Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..

7/13/11

वेड्या असतात मुली

वेड्या असतात मुली..
मोगरीच्या गंधाने 
इतक्या खुळावतात की 
ओरबाडणाऱ्या काट्याचे अस्तित्व
त्यांना मान्यच नसते मुळी
वेड्या असतात मुली..
नवेकोरे परकर पोलके आणि 
मूठभर गजगे पाहून 
हरखून जातात इतक्या की 
गुदमरवून टाकणारा 
भातुकलीतल्या  चुलीचा धूर   
त्यांना ठाऊकच नसतो मुळी
वेड्या असतात मुली..
चांदीसारख्या चांदण्याला
चमचमणाऱ्या चन्द्राला 
अशा काही चटावतात की
हाच चंद्र नंतर
झिजत झिजत जाऊन
काळोखात निपचित बुडतो
याचा विसरच पडतो मुळी 
 वेड्या असतात मुली..
हरणाचा डौल लेवून आणि
सशाचे काळीज पांघरून
हुंदडत राहतात रानभर
संध्याकाळी परतताना
आपली संख्या रोडावते आहे
रानातील लांडगे मात्र माजतायेत
हे त्यांच्या ध्यानी मनीही
कधी  येत नाही मुळी
वेड्या असतात मुली..
हो, वेड्याच असतात मुली..!!

No comments:

Post a Comment