Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..

3/13/17

उत्तराखंड भाग ५


१२ दिवसांचा आमचा दाई प्रशिक्षण कार्यक्रम सुधाकरने आधीच आखून ठेवला होता.
पहिल्या दिवशी आमच्या टीमची मिटिंग होती. सुधाकर व संगीता हे दोघे फिजिओथेरपिस्ट होते व त्यानंतर त्यांनी पब्लिक हेल्थ डिप्लोमा केला होता व सध्या ते आरोहीसोबत Project manager म्हणून काम करतात. आशांचे प्रशिक्षण, आरोहीच्या Trainers, Health workers आणि Supervisors प्रशिक्षण, दाई प्रशिक्षण, आरोहीतर्फे चालणारे Research , Data collection & analysis अशा विविध जबाबदाऱ्या त्यांच्याकडे होत्या. त्यासाठी ते आरोहीचे काम चालणाऱ्या ओखलकांडा या ब्लॉकमधील बेडाचुल्हा या पहाडी खेड्यात राहत होते. माझी सोयही त्यांच्यासोबत करण्यात आली होती.
पहिल्या दिवशी सुधाकर, संगीता, आमची या ब्लॉकमधील ट्रेनर कल्पना, आणि माझी मिटिंग झाली आणि आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम आखला व त्यासाठी लागणारे साहित्य गोळा केले. आम्ही २ तासांचे प्रशिक्षण आखले होते. त्यात काही व्हिडिओ दाखवणे, डेमो देणे, दाईकडून प्रात्याक्षिके करून घेणे , मधे चहासाठी छोटी सुट्टी घेणे असा कार्यक्रम होता. प्रत्येक दाईला या प्रशिक्षणात सहभाग घेतल्याबद्दल आरोहीतर्फे १०० रुपये मिळणार होते. पुढचे १०-१२ दिवस आम्ही वेगवेगळ्या गावात जाऊन तिथे आजूबाजूच्या दाईना गटागटाने प्रशिक्षणासाठी बोलवणार होतो. डॉ. सुशील सरांनी मला Postpartum hemorrhage म्हणजेच गर्भवती स्त्री बाळंत झाल्यानंतर काही स्त्रियांना होणारा रक्तस्त्राव या विषयावर ट्रेनिंग घ्यायला सांगितले होते. कारण तिथे असा रक्तस्त्राव होऊन स्त्रीचा त्यात मृत्यू होण्याचे प्रमाण खूप होते. असा रक्तस्त्राव होणे हे जीवासाठी धोकादायक असते हे लोकांना माहित नव्हते आणि जेव्हा स्त्रीची प्रकृती गंभीर होयची तेव्हा पहाडी गावातून डांबरी सडकेला पोहोचायच्या ४-५ तासांतच स्त्रीचा मृत्यू होयचा. तिथून पुढे शहरातील दवाखान्यात पोहोचणे तर अवघड गोष्ट होती.
पहिल्या दिवशी मला खूप टेन्शन आले होते. कारण असे प्रशिक्षण घेण्याचा मला काहीच अनुभव नव्हता. आमची पूर्ण टीम एका गावामध्ये गेली. तिथे १४ दाई होत्या. त्या सर्व बऱ्याच वयस्कर होत्या, ४०-५० शीच्या व काही अगदी सिनिअर ६०-७० च्या. संगीताने मला बऱ्याच गोष्टी सांगू ठेवल्या होत्या, जसे की त्या खूप अनुभवी असल्याने बऱ्याच वेळा त्याच आपल्याला शिकवायला सुरु करतात, किंवा फार वेळ त्यांना काही सांगत राहिले की त्या झोपी जातात किंवा काही दाई प्रत्येक गोष्टीची चेष्टा करून एकमेकीत गप्पा मारतात. त्यामुळे सर्वाना कसे सामील करून घ्यायचे, त्यांची उत्सुकता सतत जागरूक ठेवून आपल्या गोष्टी त्यांच्या कशा पचनी पाडायच्या याचा मी बराच विचार केलं होता.
त्यामुळे आधी त्यांची नावे विचारून त्यांच्याशी गप्पा मारून वातावरण हलके फुलके करणे, एक एक गोष्ट ४-५ वेळा सतत समजावून सांगणे, वैज्ञानिक संज्ञा त्यांना सोप्पी करून समजावणे, एखाद्या गोष्टीबद्दल त्यांना किती माहिती आहे ते आधी विचारून मगच त्यात आपली भर घालणे, त्यांच्या परंपरा समजावून घेवून त्याला कमीत कमी धक्का लागेल अशा पद्धती त्यांना सांगणे, अर्धा अर्धा तासाने त्यांना छोटे ब्रेक्स देणे, चहा साठी निवांत वेळ देणे, सर्व झाल्यावर त्यांची उजळणी करून घेणे अशा विविध पद्धती मी अवलंबल्या. पहिल्या दिवशी मला अंदाज यायला वेळ लागला. थेरी जास्त झाली आणि बोजड भाषेत झाली. दाई मधे मधे कंटाळत आहेत हे जाणवले. काही संज्ञा त्यांना समजल्याच नाहीत हे कळले. २ तासा ऐवजी जास्त वेळ लागून त्यांच्यासाठी ते रटाळ झाले. तसेच मला दिलेला विषय डायरेक्ट सांगून जमणार नव्हते , त्याआधी त्यांना बाळंतपणा विषयी थोडी माहिती सांगणे गरजेचे होते, कारण त्यात पण त्यांना बऱ्याच गोष्टी माहित नव्हत्या व त्या चुकीच्या पद्धतीने केल्या जात होत्या. माझा विषय फक्त हाच आहे व मी तेवढाच शिकवणार असे म्हणून चालणार नव्हते.
पहिल्या दिवशीच्या अनुभवाने मी नाराज झाले होते. हे सगळं २ तासामध्ये कसं बसवणार, त्यात ते त्यांना समजेल अशा भाषेत कसं सांगायचं , असे नुसते प्रश्न प्रश्न डोक्यात होते. आजच्या अनुभवाने आम्ही प्रशिक्षणात बऱ्याच सुधारणा केल्या. एका महिन्यामध्येच त्यांना सर्व माहिती सांगून गोंधळात टाकणे बरोबर ठरणार नव्हते, म्हणून या प्रशिक्षणासाठी महत्वाच्या फक्त ४ गोष्टी ठरवल्या. व्हिडिओ त्यांना फार आवडायचे, त्या खुश होयच्या व बाळंतपण त्यांना सोप्यारीतीने समजायच्या म्हणून व्हिडीओ वाढवले. मला त्यांना बाळंतपणाच्या ४ स्टेजेस सांगायच्या होत्या. परंतु स्टेजेस हा शब्द त्यांना कठीण जात होता. मग मी ते सोपे केले. असं समजा की ४ डब्बे आहेत. जसे आपण स्वयंपाक घरात वेगळ्या डब्यात वेगळ्या वस्तू ठेवतो तसे आपण आता बाळंतपणाचे ४ भाग करू व ४ डब्यात ठेवू असे म्हटले की त्यांना छान समजू लागले. प्रत्येक जण मग कुठल्या डब्यात काय ठेवायचे व त्याची काळजी कशी घ्यायची हे सांगू लागली. तसेच आम्ही आणखी एक गम्मत केली. मला त्यांना स्त्री बाळंत झाल्यावर तिच्या गर्भपिशवीला करण्यात येणारा मसाज शिकवायचा होता. या मसाजने मऊ असलेली गर्भपिशवी कडक होऊन रक्तस्त्राव खूप कमी होतो. मऊ गर्भपिशवीसाठी मोठा बनपाव व कडकसाठी फुलकोबी असे घेऊन आम्ही ते कापडात गुंडाळायचो व ओळीने प्रत्येकीला त्यावर मसाज शिकवायचो. ग्लोव्ज घालणे प्रकार त्यांना माहिती नव्हता. तिथे अशी प्रथा होती की बाळ बाहेर आले की दाईची जबाबदारी संपली. पुढे नाळ कापणे, वार काढणे अशा गोष्टी त्या स्त्रीने स्वतःच्या स्वतःच करायच्या. कारण तिला कोणी हात लावला तर अस्पृश्य होते असं समज होता. आरोहीने बरेच प्रशिक्षण घेऊन दाईचा तो समज दूर केलं होता. म्हणून दाई सध्या ते करत होत्या परंतु मग तीन दिवस त्यांचे कुटुंब त्यांना वाळीत टाकते. काही दाई खूप मजेने म्हटल्या, जाऊ दे, टाकू दे वाळीत. तेवढाच आम्हाला ३ दिवस आराम मिळतो, स्वयंपाक करावा लागत नाही. स्त्रीला मदत करणे हे त्यांना जास्त महत्वाचे वाटत होते. परंतु तरीही एक प्रश्न राहत होता. कोणीही स्त्रीच्या वारेला हात लावत नव्हते, त्यांना रक्तामुळे ते घाण , किळसवाणे वाटत होते. त्याचा परिणाम म्हणून तिथे काही स्त्रियांची वार २-३ दिवस लटकत राहते, त्यातून रक्त जाऊन रक्तक्षय होणे, जंतू संसर्ग होऊन स्त्रीच्या जीवाला अपाय होणे या घटना खूप घडतात. त्यामुळे आम्ही त्यांना ग्लोव्ज ची ओळख करून दिली. त्यांनी ते प्रथमच पाहिले. त्यांना ते आवडले. हे घातले तर आम्ही स्त्रीच्या वारेला हात लावू व ती काढायला मदत करू याला त्या तयार होत्या. पण त्यांना ते घालणे अवघड जात होते. आम्ही प्रत्येकी कडून २-३ वेळा सराव करून घेतला परंतु ते शिकायला त्यांना बऱ्याच सरावाची गरज पडणार होती.
नंतरचे आमचे प्रशिक्षण छान होत गेले. रोजच्या अनुभवाने आम्ही शिकायचो व तसा बदल करायचो. रोज मी एकच विषय शिकवत असले तरी रोजचा दाईचा नवा नवा गट बघून मला धडकी भरायची व भीती वाटायची की या माझे ऐकतील की नाही. परंतु प्रशिक्षण सुरु झाले की गप्पा मारत, प्रात्याक्षिके करत, मधेच त्या पेंगुळल्या की व्हिडीओ दाखवत, चहा पीत मी त्यांच्याशी पूर्ण एकरूप होऊन जायचे. त्यांचा अनुभव पाहून मी आदराने थक्क व्हायचे. जगाच्या खऱ्या शाळेत काम करणाऱ्या, कुठलेही साधन नसताना पूर्ण आत्मविश्वासाने वावरणाऱ्या व कितीतरी स्त्रियांना धीर देऊन सुरक्षितपणे बाळंत करणाऱ्या, डॉक्टर नसलेल्या पहाडी भागात आरोग्यसेवा देणाऱ्या त्या दाईकडून मी आयुष्याचे एक वेगळे रूप शिकत होते आणि त्यांच्या प्रेमात पडत होते.
एक खूप मजा व्हायची. एखादी दाई मला सुनवायची, “आप तो प्लेनसे आये हो, हम पहाडी लोग है. आप क्या जाने पहाडी डिलिव्हरी कैसी होती है” अशा दाईला मग काहीतरी वेगळी गोष्ट शिकवून मला तिचा विश्वास जिंकावा लागायचा. प्लेनसे म्हणजे आपण सपाट प्रदेशातले. ते लोक पहाडी भागाला देवभूमी म्हणतात व त्याचा त्यांना खूप अभिमान आहे. सुधाकर हैदराबादचा, त्याला खूप राग यायचा, “आपकी देवभूमी, और हमारी क्या राक्षसभूमी ?” असं तो विचारायचा. कधी एखादी दाई वैतागेलेली असायची, “पैसा दो जल्दी और जाने दो” अशी घाई करायची. मग तिच्याशी प्रेमाने बोलून तिच्या घरच्या समस्या समजून घ्यायचे, मग ती शांत होऊन, कितीही वेळ बसायला तयार व्हायची. कधी थोड्या दाई यायच्या व बाकीच्यासाठी वाट पाहत थांबावे लागायचे. मग शेतीची कामे खोळंबतात म्हणून त्या रागवायच्या. अशा वेळेस आम्ही त्यांना गाणी गायला लावायचो, गाणी म्हणून वेळ जायचा व त्यांचा मूड प्रसन्न व्हायचा.
या सर्व कालावधीमध्ये मला २ जीवाभावाचे मित्र मिळाले, सुधाकर व संगीता. समस्यावर चर्चा करून सोडवणे, त्यांचे आरोहीसोबत काम करताना येणारे अनुभव व काही नाराजी, कमी पगारामुळे सोडून जाणारे चांगले प्रशिक्षित ट्रेनर्स अशा विविध गोष्टीवर शेअरिंग झाल्याने आम्ही जवळ आलो. तसेच प्रशिक्षण संपल्यानंतर कधी नदीकिनारी जेवण करणे, एखाद्या गावातील प्राचीन मंदिराला भेट देणे, एकत्र स्वयंपाक करणे या गोष्टीनी मी रमून गेले होते. पिंडारी ट्रेक व मेडिकल कॅम्पसाठी सतोलीला परत निघताना सुन्नीबेंडचे माझे धुक्यातले घर सोडणे जड झाले होते.

No comments:

Post a Comment