Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..

3/3/17

तुमच्या आयुष्याची किंमत किती ?


तुमच्या आयुष्याची किंमत किती ? समजा मी म्हटलं तुम्हाला की मला विकत घ्यायचेय तुमचे आयुष्य, तर किती किमतीला विकाल ?
काय म्हणता ? कशासाठी विकत हवेय ? नाही, ते मी नाही सांगणार. त्याचे पुढे परिणाम काय होतील हेही नाही सांगणार.
बरं, चला तर मग, लवकर सांगा, कितीला विकणार आयुष्य ?
काय ? नाही विकू शकत असं ?
मग एक काम करा. पूर्ण आयुष्य नका विकू. रोजच्या दिवसातील काही तास विका. हे तर जमेल की अगदी.
काय ? हे पण नाही.
आता मात्र कमाल करता हं राव. रोज तर तुम्ही तुमचे कितीतरी तास असेच फुकट देऊन टाकता, काहीजण तर आख्खं आयुष्य फुकट देता दुसऱ्याला, काही शरीर देता फुकट तर काही अख्खा मेंदू, मन,भावना फुकटात देऊन टाकता, आणि मी मात्र तुम्हाला हवी ती किंमत देऊन मागतेय, तर देत नाहीत ?
आवडत नसलेली नोकरी केवळ पैसा हवा म्हणून करता, पैसा का हवा तर समाजात प्रतिष्ठा मिळावी म्हणून, तेव्हा स्वतःला विकताच की हो तुम्ही.
महागाचे कपडे,आवडत नसले तरी, भर उन्हाळ्यात गरम होत असले तरी त्रास सहन करत घालता, का तर समजात स्टेटस दाखवण्यासाठी, तेव्हा त्या काही तासांसाठी तुमचे शरीर फुकट देताच की तुम्ही लोकांसाठी.
एखादी स्त्री लग्न झाले म्हणून, सासरच्या लोकांमुळे, तिच्या आवडीच्या गोष्टींना कायमचा रामराम ठोकते, तेव्हा ती तरी वेगळे काय करते ?
आणि तीच एखादी स्वयंपूर्ण उच्चपदवीधर स्त्री ऑफिसमध्ये स्टेटस दाखवण्यासाठी उंची मेकअप करते, आवडत नसले तरी हानिकारक केमिकल्स वापरते, तेव्हा ती तरी वेगळे काय करते ?
चार चौघात प्रतिष्ठा म्हणून दारू पिली जाते, पार्टी संस्कृती आवडत नसताना हॉटेलिंग केले जाते, परवडत नसताना कर्ज काढून कार विकत घेतली जाते, मुलाला कोणत्या शाळेत घालायचे हे सुधा शेजारचे लोक ठरवतात, किराणा घेण्यासाठी मॉलमध्ये जातो हे अभिमानाने सांगितले जाते. आपण वेळ नाही या सबबीखाली आपले सर्व छंद सोडतो, मन मारून दिवस काढतो.

हे सर्व काय आहे ? आयुष्य दुसऱ्याला देणेच नाही का ? आणि त्या बदल्यात काय मिळते आपल्याला ? सततचा तणाव, चिडचिड, मानसिक अस्वस्थता, काळजी, झोप न येणे, पाठदुखी, कंबरदुखी, बीपी, शुगर, लठ्ठपणा .......मानसिक व शारीरिक व्याधी.
मेंदू तर आपण सोशल साईट, फेसबुक, व्होट्स अप, जाहिराती, राजकारणी, टीवी या सर्वाना देऊन टाकला आहे, त्यामुळे फिलोसोफी, अध्यात्म या गोष्टीसाठी आपल्याला वेळ व इच्छा पण नाही.

मग बघा.. कसला घाट्याचा सौदा करताय तुम्ही ? परवडतेय ??

1 comment:

  1. हा तुमचा लेख एकदम मेंदूत घुसला
    खरचं की आपण आयुष्य असच जगत आलोय

    ReplyDelete