Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..

4/6/15

मी आणि बाईपण

सोमवारचा दिवस. OPD मध्ये भरपूर गर्दी. म्हणजे काम करायचा थकवा येत नाही. पण मी केबिनमध्ये समोर एक रुग्ण तपासत असताना बाहेरील गर्दी, ताटकळत उभे असणारे रुग्ण, त्यातले काही आजारामुळे थकलेले, कोण ताप असलेले, कोणाचे दूरचे गाव म्हणून त्यांची घाई या सगळ्याच्या चिंतेने मी थोडी भांबावून जाते. समोरच्याला वेळ तर द्यायचाच असतो आणि डोक्यात बाहेर असलेल्यांची चिंता. मग मी मन शांत ठेवून कामावर focus करते. तर आज असेच चालू होते. कामे थोडी नियंत्रणात आली होती. कामाच्या सुलभतेसाठी आणि रुग्णांना सोयीस्कर व विनासंकोच बोलता यावे म्हणून आम्ही स्त्री पुरुष रुग्ण वाटून घेतो. माझा सहकारी वैभव पुरुष रुग्ण तर मी व डॉ. मृणाल स्त्री रुग्ण असे करतो. पाळीच्या तक्रारी व गरोदर स्त्रियांची तपासणी डॉ. राणी बंग, ज्यांना आम्ही प्रेमाने “अम्मा” म्हणतो त्या पाहतात. तर विशेष तज्ञ म्हणून डॉ. योगेश गंभीर रुग्ण पाहतात.
मग एक ४५ वर्षाची रुग्ण आली. तिच्या तक्रारी सांगणे सुरु झाले. पहिले तर तिचे गुडघे आणि मांड्या खूपच दुखत आहेत अशी तक्रार. इतके की ती त्या दुखण्याने रडकुंडीला आलेली. मग बाकीचा त्रास की सगळेच सांधे दुखताहेत, सूज येते, पूर्ण अंग सुजते इत्यादी. तिला तपासताना माझे तिच्या चेहर्याकडेही लक्ष होते. तिच्या अंगावर तर कुठेच सूज नव्हती. पण ती मात्र दुखण्याला वैतागलेली दिसत होती. पण तिचा चेहरा काही वेगळेच सांगत होता. घासून पुसून लक्ख केल्यासारखा व चेहऱ्यावर एकही आठी न पडण्याची काळजी घेत ती बोलत होती. अनुभवावरून आम्हाला लक्षात येते की असे रुग्ण काहीतरी लपवू पाहत असतात. एकदम नवीन ठिकाणी, नवीन डॉक्टर समोर रडू फुटू नये याची काळजी घेत असतात. आम्हाला उपचार करण्यासाठी समोरच्या व्यक्तीचा खरा त्रास समजून तर घ्यायचा असतोच. नाहीतर मी ते समजून न घेता नुसत्याच दुखण्याच्या गोळ्या खरडल्या आणि तिला पाठवून दिले तर माझे डॉक्टर असणे निरुपयोगी आहे असे मी मानते.
तिला तपासता तपासता मी तिच्याशी बोलत राहिले. तिला थोडा विश्वास वाटतोय असे दिसताच तिला विचारले, “कसली चिंता आहे तुम्हाला ? नक्की काय होतेय ?”
ती तिथेच रडू लागली. कोंडलेले अश्रू बाहेर पडले.
“ काय सांगू ताई तुला. नवरा सोडतच नाही. एक दिवस पण त्याला जमत नाही जवळ आल्याशिवाय. पोटच्या पोरी लग्नाला आल्या तरी हा माणूस रोज ओरबाडतो. तंगड्या वर करून झोपावं लागतं रोज, त्यानी गुडघे नी मांड्या भरून येतात. या वयात खूप त्रास होतो, कळा येतात.
रोज तो दारू पिऊन येतो आणि माझ्या मागे लागतो. त्याला नाही म्हटलं तर तुझं बाहेर काय आहे, कोणासोबत आहे म्हणून म्हणून शिव्या घालतो आणि मारतो.”
मी सुन्न. तिच्याकडे पाहत राहण्याशिवाय काही करू शकत नव्हते.
“तू भांडत का नाहीस? मार का खाते ?” माझा साळसूद प्रश्न.
“ खूप शक्ती आहे त्याच्या अंगात. नाही चालत माझा जोर. Delivery नंतर फक्त ४ दिवस सोडला त्याने. पोरी तान्ह्या असतानाच सुरु. MC मध्ये पण नाही सोडायचा. आता त्याला देवाची भीती घालते म्हणून तेवढे चार दिवस तरी सुटका होते. नाहीतर गावाला पण नाही जाऊ देत. कारण मग त्याला ते कसं मिळणार.
आजूबाजूच्या बाया म्हणतात किती खराब झालीये तुझी तब्येत. त्यांना काय सांगणार.
ताई, असं वाटतं, जेवणात काहीतरी कालवून द्यावं म्हणजे मरेल तरी एकदाचा. “
मी नुसतीच ऐकतेय. मन अस्वस्थ झालेलं.
“ तो दारू पिऊन येतो. त्याचा वास तरी कसा सहन करतेस गं तू ? आणि त्यात तो जवळ येणार काय होतं गं तुझ्या मनाचं ?”
यावर ती बिचारी तरी काय बोलणार ?
मी वेगळ्याच पेचात अडकले. एकवेळ तिला कसला आजार असता तर देऊ शकले असते त्याची औषधे. संधिवात असता तर त्याचे विशेष उपचार. पण तिची समस्या माझ्या आणि तिच्याही नियंत्रणा बाहेरची होती.
“ दवाखान्यात आण एकदा त्याला. आम्ही बोलू त्याला. दारू सोडवायची औषधे देऊ.”
पण मी बोलत असतानाच माझे शब्द किती फोल आहेत ते जाणवत होते मला.
दारू पिऊन मारझोड करणाऱ्या नवर्यांच्या गोष्टी सार्याच सांगतात. पण ही बाई इतकी व्यक्तिगत गोष्ट घडाघडा बोलून गेली आणि मी विचारत पडले.
दीपिकाच्या video वरून चाललेला वाद आठवला. त्यातील pre-marital sex आणि extra-marital sex मध्येच लोक इतके अडकून पडले की मूळ उद्देश बाजूलाच राहिला.
स्त्रीच्या शरीरावर फक्त तिचाच हक्क असावा आणि संबंध ठेवावे की नाही हे तिला ठरवता यावे हे का नाही होत प्रत्यक्षात ? लग्न झालेल्या जोडप्यात नवर्याने स्त्रीच्या संमतीशिवाय केलेला संभोग हा बलात्कार च ठरतो. तो नाकारण्याचा अधिकार याबद्दल नाहीच कोणी बोलत. स्त्री ने लग्न आधी कुमारिका असावे यावर बोलण्यात आपली इतकी शक्ती खर्ची होते की स्त्रीच्या मनावर व शरीरावर चालणारे असंख्य प्रकारचे बलात्कार आपण सोयीस्कररित्या नजरे आड करतो.
नजरेनी बलात्कार करणारे तर मी गिणतच नाहीये.
पण केवळ मंगळसूत्र गळ्यात बांधले म्हणून स्त्रीच्या शरीरावर पुरुषाचा हक्क प्रस्थापित झाला व तो हक्क तो कशाही रीतीने हवा तेव्हा तिच्या शरीराचा, मनाचा , तिच्या सन्मानाचा चुराडा करून तो वापरू शकतो हीच आहे ना आपली आदर्श लग्न व्यवस्था ?????????
किती तरी अशा स्त्रिया भेटतात मला रुग्ण म्हणून. गर्भपिशवी काढण्याचे ऑपरेशन झाल्यावर आम्ही त्यांना सूचना देतो की “बाई गं, ३ महिने नवऱ्यापासून दूर रहा, संबंध नको. तेव्हा ती म्हणते, “ ताई, तुम्हीच त्याला सांगा. ऐकतच नाही. आणि चांगले ६ महिने नाहीतर सरळ वर्ष १ वर्ष सांगा. तेवढीच माझी सुटका...!!”
खूप अस्वथ व्ह्यायला होतं मग. कळतच नाही याला मी काय उत्तर देऊ ?
त्यांचे प्रश्न मग माझे होऊन जातात. मी लग्नाळू मुलगी. मलाही ती भीती वाटू लागते मग की अशी परिस्थिती माझ्या सोबत घडली तर मी काय करणार ?
त्याही आधी मी घटस्पोटीत मुलगी असते. त्यामुळे फार प्रेमाच्या गप्पा करणारी मुले माझे divorcee status कळले की आपसूक दूर होतात. बायको तर virgin हवी.
ही सगळी भारतीय संस्कृती घेर धरून नाचते माझ्या अवती भोवती.
मी, माझे रुग्ण आम्ही लढतोय या सर्वांशी. मला हरायचं नाहीये. खूप strong रहायचं आहे. माझे सामर्थ्य माझ्या बायांना द्यायचं आहे आणि मी थकते तेव्हा त्यांच्याकडूनच मिळवायचं आहे या दांभिक समाजाविरुद्ध पुन्हा उभं रहायचं बळ.

13 comments:

 1. Replies
  1. हो...सुन्न होते मी एक स्त्री आणि डॉक्टर म्हणून सुद्धा.

   Delete
 2. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 3. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 4. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 5. You have placed mirror infront of us..

  ReplyDelete
 6. You have placed mirror in front of us. Did I see me reflected in it?

  ReplyDelete
 7. WOoops, something went wrong!! Sorry.

  ReplyDelete
 8. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 9. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 10. It is very complicated to understand the Indian culture regarding women.

  ReplyDelete
 11. Yeah..its very much complicated.,I m still struggling to understand it completely !!

  ReplyDelete