Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..

1/30/18

छत्तीसगड

सध्या मी छत्तीसगड या राज्यात, आदिवासी बहुल व नक्षल ग्रस्त अशा भागात, बिजापूर या ठिकाणी, सरकारी जिल्हा रुग्णालयात 'स्त्री रोग तज्ञ' म्हणून काम करत आहे. इथे लोकांना असंख्य समस्या आहेत. कुपोषण आणि आरोग्याच्या असंख्य प्रश्नांनी, दररोजच्या मरण्याने इथले आदिवासी ग्रस्त आहेत.या सर्वात एक आशेचा किरण आहे, तो म्हणजे २ वर्षापासून इथे कार्यरत असलेले जिल्हाधिकारी डॉ. अय्याज तांबोळी, ज्यांनी आरोग्य, रस्ते, रोजगार व शिक्षण या क्षेत्रात अनेक वेगवेगळी कामे राबवून, विकास घडवून आणल्याने, या प्रदेशात एक नवीन आशादायी बदल होत असल्याचे चित्र पाहायला मिळतेय. अय्याज सरांच्या कामाबद्दल माझा दीर्घ लेख साधना साप्ताहिकाच्या १२ जुलै २०१७ च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. तो मी इथेही प्रसिद्ध करेन. तसेच अलीकडे माझा मित्र मकरंद दीक्षित याचाही लेख २ भागामध्ये, लोकप्रभाच्या १९ व २६ जानेवारी २०१८ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. मकरंद मुंबई चा असून, त्याने पूर्ण वेळ सामाजिक कामात वाहून घेतले आहे. डिसेंबरमधे १० दिवस तो बिजापुरला येऊन राहिला आणि त्याला आलेल्या अनुभवावर त्याने लोकप्रभा मधे खूप सुंदर लेख लिहिला आहे.
मला आयुष्यात ध्येयाने वेडावलेली, अफाट काम करून दाखवणारी, स्वतःची बुद्धी व उर्जा समाज हितासाठी वापरणारी माणसे भेटली की मी भारावून जाते अशा व्यक्तींच्या दर्शनाने. मग ते डॉ. अभय बंग, डॉ. रानी बंग असोत, डॉ. प्रकाश आमटे असोत, विकास आमटे असोत किंवा आमचे छत्तीसगडस्थित बिजापुरचे जिल्हाधिकारी डॉ. अय्याज तांबोळी असोत. अशी माणसे स्वतः तर मोठे कार्य घडवातातच पण दुसऱ्यासाठीही एक मोठा आदर्श निर्माण करतात.
इथे छत्तीसगड मधे काम करताना, डॉ. अय्याज तांबोळीची कार्यशैली आणि मैत्री जवळून पाहायला मिळाली. त्यांच्यासाठी लिहिलेली ही कविता.


हिरवं हिरवं जंगल
दाट दाट झाडी
कमळांनी भरलेले तालाब
आभाळाला टेकणारे महाकाय वृक्ष
या साऱ्या उत्कट निसर्गात
गर्द हरवलेली माणसांची
छोटी छोटी खेडी..घरे.
आणि या सगळ्यावर उमटलेली
तुमच्या शुभ्र कर्तृत्वाची मोहोर
हे सारं सारं तर आवडतं मला..


उघड्या नागड्या पोरांना
छातीशी धरणार्या
अतिसुंदर आणि अतिकठीण आया.
पोटातील भूक गच्च दाबून
गोड हसणार्या आदिवासी बाया..
जंगलात लाकूड, करवंदे, महूआ
ढुंढाळणारे हे जंगल वासी.
या सर्वांवर मायेची पाखर धरणारे
त्यांच्या जगण्याचा टेकू बनणारे ,
आधार देणारे तुमचे काम..
त्या कामामागचा तुमचा कळवळा
तुमची दूरदृष्टी
तुमचा सारासार विचार
हे सारं सारं तर आवडतं मला..


तुमच्याकडे कोणतीही अडचण
घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला
तुमच्याकडून
मिळणारा दिलासा
एखाद्या अवघड समस्येवर
तुमच्याकडे असलेले असंख्य उपाय
समोरच्या व्यक्तीला समजून घेऊन
तुमच्या विशाल अंतरंगात
सामावून घेणारे
तुमचे प्रेमळ, सहज भान
तुमचे हसून बोलणे,
सांभाळून घेणे
हे सारं सारं आवडतं मला..

हेच तर बळकट करते आयुष्यावरची श्रद्धा
आणि तुमच्यावरचा विश्वासही.

3 comments:

  1. अशी सामाजिक कार्य करणारी डॉक्टर मंडळी यांना माझा सलाम

    ReplyDelete