Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..

4/16/15

सुशीला आणि हृषीची कहाणी


ती सर्चच्या दवाखान्यात आली तेव्हा आमचे लक्ष तिच्यापेक्षा जास्त तिच्या हातातील मांसाच्या गोळ्याकडे होते.
नॉर्मली गर्भावस्थेचा काळ हा नऊ ते साडेनऊ महिन्यांचा राहतो.परंतु सुशीलालामात्र सातव्या कि आठव्या महिन्यातच कळा सुरू झाल्या. त्यावेळेस गावातील नर्स हजर नव्हती. गावातील दाई म्हातारपणाने थकलेली आणि गुडघेदुखीने हैराण झालेली . तिला निरोप देऊन सुशीलाचा नवरा हृषी बाळंतपणासाठी नर्सला शोधायला निघाला . पण इकडे सुशीलाच्या कळा वाढल्या आणि बिचारी संडासातच बाळंतीण झाली . हडकुळी सुशीला , तिचं कमी वजनाचे बाळ, बाळाची नाळ, वार सारंच कितीतरी वेळ रक्ताच्या थारोळ्यात तसंच पडलेलं.काही वेळाने MMV तिथे पोहोचली आणि सर्चच्या डॉ. भूषणने बाळाला उचलून स्वच्छ केले. दाई पण पोहोचली. MMV मधून आई व बाळ सर्च दवाखान्यात दाखल झाले . कमी दिवसांचे, कमी वजनाचे , दूध ओढू न शकणारे, तापमान कमी होत जाणारे ,त्यात संडासात जन्म
ले असल्याने जंतुसंसर्गाचा धोका या सर्व कारणांमुळे उपचारांना प्रतिसाद न देता बाळ दोन दिवसांत दगावले. त्यावेळेस बाळाचा बाप सोबत नव्हता . बाळाच्या अंत्यसंस्कारांसाठी आईला बाळाच्या मृतदेहासोबत अँम्बुलन्सने तिच्या 'कोंदावाही' या गावी पाठवायचे ठरले . पण मी व माझा सहकारी डॉ. वैभव आम्हांला चिंता होती की हिला पाठवतोय खरे , पण ही परत दवाखान्यात आलीच नाही तर ? कारण सुशीलाला ताप येऊ लागला होता व आम्हाला आता तिची काळजी वाटत होती . तसे आम्ही तिला समजावून सांगू लागलो की तिचे परत दवाखान्यात येणे कसे महत्त्वाचे आहे तेव्हा तीच स्वतःहून म्हणाली की "मला बरं वाटत नाहीये . मला औषधी हवी आहेत आणि म्हणून मी परत येणार आहे." एवढं सांगून ती तो लहानसा मांसाचा गोळा घेऊन गावी गेली .
इकडे आमची चर्चा चालायची की पहिल्या मुलीवर पुन्हा मुलगीच झाली म्हणून नवर्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले, तिच्यासोबत दवाखान्यात आला नाही. आता तरी तो तिला परत पाठवतोय की नाही शंकाच होती.
पण दुसऱ्या दिवशी मात्र सुशीला , तिचा नवरा हृषी, सोबत त्यांच्या चार वर्षाच्या बालीला घेऊन हजर झाले आणि त्यासोबतच आमचे 'सुशीला पर्व' सुरु झाले .
ती आली तेव्हा चालत आली पण हळूहळू तिची तब्येत ढासळत गेली. मला अजून आठवतं, ती आली तेव्हा तिला आमच्या मेन कॉरिडॉरमध्ये बसवून मी तिची हिस्ट्री घेत होते. तेव्हा तिला विचारलं , बाई गं, तुझं लग्न होऊन किती वर्षे झाली ? तर तिचं उत्तर की माझं लग्न झालेलं नाही. मी इकडे अवाक. म्हटलं , असं कसं, आधीची एक पोरगी, त्यात ही दुसरी आणि म्हणते की लग्न झालं नाही म्हणून..? आमचे हे संवाद ऐकून सिस्टर वर्षाताई माझ्या मदतीला धावल्या. "ताई, यांच्यात असंच असतं. बाई पुरूषाच्या घरात जाऊन राहते. त्यांना मुलंबाळं होतात; मग नंतर सावकाश ते लग्न करतात. तशी रूढीच आहे त्यांच्या समाजाने स्वीकारलेली."
येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक तिची तब्येत ढासळत गेली व चालत आलेली सुशीला कॉरिडॉरमधील त्याच बेडवर आडवी झाली. आमचे सिनिअर डॉ. योगेश यांना तिला बाळंतपणानंतर होणारा एक विशिष्ट प्रकारचा हृदयरोग झाल्याची शंका होती आणि ज्यामध्ये रूग्णाचे वाचण्याचे प्रमाण फार कमी असते. तरीही तिचे नेमके निदान होत नव्हते. ज्या काही सुविधा आमच्याकडे उपलब्ध आहेत , त्यामध्ये जास्तीत जास्त चांगले उपचार देण्याची योगेशदादांची धडपड चालली होती.
या सगळ्यात सुशीलाचा नवरा हृषी याचे मला फार कौतुक वाटायचे. सुशीलाची तो पूर्ण वेळ व्यवस्थितपणे काळजी घ्यायचा. कधी तो कंटाळलाय, चिडलाय किंवा त्रासून जाऊन तिच्याशी भांडतोय असं मी कधी त्याला पाहिलं नाही. केव्हाही मी त्याच्याशी बोलायला गेले की तो शांतपणे ऐकून घ्यायचा व समजून घ्यायचा. त्याचा आमच्यावर पूर्ण विश्वास होता. सुशीलावर सतत लक्ष ठेवणे आवश्यक असल्याने आम्ही तिला मेन कॉरिडॉरमध्येच ठेवलेले होते. तिथे चार बेड ठेवलेले आहेत. दोन बेड सिरिअस रूग्णांसाठी, ज्यांचे पडदे ओढून घेतले कि आमचे 'आय. सी. यू.' तयार होते. दुसरे दोन बेड तातडीच्या रूग्णांसाठी, जिथे आम्ही त्यांना तपासून व प्राथमिक उपचार करून नंतर वॉर्डमध्ये अथवा कुटीमध्ये हलवतो.
तर बरेच दिवस सुशीला त्याच बेडला खिळून होती. पलीकडच्या बेडवर हृषी व त्याची पोर दिवसरात्र पडून असायचे. सुशीलाच्या हृदयावर ताण पडू नये म्हणून तिला बेडवरून खाली उतरायची परवानगी नव्हती. त्यानुसार तिला शौचासाठी जागेवरच बेडपँन द्यायची सोय केली गेली. पण तीही हट्ट धरायची कि "मला संडासात जाऊ द्या. मी बेडपँन घेणार नाही ." पण तिच्या शरीरात मात्र थोडेही त्राण नसायचे. या गोंधळात मग तिची कपड्यांमध्येच घाण होऊन जायची. ते साफ करून तिचे कपडे बदलणं आमची मावशी व अर्थातच हृषीवर यायचं . वास येऊ नये म्हणून आम्ही पडदे ओढून दूर व्हायचो पण माझ्या नजरेसमोर बायकोचं
हगणं मुतणं साफ करणारा हृषी तरळत रहायचा.
सुशीलाचा आजार वाढत चालल्याने तिला वेगवेगळी औषधे लागायची. आदिवासी भागातील असल्याने तिला भरती व उपचार मोफत होते. परंतु औषधे आणावी लागत. त्यावरही ५०% सवलत मिळत असल्याने तशी महागडी औषधे कमी दरात उपलब्ध होतात. परंतु तो खर्चही त्यांच्यापरीने खूप जास्त असायचा. आजूबाजूच्या लोकांकडून मला समजायचं की हृषीकडील पैसे कधीच संपले होते. ओळखीच्या लोकांकडे मागून तो पैसे जमवत होता. प्रत्येक वेळी सकाळी औषधे लिहून त्याच्या हाती चिठ्ठी ठेवताना माझ्या छातीत धडधडायचं की आता याच्याकडे पैसे आहेत की नाहीत. तो मात्र खालमानेने ती चिठ्ठी घेऊन पसार व्हायचा आणि दुपारी
नर्सबाईकडे औषधे पोहोचती करायचा. एकदा मी त्याला पैशांबाबत विचारलं तेव्हा
त्याने सांगितले की त्या दोघांना त्यावर्षी तेंदूपत्त्याचे मिळालेले २५०० रूपये बँकेत होते ते त्याने काढून आणले होते. मीही काही करु शकत नव्हते कारण येणार्या प्रत्येकच रूग्णाचा खिसा फाटका, त्यामुळे
विचार तरी कुणाकुणाचा करणार..?
बरेच दिवस सुशीलाचा मुक्काम आमच्या दवाखान्यात पडल्याने हृषी चांगलाच रूळला होता. नवे रूग्ण आले की तो कुतुहलाने पहायचा. जमेल ती मदत करायचा. कधी मला आदिवासी भाषा समजली नाही कि दुभाषाचं काम करायचा. मीही त्याला मग उत्साही कार्यकर्त्याप्रमाणे कामे सांगायचे. नव्या बुजणार्या नातेवाईंकासोबत पेपर बनवायला पाठव तर कधी एखाद्या म्हातारीसाठी मेसमधून जेवण आणायला पाठव अशी कामे मी त्याला हक्काने सांगायची. मला तो आवडू लागला होता.त्याला 'हृषी' म्हणून हाक मारताना मला आशावादी आणि प्रसन्न वाटायचे. पैसे तो कसा कोठून घेऊन येतो हे जसे मला कोडे होते तसेच सुशीला इतकी गंभीर असताना हा जगण्याचे बळ आणि चेहर्यावरचे उमदे हसू कोठून मिळवतो हेही मला कोडेच होते. त्याच्या पोरीला घेऊन तो पूर्ण कँपसमध्ये फिरायचा. कधी मॉर्निंग वॉकला माझ्या वेळूबनसमोर दिसायचा. त्याचा चेहरा सदोदित निरागस व उत्साही दिसायचा. एकदा मला म्हणाला, " माझ्या पोरीचं पोट तपासा; बोंबली बाहेर येतेय तिची." पण ती पोट्टी मला पोटच दाखवेना. खदाखदा हसत सुटायची. मग आमचा रोजचा कार्यक्रम ठरून गेला. मी तिला म्हणायची, "तुझी बोंबली पाहू दे मला" आणि तिनं हसत पळत सुटायचं. हृषी आणि बाकीचे लोक मजा वाटून हसत रहायचे.
इकडे सुशीला हळूहळू आमच्या उपचारांनी बरी होत चालली होती. एक रात्र अशीही होती कि योगेशदादांना व मला वाटलं ही सकाळपर्यंत राहते कि नाही. पण ती तगली. मध्येच वेडसरपणा यायचा. पण आता बरीच सुधारली. उठून बसू लागली. खाऊ लागली. मग कुठुनतरी तिची आई उगवली. ती तिला धरून संडासात नेऊ लागली. आंघोळ घालू लागली. हृषी गावी जाऊन त्याच्या २-४ एकर शेतात धानकापणी करून आला. तिच्या बेडवरून आम्ही तिला साईडरूममध्ये हलवले. हिमोग्लोबिन कमी असल्याने तिला एक बाटली रक्त चढवले. मग गोळ्या - औषधे देऊन त्या कुटुंबाला घरी पाठवताना आम्ही समाधानी होतो.
परंतु काही दिवसांनी सुशीलाला घेऊन हृषी परत आला. यावेळेस मात्र तिची तब्येत अतिशय खालावलेली होती. चालण्याचेही तिच्यात त्राण शिल्लक नव्हते. वेडसरपणा वाढला होता. खाणं बंद होतं. हाताला सुई लावूच देत नव्हती. मग तिला सलाईन लावले की हृषीला मी तिथे बसवून ठेवायचे. हृषीने सांगितले कि तिने घरी कोणतीच औषधे खाल्ली नाहीत.गोळ्या दिल्या कि फेकून द्यायची. पुन्हा आमचे तिच्यावरचे उपचार सुरू झाले. पण कशालाच तिचा प्रतिसाद मिळत नव्हता. तिचे हिमोग्लोबिन पुन्हा प्रचंड कमी झालेले, अवघे साडेपाच ग्रँम. रक्त द्यावे तर तिला हृदयरोग असल्याने हृदयावर ताण यायची भिती.
यावेळेसही हृषी सारी कामे करत होता परंतु त्याच्या चेहर्यावरचा उमदेपणा जाऊन तिथे निराशा पसरली होती.सुशीला पासून तो दूर दूर रहायचा. मी गेले कि हाका मारून त्याला बोलवायचे पण वातावरणात विचित्र ताण भरून रहायचा. योगेशदादा, मी, वैभव आम्ही प्रयत्न करतच होतो पण फारशी आशा नव्हती. यावेळेस तिची पोरगीही हसत नव्हती. बोंबली दाखव म्हटलं कि निमूटपणे झोपून तिने मला तिचा पोटाचा हर्निया तपासू दिला.
मग शेवटी ती वेळ आली. एका संध्याकाळी प्रार्थनेला जात असता दवाखान्याची मावशी मला बोलवायला आली. मी गेले तर सुशीला पोटातील असह्य वेदनांनी तळमळत होती. पोट कडक झालेलं. तिच्या लक्षणांवरून तिच्या
आतड्याला भोक पडल्याची शक्यता वाटत होती. अशा स्थितीत तातडीने सोनोग्राफी करून गरज असल्यास तत्काळ शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते. परंतु सुशीलाच्या शरीरात आधीच रक्त कमी, त्यात पुन्हा हृदयविकार व रक्तपेशींच्या आजाराची शक्यता. अशा स्थितीत शस्त्रक्रिया करतानाच तिच्या जिवाला धोका होण्याची शक्यता जास्त होती. योगेश दादा व अम्मांनी हृषीला सर्व स्पष्ट कल्पना देऊन शेवटचा प्रयत्न म्हणून सुशीलाला गडचिरोलीला नेण्याचा सल्ला दिला. हृषी सुशीलाशी जाऊन बोलला. दोघांनी मिळून निर्णय घेतला कि आम्ही घरी जाऊ. शेवटचे श्वास घेण्यासाठी तिला घरी परतायचं होतं. आम्ही अँम्बुलन्स तयार ठेवली.
जेव्हा रूग्णाला गडचिरोलीला नेऊन फायदा होईल अशी आशा असते तेव्हा आम्ही नातेवाईकांना ते पटवून देऊन पाठवतो. परंतु जेव्हा आशा नसते तेव्हा तो निर्णय आम्ही नातेवाईंकांवर सोपवतो.
अखेरचे क्षण मोजणारी सुशीला नवरा व बालीसोबत घरी परतली. पण "मला बरं वाटत नाहीये. औषधे घ्यायला मी परत येणार आहे" अशी म्हणणारी सुशीला , तिचा निस्तेज होत गेलेला चेहरा आणि उमद्या मनाचा , बायकोची सर्व सेवा करणारा, पैसे जमवणारा हृषी ...या सर्व आठवणी रेंगाळल्या आहेत मागेच.. दुःखाची गडद छाया पडलेलं त्यांचं झाकोळलेलं सहजीवन तरळत राहतं नजरेसमोर अजूनही.

No comments:

Post a Comment