कधी कधी एखादी वाट मोहात पडते, अनोळखी असूनही आपण घेतो ती इतर सरळ मार्ग सोडून.. कधी पुढे जाऊन त्या वाटेवर अडखळतो, हरवतो. वेळीच समजतं की पुढे चालणं जमणार नाही; मग वळून परत येतो. पण ती मोहाची वाट पुन्हा पुन्हा खुणावेल, म्हणून मग एखादा दगड लावून देतो खुणेसाठी, ती वाट कायमची बंद करण्यासाठी. पण तीच तर चूक होऊन बसते.. इतर असंख्य वाटांवरून आयुष्य धुंडाळता धुंडाळता क्रॉस ओव्हर होऊन त्या जुन्या वाटेशेजारून निघताना आपण ठेच खात राहतो पुन्हा पुन्हा त्या खुणेच्या दगडाशी.. आणि ती ठणकणारी ठेच पुन्हा पुन्हा आठवण करून देत राहते त्या निश्चयाने दूर ठेवलेल्या पण मोहवणाऱ्या वाटेची..! मग कळून चुकतं, पूर्वी जर तो दगड तिथे लावलाच नसता, तर अशी ठेच बसली नसती आणि इतर असंख्य वाटांमध्ये ही वाटही विरघळून गेली असती अलगदपणे, मागे कसलीही खूण न ठेवता..!!
Pages
Welcome...
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..
Labels
- Love (1)
- कविता (23)
- मीराची डायरी (17)
- ललित (32)
- संवाद (6)
- सुचेल ते.. (10)
- हिंदी कविता (3)
7/31/11
"U" turn
" आयुष्यातील वेगवेगळे रस्ते..
काही फक्त पुढे पुढेच नेत राहतात..one way सारखे.. त्यावरून वळून मागे नाही परतता येत..
पण म्हणून नाराज नाही व्हायचं स्वत:वरच..
कारण काही रस्त्यांवर मात्र असते सोय... " U " turn ची... "
" नकोस.."
नकोस येऊ इतुकी जवळ
की तुला लपवणं
होईल अशक्य..
नकोस जाऊ इतुकीही दूर
की तुला विसरणं
होईल सहजच शक्य..
नकोस अशी येऊ सामोरी
आसवांना थांबवणं
तूच सांग, कसं जमेल मला..?
पाहीन तुला दुरूनच
तेव्हाच हे जगणं
कदाचित जमेल गं मला..!
7/25/11
स्वप्न
कदाचित कधीतरी जागी होईन मी या स्वप्नातून आणि असेन तुझ्याजवळच..!
तुझा हात उशाला घेऊन विसावली असेन आणि
अर्धवट झोपेच्या गुंगीत हे दु:स्वप्न पाहत असेन.
ही झोप संपेल तशी मी जागी होईन आणि असेन तुझ्याजवळच...
तुझा विरह म्हणजे जणू मी झोपेत रचलेलं दु:स्वप्नच..!
किंवा कदाचित असंही असेल की, मी डोळे उघडेन तेव्हा
आपण दोघे एकच असू, एकच एक, एकसंध..एकरूप..
हे द्वैत, तू वेगळा आणि मी वेगळी, हे द्वैत केवळ एक भ्रमच ठरेल मग.
डोळे उघडून पाहू तेव्हा असू आपण एकसंधच..!
किंवा डोकावली असेन मी एका नितळ जलाशयात
आणि साकारला असशील तू माझ्याच प्रतिबिंबातून..!
कधी आपणच आपले प्रतिबिंब ओळखू शकत नाही
आणि होतो वेगळ्याच व्यक्तीचा भास.. तसेही असेल कदाचित..!
त्यातूनच ही दुही निर्माण झाली असेल,
पण पुन्हा चेतना जागृत होईल तेव्हा जाणवेल आपल्याला
की तू आणि मी आहोत एकच गाभ्यामध्ये..!
तुझा आणि माझा आभाळदेह असेल एकच,
फक्त धरतीवर पडलेल्या सावलीचे झाले असतील कदाचित दोन स्वतंत्र तुकडे..!
पण जाग येईल साऱ्या भ्रमातून तेव्हा एकच असू आपण दोघे...
कदाचित असंही असेल की विश्वाच्या या तीन मितींमध्ये आपण असू सुटे सुटे , स्वतंत्र..
परंतु जिथे या विश्वाची चौथी मिती असेल,
तिथे मात्र आपण जोडलेले असू अगदी प्रत्येक अणुरेणूसकट..!
तिथे मग वेगळे असण्याचा प्रश्नच नाही.. तिथे असू एकरूप..
या तीन मितींमधील विरह निवळेल धुक्यासारखा त्या चौथ्या मितीमध्ये
आणि भेटूच आपण त्या अखेरच्या बिंदूवर एखाद्या भ्रमविरहित क्षणी...!!
माझ्या जिवाचं पाखरू नाचतं..
फांदी फांदीवर
पानां पानांवर
माझ्या जिवाचं पाखरू नाचतं
तुझ्या मनाच्या झाडावर..
कुंपणाच्या कडेला
घराच्या आडोश्यात
माझ्या जिवाचं पाखरू नाचतं
तुझ्या मनाच्या अंगणात..
रातीच्या काळोखात
काजव्यांच्या दिव्यात
माझ्या जिवाचं पाखरू नाचतं
तुझ्या काळजाच्या सावलीत..
थंड या पाण्यात
खोल खोल खोलात
माझ्या जिवाचं पाखरू नाचतं
तुझ्या काळजाच्या डोहात..
हिशोब
बुद्धानं सांगितलेल्या सत्याचा
पडताळा घ्यावा म्हणून
भरलं मी सारं दु:ख
एका गाठोड्यात नि
फिरायला लागले
दारोदारी विचारत
" कोणी वाटून घेणार
का माझं दु:ख ? "
ओझं हलकं करावं
म्हणून हा खटाटोप..
तर हाय रे दैवा.!
पहिल्याच दारी तू भेटलास
अन दु:खाचं ते गाठोडं
झालं दसपटीनं जड..!
7/23/11
सांजवेळ
संध्याकाळी वेळी-अवेळी उगाचच हळवं व्हायला होतं..
उगाचच एखादी चिमणी मनात उसासते आणि बांधून ठेवलेलं सारंच बंध तोडून बाहेर पडू पाहतं. मनाची ही चुकार खोड माहीत असते म्हणून मुद्दाम हुरहूर लावणारी ती सांजवेळ चुकवण्यासाठी कठोरपणे मनाला एखाद्या अवघड कामात अडकवावं तर सगळं काही सुरळीत चाललयं असं वाटत असतानाच उगाचच एखादी चिमणी मनात उसासते आणि गळ्यात कोंडून ठेवलेला हुंदकाही बिनबोभाटपणे बाहेर पडतो. आवरून सावरून शहाणं केलेलं मनही मग बंद करून उठतं, ते त्याचा हक्क मागू लागतं हळवं होण्याचा.. आणि हळवं होऊन त्यानं नित्यनेमानं काय करावं तर एकच ठरलेलं काम.. तुझ्या आठवणींत गुंग होणं. आधी तुझी आठवण काढून मोहरतं, आनंदतं; मग अचानक तुझं दूर असणं त्याला जाणवतं आणि मग बसतं झुरत तुझ्यासाठी पूर्ण सांजभर.. जणू ही संध्याकाळची वेळ म्हणजे त्याची हक्कानं वेडं होण्याची, तुझ्यासाठी झुरण्याची. ऐकतच नाही ते माझी कुठलीच शहाणपणाची गोष्ट. अगदी हटूनच बसतं.. मग मीही त्याला समजावण्याचे सारे प्रयत्न सोडून देऊन, हताशपणे पाहत बसते त्याच्याकडे.
खरंतर हे सारं आवडतं मलाही, पण तूच सांग इतका हळवेपणा बरा आहे का.. अशानं मग आयुष्यच अडकून राहील ना रे जुन्या आठवणींच्या गुंत्यामध्ये.. नवे धागे जोडणं अशक्यच होईल रे मग मला.. ते तुला तरी आवडेल का..?
म्हणूनच अलीकडे हुसकावून देते साऱ्या हळव्या चिमण्या, नाहीतर खाऊन टाकतील त्या माझ्या नव्या आयुष्याची इवलीशी रोपं..
आपलं नातं
कधी वाटतं आपलं नातं
या जगाच्या मर्यादा ओलांडून पार पल्याड पोहोचलं आहे.
काहीही झालं तरी नाही तुटायचं हे.
तू भेट, न भेट.. तरी हे नातं राहील अभंग कायमसाठी..
तू कितीही दूर असलास तरी
माझ्यासाठी असशील फक्त एका हाकेच्या अंतरावर.
जशी फुलं फुलत राहतात; कळ्या उमलतात; पाकळ्या गळतात; सुकतात.
तरी पुन्हा नव्या कळ्या जन्मतात नव्या दिमाखात; तसंच आपलं नातं..
क्षुल्लक घटनांनी, तात्पुरत्या दुराव्यानी
नाही यायची आच त्यावर...
माझा विश्वास आहे..
जास्त टिकाऊ
इतके दिवस स्वत:च्याच हातांनी स्वत:चेच आयुष्य टराटरा फडत गेले.. आता वयासोबत शहाणपण आलंय. मग काय, प्रयत्न करत राहते जमेल तसं ते पुन्हा शिवायचा आणि परत पाहिल्यासारखं ते अखंड करायचा.. पण होतं काय, शिवणीचे धागे दिसतातच ना.. बुडाला लावलेली ठिगळं बूड उचललं की दिसतातच ना..!
असू दे.. पण यातही एक गम्मत कळलीये.. शिवून जरी पहिल्यासारखं नाही झालं ना, तरी या चीन्ध्यातून नवंच काही आकार घेऊ पाहतेय.. कदाचित पहिल्यापेक्षाही जास्त ऊबदार, जास्त मनोहर आणि जास्त टिकाऊ..!!
7/22/11
तिची विमानं..!!
" बघ ना, आता मोबाईल, इंटरनेट सारं आहे. पत्राची गरजच उरली नाही. तो तुझ्यापासून कितीही दूर असला ना तरी नव्या तंत्रज्ञानाने प्रत्यक्षात असतो एका 'call च्या ' कक्षेमध्ये, नाहीतर एका 'mail च्या' अंतरावर..."
"पण खरं सांगू का, ते एक click करणं नाहीच जमत मला..मग त्याच्या आठवणींचे माझ्या कवितांमधील किस्से माझ्या जवळच राहतात.."
" का गं..? "
" असं वाटतं की त्या साऱ्या आठवांचे ठसे पांढऱ्या शुभ्र कागदांवर उमटवावेत; खाली माझं नावही टाकू नये. मग त्यांची मस्त मस्त विमानं बनवावीत आणि अलगद सोडून द्यावीत वाऱ्याच्या तरंगावर.. मग त्यांनीही उडत उडत जाऊन, निमूटपणे त्याच्याच तळव्यावर विसावावं.. काळजीपूर्वक त्यानं एकेक ओळ वाचावी... बास्स.. एव्हढंच..! पुढे रस्ता बंद.. काहीच नको..!! "
साचे
" गणपती बनवण्यासाठी जसे साचे असतात ना, तसेच माणसे बनवण्यासाठी पण हवे.."
" का गं, तुला कसला साचा हवा आहे तुझ्यासाठी..? "
" नाही, मला नकोय साचा.. उलट साचेबंद आयुष्य आणि साचेबंद माणसं जीव घुसमटवतात माझा.. "
" का गं बाई..? "
" अरे हे डोक्यावरचं आभाळ असंच मोकळं ढाकळं हवं. विशाल निवांत निराकार. त्याला उगाच एखाद्या खुराड्यामध्ये बंदिस्त करायला नाही आवडत मला.. "
" अन ते साच्यांचं काय म्हणत होतीस..? "
" ते साचे होय... ते तुझ्यासारख्या लोकांसाठी.."
"तुझ्यासारख्या लोकांना कसं सारं जसं पाहिजे तसंच हवं असतं..जागच्या जागी प्रत्येक खिळा.. म्हणजे तुमच्या जवळचा माणूसही तुम्हाला जसाच्या तसा हवा, एका विशिष्ट चौकटीत बंदिस्त. त्याच्या विचारांची, वागण्या बोलण्याची चौकट. थोडा तो वेगळा वागला, इकडे तिकडे सरकला, की तुम्ही बिथरता. तो असं वागूच कसं शकतो म्हणून कांगावा करता.. तो एक जिवंत माणूस आहे, जिवंतपणा म्हटलं की बदल आलाच, अकलेची वाढ आली, विचारांची विविधता आली हे विसरूनच जाता.. माणसाचं विशाल मन एका छोट्या खुराड्यात कोंडून घेण्याची त्यावर सक्ती करता... स्वत:च्या संकुचित वृत्तीपायी दुसऱ्यांच्या मनांचा बळी घेता.."
" म्हणून म्हणते, तुम्ही ना तुम्हाला पटणाऱ्या आचार विचारांचे, स्वभावाचे साचे बनवून घ्या आणि घालत सुटा रतीब तुम्हाला हव्या तश्या माणसांचा.... "
तो प्रचंड चिडला.. त्याचे तिरकस उत्तर.. " thanks for suggestion .."
तिचे सरळ बोलणे.. " तू नकोस म्हणू thanks .. कारण त्याचा फायदा तर आमच्या सारख्या लोकांना होईल.. आम्हा जिवंत माणसांना साच्यात घालून mould करण्याचे तुमचे अघोरी प्रयत्न तरी थांबतील.. "
कधीतरी
कधीतरी
या जगाच्याही पलीकडे
सृष्टीच्या परिघाबाहेर
काळाच्या हातून
निसटलेल्या
एखाद्या चुकार क्षणी
भेटशील..?
मागणं
तुझ्याशिवाय कधी कोणी नाहीचं आलं इतक्या जवळ मनाच्या..
मलाही मन आहे असं कधी कोणी विचारच केला नाही रे..
एखाद्या निर्जीव वस्तूशी करावेत व्यवहार, तसंच सर्वांचं माझ्याशी वागणं..
वस्तूला कुठे असतो रे हक्क तिचा उपभोग घेणाऱ्याला नकार देण्याचा..?
कधी नाही म्हणू शकले नाही आणि म्हणूनच वापरली गेले वस्तूसारखी..
विसरूनच गेले होते मी माझे अस्तित्व..
आणि तू आलास..
तू आलास आणि थेट उतरलास माझ्या काळजात..
तूच तर फक्त जाणू शकला माझं जीवंतपण..
तुझेच डोळे तर फक्त पाहू शकले ना मला आरपार नितळपणे.
तुझं भक्कम आधार मिळाला म्हणून तर पाहू शकले स्वत:कडेच कुठल्याही शंकेविना.
आणि पहिल्यांदाच जाणीव झाली आत्मसन्मानाची.
तूच जागवलं आत्मभान माझ्या हरवलेल्या नजरेमध्ये
आणि हात देऊन सावरलं मला आत्मघाताच्या वाटेवरून...
आता मागणी होते आहे हक्काची..
प्रेमाचा हक्क..
तुझ्याशिवाय कोणाकडे रे मागणार मी..?
देशील..?
येशील?
तुला काय वाटलं, असं सहजासहजी चुकवून जाशील मला.?
आणि कितीही दूर गेलास तरी मला विसरू शकशील..? अशक्य..!
बोलायचं नसेल तर नको बोलूस. मीही नाही बोलणार.
तुझं प्रेम खोल खोल दडवून टाकेन, अगदी काळजाच्या तळाशी...
मग एके दिवशी मोरपिशीची लेखणी घेऊन बसेन आणि
अन्थारेण थोडंसं निळंशार आभाळ अंगणामध्ये..
मग माझ्या काळजाच्या डोहामध्ये बुडवीन लेखणीचं टोक
आणि लिहीत राहीन तुझं नाव आभाळाच्या तुकड्यावर...
मग ती माझी काळीजभरली साद जिवंत होईल मोरपिशीच्या स्पर्शानं,
चैतन्यानं भारलेली, आरूढ होईल वाऱ्यावर
आणि पसरत राहील दाही दिशांत..
मग तर यावंच लागेल तुला.. हो यावंच लागेल..
येशील..?
रंगहीन आकारहीन
मी एक रंगहीन आकारहीन अस्तित्व..निरभ्र आभाळाचा तुटून पडलेला रिकामा कोपरा..
आटून गेलं आहे पाणी की कधीच झालंच नव्हतं गर्भारपण पाण्याचं माझ्या या आभाळ तुकड्याच्या कुशीमध्ये, काय माहीत..
म्हणून मी शुष्क..कोरडा अभ्र तुकडा..
ना कोणाला काही देण्याची कुवत, ना कोणाकडे काही मागण्याची इच्छा..
कशाला कोणी फिरकेल अशा हीनदीन अस्तित्वाकडे...?
आणि जरी कोणी चुकून आलेच, तरी जाणीवतरी होईल का कोणाला माझ्या शुभ्र फटफटीत अस्तित्वाची..
मी एक रंगहीन आकारहीन.. आभाळाचा रिकामा निष्प्राण तुकडा..
तुझा नाहीच दोष की तुला निघून जावे वाटले..तुझा नाहीच दोष की तुला परतून यावे नाही वाटले.
जिथे काही अंकुरण्याची आशाच नाही तिथे कशाला कोवळे बीज पेरायचे.,?
येणाऱ्या क्षणाचाही ज्याला भरवसा नाही, असं माझं भग्न अस्तित्व कशी करणार तुझी साथ आयुष्यभरासाठी..?
छे छे मी नाही बुवा इतकी स्वार्थी, तुझ्याकडून कसल्याही भव्यदिव्य अपेक्षा ठेवेन.
तू बापडा जा खुशाल तुझ्या स्वप्नांच्या शोधात तुझ्या वाटेवर.
चुकून इथे थांबलास तर इथली शुष्क भयाण निराशा वेढून टाकेल तुलाही..
जा चालता हो.
मी जगेन..
मी जगेन. मी यातूनही तरून जाईन. या सत्यातून पार होऊनही मी जगेन. अगदी काहीही झाले तरी..! कितीही काळ हा अंधार असाच खेळ खेळत राहिला, तरी मी धीर धरेन आणि पाहत राहीन वाट नव्या प्रकाशाची... तोवर माझ्या जीवाला मीच होईन आधार; मीच माझं सांत्वन करेन आणि जीवाला आंजारून गोंजारून, चुचकारून सोसायला लावेन ही धग. उघड्या डोळ्यांनी सारं पाहीन आणि तरीही सांडू देणार नाही एकही अश्रू दु:खाचा.. तरून जाईन मी या साऱ्यातून.. हीच असेल माझी साधना, माझी तपश्चर्या. जळून जाऊ दे सारे भोग... होऊ दे राख साऱ्या इच्छा आकांक्षांची.. सोसेन मी धग आणि तरीही जगेन.
हे खरे आहे की तुझ्या वाटेकडे डोळे लागून राहतात कधीतरी, वाट पाहते मी तुझी कधीतरी... संध्याकाळचे हुरहूर लावणारे काही क्षण हे तुझ्याच नावे केले आहेत कायमसाठी... पण तू जर आलाच नाहीस कधी तर मी कोलमडून जाईन असे मात्र मुळीच नाही.. तू येणार की नाही माहीत नाही आणि आलासच तरी परत जाणार नाहीस याची काय शाश्वती.. म्हणूनच जरी तुझी वाट पाहते तरी वेड्या आशेने हळवी होत नाही तुझ्यासाठी. तू आलास तर ठीकच आहे, पण नाही आलास तरी.. तरीसुध्धा मी जगेन तुझ्या दाहक विरहासकट..!
म्हणूनच तू यावं असं बंधन नाही आणि चुकून आलास तरी थांबावंच अशीही सक्ती नाही..!
कारण आता जगायचं ठरवलं आहे मी काहीही झालं तरी.. अगदी काहीही झालं तरी..!
7/21/11
शिक्षा
चुकीची शिक्षा किती किती अघोरी..
जणू काही नियतीनं सारेच दरवाजे बंद केले आहेत माझ्यासाठी.
सारेच हक्क नाकारले गेले आहेत मला..
हक्क, आनंदाचा, स्वातंत्र्याचा, स्वप्नांचा, प्रेमाचा, प्रकाशाचा..
जीव गपगार होऊन पडला आहे या कोंदट वातावरणात..
श्वास घेणंही अवघड होत चाललंय क्षणोक्षणी..
जिवंत राहील का मी.. आणि चुकूनमाकून वाचलाच जीव या साऱ्यातून पार होऊनही;
तरी प्रकाशाची दारं होतील का खुली माझ्यासाठी पुन्हा एकदा..?
उद्याचा सूर्योदय येईल का घेऊन माझ्याही आयुष्यात नवी पहाट..?
मिळेल का मला हक्क माझं आयुष्य माझ्या मर्जीनं जगण्याचा, पुन्हा एकदा..?
थांग
एकांतात या
तुझ्यासवे बोलते
शब्दांच्या झुल्यावर
खूप खूप झुलते
तरीही का रे
नि:शब्द अंतराचे
गुज खोलता येईना..
गूढ मौनाचा तुझ्या
थांग लागता लागेना..
"तिचं आणि त्याचं नातं"
एका पावसाळी संध्याकाळी तिचा आणि त्याचा वाद.. नेहमी सारखाच..
तो.. " सगळंच संपतं गं कधी ना कधी.. प्रत्येक नातं हे जेव्हा जोडलं जातं, तेव्हाच नियतीनं त्याचा शेवट
कुठेतरी लिहून ठेवलेला असतो..."
ती.. " म्हणजे आपलं नातंही संपणार कधीतरी..? "
तो.. " माझा तसा अर्थ नव्हता.. मी generalised statement दिलं... every relationship has to end some day .."
ती.. " किती नकारात्मक बोलतोस.."
तो.. " खरं तेच बोलतो.."
ती.. "नाही.. मला नाही पटत असलं चुकीचं बोलणं..
खरं तर दोन व्यक्तींमध्ये नातं जोडलं गेलं की ते ना गोंदलं जातं काळाच्या पडद्यावर आभाळीच्या नक्षत्रासारखं... ते असतंच कायम अस्तित्वात..फक्त होतं काय तर त्याचे रंग बदलत जातात, पोत बदलतो, सूर बदलतात, इतकंच.. पाण्याचा झरा असतो ना, तो कशी वाट काढत राहतो, वळणं वळणं घेत जातो, कधी जमिनीच्या पोटात गुडूप होऊन जातो पण पुन्हा दूर कुठेतरी बाहेर पडतोच.. त्या पाण्याच्या प्रवाहासारखंच नातंही घेत राहते जीवनातील अनोळखी प्रदेशांचा शोध.. "
तो.. " अगं पण बाष्पीभवन होतंच ना पाण्याचं.. उन्हाचे चटके बसले की वाफ होते पाण्याची.. नातंही होरपळून जातं वास्तवाच्या धगीत आणि मागे राहते नुसती वाफ.. "
ती.. " हो वाफ होते पण म्हणून संपून थोडीच जातं..? त्याचं अस्तित्व रहातच ना... आणि मग ग्रीष्म दाहाने वाफ झालेलं पाणी वर्षा ऋतूमध्ये पाऊस होऊन बरसतं त्याचं काय..? "
बाहेरचा पाऊस हातावर घेत ती बोलली..
बोटावरचा थेंब तिनं काळजीपूर्वक त्याच्या हातावर टेकवला आणि मूठ बंद केली..
तोही चिडलेला... तिला खिडकीजवळून बाजूला सरकवून त्याने खटकन खिडकी बंद केली.
तो आडमुठेपणाने बोलला.. " मी खिडकी बंद केल्यावर, पाऊस बाहेर, मी आत कोरडा.. मग काय करशील..? "
ती मुग्ध हसली.. समजून उमजून हसत उत्तरली...
" पावसाचं पाणी म्हणजे जिवंत अन सळसळतं चैतन्य असतं.. ते मातीत रुजतं, मातीशी सलगी करतं.. एखादं बीज शोधतं, त्याला माया देऊन फुलवतं.. मग ते बीज अंकुरतं एखाद्या रोपट्याच्या रूपानं. त्याला फळ आलं तर तुझ्या पोटात जाऊन तुला जीवनरस पुरवेल, आणि फूल आलं तर त्याचा सुगंध भिंत किंवा तुझी बंद खिडकीही ओलांडून पोहोचेल तुझ्या नाकपुड्यांत.. "
बोलतच तिने हळूच त्याच्या नाकावर टिचकी मारली.
तो गोंधळला, बावरला.
तिला हसू फुटलं, पण त्याला हार मानायची नव्हतीच तिच्या समोर..
त्याचा सवाल.. " पण अगदीच बिनकामाचं गवत उगवलं तर, जनावरांच्या पण खाण्यालायक नाही असं, किंवा त्याहीपेक्षा वाईट म्हणजे विषारी वेल उगवली तर..? "
तिच्या चेहऱ्यावरचे हसू पुसून जाऊन तिथे आता वेदनेची कळ.
त्याच्या चेहऱ्यावर मात्र जिंकल्याचा आनंद.
तरीही तिचे हळवे उत्तर.. " बिनकामाचं माजलेलं गवतसुध्धा शेकोटीच्या कामी येतं, एखाद्या रक्त गोठवणाऱ्या थंडीमध्ये ऊब मिळावयाला; आणि विषाचं म्हणशील तर काही नाती जपण्यासाठी आयुष्याचीही किंमत आनंदाने मोजावी लागते कधी कधी.. "
तो स्तब्ध. अस्वस्थ आणि बेचैन. भले तो दगडासारखा कठोर असला म्हणून काय झालं, इतका हळवा हल्ला झाल्यावर कोसळणार नाही तर काय..
तिची शून्यात नजर.. " कुठला पाऊस घेऊन येणार रे आपलं नातं ? माहीत नाही म्हणून आजकाल प्रत्येक पाऊस घेते अंगावर.. कुठल्या थेंबातून कुठला अंकुर फुटेल कोणी सांगावे..? "
7/19/11
समजून घेताना..
" प्रत्येक माणूस म्हणजे भावनांचा पेटारा असतो... पण बंदिस्त.. अगदी कडी कुलुपात बंद.. बाहेरून नुसतेच कडक कवच दिसते, परंतु आत मात्र खदखदणारे अद्भुत, अजब रसायन..."
" गम्मत म्हणजे बहुतेकांना या कुलुपाची चावी कुठे शोधायची हेच ठाऊक नसते... मग नुसतेच कवच पकडून बसतात, आपापल्या कुवतीनुसार अर्थ लावतात आणि मग अनर्थ होतात..."
"मग दुसऱ्यांची किल्ली शोधायची तरी कुठे..?"
" पहिल्यांदा स्वत:ला स्वत:ची किल्ली शोधावी लागते. स्वत:ची किल्ली सापडली म्हणजे मग आधी स्वत:चे कवच भेदून आत शिरता येते आणि स्वत:ला समजून घेता येते. स्वत:ला समजून घेता आले, तरच इतरांना समजून घेणे सहजपणे जमते.. एकदा का ही समजून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली ना, की सगळे गुंते अलगद सुटतात, गैरसमज गळून पडतात.. इंद्रिये स्वछ्च आणि जास्त संवेदनशील होतात.. मग फुलाच्या गळून पडण्याचा नादही टिपता येतो आणि कोड्यात टाकणारी मौनेही बोलकी होतात.. असा माणूस पाण्यासारखा नितळ होऊन जातो.. दृष्टी आतून बाहेर निर्मळ होते.. मग जागा होतो खरा विश्वबंधुभाव.. तेव्हा स्वत:वर आणि इतरांवरही प्रेम करण्यासाठी काही खास प्रयत्न करावे लागत नाहीत.. ते सहज साध्य होते...
मनाची क्षितिजे रुंदावतात.. "
नयन
नयनांचा हा
रम्य पिसारा
झुलता वाटे
मोहाचा खेळ सारा
करामत होई कधी
जुळती हृदयाच्या तारा
तर कधी शोधसे
क्षणभराचा निवारा
रंग हे नवखे
मना भुरळ घाली
जणू इंद्रजाल हे
क्षणात उमले नि
क्षणात नाहीसे होई
दुनियेत या
पाऊल ठेवता
मन जणू वाऱ्यावर
पाचोळा पाचोळा
राधेसमवेत रमलेला
तो मुग्ध
रघुनंदन सावळा..
पाऊस आणि मी
दुपारचं ढगाळ वातावरण.. भर दुपारी अंधारून आलेलं.. मंतरलेलं.. गारठलेलं..
आणि मग हलकेच अवतरणाऱ्या पावसाच्या झिम्म लडी.. खिडकीतूनच पाहत राहते पावसात
चिंब भिजणारा हिरवाकंच निसर्ग..
वय वाढत गेलं की सारं कसं कृत्रिम होत जातं.. निसर्गाचं साधं सोप्पं असतं, पाऊस आला कि भिजायचं.. माणूस मात्र सगळीच गुंतागुंत करतो.. पाऊस पाहून चटकन आवेग येतो भिजावं म्हणून.. पण माणूस त्या आवेगाला शांत करतो.. चेहरा मख्खच ठेवून विचार करत राहतो, भिजावं की नको यावर.. कपडे खराब होतील, केस भिजतील, आजारी पडू इथपासून इतर लोक काय म्हणतील इथपर्यंत सारे हिशोब होतात.. आकडेमोडीत पाऊस नेहमीच शून्य ठरतो..
सारे विचार दूर फेकून देऊन मी धाडधाड जिना उतरून खाली येते.. अंगणात येताच सरी मला कुरवाळतात.. ओल्याकंच मातीचा गंध ऊर भरून घेताना मन विरघळून जातं.. माझं सारं शरीरच भुसभुशीत काळ्या मातीसारखं फुलून येतं, पावसाचा थेंब अन थेंब टिपायला.. पाऊस हळूहळू वाढत जातो आणि ओलाकंच झालेला माझा देह..तोही पावसाची एक सरच बनून जातो.. आधी थंड वाटणारे पाणी आता ओळखीचे होऊन जाते आणि थंड शिरशिरी हाडामासात रुजून जाते.. पाऊस.. मला माझ्या असण्या -नसण्यासकट स्वीकारून, त्याच्यात सामावून घेणारा पाऊस.. त्याच्या ओल्या गर्भाची ऊब साऱ्या जगण्यावर पांघरणारा.. पाऊस....
हळूहळू पुन्हा अस्तित्वाचे भान येऊ लागते.. आता मात्र कमाल झाली.. पावसाचा स्पर्श झेलण्यासाठी मला माझा देहही अपुरा वाटू लागतो.. या देहावरील कातडी तिची मर्यादा कशी ओलांडणार.. हे अपुरेपणाचे भान येताच मी असोशी होऊन डोळे उघडते.. समोरच भला थोरला पारिजातक उभा.. तो ओला हिरवाकंच वृक्ष पाहून मला हेवा वाटतो त्याचा.. वाटते आपणही एक भव्य वृक्षच होऊन जावे.. मुळ्यानी मातीला घट्ट पकडून ठेवावे आणि असंख्य फांद्या अंगाखांद्यावर डवरून पावसात भिजत रहावे.. खूप साऱ्या फांद्यांना अगणित पाने.. त्या साऱ्या अगणित पानांनी पाऊस प्यायला किती किती छान वाटेल, आनंद वाटेल.. पारिजातक बनून पाऊस अंगावर घ्यायचा.. प्रत्येक अणूरेणू वरून पावसाचे थंड थेंब ओघळताना शहारे येतील साऱ्या अस्तित्वावरच... थरथरून उठेल सारी हिरवी काया.. हो आणि मुळ्यानीही शोषून घ्यायचे मातीत गेलेले पाणी.. म्हणजे वरपासून खालीपर्यंत पाऊसमय होऊन जायचे.. पाऊस नसानसात रुजवायचा.. आनंद अंगामध्ये भिनवायचा... आणि मग प्राजक्ताच्या असंख्य कळ्यामधून, फुलांमधून बहरून यायचे.. तो बहरण्याचा सोहळा किती अप्रतीम असेल.. प्रत्येक आनंदलहरीसोबत फुले फुलतील माझ्या फांदीफांदीवर.. खळखळून मी हसेल तेव्हा अंगण भरून सदा पडेल केशरी देठाच्या दुधाळ प्राजक्त फुलांचा.. शाळकरी पोरी येतील गोळा करायला फुले.. त्यांच्या इवल्या इवल्या ओंजळीमध्ये मावतील तेवढी फुले घेऊन धूम ठोकतील.. मी मात्र समाधानाने गहिवरेल.. पुन्हा पुढच्या पावसाची वाट पाहत उभी राहीन मी उन्हातान्हात सारं पानभरलं हिरवं अस्तित्व सावरून आवरून घेत..!!
7/18/11
गाव सोडताना
क्षीतिजावर मित्राने
पाऊल ठेवलेले
लाल केशरी शिंपण
भोवताली सांडलेले..
वेग घेता गाडी
वारा वाहे भरधाव
वळून पाहता मागे
मागे पडे गाव..
दूर राहिले घर पण
आठवणी न सोडती
मन केले कठोर पण
आसवे न खंडती
शेजारी विचारे
बरे नाही काय..
माझी चिंता मात्र
जीवाभावाचे गाव
परत दिसेल काय..?
गुरुपौर्णिमेनिमित्त..
प्रिय सर ,
आज मनाच्या गाभ्यातून आठवताहेत काही सुंदर रम्य क्षण.... शाळेतील चिमुकले क्षण.. प्रेमळ मायाळू आठवणी..
तुम्ही नेहमीच स्वीकारले मला सर्व गुणदोषांसकट आणि निरपेक्षपणे प्रेम दिले, माझा सारा वेडेपणा सुद्धा सहन करत... त्यावेळी ते समजले नाही पण आज त्याचे महत्त्व जाणवते आहे.. आज जी काही मी आहे ती तुम्ही घडवले मला म्हणूनच..
जेव्हा जेव्हा धीर सुटायचा, एखाद्या समस्येने मी घाबरून जायचे, तेव्हा तुम्हाला ते न सांगताच कळायचे..तुमचा मायेचा स्वर आणि पाठीवरचा हात सारी काळजी दूर करायचा.. त्यासाठी तुम्हाला औपचरिक भाषणाची गरजच पडली नाही, तुमचा प्रेमाचा एक शब्दच पुरेसा असायचा..
कधी चूक झाली तर तुमच्या समोर शरमेने मान खाली जायची.. तुम्हाला sorry म्हणताना आवाज ओठांतच अडकायचा, हुंदका फुटायचा, तेव्हा माझ्यापेक्षा तुम्हालाच जास्त वाईट वाटायचे..थोडेसे रागावून, मग तुम्हीच समजूत घालायचे.. शिक्षा जरी केली तरी तुम्ही चूक कबूल करून त्यातून धडा घ्यायला शिकवले आणि तेही ताठ मानेने करायला लावले, स्वत: बद्दल लाज न बाळगता..
कधी टेस्ट असायची, अभ्यास झाला नसला कि मला पळून जाऊ वाटायचे, टेस्ट बुडवायचा मोह व्हायचा..तुम्हाला सांगायला यावे अभ्यास झाला नाही म्हणून तर तुम्ही समजावून सांगायचे , टेस्ट चुकवायची नाही म्हणून, भले मार्क्स कमी का पडेनात.. यातूनच तुम्ही धैर्याने अडचणींचा सामना करायला शिकवले, पण तोंड लपवून पळून जायची परवानगी नाही दिली कधीच..
कधी नकळतपणे मनात नसतानाही चुकीचे वागले, तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवून प्रेमाने माफ ही केले..पण कधीच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे नाही केले सर्वांसमोर.. चुकीसाठी अपमान करणे तर तुम्हाला कधी मान्यच नव्हते..
कधी आतूनच निराशा पोखरत आली..आतल्या दुःखाचे, वेदनेचे कढ चेहऱ्यावर उमटले , तेव्हाही जिवलग मैत्रीणीपेक्षा ते तुम्हीच आधी वाचले आणि स्पर्श न करताही केवळ तुमच्या ममतेनेच सारे व्रण भरून काढले... वेळोवेळी जखमा भरून आल्या त्या तुमच्याच वात्सल्याने..
आज मोठे झाल्याचा मोठाच तोटा जाणवत आहे आणि कळ उठतीये खोलवर तुमच्या आठवणीने... या बाहेरच्या शहाण्या पण असुरक्षित जगात मी गोंधळून गेले आहे, हरवले आहे.. स्वत:ची ओळख विसरून स्वत:पुढेच मान खाली घालून उभी राहते तेव्हा तुमची आठवण येते "सर" ... कधी वस्तुस्थितीचा भयाण अंध:कार पाहून तोंड चुकवून पळून जायची इच्छा बळकट होत जाते तेव्हा कुठूनतरी तुम्ही आठवता मला पळून जायची परवानगी नाकारत.. तुमच्यासमोर स्वत:ला असे गलितगात्र पाहून खूप वाईट वाटते..पण मग विश्वास वाटतो की तुम्ही समजून घ्याल..घ्याल ना..?? बघा नुसता तुमच्या समजूतदार, आश्वासक आठवणींचा हात हातात घेतला तरी किती आधार वाटतो आहे मला.. हळूहळू तुमच्या जीवनदायी प्रेमाचा स्त्रोत प्रवाहित होतो आहे माझ्या अणुरेणूंमध्ये .. तुमच्या माझ्यावरील प्रगाढ विश्वासाचे कवच घट्ट धरून ठेवीन मी माझ्या अस्तित्वाभोवती.. नुसत्या या विचारानेच किती बळ मिळतेय..
सर, तुमच्या संस्कारांना योग्य न्याय देईन मी.. तुमच्या अतूट विश्वासाला जागेन मी.. फक्त तुमची प्रेमळ आठवण राहू द्या सोबत अशीच..
तुमचीच शिष्या..
7/13/11
वेड्या असतात मुली
वेड्या असतात मुली..
मोगरीच्या गंधाने
इतक्या खुळावतात की
ओरबाडणाऱ्या काट्याचे अस्तित्व
त्यांना मान्यच नसते मुळी
वेड्या असतात मुली..
नवेकोरे परकर पोलके आणि
मूठभर गजगे पाहून
हरखून जातात इतक्या की
गुदमरवून टाकणारा
भातुकलीतल्या चुलीचा धूर
त्यांना ठाऊकच नसतो मुळी
वेड्या असतात मुली..
चांदीसारख्या चांदण्याला
चमचमणाऱ्या चन्द्राला
अशा काही चटावतात की
हाच चंद्र नंतर
झिजत झिजत जाऊन
काळोखात निपचित बुडतो
याचा विसरच पडतो मुळी
वेड्या असतात मुली..
हरणाचा डौल लेवून आणि
सशाचे काळीज पांघरून
हुंदडत राहतात रानभर
संध्याकाळी परतताना
आपली संख्या रोडावते आहे
रानातील लांडगे मात्र माजतायेत
हे त्यांच्या ध्यानी मनीही
कधी येत नाही मुळी
वेड्या असतात मुली..
हो, वेड्याच असतात मुली..!!
कधीमधी वाटते..
छोटेसे नाजूक फूल...कागदी फुलासारखे ..मोजून फ़क्त चार पाकळ्या..पण त्या जिवंत रक्तवर्णी ... सुबक..
मधूनच फुटलेला सुकट देठ..तोही तांबूस पण फिकुट्लेला..
त्यातून अगदी वरपर्यंत पोहोचलेले नाजूक तंतू अन त्यावर विसावलेले इवले इवले परागकण...
किती सहज सोप्पे , इटुकले अस्तित्व पण स्वयंभू आणि परिपूर्ण..
याच्या कित्येक पिढ्या या जमिनीतून वर आल्या आणि गेल्या असतील ...
त्याच मालेतील हे इवलेसे गवतफूल.. गंधहीन तरीही स्वत: मधेच परिपूर्ण..
ना कसली अपूर्णता, ना कसली तडफड, ना कसली खंत आणि ना कसला अस्वस्थपणाचा शाप...
एवढेसे हे सौंदर्यतत्व..पण त्याने सामावून घेतलेले परतत्व मात्र अनिर्बंध अविनाशी..
किती सहज सुंदर मिलाफ आहे हा साकाराचा निराकाराशी...
या गवतफुलाचे साधे उमलणे साऱ्या गहन प्रश्नांच्या पार जाऊन चिरतत्वाशी भिडणारे...
या क्षणभंगुर इवल्या अस्तित्वाला हे जमते,
मग मनुष्य तर इतका बुद्धीमान, निसर्गाच्या कलेमधील उत्कृष्ट देणग्यांचा हक्कदार...त्याला का जमू नये हे....??
कि त्याचे बुद्धीचे वरदानच हिरावून घेऊ पाहतो आहे त्याचा सहज सुलभ जगण्याचा, उत्कटपणे उमलण्याचा जन्मसिद्ध वारसा..??
मधूनच फुटलेला सुकट देठ..तोही तांबूस पण फिकुट्लेला..
त्यातून अगदी वरपर्यंत पोहोचलेले नाजूक तंतू अन त्यावर विसावलेले इवले इवले परागकण...
किती सहज सोप्पे , इटुकले अस्तित्व पण स्वयंभू आणि परिपूर्ण..
याच्या कित्येक पिढ्या या जमिनीतून वर आल्या आणि गेल्या असतील ...
त्याच मालेतील हे इवलेसे गवतफूल.. गंधहीन तरीही स्वत: मधेच परिपूर्ण..
ना कसली अपूर्णता, ना कसली तडफड, ना कसली खंत आणि ना कसला अस्वस्थपणाचा शाप...
एवढेसे हे सौंदर्यतत्व..पण त्याने सामावून घेतलेले परतत्व मात्र अनिर्बंध अविनाशी..
किती सहज सुंदर मिलाफ आहे हा साकाराचा निराकाराशी...
या गवतफुलाचे साधे उमलणे साऱ्या गहन प्रश्नांच्या पार जाऊन चिरतत्वाशी भिडणारे...
या क्षणभंगुर इवल्या अस्तित्वाला हे जमते,
मग मनुष्य तर इतका बुद्धीमान, निसर्गाच्या कलेमधील उत्कृष्ट देणग्यांचा हक्कदार...त्याला का जमू नये हे....??
कि त्याचे बुद्धीचे वरदानच हिरावून घेऊ पाहतो आहे त्याचा सहज सुलभ जगण्याचा, उत्कटपणे उमलण्याचा जन्मसिद्ध वारसा..??
Subscribe to:
Posts (Atom)