Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..

4/18/18

एकटेपणा

कधी कधी आपण असतो गर्दीमध्ये आणि अचानक धावून येते अंगावर अटळ एकटेपणाची जाणीव नकळतपणे.. त्या जाणिवेला कधी असते जबाबदार आपल्याच मनीचे वैराण प्रदेश. तर कधी मात्र दुसरेच लोक जाणीव करून देतात या एकटेपणाची.
म्हणजे आपण खूष असतो कधी एखाद्या पार्टीमधे किंवा गातअसतो, नाचत असतो, हरवलेले असतो आनंदात मित्र-मैत्रिणींसोबत.
अचानक एखादी व्यक्ती अशी काही वागते किंवा बोलते किंवा करते, कि फटकन शुद्धीवर येतो आपण.
भीती वाटते मला अशा लोकांची, जे गर्दीमधेही तुम्हाला अगदी एकटे एकटे करून टाकतात.
yes, I am scared of people, who make me feel utterly lonely, in middle of party.

एखादी जवळची मैत्रीण असते. तिच्याजवळ मन मोकळे करून सारं सारं तिला सांगावं आणि  मग तिने त्याचाच वापर करुन घाव द्यावेत मनावर.
अगदी मामुली घाव असला तरीही वर्मी बसतो, मैत्रिणीचा घाव, तिला सार्या खाणाखुणा ठाऊक, घाव कसा चुकणार ?
तिला विश्वासाने सांगावे, मला 'तो' आवडलाय. त्याच्याशी मैत्री करायचीय. नंतर पहावे  तर ती त्याच्यासोबत इतकी रंगलेली कि त्यांना इतरांचा विसर पडावा. तिने त्याला आपल्यापासून अलगद तोडावे, जिंकल्याच्या आनंदात छद्मी हसावे आणि हताशपणे पाहत विचार करावा, मैत्रीण इतकी दुष्ट वागू शकते ?
आपण आणखी एकटे. .

भीती वाटते मला, ज्याला जवळचे मानून आपण विश्वास टाकतो, त्याच्याच हातात सोपवतो आपण सुराही, हृदयावर वार करायला.

अशा लोकांची भीती वाटते, जे तुमच्यासमोर तर कौतुकाच्या पायघड्या अंथरतात, पण लोकांसमोर मात्र तुमचा विदूषक बनवतात.

आणि अशाही लोकांची भीती वाटते, जे जातात तुम्हाला एकटेपणाच्या खाईत लोटून, जेव्हा तुम्ही जिवाच्या आकांताने मारत असता त्यांना काही क्षणांच्या सोबतीसाठी हाका.

हेच असते का अटळ सत्य? एकटेपणा एकट्यानेच भोगत जाणे ?

3 comments:

  1. अतिपरिचयात अवज्ञा, एखादा कोपरा असू द्यावा असाही की जो कोणालाच माहिती नाही, माहीत नसलेल्या गोष्टींना लोक घाबरतात :)

    ReplyDelete