माझ्यासोबत रहा.. माझ्यासोबत थांब...
तुझा हात हातात घ्यायचा आहे कायमसाठी...
पूर्वी एकदा पकडला होता तुझा हात, पण तो गरज म्हणून, मदतीसाठी...
खूप दुर्बल होते, अगतिक होते; तेव्हा हक्काने तुला हाक मारली आधारासाठी
आणि तूही मोकळेपणाने आलास मला सावरायला..
नंतर त्याच हक्काने तू दूर झालास आणि मीही जाऊ दिले तुला
आत्मनिर्भर होण्यासाठी; स्वत:ला ओळखण्यासाठी..
एकटीच लढत राहिले, ढासळलेले दुवे सांधत राहिले.
आता समर्थ झाले आहे स्वत:बद्दलच्या नव्या जाणीवेने..
नव्यानंच सुरु करते आहे पुन्हा जगायला आत्मसन्मानासहित..
या सशक्त जाणीवेनं तुझा हात हातात घ्यायचा आहे
निखळ सोबतीसाठी, कुठल्याही अपेक्षेविना..प्रगाढ विश्वासानं..!!
No comments:
Post a Comment