पहाडावरील त्या लाकडी घरात राहणे खूपच आनंददायी होते. लाकडाचे असल्याने त्याला वेगळेच देखणेपण लाभले होते. आजूबाजूला पूर्ण जंगल पसरलेले होते. त्या पूर्ण पहाडावर वेगवेगळ्या ठिकाणी घरे वसली होती. आरोहीचे ऑफिस व हॉस्पिटल पहाड उतरून गेल्यावर खाली पायथ्याजवळ होते.
आम्ही, म्हणजेच मी व हिमांशु सकाळी ९ ला निघायचो. कधीकधी माधुरी, जमाल हे आरोही सोबत काम करणारे volunteers भेटायचे. काधीकोणी foreigner visitor, medical student किंवा माझ्यासारखेच short time volunteer पण सोबत असायचे. बाहेर पडले की सुशील सरांचा डोरेमोन व आणखी एक कुत्रा आमच्या मागे मागे थोडे अंतर यायचे. त्यांची हद्द संपली की परत फिरायचे. रस्त्यात जाताना दूर दूर अंतरावर एखादे घर लागायचे. तिथे घराच्या आजूबाजूला विविध फळझाडे,फुलझाडे , भाज्या लावलेल्या असायच्या. मधेच कोणी शेतकरी गायी, बकऱ्या चरायला घेऊन जाताना भेटायचा. पहाडावर नैसर्गिकरीत्या खूप सुंदर, आकर्षक रंगाची फुले फुललेली दिसायची. ना कोणी लावलेली, ना कोणाची निगराणी असलेली ती जंगली फुले कुठल्याही बागेतल्या शोभिवंत फुलांपेक्षा सुंदर होती. विविध प्रकारचे मशरूम, शेवाळेही दिसायचे.
तिथे सर्वत्र दिसत होती ती पाईन जातीची झाडे. खरेतर त्या प्रदेशात पूर्वी मुबलक प्रमाणात देवदार व ओक वृक्ष होते. ते वृक्ष त्या त्या प्रदेशातील जमिनीमध्ये पाणी टिकवून ठेवणारे व हवेत ओलावा निर्माण करणारे आहेत. परंतु ब्रिटीश लोकांनी बऱ्याच प्रदेशातील ती झाडे पूर्णपणे तोडून टाकून पाईन लावले. पाईनचे फायदे हे की त्यापासून रंग, टर्पेनटाइन मिळते. परंतु त्यांचे तोटे असे की ते जमिनीतील पाणी जास्त वापरतात व हवामान उष्ण करतात. याचा परिणाम होऊन सतोली मधलेही पूर्वीचे नैसर्गिक थंड हवामान जाऊन तिथे उष्ण हवामान झाले आहे.
त्या रस्त्यावरून जाताना चढ उतार असायचा. मी पूर्ण थकून जायचे. मग मधे मधे ब्रेक घेत मी हॉस्पिटलमध्ये पोहोचायचे. संध्याकाळी ५- साडे ५ ला आम्ही परत निघायचो. कधी ६-साडे ६ वाजले तर अंधार पडायला सुरुवात होयची. मग घाई-घाईमध्ये आम्ही झपझप पाय उचलत चालायचो. कधी पाउस सुरु झाला की मग तर तारांबळ उडायची. पावसामुळे आणखी एक समस्या निर्माण व्हायची...जळवांची! पाउस पडला की जळवा बाहेर पडायच्या. त्या पायाला चिटकल्या व रक्त पिऊ लागल्या तरी बिलकुल दुखत नाही. त्यामुळे त्या पायाला लागलेल्या पण समजत नाही. मग त्या तशाच रक्त पीत राहतात व फुगून मोठय टम्म झाल्या की त्यांच्याच भाराने आपोआप गळून पडतात. अशीच एके दिवशी मी घरी परतले तेव्हा पाय धुवायला बाथरूममध्ये गेले. पायांकडे पाहिला तर काळे काळे ठिपके दिसले. मी पायांवर पाणी सोडले तरी ते जाईना. उलट ते लांब लांब होऊ लागले, वळवळू लागले. तेव्हा माझ्या लक्षात आले की ते दुसरे तिसरे काही नसून जळवा आहेत. मी आयुष्यात पहिल्यांदाच जळवा पाहत होते. मी घाबरून ओरडत बाहेर आले. पण नेमका हिमांशु जमालच्या घरी गेलेला. शेवटी पायाला लागलेल्या त्या ५-६ जळवा मी ओढून काढल्या. त्यानंतर २०-२५ मिनिटे तेथून रक्त येत राहते. त्याला मग कागद चिटकून टाकला. थोडा वेळाने हिमांशु परतला तेव्हा त्याने मला उपाय सांगितला की जळवा लागल्या की त्यांच्यावर मीठ टाकायचे म्हणजे त्या आपोआप गळून पडतात. ओढून काढल्या की मग महिनाभर त्या जागी खाज सुटत राहते. हाय !! त्याला म्हटलं , इतके दिवस सर्वांनी मला जळवांच्या स्टोऱ्या ऐकवल्या, पण एकाने पण इतका सोपा उपाय सांगितला नाही.
सकाळी ७ ला उठून मी बाल्कनी मधे यायचे. समोर पाहिले तर मस्त धुक्याने भरलेली दरी दिसायची. घर पूर्ण धुक्यात हरवलेले असायचे. जसा दिवस सुरु होईल तसे तसे ते धुके निवळत जायचे. असेच एके दिवशी आम्ही खाली म्हणजेच हॉस्पिटलकडे जात असताना पूर्ण धुके निवळले व दूरवर डोळ्यांच्या लेवलला हिमालयाची बर्फाच्छादित शिखरे स्पष्टपणे नजरेस दिसू लागली. आम्ही दोघेही आनंदाने , भरल्या मनाने ती पाहू लागलो. हिमांशूने सांगितले की बऱ्याच महिन्यानंतर आज धुके निवळून ती शिखरे दृष्टीस पडली होती. तो उत्साहाने मला त्यांची नावे सांगू लागला.. त्रिशुल, नंदादेवी, पंचचौली. मला तर किती फोटो काढू आणि किती नको असे झाले होते. पुढे मी एक महिना तिथे असेपर्यंत रोज त्या शिखरांचे दर्शन होतच राहिले.
संध्याकाळी परत येताना तो रस्ता वेगळाच वाटायचा. पाईन वृक्षांच्या त्या जंगलातून जाताना मला सतत लॉर्ड ऑफ रिंग्ज या मूवीमधल्या जंगलाचाच भास होयचा. घरी पोहोचेपर्यंत ७ वाजलेले असायचे व बऱ्याच वेळा घर धुक्यामध्ये हरवून गेलेले असायचे. आमची हद्द सुरु होताच डोरेमोन व त्याचा मित्र आमच्या स्वागताला हजर असायचे. रस्त्यात आजूबाजूला राहणारे कोणीनाकोणी भेटायचे. एक वंदना आणि तिच्या २ लहान मुलांचे घर लागायचे. गप्पा मारत आम्ही यायचो. घरी पोहोचले की मी मस्त चहा बनवून बाल्कनीमध्ये खुर्ची टाकून बसायचे. खालच्या मजल्यावर हिमांशुचा गिटारचा रियाज चालायचा. त्याचे सूर कानावर पडायचे. कधी तो अर्जित सिंगची किंवा हरिहरनची गाणी लावायचा. ती सुरेल गाणी ऐकून मन प्रसन्न होऊन जायचे. घरचा किंवा मित्र-मैत्रिणीचा फोन आला की मी घराचा एक कोपरा पकडायचे. फक्त तिथेच रेंज चांगली असायची आणि मी व्यवस्थित बोलू शकायचे. रात्री कधी ब्रेड ओम्लेट तर कधी दाल खिचडी तर कधी कोणी मशरूम पास्ता बनवायचो. तिथल्या ४-५ घरांची मिळून जशी काही एक चाळच बनली होती. कधीही कोणीही कुणाच्याही घरी जाऊन खायचो, प्यायचो. सगळेजण तिथे मजेत असायचे. कोणी घाईमध्ये , टेन्शनमधे दिसायचे नाही. हिमान्शुचे यावर म्हणणे असे की पहाडावरचे भाज्या, फळे यातच एक प्रकारची शांत उर्जा असते, असे अन्न खाल्ल्याने आणि पहाडाच्या मोकळ्या हवेत राहिल्याने आपोआपच इथे राहणारी माणसेही शांत होऊन जातात.
रात्री झोपताना एक नवीनच समस्या उभी राहिली. तिथे खूप सारे मोठ-मोठ्या आकाराचे कोळी असायचे. रात्र झाली की ते किडे शोधात भिंतीवर यायचे. सुमारे १०-१२ मोठाले कोळी भिंतीवर फिरताना बघून माझी झोपच उडून जायची. एक तर सर्वात मोठ्ठा आणि जाडा, चांगला पंजाएवढा होता. भीतीने मी लाईट पण चालूच ठेवायचे. मी सुशील सरांकडे तक्रार केली त्या स्पाईडर्सची. तर त्यांचे म्हणणे की “They are so innocent. They also get scared because of us. Make friends with them!!” आणि खरेच तसे झाले. काही दिवसांतच माझी भीती जाऊन उलट मला त्यांची सवय होऊन गेली. म्हटलं , उलट आता परत गेल्यावर मी मिस करेन त्यांना.
कधीकधी मला मध्यरात्री जाग यायची. पाहते तर लाईट गेलेली असायची. सगळीकडे मिट्ट काळोख पसरलेला. अशा रात्री आपण पहाडावर एका जंगलाच्या मध्यात एका लाकडी घरात एकट्याच आहोत, या विचारानेच मला भीती वाटायची. काचेच्या खिडक्यांवर मी पडदे ओढून घेतलेले असायचे. परंतु वरती छतावर एक मोठा काचेचा चौकोन होता दिवसा प्रकाश आणि ऊन येण्यासाठी. पण रात्रीच्या वेळी फार भीती वाटायची. किती प्रकारचे प्राणी आपल्या घराच्या अवतीभवती , या छतावर यावेळी फिरत असतील अशा विचारांनी माझी झोप उडायची. मग टोर्च लावून तिच्या उजेडात भीती घालवायचा प्रयत्न करत मी कधितरी झोपी जायचे.
पण अशाच एका अंधाऱ्या रात्री विचार आला की माणसाला आगीचा शोध लागण्याआधी माणूस या पृथ्वीवर, कसा जगत असेल, हिंस्त्र प्राण्यांपासून स्वतःचा बचाव कसा करत असेल. आगीचा शोध म्हणजे APES च्या Evolution मधील किती महत्त्वाची पायरी अथवा Turning point होता हे पहिल्यांदाच जाणवले.





छान लिहिता आहात. त्या एका महिन्यात आलेले अजून अनुभव, तिथे भेटलेल्या माणसांविषयी पण लिहा.
ReplyDeleteधन्यवाद. हो, त्या अनुभवांबद्दल लिहायचे आहे. कामाच्या गडबडीत राहूनच गेले.
Delete