Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..

11/25/16

उत्तराखंड भाग १

कालच तर मी दिल्लीला पोहोचले होते. पहिल्यांदाच दिल्ली पाहिली. उत्साहात कुतुबमिनाराच्या आजूबाजूला फिरले, फोटोग्राफी केली. आज सकाळी दिल्लीवरून ट्रेनने ४-५ तासांचा प्रवास करून मी काठगोदामला उतरले. तिथे दिनेश Taxi थांबवून माझी वाटच पाहत होते. तेथून पुढे तीन तास प्रवास करून आम्ही सतोलीला पोहोचणार होतो.
या पूर्ण प्रवासात मी मनोमन आश्चर्य करत होते की हे सर्व घडलेच कसे. खरेतर १५ दिवसांपूर्वी माझा कन्याकुमारीला जायचा बेत होता. कन्याकुमारीच्या विवेकानंद आश्रमात मी योगा क्लासचे बुकिंग पण केले होते. फक्त आता विमानाचे तिकीट बुक करणे बाकी होते आणि अचानक मी डेंगूने आजारी पडले. तापाने मी बरीच खंगून गेल्याने माझा कन्याकुमारीचा कार्यक्रम आपसूकच रद्द झाला.
मी जुना जॉब नुकताच सोडला होता. जुन्या कामाच्या ठिकाणी माझी बरीच ओढाताण झाली होती, मानसिक त्रास झाला होता. त्यामुळे दूर कुठेतरी जाऊन मनन चिंतन करावे, महिनाभर शांत जागी जाऊन राहावे असे विचार मनात येत होते. घरी बसल्याबसल्या माझे कुठे जावे यावर गुगलिंग चालूच होते. अशातच whats app वर एक मेसेज येऊन थडकला. “ Urgently need a female gynecologist, who loves mountains and likes trekking, need to take health check camps in villages of Uttrakhand for 1 month, good salary “. हा मेसेज वाचताच मी तेथे जायचे नक्की केले. परंतु मला विश्वासच बसत नव्हता की हा मेसेज खराखुरा आहे. जसे काही मी स्वप्न पाहत होते. मला हवी ती गोष्ट अशी आश्चर्यकारक रित्या सत्यात उतरली होती. हा मेसेज आरोही या उत्तराखंडमध्ये काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेतर्फे पाठवला गेला होता. त्यांच्यासोबत नेहमी काम करणारी स्त्रीरोगतज्ञ एका महिन्यासाठी येऊ शकत नसल्याने त्यांना तातडीने दुसऱ्या स्त्रीरोगतज्ञाची गरज होती.
मेसेजला रिप्लाय करताच आरोही या NGO चे प्रमुख डॉ. सुशील शर्मा यांच्याशी फोनवर माझे बोलणे झाले. त्यांचा आवाज मला खूप आश्वासक वाटला व आमच्या अर्ध्या तासाच्या बोलण्यातच माझ्या सर्व शंका दूर होऊन पुढील आठवड्यातच माझे उत्तराखंडला जाण्याचे नक्की झाले व प्रवासाचे सर्व बुकिंगही झाले. आरोही ही N.G.O उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातील खेड्यांमध्ये शिक्षण, रोजगार व आरोग्य या घटकांवर काम करते. सतोली या पहाडी गावात संस्थेचे मुख्य कार्यालय व दवाखाना असून आजूबाजूच्या ५०-६० गावात आरोहीचे काम चालते.
तर अशाप्रकारे गेल्या १५ दिवसात कन्याकुमारी ऐवजी मी दिल्लीला पोहोचले होते. उत्तरेला प्रवासाची ही माझी पहिलीच वेळ. पहाडी प्रदेश, पहाडी लोग हे फक्त ऐकुनच माहित होते. त्यामुळे डॉ. सुशील यांनी मला, तुला पहाडी भागात काम करायचे आहे, असे सांगितले असले तरी पहाडी भाग कसा असतो याची मला काहीही कल्पना नव्हती. गुगल map वर मी सतोली व काठगोदाम शोधले होते. आम्ही नैनिताल जिल्ह्यात असल्याने काठगोदाम रेल्वे स्थानकावर पर्यटकांची भरपूर गर्दी होती. आमचा काठगोदाम ते सतोली प्रवास सुरु झाला. जाताना बऱ्याच ठिकाणी नैनितालचे बोर्ड दिसत होते, ते नाव वाचूनच मी उल्हसित होऊन गेले. मग हळूहळू खरेखुरे पहाड नजरेस पडायला सुरुवात झाली. एक पहाड संपला की लगेच पुढचा. रस्ता पूर्ण वळणा-वळणांचा. रस्त्यात आम्हाला भीमताल गाव लागले. तिथे थोडावेळ आम्ही थांबलो. तिथल्या अत्यंत सुंदर तलावाच्या दर्शनाने मी भारावून गेले. ताल म्हणजे तलाव. इथे खूप सारे सुंदर नयनरम्य तलाव आहेत आणि त्यांच्या वैशिष्ट्यानुसार त्यांना विविध नावे दिलेली आहेत. तिथेच बाजूला दिनेश पाणी भरून घेत होते. कुठून पाणी येत आहे हे पाहिले तर ते नैसर्गिक रित्या डोंगरावरून खाली वाहत आलेले झरे होते. त्याचे पाणी अतिशय थंड असते.
तिथून पुढे आम्ही निघालो. आता मात्र खूपच जास्त पहाड दिसू लागले. मी खुश होऊन फोटो काढायला सुरुवात केली. पण काहीच वेळात माझा उत्साह ओसरू लागला. वळणा-वळणांच्या त्या घाटदार रस्त्याने पार मला दमवून टाकले. एक तासाने तर माझी फोटोग्राफी पूर्ण बंद झाली. थकव्याने कधी एकदा मी सतोलीला पोहोचेन असे झाले.
तेवढ्यात डॉ. सुशील यांचा फोन आला. तुला ट्रेकिंग आवडते ना, असे विचारून त्यांनी मला कल्पना दिली की Taxi चा रस्ता संपल्यानंतर पुढे मला अर्धा ते एक तास चढाई करायची आहे. माझ्यासोबत बरेच सामान होते. ते न्यायला कोणीतरी येईल. मी खरेतर प्रवासाने बरीच थकून गेले होते. त्यात आणखी चढाई म्हणजे मी थोडी घाबरलेच. Taxi ने मला तेथील एका आश्रमाच्या गेटवर उतरवले. तेथून पुढे कच्चा रस्ता असल्याने चालत जावे लागणार होते. तिथे अर्धा तास आम्ही आरोहीच्या माणसाची वाट पाहत उभे होतो. त्या अर्धा तासात मनात कितीतरी विचार येऊन गेले. मुख्य विचार हाच होता की सर्व सामान परत Taxi मध्ये भरावे आणि परत माघारी जावे.
एकदाची आरोहीची २ माणसे आली आणि त्यांना मला सामानासकट सुकूनला पोहोचवले. सुकून म्हणजे डॉ. सुशील यांची पहाडावरची ४-५ घरे मिळून बनलेली प्रायवेट प्रॉपर्टी. तेथील एका दुमजली घराच्या वरच्या मजल्यावर माझी राहण्याची सोय करण्यात आलेली होती. खालच्या मजल्यावर डॉ. हिमांशू राहत होता. त्याच्याकडेच सुशील सरांनी मला सर्व माहिती देण्याची व मदत करण्याची जबाबदारी सोपवली होती.
माझ्या रूमला वेगळे किचन होते. त्यात मी नाश्ता व जेवण बनवू शकणार होते. ते पहाडावरचे जंगलाच्या मध्ये असलेले असे, लाकडाचे सुंदररीत्या बनवलेले घर होते. माझ्या रूमला मस्त गच्ची होती. तेथून समोरची दरी आणि ढग दिसत होते. सुकूनमधे त्या संध्याकाळी मी एक वेगळीच शांती अनुभवली, जी बरेच वर्षे मी हरवून बसले होते. त्या शांतीच्या अनुभवाने अक्षरशः मला रडू आले.
हिमांशुसोबत कॉफी पिताना त्याने सांगितले की धुके निवळल्यावर समोर हिमालयाची बर्फाच्छादित शिखरे दिसतात. त्या रात्री सुशील सरांनी त्यांच्या घरी मला व हिमांशुला जेवणासाठी बोलावले. जेवण सुरु करण्यापूर्वी मला सुशील सरांना पहिले अगदी मनापासून Thank you म्हणावेसे वाटले.
“ I am so much grateful to you for you invited me here.”


2 comments: