Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..

7/19/11

पाऊस आणि मी

          दुपारचं ढगाळ वातावरण.. भर दुपारी अंधारून आलेलं.. मंतरलेलं.. गारठलेलं..
आणि मग हलकेच अवतरणाऱ्या पावसाच्या झिम्म लडी.. खिडकीतूनच पाहत राहते पावसात 
चिंब भिजणारा हिरवाकंच निसर्ग..
वय वाढत गेलं की सारं कसं कृत्रिम होत जातं.. निसर्गाचं साधं सोप्पं असतं, पाऊस आला कि भिजायचं.. माणूस मात्र सगळीच गुंतागुंत करतो.. पाऊस पाहून चटकन आवेग येतो भिजावं म्हणून.. पण माणूस त्या आवेगाला शांत करतो.. चेहरा मख्खच ठेवून विचार करत राहतो, भिजावं की नको यावर.. कपडे खराब होतील, केस भिजतील, आजारी पडू इथपासून इतर लोक काय म्हणतील इथपर्यंत  सारे हिशोब होतात.. आकडेमोडीत पाऊस नेहमीच शून्य ठरतो.. 
          सारे विचार दूर फेकून देऊन मी धाडधाड जिना उतरून खाली येते.. अंगणात येताच सरी मला कुरवाळतात.. ओल्याकंच मातीचा गंध ऊर भरून घेताना मन विरघळून जातं.. माझं सारं शरीरच भुसभुशीत काळ्या मातीसारखं फुलून येतं, पावसाचा थेंब अन थेंब टिपायला.. पाऊस हळूहळू वाढत जातो आणि ओलाकंच झालेला माझा देह..तोही पावसाची एक सरच बनून जातो..  आधी थंड वाटणारे पाणी आता ओळखीचे होऊन जाते आणि थंड शिरशिरी हाडामासात रुजून जाते.. पाऊस.. मला माझ्या असण्या -नसण्यासकट  स्वीकारून, त्याच्यात सामावून घेणारा पाऊस.. त्याच्या ओल्या गर्भाची ऊब साऱ्या जगण्यावर पांघरणारा.. पाऊस....
             हळूहळू पुन्हा अस्तित्वाचे भान येऊ लागते.. आता मात्र कमाल झाली.. पावसाचा स्पर्श झेलण्यासाठी मला माझा देहही अपुरा वाटू लागतो.. या देहावरील कातडी तिची मर्यादा कशी ओलांडणार.. हे अपुरेपणाचे भान येताच मी असोशी होऊन डोळे उघडते.. समोरच  भला थोरला पारिजातक उभा.. तो ओला हिरवाकंच वृक्ष पाहून मला हेवा वाटतो त्याचा.. वाटते आपणही एक भव्य वृक्षच होऊन जावे.. मुळ्यानी मातीला घट्ट पकडून ठेवावे आणि असंख्य फांद्या अंगाखांद्यावर डवरून पावसात भिजत रहावे.. खूप साऱ्या फांद्यांना अगणित पाने.. त्या साऱ्या अगणित पानांनी पाऊस प्यायला किती किती छान वाटेल, आनंद वाटेल.. पारिजातक बनून पाऊस अंगावर घ्यायचा.. प्रत्येक अणूरेणू वरून पावसाचे थंड थेंब ओघळताना शहारे येतील साऱ्या अस्तित्वावरच... थरथरून उठेल सारी हिरवी काया.. हो आणि मुळ्यानीही शोषून घ्यायचे मातीत गेलेले पाणी.. म्हणजे वरपासून खालीपर्यंत पाऊसमय  होऊन जायचे.. पाऊस नसानसात रुजवायचा.. आनंद अंगामध्ये भिनवायचा... आणि मग प्राजक्ताच्या असंख्य कळ्यामधून, फुलांमधून बहरून यायचे.. तो बहरण्याचा सोहळा किती अप्रतीम असेल..  प्रत्येक आनंदलहरीसोबत फुले फुलतील माझ्या फांदीफांदीवर.. खळखळून मी हसेल तेव्हा अंगण भरून सदा पडेल केशरी देठाच्या दुधाळ प्राजक्त फुलांचा.. शाळकरी पोरी येतील गोळा करायला फुले.. त्यांच्या इवल्या इवल्या ओंजळीमध्ये मावतील तेवढी फुले घेऊन धूम ठोकतील.. मी मात्र समाधानाने गहिवरेल.. पुन्हा पुढच्या पावसाची वाट पाहत उभी राहीन मी उन्हातान्हात सारं पानभरलं हिरवं अस्तित्व सावरून आवरून घेत..!!

1 comment:

  1. वाचताना वाटल कि मी पण पावसात जाव आणि भिजावं ...

    ReplyDelete