Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..

7/25/11

स्वप्न

कदाचित कधीतरी जागी होईन मी या स्वप्नातून आणि असेन तुझ्याजवळच..!
तुझा हात उशाला घेऊन विसावली असेन आणि
अर्धवट झोपेच्या गुंगीत हे दु:स्वप्न पाहत असेन.
ही झोप संपेल तशी मी जागी होईन आणि असेन तुझ्याजवळच...
तुझा विरह म्हणजे जणू मी झोपेत रचलेलं दु:स्वप्नच..!
किंवा कदाचित असंही असेल की, मी डोळे उघडेन तेव्हा
आपण दोघे एकच असू, एकच एक, एकसंध..एकरूप..
हे द्वैत, तू वेगळा आणि मी वेगळी, हे द्वैत केवळ एक भ्रमच ठरेल मग.
डोळे उघडून पाहू तेव्हा असू आपण एकसंधच..!
किंवा डोकावली असेन मी एका नितळ जलाशयात
आणि साकारला असशील तू माझ्याच प्रतिबिंबातून..!
कधी आपणच आपले प्रतिबिंब ओळखू शकत नाही
आणि होतो वेगळ्याच व्यक्तीचा भास.. तसेही असेल कदाचित..!
त्यातूनच ही दुही निर्माण झाली असेल,
पण पुन्हा चेतना जागृत होईल तेव्हा जाणवेल आपल्याला
की तू आणि मी आहोत एकच गाभ्यामध्ये..!
तुझा आणि माझा आभाळदेह असेल एकच,
फक्त धरतीवर पडलेल्या सावलीचे झाले असतील कदाचित दोन स्वतंत्र तुकडे..!
पण जाग येईल साऱ्या भ्रमातून तेव्हा एकच असू आपण दोघे...
कदाचित असंही असेल की विश्वाच्या या तीन मितींमध्ये आपण असू सुटे सुटे , स्वतंत्र..
परंतु जिथे या विश्वाची चौथी मिती असेल,
तिथे मात्र आपण जोडलेले असू अगदी प्रत्येक अणुरेणूसकट..!
तिथे मग वेगळे असण्याचा प्रश्नच नाही.. तिथे असू एकरूप..
या तीन मितींमधील विरह निवळेल धुक्यासारखा त्या चौथ्या मितीमध्ये 
आणि भेटूच आपण त्या अखेरच्या बिंदूवर एखाद्या भ्रमविरहित क्षणी...!! 

No comments:

Post a Comment