Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..

9/10/13

गणपती बाप्पा मोरया !

गणपती बाप्पा .. लहान थोरांचा लाडाचा बाप्प। . त्याच्या नुसत्या येण्यानेच वातावरणात आनंदी आनंद पसरतो आणि मन उत्साहाने भरून जाते . असा हा बाप्पा .. यांची आणि ऐट तर किती यांना आणायला जायला सगळ्यांनाच उत्साह येतो. मला तर लहानपणी पासूनचा असा एकही गणपती सन आठवत नाही की माझ्या लाडक्या गणरायाला आणायला मी स्वतः बाजारात गेले नाही .. माझ्या दादाला गोड गोड बोलून सजावटीच्या कामात गुंतवायचं आणि पपासोबत गणपतीला आणायला पळायचं . कधी दादा मस्त मातीचा गणपती बनवायचा आणि मग दोन्ही गणपती सजावटी मध्ये विराजमान व्हायचे . काल पपा आणि मी गणपती घ्यायला गेलो तर किती विविध रुपातले गणपती .. प्रत्येकाचे वेश वेगळे , रंग वेगळे , भाव वेगळे .. कोणी बालगण पती तर कोणी शंकर रूपातील .. कोणी कृष्ण होऊन बासरी वाजवतोय तर कुठे शेषशायी विष्णू होऊन आराम करणारा . कोणी दगडूशेठची प्रतिकृती तर काही ओबड धोबड साधे गणपती . मोठ्या आणि छोट्या सर्व मंडळांचे आधीच ओर्डर देवून तयार झालेले गणपती . मला तर सारेच्या सारे पहायचे होते. आम्ही सर्वत्र गोल गोल फिरत होतो. मधेच समोर पोरांचा घोळका आला . ( डोक्याला गणपतीची केशरी पट्टी बांधली की पोरे मस्त राजस दिसतात ) त्यांचा मंडळाचा गणपती हातात घेऊन निघाले होते. मी तर क्षणभर त्या रुबाबदार मूर्तीकडे पाहिलं आणि माझ्या गालावर हसू उमटला कौतुकाच . कारण गणेशाच्या डोक्या ऐवजी तिथे हत्तीचे डोके होते. अगदी हत्तीचे अस्सल सावळे निर्मळ कसलाही दागिना किंवा रंगरंगोटी न केलेले. त्यामुळे ती गणेश मूर्ती इतकी राजबिंडी सुरेख दिसत होती कि तिच्या कडे पाहून मी प्रेमात पडले . तिची कल्पना ज्याला सुचली असेल त्याला मनामध्येच मी दाद दिली . त्या प्रेमाने आणि कौतुकानेच मला हसू फुटलं आणि त्या गणरायाला नेणारी मुले पण आनंदाने हसली . तेव्हा विचार आला माणूस गणरायाला किती वेगळी वेगळी रूपे देतो .. हवी तशी . मनात येईल तसा माणूस गणपती मूर्ती घडवतो आणि हा मोठ्या मनाचा बाप्पा ही कसलाही अहंकार न बाळगता सर्व रूपे स्वीकारतो . तेवढ्याच प्रेमाने . असा हा बाप्पा मग तो सोन्या चांदीचा असो किंवा चिखल मातीचा कशानेशी त्याच्या दिमाखात उणेपणा येत नाही . तो विराजतो जसा श्रीमंताच्या राजवाड्यात किंवा प्रसिद्ध मंदिरात तसाच तो विराजतो गरीबाच्या झोपडीत सुध्दा . कशानेच त्याच्या देवत्वाला बाधा येत नाही . सगळ्यांचा याच्यावर एकसमान हक्क भक्तीचा आणि मायेचा . असा हा माझा , तुमचा आमचा सर्वांचा लाडाचा गणराया . गणपती बाप्पा मोरया !

1 comment: