Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..

4/24/12

तू येशील तेव्हा...

तू येशीलही कदाचित..
काळाच्या कुठल्यातरी बिंदूवर असेल ठरवलेली तुझी माझ्याकडे परतण्याची वेळ.
वाट पाहीन मी.. पण तू येशील तेव्हा मी असेन का रे जिवंत..?
तू येशील तोपर्यंत तग धरू शकेल का माझं कमकुवत मन..
की मोडून पडेल मी एखादं झाडं वादळात भुईसपाट व्हावं तशी..
थरथरतोय जीव आत्ताच. 
निराशेची काजळी चढू लागते मनाच्या नितळ आरश्यावर माझ्याही नकळतपणे.
तशी प्रयत्न करतेच आहे रे मी मनावर ताबा ठेवण्याचे. अगदी जागता कडक पहारच ठेवला आहे मी मनावर.
उगाच अडकू नये त्यानं कुठल्याही भुलभुल्लैयात नि गुंतू नये कुठल्याच वांझ भावनांमध्ये विनाकारण.
पण तरीही एखाद्या अनामिक क्षणी अंधाराची भुतावळ हळूहळू गर्दी करू लागते रे मनामध्ये..
मग मनही खचतं, निराशेनं ग्रस्त होऊन कोसळू लागतं गर्तेमध्ये
आणि मी पाहत राहते असहाय्यपणे..
अशी एखादी काळीकुट्ट रात्र मी कशी जागून काढते ते माझं मलाच माहित.
नाहीच कधी समजणार तुला, अश्या कित्येक रात्रींचे हल्ले मी कसे परतवून लावते.
पण मी आता थकते आहे हळूहळू.. कधीतरी हार मानावी लागेल की काय याची काळजी वाटतेय.
आणि तसं झालं ना तर त्या जखमा नाही पेलू शकणार माझं काळीज..
म्हणूनच विचार करते, तू येशील तेव्हा मी असेन का रे..?
तू येशील तोपर्यंत राहील का रे मी जिवंत मनाने..?
का भान सुटलं असेल माझं वास्तवाचं आणि गेली असेल मी जाणीवांच्या पलीकडे..!
स्वीकारू शकशील कारे तू मला तशाही अवस्थेत..? की पुन्हा एकदा नाकारून निघून जाशील कायमसाठी..?
पण..पण तू येशील तेव्हा मी असेन का रे ?

2 comments: