिवंत बाहेर यावं, पण सर्वच हरवून जावं, विसरून जावं तसं काहीसं झालं आहे.
आता पुन्हा अस्तित्वाचे सारे उरलेसुरले अवशेष गोळा करून स्वत:ला घडवायचंय.. काही तुकडे घासूनपुसून घ्यायचे तर काही तसेच...त्यातूनच नवीन घडेल काहीतरी..
सगळंच शिकतेय नव्यानं.. म्हणजे अगदी सकाळी जाग आल्यावर बेडवरून खाली उतरताना स्वत:च्या पायांवर भार द्यायचा, मग हळूहळू खोल श्वास घेत , थंड फरशीचा स्पर्श अनुभवत पावलं टाकायची.. इथपासून ते भरकटणाऱ्या मनाला रट्टे देऊन ताळ्यावर आणायचं इथपर्यंत..!
आणि मग शेवटची आणि अवघड गोष्ट म्हणजे ' तुझ्या विचारांत न हरवणं '.. तसे तुझे विचार हक्कानं ठाण मांडूनच बसलेले असतात.. त्यांना हाकलून द्यायचं म्हणजे जिवावर येतं पण करायलाच हवं ना..?? तुझ्या आठवणींचा कापूस पिंजून पिंजून ढीग पडतो. मग त्यांच्या वाती वळून मी पेटवून ठेवते त्यांना माझ्या हृदयाच्या खोबणीत.. जळत राहतात बिच्चाऱ्या रात्रनदिवस आणि मीही त्यांच्यासोबत..
मग कधी मोकळ्या रस्त्यावर गाडी सुसाट पळवावी वाटते, खूप जोराचा वारा तोंडावर घ्यावा, कधी पाउस असला कि त्या सरींमध्ये चिंब भिजावं आणि अशा बेभान क्षणी तरी तुला विसरून जाऊन तुझ्याशिवाय जगावं असं फार फार वाटतं रे... पण शेवटी माझे सारेच प्रयत्न असफल होतात तुझ्या चिवट आठवणींपुढे...
मग कधी आशा पल्लवित होते. तुला पण येत असेल का चुकून माझी आठवण..? तुझ्या कट्टर निर्धाराची नजर चुकवून एखादा हळवा क्षण घेऊन येतो का रे तुझ्या मनात कधी माझी आठवण..? किंवा चुकूनच कधीतरी, एखाद्या भाववेड्या सायंकाळी तू तुझे सारेच क्षण उधळून टाकतोस कारे माझ्यासाठी..?
बघ पुन्हा चुकले, पुन्हा तुझ्यामध्ये वाहवत गेले... तुझ्याशिवाय विचार करायलाही शिकावंच लागेल नव्यानं..!!