Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..

1/22/12

एवढीशी तर..

फुलपाखरू बनून
उडत उडत येईन
नि अलगद बसेन
तुझ्या नाकाच्या शेंड्यावर
गुदगुल्या होतील तुला
शिंकही येईल पण 
म्हणून चुरगाळू नकोस 
तुझ्या चिमटीत मला..
नाजूक आहेत  फार  
माझे इवलेसे पंख
तुझ्या नाकाच्या शेंड्यावर
सामावून जाईन मी
अख्खीच्या अख्खी..!
बघ, एवढीशी तर
जागा मागतेय मी
तुझ्या विश्वातील..
देशील ?

ती..

कुठल्याही आईला वाटतेच मुलीचं व्यवस्थितपणे लग्न जमावं.. त्यासाठी कधीकधी  मुलीचा भूतकाळ स्वछ्च नसेल तर लपवावा, असं लग्नाळू मुलीच्या आईचं म्हणणं..
पण पोरीचा निश्चय ठाम. मुलाला भूतकाळाविषयी सर्व कल्पना आधीच देणार..
" जुनं पुरून टाक गं आता.. झालं गेलं विसर. पुन्हा ते मुलाला सांगायची की गरज..? अशानं कोणता चांगला मुलगा होकार देणार तुला..? "
" अगं आई, केवळ चांगला नवरा मिळावा यासाठी मी माझी तत्वे पाण्यात सोडून देऊ का..? एकवेळ एकटं जगणं पचवेन मी, पण माझ्या आत्म्यावरचे घाव लपवून आणि आयुष्याच्या प्राथमिक तत्वांशीच तडजोड करून काही मिळवणं नकोय  मला. "
" म्हणजे बिन लग्नाची राहशील पण तडजोड नाही करणार..? "
" अगं आई, माझं लग्न होणं जितकं महत्त्वाचं वाटतं तुला, तितकंच माझं एक चांगला माणूस असणं का नाही महत्वाचं वाटतं..? "
" पण भूतकाळाशिवाय काही अडतंय का.."
" भूतकाळ लपवून ठेवणे म्हणजे एकप्रकारे मी स्वत:लाच नाकारणे नाही काय..? आणि जर मीच स्वत:ला नाकारलं तर दुसरा  कोणी मला पूर्णपणे कसा काय स्वीकारू शकेल..?
   चांगल्या मुलाचंच म्हणशील तर, माझ्या भूतकाळाकडे स्वछ्च नजरेने पाहण्याचा पुरुषार्थ ज्या मुलामध्ये नसेल, अशा पुरुषासोबत माझं आयुष्य बांधून घेण्याची मला काहीही गरज किंवा इच्छा नाहीये.. एकवेळ असा संकुचित वृत्तीचा मुलगा माझ्या जीवनाचा राखणदार होऊ शकेल पण साथीदार कधीच नाही...!! "

1/7/12

भुरळ

इवल्याश्या कोवळ्या पोरी
भल्या पहाटे
दुडूदुडू धावत जाऊन
ओच्यात भरून घेतात
प्राजक्ताची फुलं..
ते चिमण  हात
मग ओवू लागतात
गजरे त्या फुलांचे
मोठ्या आनंदात..!
फुललेले चेहरे
आणि मोहरलेली मने..
मला मात्र चुटपूट
यांना कळत कसे नाही
कोमेजू लागतील
ही टपोरी फुलं
चढत्या उन्हासोबत..
की हे कळूनही
भुरळ पडते यांना 
केशरी देठांची...
( परंपरेनुसार.. ? )
 मग मुली केसांमध्ये
दुधाळ केशरी गजरे माळून
तोऱ्यात फिरतात
उडवत नकटं नाक !
सकाळ सरतेच कधीतरी
मध्यान्ह होतेच कधीतरी
रणरणतं उन्हं माथ्यावर येतं
नि  मुलींच्या हातात राहतात
कोमेजलेली मरणग्रस्त
प्राजक्तफुलं...!!