Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..

7/22/11

मी जगेन..

      मी जगेन. मी यातूनही तरून जाईन. या सत्यातून पार होऊनही मी जगेन. अगदी काहीही झाले तरी..! कितीही काळ हा अंधार  असाच खेळ खेळत राहिला, तरी मी धीर धरेन आणि पाहत राहीन वाट नव्या प्रकाशाची... तोवर माझ्या जीवाला मीच होईन आधार;  मीच माझं सांत्वन करेन आणि जीवाला आंजारून गोंजारून, चुचकारून सोसायला लावेन ही धग. उघड्या डोळ्यांनी सारं पाहीन आणि तरीही सांडू देणार नाही एकही अश्रू दु:खाचा.. तरून जाईन मी या साऱ्यातून.. हीच असेल माझी साधना, माझी तपश्चर्या. जळून जाऊ  दे सारे भोग... होऊ दे राख साऱ्या इच्छा आकांक्षांची.. सोसेन मी धग आणि तरीही जगेन.
   हे खरे आहे की तुझ्या वाटेकडे डोळे लागून राहतात कधीतरी, वाट पाहते मी तुझी कधीतरी... संध्याकाळचे हुरहूर लावणारे काही क्षण हे तुझ्याच नावे केले आहेत कायमसाठी... पण तू जर आलाच नाहीस कधी तर मी कोलमडून जाईन असे मात्र मुळीच नाही.. तू येणार की नाही माहीत नाही आणि आलासच तरी परत जाणार नाहीस याची काय शाश्वती..  म्हणूनच जरी तुझी वाट पाहते तरी वेड्या आशेने हळवी होत नाही तुझ्यासाठी.  तू आलास तर ठीकच आहे, पण नाही आलास तरी..  तरीसुध्धा मी जगेन तुझ्या दाहक विरहासकट..!
    म्हणूनच तू यावं असं बंधन नाही आणि चुकून आलास तरी थांबावंच अशीही सक्ती नाही..!
    कारण आता जगायचं ठरवलं आहे मी काहीही झालं तरी.. अगदी काहीही झालं तरी..!

No comments:

Post a Comment