Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..

2/25/17

उत्तराखंड भाग ४



आजपासून, म्हणजे १ सप्टेंबरपासून ते ८ सप्टेंबरपर्यंत आमच्या फिरत्या दवाखान्याचा कालावधी होता. दर महिन्याचे पहिले ८ दिवस आरोही हा फिरता दवाखाना चालवते. गावोगावच्या आशा व आरोहीच्या हेल्थ असिस्टंट मार्फत कोणत्या दिवशी कोणत्या गावी फिरत्या दवाखान्याचा थांबा ठरलेला असेल त्याची माहिती पसरवली जाते. त्यानुसार त्या गावचे व आजूबाजूचे रुग्ण ठरलेल्या दिवशी तिथे तपासणीसाठी येतात.
आरोहीसोबत ८ दिवस मानधनावर काम करायला नेहमी दिल्लीवरून येणाऱ्या डॉ. रितू म्हणून स्त्रीरोगतज्ज्ञ असतात. काही कारणाने त्या या महिन्यात येऊ शकल्या नसल्याने डॉ. सुशील यांनी मला बोलावले होते. आमच्या टीम सोबत एक सोनोग्राफी तज्ञ डॉ. प्रशांत नातू हे होते. ते लखनौमध्ये प्रायवेट प्रक्टिस करतात व दर महिन्यातील ८ दिवस आरोहीच्या या फिरत्या दवाखान्यासोबत काम करायला येतात.
पहिल्या दिवशी आमचा कॅम्प सतोलीलाच होता. पेशंटची झुंबड उडाली होती. त्यात हिमांशु जेवणासाठी ब्रेक घ्यायचा नाही. जोपर्यंत सर्व पेशंट तपासून होत नाहीत तोपर्यंत आम्ही सर्वांनी त्याला कितीही जेवायला बोलावले तरी तो काही यायचा नाही, मग अशाने त्याला दुपारी ४-५ वाजायचे जेवायला. आम्ही बाकीची टीम मात्र २-३ वाजता ब्रेक घेऊन जेवायचो, जेवल्याशिवाय आम्हाला काम करणे शक्य होत नसायचे. परंतु हिमान्शुला सोडून जेवताना मला खूप अपराधी भावना यायची आणि त्याचे पर्यवसन माझी त्याच्यावर चिडचिड होण्यात होयचे. मग मी जेवून आले की त्याच्याकडील रुग्णांना माझ्याकडे बोलवायचे, मग हिमांशु जेवायला जायचा.
दुसऱ्या दिवशी पहाटे सतोली सोडून आम्ही निघणार होतो व पुढचा मुक्काम सरगाखेत या ठिकाणी पडणार होता. एक मोठी बस, ज्यामध्ये फिरत्या दवाखान्याचे पूर्ण सामान आणि २ जीप अशा रीतीने आमचा प्रवास होणार होता. या बसमध्ये टेबल, खुर्च्या, औषधे, रक्त तपासणीची lab, एक्सरे मशीन, सोनोग्राफी मशीन, स्टेथो, बीपी मशीन, इत्यादी असं सगळा पसारा मावला होता.
दुसऱ्या दिवशी सरगाखेतला प्रचंड गर्दी होती. जवळ जवळ १५० गर्भवती स्त्रिया तपासणीसाठी व सोनोग्राफीसाठी आलेल्या होत्या. सरगाखेत हे एका दरीच्या कडेला, निसर्गरम्य परिसरात वसले होते. सकाळी आम्ही पोहोचलो तेव्हाच तेथील झाडे, फुले, दरीत दिसणारी घरे, रिसोर्ट्स, धुके या सगळ्यांना पाहून मी वेडावले होते. आमच्या खाण्यापिण्याची सोय एका सुंदरशा हॉटेलमध्ये केलेली होती. ते पूर्ण लाकडापासून बनवलेले व लाकडाच्याच वस्तूंनी सजवलेले कॅफे शॉप सारखे ते होते. रात्री आमची राहण्याची सोय केलेले हॉटेलही खूप सुंदर होते. मलातर एखाद्या छानशा ट्रीपला आल्याचा भास होत होता. कामासाठी मी आलेय असे वाटतच नव्हते.
पुढचे २ दिवस मात्र राहायला खूप साधीच सोय होती परंतु आम्ही सर्व एकत्र राहून खूप धमाल केली. सर्वच जणांचा स्वभाव मस्तीखोर असल्याने कंटाळा कधी यायचाच नाही. किंवा एकत्र हॉलमध्ये गप्पा मारत बसायला लाज वगैरे वाटायची नाही. मिळून चहा बनवणे, पत्ते खेळणे, हिमांशुच्या laptop वर गाणी ऐकणे, जोक सांगणे असे रिकाम्या वेळात उद्योग चालू राहायचे. प्रत्येक ठिकाणी सामानाची चढ उतार करावी लागायची. मग सगळे मिळून साखळी बनवायचो व सामान पास करत रूम पर्यंत पोहोचवायचो. आता खाण्यापिण्या साठी धाब्यावर सोय होती. पण ते धाब्यावरचे नॉर्थ इंडियन फूड, विविध प्रकारचे परोठे, छोले, ओम्लेट,पनीर, दही, लस्सी, दाल इत्यादी आम्ही मस्त एन्जॉय करत होते.
चौथ्या दिवशी आम्ही खनस्यू या ठिकाणी पोहोचलो. खनस्यू ही जागा तर मला स्वर्गासारखी भासली. या गावातून सुंदर नदी वाहत होती व गावाबाहेर २ नद्यांचा संगम होता. या गावात आमच्या टीममधील ३ ड्रायव्हर्स पैकी एक, राजुभैय्याचे कुटुंब राहत होते. त्याच्याकडेच आमच्या खाण्यापिण्याची जबाबदारी सोपवली होती. तिथे पोहोचताच एका धबधब्यावर सर्व गाड्या धुण्यात आल्या. सर्वांनी पाण्यात फुल धमाल केली.
दुसऱ्या दिवशी लवकर उठून मी नदीकिनारी फिरायला गेले. तिथे नदीवर एक प्रचंड पूल होता. त्याच्यापलीकडे जंगल व पहाडावर शेती होती. मी पूल पार करून गेले. पलीकडे गेल्यावर तिथे एक मोठी शिळा होती. त्यावर छान विसावले. तेथून खूप सुंदर नजारा दिसत होता. नदीचे स्फटिकासारखे दिसणारे पांढरे शुभ्र पाणी, पूल, आजूबाजूची दाट झाडी...इतके सुंदर दृश्य पाहून मी तर खनस्यूच्या प्रेमातच पडले. तो क्षण खूप सुंदर होता. एका क्षणात आयुष्य उलगडणे काय असते ते जाणवले. खूप दिवस मनात साचून राहिलेली तगमग, अस्वथता जाऊन, मन शांत व प्रसन्न झाले. असं वाटले की तिथेच कायमचे राहून जावे.
३ दिवस तिथे आमचा मुक्काम होता व रोज तेथून वेगवेगळ्या गावी आमचा फिरता दवाखाना जात होता. आमची व्यवस्था अशी होती की सर्वात पुढे बस जायची. गावातील शाळा, किंवा सरकारी आरोग्य केंद्र किंवा एखादे जुने घर असे जे मिळेल ते दवाखाना लावण्यासाठी निवडले जायचे. मग तेथे बस नेवून सर्व समान उतरवले जायचे. दोन डॉक्टरांसाठी २ जागी टेबल खुर्च्या लावून व्यवस्था केली जायची. मला गर्भवती महिला तपासण्यासाठी एका कॉटची सोय केली जायची. सोनोग्राफी, एक्सरे, रक्त तपासणी व औषधे वितरण याची सोय बसमध्येच केलेली असायची. नंतर जीप मधून मुन्नी दीदी व नर्स जायच्या. मुन्नीदी चा रुग्णांच्या नाव नोंदणीचा टेबल लागायचा. आम्ही पोहोचेपर्यंत नाव नोंदणी सुरु झालेली असायची. मग आम्ही रुग्ण तपासून त्यांना पुढील गोष्टीसाठी बसकडे पाठवायचो. दुपारी जेवणाची सोय तिथल्याच एखाद्या छोट्याशा टपरीमध्ये असायची. मधे मधे चहा मिळायचा.
एखाद्या दिवशी छोटे गाव असले व कमी रुग्ण असले की दुपारीच आम्ही रिकामे होयचो. मग रमत गमत सर्व परतायचो. मधेच शेत लागले की सर्व जण गाडीतून उतरायचे. ओळखीच्या लोकाकडे थांबायचो. तिथे पाहुणचाराची पद्धत म्हणजे जे कुठले सिझनल फळ असेल, ते भरपूर प्रमाणात खायला मिळणार. मी गेले होते तेव्हा काकडीचा मोसम होता. तिथे मोठ्याल्या रसरशीत काकडी मिळतात, त्याला ते खीरा म्हणतात. कुठेही गेलो की पहिले कोणीही मोठा खीरा कापून , त्यासोबत मिरचीची चटणी खायला देणार. सगळे नुसते तुटून पडायचे खीरा खायला. एकदा एक आजी घराच्या छतावर शेंगा वळत घालत होती. भावनाने जाऊन तिला शेंगा मागितल्या, ती आनंदाने देऊ लागली, इकडून मी फोटो काढत होते. फोटो काढलेले पाहताच ती खुश झाली आणि तिने नको म्हणत असताना खूप साऱ्या शेंगा दिल्या, आम्हाला त्या पुढे ३-४ दिवस पुरल्या. मग मधेच धबधब्यावर थांबून पाण्यात खेळणे व्हायचे, कोणी पोहायचे. मधेच रस्त्यावर धावण्याची शर्यत लावली जायची. कधी रानटी फळे दिसली की उतरून ती खाऊ लागायचो. कधी गवत जायला उशीर होतोय म्हणून मुन्नीदी रागावून आम्हाला खालीच सोडून जीपने पुढे जायची. मागून दुसरी जीप घेऊन येणारा राजुभैय्या मग आम्हाला लिफ्ट द्यायचा.
रात्री जेवणाआधी अंताक्षरी चालायची. हिमांशु पत्त्यांच्या ट्रिक्स करून दाखवायचा, माईंड गेम्स करायचा. भरपूर मेडिटेशन करून तो त्यात एकदम निष्णात झाला होता. एकदा मुन्नीदीचा वाढदिवस होता. मग सर्वांनी मिळून गाणे लावून, तुफान डान्स केला. आमच्या टीममधील कोणीही कधी वेडेवाकडे वागायचे नाही, मुलींकडे वाईट नजरेने पहायचे नाही, कधी आमच्यासमोर घाणेरडे जोक करणे असे कारायचे नाही, दारू तर पिणे निषिद्धच होते. या गोष्टींचे मला खूप कौतुक वाटायचे. मुन्नीदी बेस्ट लीडर होती. ती पूर्ण व्यवस्था सांभाळायची, कामे करवून घ्यायची, कोणी रुसलं चिडले तर समजावून घ्यायची, समस्या उत्कृष्टरित्या सोडवायची, तिच्या शिस्तीमुळे सर्व कामे वेळेत व योग्य पद्धतीने चालायची. हिमांशु सुद्धा शांत, नम्र आणि कष्टाळू डॉक्टर असल्याने सर्वजण त्याचे ऐकायचे. तोही चिडचिड न करता गोष्टी हाताळायचा.
मी आणि माझी असिस्टंट नर्स भावना, आमच्या दोघींची टीम गर्भवती महिला व इतर समस्या असलेल्या महिलांची तपासणी करण्यासाठी होती. पहिले रूम मध्ये गेलो की आम्ही दोघी सामानाची योग्य रीतीने मांडामांड करायचो. रोज वेगवेगळ्या प्रकारची कंडीशन असायची. कधी अगदीच स्वच्छ खोली मिळायची तर कधी अगदीच गलिच्च खोली मिळायची. गर्भवती महिलेला झोपवण्यासाठी कॉट लागायचा. एकदा तर एक अडगळीची खोली तपासणी रूम म्हणून मिळाली. तिथे खूप कमकुवत दिसणारा, तुटायला आलेला कॉट होता. आम्हाला भीती वाटली की एखादी महिला पडेल यावरून. मग कॅम्पच्या वेळेस सर्वत्र फिरून व्यवस्था पाहणारे, चहा आणणारे ड्रायवर काका आले आणि त्यांनी त्यावर उडी मारून, झोपून दाखवले, मग तो कॉट आमच्या परीक्षेत पास झाला. एकदा एका जुन्या घरात आमची सोय होती. तर तिथे एका कोपऱ्यात एक आजारी कुत्रा झोपलेला होता. पूर्ण खोलीभर त्याचा घाण वास पसरलेला. आम्हाला काळजी की चुकून हा कुत्रा एखाद्या रुग्णाला चावला बिवाला तर ? मग भावनाने बराच प्रयत्न करून त्याला बाहेर काढले. तो कुत्रा मधेच आत पुनः यायचा व भावना त्याला बाहेर हाकलत राहायची.
अशी रोज विविधता असायची आमच्या फिरत्या दवाखान्यामधे. एका ठिकाणी एका प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर आलेली होती. मला आश्चर्य वाटले. ती कानपूरची होती. म्हणजे इथून ८-९ तास अंतरावर. नंतर कळले की ती कधीच यायची नाही तिथे. फक्त पगार घ्यायची घरी बसून. परंतु त्यादिवशी आम्ही तिथे येणार आहोत हे आशा वर्कर मार्फत तिला कळाले, आम्ही तिच्या गैरहजेरीची नोंद करून तिची तक्रार करू अशी भीती वाटल्याने त्या दिवशी ती आली होती.
फिरत्या दवाखान्याला खूप गर्दी व्हायची. कारण शहरात जाऊन उपचार घेणे त्यांना परवडत नाही. गर्भवती महिला तर दर महिन्याला फिरत्या दवाखान्यातच यायच्या. त्यांच्या बीपी, पोट, रक्त तपासणीपासून सोनोग्राफी व औषधोपचार सर्व मोफत उपलब्ध होते.
या तपासणीमध्ये मला तिथल्या स्त्रियांचे राहणीमान, समस्या, कष्टाचे काम, कुटुंबव्यवस्था , त्यांचे सामाजिक स्थान, कुपोषण, वारंवार राहणारा गर्भ, कधी गर्भपात, तर कधी पोटात किंवा जन्मल्यावर मुल दगावणे अशा बऱ्याच आरोग्य समस्या लक्षात येऊ लागल्या. प्रोलाप्सचे प्रमाण तर भरपूर होते. कुटुंब नियोजनाबद्दल तर तिथे खूप अज्ञान होते व सुविधा उपलब्ध नव्हत्या.
एक स्त्री आली , ती तर १० व्या वेळेस गर्भवती होती. का तर, आधीच्या ९ मुलीच होत्या. ती खूप कुपोषित होती, त्याहीपेक्षा जास्त ती उदास व निराश दिसत होती. तिचा चेहरा भावशून्य होता, असे वाटत होते जशी ती सर्व संवेदनांच्या पार गेली होती. बराच वेळ मी तिला समजावत होते, पण मला हेही कळत होते की तिच्या कुटुंबाने तिला जबरदस्तीने हे ओझे लादले होते. तिचा यात काय दोष ? आजही तिचा तो माणूसपणाच्या पलीकडे गेलेला भावविरहित चेहरा मी विसरू शकत नाही. एका गर्भवती महिलेच्या सोनोग्राफी मध्ये दोष आढळला. लवकरात लवकर सीझर करून बाळ वाचवणे आवश्यक होते. नाहीतर कोठल्याही क्षणी बाळ पोटात मरून गेले असते. मी त्यांना आधी शांत भाषेत समजावले, परंतु तिची सासू ऐकायलाच तयार नव्हती, गर्भवतीला दवाखान्यात न नेता घरीच बाळंतपण करायची तिची घाई होती. शेवटी मला बाळ कधीही पोटात मरेल असे स्पष्ट भाषेत सांगावे लागले, ते ऐकून रडारड सुरु झाली. हिमांशु येऊन मलाच विचारू लागला की तू असे काय बोललीस की सर्व कुटुंब घाबरले ? पण भीतीमुळे त्यांनी लवकर तिला शहरात दवाखान्यात हलवले व तिथे सीझर होऊन आई व बाळ सुखरूप राहिले.
खनस्यूला एक रुग्ण भेटली. तिला तपासल्यावर मी तिची सोनोग्राफी सांगितली. तर तिला एक्टोपिक गर्भ होता. म्हणजे नॉर्मली जो गर्भ गर्भपिशवीत असतो, तो तिच्या गर्भनलिकेत होता. असा गर्भ मोठा होऊ लागला की कधीही पोटात फुटू शकतो व अशा स्थितीत महिलेला लवकरात लवकर, काही तासांच्या आत दवाखान्यात नेऊन ऑपरेशन करावे लागले. दवाखान्यात पोहोचायला उशीर झाला तर महिलेचा जीव जाऊ शकतो. आम्ही तिच्यावर जीवघेणी परिस्थिती ओढवायच्या आधीच तिचे निदान केले होते. ती एकटीच आली होती, तिला आम्ही सर्व समजावले. ती म्हणाली की घरी जाऊन ती नवऱ्याशी बोलेल व लगेच शहराकडे रवाना होईल. संध्याकाळी मुन्नीदी व भावना दोघी त्या स्त्रीच्या घरी गेल्या, ती दवाखान्यात गेली की नाही, नसेल तर कधी जाणार ते विचारायला. तिथे तिचा नवरा भेटला. त्याने सांगितले की तो त्याच्या बायकोला दवाखान्यात नेणार नाही. भावनाने सोनोग्राफी दाखवून, चित्र काढून त्याला त्याच्या बायकोचा आजार समजावला, जीवाला असलेला धोका सांगितला, तरी तो ऐकतच नव्हता. शेवटी भावनाने त्याला चिडून विचारले की “अगर वोह मर गयी तोह क्या करोगे ?” त्यावर तो हसून तिला म्हणाला, “दुसरी शादी कर लूंगा.” भावनाला ते ऐकून धक्काच बसला. नंतर २ दिवस तिला एकसारखे तेच आठवत होते, “माम, वोह ऐसे कैसे बोल सकता है ?”
कधी गर्दी कमी असली की आम्ही निवांत रुग्णांशी गप्पा मारत तपसणी करायचो. त्यामुळे त्यांच्या समस्या, घरची काळजी समजायची. कधी मी एखाद्या स्त्रीला कॉट वर झोपायला सांगायचे. तपासायचे. तपासून झाले की परत टेबलपाशी येऊन औषधे लिहायचे. मग पुढच्या पेशंटला बोलवायचे. असेच एकदा गडबडीत एक पेशंट कॉट वर झोपली आहे ते मी विसरले. नंतर थोड्या वेळाने पुढची पेशंटला तिकडे नेले, तर बरीच आधी तपासलेली ती महिला तशीच झोपली होती. म्हटलं, “आप अभीभी इधर लेटे हो ?” तर तिचे उत्तर, “आपले बोला नाही उठने के लिये”
रोज सकाळी उठले की मी पहाडावर किंवा नदीकिनारी फिरायला जायची. तो पूर्ण प्रदेशच खूप सुंदर होता. तिथे बिबट्यांचा वावर पुष्कळ होता. बिबट्याच्या गोष्टी खूप ऐकल्या पण पहायला मिळाला नाही. लांडगे मात्र दिसले फिरताना. ८ तारखेला शेवटचा कॅम्प संपवून आम्ही सतोलीला परत निघालो. माझ्या मनात मात्र या ८ दिवसातील, वेगवेगळ्या गावांच्या असंख्य आठवणी होत्या.

2/21/17

उत्तराखंड भाग ३


पहाड आणि तेथील जंगल, झाडे, घरे याबद्दल थोडेफार लिहिलेय. पण पहाडी लोकांबद्दल लिहायचे अजून राहिलेय.
खरेतर पहाडी लोक असा शब्दप्रयोग खूपवेळा वाचनात आला होता. परंतु त्या शब्दावर कधी विचार करायची गरज पडली नाही किंवा तसा विचारच केला नाही. हलद्वानी या गावापासून जेव्हा मी सतोलीला टेक्सीने निघाले आणि लवकरच सपाट प्रदेश संपून आम्ही पहाडातून प्रवास सुरु केला , तेव्हा कुठे मला पहाडी प्रदेश या शब्दाचा खरा अर्थ लक्षात येऊ लागला. कारण आम्ही नुसते एका पहाडावरून दुसऱ्या , तेथून तिसऱ्या असे फक्त पहाडातच प्रवास करत होतो. जी काही गावे लागत होती, ती त्या पहाडांवरच होती. जेवायला आम्ही थांबलो, ते गाव सुद्धा असेच एका पहाडावर वसलेले होते. मी टेक्सीतून उतरले, एका रोडसाईड धाब्याकडे गेले. आजूबाजूला नुसते पहाडच पहाड, आणि हा धाबापण असाच एका पहाडी वळणावर विसावलेला. तिथे पराठे आणि पहाडी आलू स्पेशल डिश खाताना माझे विचार चालू होते, “अरे, खरेच हे लोक शब्दशः पहाडावरच राहतात, यांची गावे, शेती, बाजार, जगणे मरणे सगळे पहाडावरच तर आहे.”
पुढे एका वळणावर तर मला आणखी एक दृश्य दिसले. एका पहाडाच्या रस्त्याला लागून असलेल्या उतरणीवर एक भलामोठा वृक्ष होता आणि त्याच्या एका बऱ्याच उंचीवरच्या फांदीवर एक स्त्री चढलेली. मला तर आश्चर्याचा धक्काच बसला. हे मला झालेले धाडसी पहाडी स्त्रीचे पहिले दर्शन!! त्यानंतर मग रस्त्यांवर गवताचे प्रचंड मोठे मोठे भारे आपल्या डोक्यावर वाहणाऱ्या पहाडी स्त्रिया दिसतच राहिल्या. ते भारे जवळ जवळ त्या स्त्रियांच्या उंची एवढेच मोठे मोठे असायचे, डोक्यावरच्या भाऱ्यामुळे त्यांचा चेहरा दिसायचाच नाही, त्यांना पुढचा रस्ता कसा काय दिसत असेल याचेच मला नवल वाटत राहिले. एकही पुरुष मला असा भारा वाहताना दिसला नाही. स्त्रियांच्या या कष्टांची किंमत त्यांचे शरीर कशाप्रकारे मोजते आहे, याची झलक एक डॉक्टर म्हणून मला पुढल्या काही दिवसात पहायला मिळणार आहे, याची मला किंचितही कल्पना त्यावेळेला नव्हती.
सतोलीच्या हॉस्पिटलमध्ये असताना , माझा दुसराच दिवस होता तेव्हा, एक स्त्री व तिचा नवरा तपासणीसाठी आले. तिचे वय फक्त २४ वर्षेच होते. मी तिला तपासले आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण तिची गर्भपिशवी पूर्णपणे बाहेर आलेली होती. बरेच दिवस ती तशीच बाहेर लटकत राहिल्याने त्यावर जखमा झालेल्या होत्या. वास येत होता. खरेतर अशा प्रकारचा आजार हा पाळी निघून गेलेल्या, ५०-६० वयाच्या वयस्कर स्त्रियांमध्ये दिसून येतो. याला आम्ही प्रोलाप्स असे म्हणतो. महिला याला “अंग बाहेर येणे” असा शब्दप्रयोग वापरतात. गर्भपिशवी ही लीगामेंटस व स्नायूच्या सपोर्टने तिच्या नॉर्मल जागेवर धरून ठेवलेली असते. विविध कारणांनी हा सपोर्ट कमजोर पडून गर्भपिशवी व तिच्यासोबत लघवीची पिशवी, संडासची जागा हे नॉर्मल जागेवरून हळूहळू खाली सरकू लागतात. त्यानुसार आम्ही त्याचे 1st , 2nd , 3rd डिग्री व complete prolapse वर्गीकरण करतो. जास्त म्हणजे 2nd, 3rd डिग्री व complete prolapse ला स्त्रियांच्या वयानुसार विविध शस्त्रक्रिया लागतात. अशा आजाराच्या खेड्यातल्या वयस्कर स्त्रिया लाजेने वेळीच दवाखान्यात येत नाहीत आणि मग आजार वाढतो, जखमा होतात तेव्हा येतात. तोपर्यंत मग शस्त्रक्रियेची गुंतागुंत वाढलेली असते. गडचिरोली जिल्ह्यात मी होते, तिथे तर एक अंधश्रद्धा होती की ज्या स्त्रियांचे लग्नाबाहेर परपुरुषासोबत संबंध असतात, त्यांना हा आजार होतो. त्यामुळे तर मग तिथे अशा आजाराच्या स्त्रिया कोणालाच काही सांगत नाहीत. सहन होण्याच्या पलीकडे त्रास गेल्यावर मगच दवाखान्यात येतात.
प्रोलाप्स होण्याच्या कारणांमध्ये सतत होणारी बाळंतपणे, दोन बाळंतपणामध्ये अगदी कमी कालावधी असणे, लहान वयातच बाळंतपणे होणे, चुकीच्या पद्धतीने कळ देणे, घरीच बाळंत होणे, रजोनिवृत्तीनंतर आधीच कमजोर झालेले लिगामेंट आणि स्नायू नैसर्गिकरित्या आणखी कमजोर होऊन गर्भपिशवी खाली सरकणे. या कारणांशिवाय कुपोषण, गर्भवतीने पौष्टिक आहार न घेणे, गर्भवतीला रक्तक्षय असणे ही कारणे पण आहेत. तसेच स्त्री बाळंत झाल्यानंतर तिने दीड महिना आराम केला पाहिजे, कष्टाची कामे बिलकुल करू नयेत. कारण बाळंतपणाच्या वेळेस स्त्रीच्या शरीरावर ओटीपोटाच्या स्नायूंवर ताण आलेला असतो, त्याला आराम मिळून त्यांची ताकद पुनः भरून यायला तेवढा वेळ द्यावा लागतो.
आपल्या भागातील तरुण स्त्रियांमध्ये 1st 2nd डिग्री प्रोलाप्स दिसून येतात. परंतु त्यापेक्षा जास्त मात्र चुकून एखादीला दिसतो.
इथे सतोलीमध्ये मात्र २४ वर्षाच्या स्त्रीला इतक्या टोकाचा आजार पाहून मी विचारात पडले. तिथल्या नर्सचे मात्र म्हणणे पडले की हे खूप कॉमन आहे या पहाडी भागात. खूप स्त्रियांना असा आजार दिसून येतो. मी मात्र खूप अस्वस्थ झाले होते त्या स्त्रीला पाहून. तिच्या गर्भपिशवीला १५ दिवस औषधाने ड्रेसिंग करून, जखमा बऱ्या करून, सूज कमी होऊ देऊन मग तिचे ऑपरेशन करता येणार होते.
इतक्या कमी वयात हिला कसा काय पूर्ण प्रोलाप्स झाला ? हिने कमी त्रास असतानाच का नाही तपासणी करून घेतली ? हिला एक वर्षापासून इतका जास्त त्रास आहे, तर ही त्रास सहन करत कशी काय काम करत असेल ? डॉ. सुशील सरांशी बोलून माझ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली. तेथील गरिबी, भौगोलिक परिस्थिती, स्त्रियांवरचा कष्टांचा बोजा आणि आरोग्य सुविधांचा अभाव या सर्व गोष्टींमध्ये तिच्या आजाराचे मूळ सामावले होते. गरिबीमुळे लहानपणिपासूनचे कुपोषण, गर्भवतीला न मिळणारा पौष्टिक आहार, कष्टांची कामे, त्यात महत्वाचे म्हणजे जड गवताचे भारे डोक्यावरून वाहून नेणे. भौगोलिक परिस्थिती यासाठी की तिथल्या महाकाय डोंगरांवरून सततची चढ उतरण चालूच, त्यात डोक्यावर मोठाले गवताचे भारे किंवा इतर जड सामान. यामुळे स्त्रीच्या ओटीपोटात जास्त ताण येतो व तिथल्या स्नायूंवर, लिगामेंटस वरचा ताण वाढतो, पर्यायाने गर्भपिशवीचा सपोर्ट हळूहळू कमजोर होत जातो. तसेच भौगोलिक परिस्थितीचा आणखी एक तोटा की स्त्रीला बाळंतपणाच्या कळा सुरु झाल्यावर तिला तिच्या डोंगरातील प्रदेशातून आरोग्यसुविधा असलेल्या शहराच्या ठिकाणी जायला वाहन मिळत नाही. बऱ्याच वेळा तिला कॉटची पालखी करून काही किलोमीटर चढ उतार पार करून, तेथून डांबरी रस्ता असलेल्या ठिकाणी नेले जाते. तेथून मग बरेच पैसे मोजून शहरापर्यंत पोहोचवले जाते. ही पूर्ण प्रक्रिया होईपर्यंत बऱ्याच स्त्रिया घरीच बाळंत होऊन जातात. तर काही लोकांकडे वाहनासाठी पैसा नसल्याने, शहराची भीती वाटत असल्या कारणाने ते घरीच बाळंतपणाचा पर्याय स्वीकारतात. तिथे काही ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे व त्यापेक्षा लहान डीस्पेन्सरीज आहेत. परंतु तिथे एकही डॉक्टर व नर्स नसते. तिथे दाईच बाळंतपण करतात. एकदा मी तिथे दाई मिटिंग मधे सर्वांना प्रश्न विचारला की तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात का जात नाहीत ? तर एका दाईने सांगितले, “आम्ही नेतो तिथे स्त्रियांना, आम्हाला पण वाटते की औषधे मिळावीत, बाळंतपणे सुखरूप व्हावीत परंतु एकदा गेलो तर तिथे डॉक्टर, नर्स कोणीच नाहीत. वर पाणी पण नाही. शेवटी मीच इकडून तिकडून पाणी गोळा करून आणले आणि केले त्या बाईचे बाळंतपण.” यावर मी निरुत्तर झाले.
घरी होणाऱ्या बाळंतपणामध्ये स्त्रियांना रक्तस्त्राव होऊन त्यांचे मृत्यू होण्याचे प्रमाण बरेच आहे. तसेच कुपोषण आणखी वाढणे, रक्तक्षय होणे, जंतुसंसर्ग होणे, बाळ पोटातच किंवा जन्मल्यानंतर मरणे, बीपी वाढून फिट येणे, सतत गर्भपात होणे, अशी बरीच गुंतागुंत निर्माण होते.
बाळंत झाल्यावर या स्त्रिया बिलकुल आराम करत नाहीत. लगेच १-२ दिवसात त्यांची कष्टांची कामे सुरु होतात. हेसुद्धा तरुण वयामध्ये प्रोलाप्स होण्याचे महत्वाचे कारण आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व नर्स नसल्याने त्यांना कुंटुंब नियोजनाबद्दल माहिती द्यायला कोणीही उपलब्ध नाही. त्यामुळे प्रत्येक स्त्रीला दरवर्षी मुल होते व प्रत्येकीला कमीत कमी ४ मुले तरी होतात. एक गर्भवती स्त्री तर १० व्या वेळेस गरोदर होती, कारण पहिल्या ९ ही मुली होत्या.
संध्याकाळी आम्ही हॉस्पिटलमधून सुकूनकडे, म्हणजेच आमच्या राहण्याच्या ठिकाणी परत जाताना माझे मन खूप उदास होते. काही केल्या त्या स्त्रीला मी विसरू शकत नव्हते. सुशील सरांशी चर्चा करत रस्ता संपत होता. आता मला समजत होते की यांना स्त्रीरोग तज्ञाची इतकी तातडीची गरज का आहे ते. पुढचा माझा महिना पूर्ण प्लान केला होता. पहिले ८ दिवस मोबाईल मेडिकल युनिट म्हणजेच फिरत्या दवाखान्यासोबत स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम करणे, नंतर १५ दिवस दाई प्रशिक्षण कार्यक्रम आखणे व राबवणे आणि शेवटचे ७ दिवस पिंडारी ट्रेक मध्ये डॉक्टर म्हणून जॉईन होणे.
डॉ. हिमांशु सोबत आरोहीच्या हॉस्पिटलमध्ये डॉ. तेजस्वी म्हणून डेंटिस्त काम करते. ती शेजारच्या एका शहरातून जॉबसाठी तिथे आलेली. तिच्याकडे पाहिले की पहाडी सौंदर्य काय याचा प्रत्यय मला आला. सफरचंदासारखे गुलाबी गाल आणि लाघवी बोलणे हे तिचे स्पेशल फीचर्स. तिच्या गोड स्वभावाने आमची पक्की मैत्री जमली. मला सर्व माहिती सांगणे, तिथे अडजस्ट होयला मदत करणे, तेथील स्टाफशी ओळख करून देणे असे सगळे ती प्रेमाने करायची.
माझ्यासोबत आणखी २ मुली रिंकी व भावना तिथे नर्स म्हणून जॉईन झाल्या होत्या. दोघी पण पहाडी मुली. परंतु माझ्यावर त्यांचे फार प्रेम. तसेच कामात भरपूर उत्साह. सतत मला हे शिकवा , ते शिकवा म्हणून मागे लागणार. यातील भावना माझ्यासोबत फिरत्या दवाखान्यासाठी येणार होती. तर मुन्नी दीदी म्हणून, बऱ्याच वर्षांपासून आरोही सोबत काम करणारी, पेशंटच्या रजिस्ट्रेशनची जबाबदारी सांभाळणारी व स्टाफची व्यवस्थापक म्हणून काम पाहणारी बोल्ड स्त्री होती. एक त्रास देणारी नर्स पण होती. फार्मसी सांभाळणारा तरुण प्रदीप, रक्त तपासणी करणारे जगदीशदा , एक्स रे करणारे प्रकाशदा असे सारे माझ्या चांगल्या ओळखीचे झाले होते. आमची छान टीम जुळली होती. पुढचे ८ दिवस फिरत्या दवाखान्यामध्ये आम्ही सारे एकत्र काम आणि फुल दंगामस्ती करणार होतो.

2/3/17

Body positivity

शाळेतील मुलींना आरोग्य मार्गदर्शन करताना, मी त्यांना body positivity शिकवते , स्वतःच्या शरीराला स्विकारायला आणि सुंदर मानायला शिकवते.
आणि तीच मी कपड्यांच्या दुकानात जाते , तेव्हा माझ्या मोठ्या size चे कपडे हवे तसे मिळत नाहीत, limited stock पाहून स्वतःच्या शरीराचा तिरस्कार करते ,
तेव्हा मी किती confident आणि किती insecure या विचाराने गोंधळून जाते.
माझा नाराज चेहरा पाहून , counter मागची बारीक मुलगी जेव्हा म्हणते की ताई, तब्येत तुझ्यासारखीच हवी. आमच्यासारखी बारीक काय कामाची , तेव्हा धड ती पण सुखी नाही आणि मी पण नाही , याचा मला साक्षात्कार होतो.